Wednesday, March 29, 2017

गुढी पाडवा व संभाजीराजेंच पुण्यस्मरण !

"औरंगजेबाने ब्राम्हण मंडळींचे सल्ल्याने मनुस्मृतिमधे कथन केल्यानुसार संभाजीराजेना हालहाल करुन ठार केले" हा नवा इतिहास समजावून सांगणारे दोन लेख हे व्हाॅट्स अॅपवर गुढी पाडव्याच्या दिवशीच वाचण्यात आले.

एका लेखाच शिर्षक "गुढी पाडव्याचे गुढ समजावून घ्या" असे होते तर दुसऱ्याच "मृत्युंजय अमावस्या व रक्तरंजित पाडवा" !  या लेखात आलेल्या उल्लेखानुसार औरंगजेबाला धर्मप्रसारात रस नव्हता तद्वत  संभाजीराजेना ठार करण्यामागे धर्मद्वेष हे कारण नव्हते. संभाजीराजेंनी धर्मपरिवर्तनास नकार दिला म्हणुन त्यांना ठार मारले हे चुकीचे असल्यामुळे संभाजीराजेंना घर्मवीर संबोधणे अयोग्य आहे असे लेखात म्हटले आहे.

म्हणजे हुमायून बाबरापासून ते औरंगजेबाच्या आधीपर्यंत आलेले सर्व मुगल राजे हे क्रुर व आक्रमकपणे धर्मप्रचार करणारे असले तरी औरंगजेब तसा नव्हता अस म्हणाव लागेल. तो ब्राम्हणांच्या नुसता आहारीच गेला नाही तर त्यांच्या इतका नादी लागला कि त्यांचे (म्हणजे त्या ब्राम्हणांचे) धर्मपरिवर्तन न करता संभाजीराजेना कस मारायच यासाठी स्वतःच्या दरबारातील मुगल, राजपूत वगैरे सरदारांचा सल्ला न घेतां त्याने थेट या ब्राम्हणांचा सल्ला घेतला असा अर्थ मग काढाव लागेल.

शिवरायांनी अठरा पगड जातीच्या मंडळींना  एकत्र केले व या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्यांची धुरा स्वतःच्या शिरावर घेऊन ती समर्थपणे पेलली.

सदर लेखात म्हटल्याप्रमाणे औरंगजेबाला ही ब्राम्हणमंडळी फितूर झाली व त्यांच्या सल्ल्याने संभाजीराजेंची हत्या करण्यात आली. याचा अर्थ राज्यात अशी फितूरी झाल्याचे खुद्द संभाजीराजेंना किंवा अष्टप्रधान मंडळालाही कळले नाही इतकी राजेंची गुप्त हेर यंत्रणा ढिसाळ होती कि काय ? जर नसेल तर मग अशा फितूर ब्राम्हण मंडळींचा शिरच्छेद किंवा त्यांना कठोर शिक्षा करुन राज्यात योग्य संदेश का नाही दिला गेला ?

संभाजीराजेंचा शारिरिक छळ व अनन्वित अत्याचार करुन त्यांना ठार मारणे व गुढी पाडवा हे दिवस तिथिने एक येणे हा निव्वळ योगायोग आहे. जर यात ब्राम्हण समाजाचा जाणीवपूर्वक सहभाग असला असता तर त्याचवेळी स्वराज्य रक्षणकरत्यांनी या समाजाला लक्ष्य केले असते. ब्राम्हणांची संख्या आज ३% आहेत मग त्याकाळी त्यांची संख्या अशी किती असेल ? संभाजीराजेंच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्या या ब्राम्हण समाजाचे समूळ उच्चाटन करणे त्यावेळी असे कितीसे अवघड होते ?

पण ३५० वर्षांनंतर आज अचानक संभाजीराजे यांचा बलिदान दिवस व गुढी पाडवा यांचा संबंध दाखवितांना हा सण म्हणजे ब्राम्हण मंडळींची बहुजन समाजाच्या मानसिकतेवर असलेली पकड व त्यातून निर्माण झालेले हे सणाचे प्रारुप म्हणजे संभाजीराजे यांचा बलिदान दिन विकृतपणे साजरा करण्याचा प्रकार असल्याची मांडणी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे समाजात दुहीची बीजे नव्याने  पेरण्याचा एक प्रकार असे म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातील सत्तांत्तरानंतर झालेला ब्राम्हण मुख्यमंत्री व त्यानंतर सातत्याने आरक्षणांसाठी निघणारे विविध समाजांचे मोर्चे (काय आणि किती हे योगायोग) व आता गुढी पाडवा या सणाच्या साजरीकरणाला ब्राम्हणी अविष्कार संबोधून त्याचा संभाजीराजे यांच्या बलिदान दिनाशी नेमका आत्ताच संबंध लावण्याचा हा प्रयत्न, हे सगळे ठरवून केलेले किळसवाणे ब्राम्हणद्वेषाचे  राजकारण वाटतय.

अर्थात, याचा संबंध लावण्याला गुढी पाडवा हा हिंदू सण फक्त महाराष्ट्रातच व तोही याच  पद्धतीने साजरा केला जातो अन्यत्र नाही असा एक तर्क लेखात मांडला आहे. पण हिंदू परंपरेतील कित्येक सण साजरे करण्याच्या पद्धती या राज्यनिहाय वेगवेगळ्या  असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे गुढीची प्रथा केवळ महाराष्ट्रातच आहे अन्य राज्यात नाही म्हणुन गुढी हा प्रकार म्हणजे संभाजीराजे याचा बलिदान दिनाचा विकृत अविष्कार असे म्हणून ही मंडळी एक प्रकारच्या विकृत मानसिकतेचे केवळ दर्शनच घडवित नसून या महान राजाला केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित करत आहेत.

गुढी उभारणे याचा संबंध संभाजीराजे यांच्या बलिदानाशी लावायचाच असेल तर ......

औरंगजेबाच्या अत्याचारासमोर किंचितही न झुकणारा व ताठ मानेने उभा रहाणारा व हिंदू धर्माची पताका उंच डौलाने फडकत ठेवणारा एकमेव धर्मवीर हिंदू राजाचे रुप म्हणून या गुढीच्या रुपाकडे का पाहून नये ?

ही गुढीची काठी म्हणजे "न वाकणारा व ताठ", त्यावर लावलेले भगवे उपरणे म्हणजे "हिंदू धर्माची पताका" तर पालथा गडू म्हणजे "मान कदापि न झुकू देणारा" परंतु किंचितशा कलत्या मानेने "शत्रुला आव्हान देणारा" असे धर्मवीर संभाजीराजे यांचेच जणू प्रतिक ! धर्म व हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्याने शारिरिक हाल, यातना सहन केल्या व बलिदान दिले पण कोणतीच तडजोड स्वीकारली नाही अशा राजाला माल्यापर्ण करणे,  गुढीला हार घालणे व त्यांच्या चरणी फुले वाहणे म्हणजे या "गुढीरुपी संभाजीराजेंच्या चरणी संपूर्ण नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त करणे" होय.

अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवुन वेगळी अर्थमांडणीही करता येईल. आज नकारात्मक अर्थमांडणी करुन समाजात दूही निर्माण करणे हे सोप आहे पण गरज आहे ती सगळे मागे सोडून समरसतेकडे वाटचाल करण्याची ! पहा पटतय का !

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment