Sunday, January 7, 2018

७/१/१८ च्या बैठकीचे इतिवृत्त

नमस्कार !

बैठकीचे इतिवृत्त

आज ७ जानेवारी २०१८, ज्या दिवसांची आपण सगळेच जण वाट पहात होतो तो दिवस ! पुण्यात सिंहगड रोडवर माणिकबाग येथील सिद्धार्थ हाॅल येथे बैठकीचे आयोजन केल होत व सुमारे ६५ जणांची उपस्थिति गृहित धरली होती. ऐन वेळच्या अडचणी, घरगुती समस्या, किंवा प्रकृतीअस्वास्थ्य यामुळे अनेक मंडळींना प्रबळ इच्छा असूनही त्यांचे येणे शेवटच्या क्षणी रहित करावे लागले. जे येऊ शकणार नव्हते त्यांच्या शुभेच्छा पाठिशी होत्याच परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक सदस्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती.

या पार्श्वभूमिवर आजच्या बैठकीला ३५ सदस्यांची उपस्थिति ही नुसती आशादायक नव्हे तर आपल्या नियोजित प्रकल्पाची भक्कम पायाभरणी करणारी ठरली हे नमूद करतांना मनस्वी आनंद होत आहे. एक विशिष्ट संकल्पना डोळ्यापुढे ठेवली आणि त्यासाठी एक व्हाॅट्स अॅप ग्रुप स्थापन करुन ज्या अॅडमिन मंडळींनी पहिले पाऊल टाकले त्या अॅडमिन मंडळींनी सर्वप्रथम आपआपला परिचय दिला. उपस्थित सगळेजण पहिल्यांदाच एकमेकांना पहात होते, भेटत होते त्यामुळे अॅडमिन मंडळींच्या परिचयानंतर उपस्थित प्रत्येक सदस्याने आपआपला परिचय करुन दिला.

मिटिंगची सुरुवात अॅडमिन सौ विद्या कुळकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. आपले मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या कि आर्थिक सुबत्ता ही प्रत्येकालाच हवी असते. ब्राह्मण व्यक्ति ही व्यवसाय करु शकत नाही हा भ्रम आहे. आपल्या कृतीने आपण हा दूर करुन दाखवू. यशस्वी उद्योजक होतांना आपल्या बांधवांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ देऊ असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतामधे व्यक्त केला.

श्री जयंत मुळे यांनी विचारांना चालना देणारा वेगळा व सकारात्मक दृष्टिकोण सदस्यांपुढे मांडला. गरीबीत जीवन कंठणारी ब्राह्मण मंडळी, मुले परदेशात असणारी वृद्ध मंडळी यासारख्या घटकांचाही विचार आपल्या कार्यात असावा. आपला समाज सुशिक्षित आहे व विविध क्षेत्रात नैपुण्य असणारा आहे. त्यांच्या हुषारीचा, कौशल्याचा आपल्यातील गरजवंतांसाठी कसा उपयोग करुन घेता येईल यावर योजना तयार व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

सदस्यांनी आपले मत मोकळेपणाने मांडतांनाच एकमेकांची मते, विचार  समजावून घ्यावीत असा विचार श्री प्रसाद कुळकर्णी यांनी मांडला तर श्री नांदेडकर यांनी प्रत्येकाने किमान एक तास आपल्या समाजासाठी द्यावा असे आवाहन करतांना आपल्या बैठकीत झालेले निर्णय, चर्चा या आपआपल्या भागात, गावात असलेल्या अन्य सभासदांपर्यंत कळविण्याची सूचना केली.

आजकाल सर्वत्र आवश्यक बनलेल आधार कार्ड, त्याचा उपयोग आपणही सदस्यांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी करावा व एका छापील फाॅर्मवर सदस्य व त्याच्या कुटूंबाची सविस्तर माहिती आपल्या रेकाॅर्डवर ठेवावी अशी महत्वाची सूचना श्री दिलिप कुळकर्णी यांनी मांडली. श्री दिनेश तांबोळी यांनी आपल्यापैकी उद्योजक मंडळींना त्यांची उत्पादने आपल्या बांधवांसमोरही आणली जावी असा उपयुक्त प्रस्ताव मांडला.

श्री सतिश पुरंदरे यांनी महत्वाच्या म्हणजे आर्थिक विषयाला हात घातला. त्यांनी कल्पना समजावून सांगतांना आपण प्रायव्हेट लि. कंपनी तिचे पेडअप कॅपिटल वगैरे .. या धर्तीवर आपला ढाचा असावा असे म्हटले. सदस्यांना मदत / निधी देतांना नाॅन फंड बेस बँक गॅरंटी घ्यावी असे सुचविले. तसेच निधि संकलन व त्याचा विनियोग यावरही मत मांडले. तर श्री किरण दिक्षित यांनी निधीेच्या वाटपाचे नियम व निकष ठरवितांना क्रेडिट सोसायटीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल असा विचार मांडला.

श्री सिद्धार्थ बर्वे यांनी आपल्या "ब्राउनि"ने भांडवल पुरवठा करतांना त्या त्या उद्योगांशी ठराविक मुदतीसाठी भागीदारी करावी व भांडवलाची परतफेड झाल्यानंतर त्या उद्योगातून बाहेर पडावे अशी कल्पना मांडली. श्री चितळे यांनी आपआपल्या ओळखीतून सदस्यवृद्धिसाठी प्रयत्न करावा तसेच व्यवसाय विस्तार व नविन व्यवसाय असे ध्येय ठेवणाऱ्यांना मदतीचा हात द्यावा असा विचार ठेवला. सौ स्नेहल कुळकर्णी यांनी सभासद संख्यावाढीसाठी कार्य करण्यावर भर दिला. चाकोरीबद्ध जीवनाच्या चौकटीतून बाहेर पडून तरुण वर्गाने व्यवसायासाठी पुढे यावे व त्यासाठी प्रक्षिक्षण देण्यापासून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
सौ स्नेहल कुळकर्णी या आॅटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असून अशा प्रकारचे सामाजिक कार्य त्या करत आहेत.

श्री प्रविण नामजोशी यांनी पितृसंस्था उद्योजक विकास प्राधिकरण ही कल्पना विस्ताराने मांडली व श्री संकेत रोहगावकर यांनी त्याला सहमती दर्शविली. श्री शार्दुल जोशी हे कंपनी सचिव असून त्यांनी संघटना बनवितांना एक समिति बनविण्याची सूचना केली व सदस्य संख्येच्या वाढीनुसार समितिचा विस्तार करता येईल असे सांगितले. श्री संतोष करमरकर यांनी कंपनी अॅक्टच्या सेक्शन ८ वर आधारित आपली नियोजित संस्था आकाराला येऊ शकते का ? असा प्रश्न मांडून त्या अनुषंगाने काय करता येईल ? असे विचारले असता श्री तेजस पाटणकर यांनी हे कलम काही बाबतीत कसे अडचणीचे ठरते ते समजावून सांगितले.

श्री हेमंत कुळकर्णी, मनिष पाठक तसेच उपस्थित भगिनिंनी चर्चेत सहभागी होतांना चांगले मुद्दे, सुचना सादर करत आजच्या बैठकीत भरीव योगदान दिले. एकंदरित जी संस्था आपण स्थापन करण्याचा संकल्प करत आहोत त्याला घटना असावी यावर सगळ्यांचे एकमत झाले. या संस्थेचे स्वरुप प्रायव्हेट लि. असावे कि सहकारी संस्था ? या संस्थेने चॅरिटी करावी, देणगी द्यावी कि कर्ज ? तोटा झाला तर त्याचे काय करायचे ? या व यासारख्या अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळीशी चर्चा करण्यासाठी व त्याआधारे काही ठोस अंतिम पर्याय निवडण्यासाठी एक कोअर कमिटी स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले.

त्यानुसार उपस्थित सदस्यांपैकी स्वेच्छेने खालील सदस्यांनी या कोअर कमिटीत आपले योगदान देण्यासाठी संमती दर्शविली आहे. "हंगामी नियंत्रक समिती" असे समितीचे नामकरण झाले असून सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१ जयंत मुळे
२ विद्या कुळकर्णी
३ प्रसाद कुळकर्णी
४ राम वैद्य
५ श्रीकांत वाकणकर
६ बिंदुमाधव भुरे
७ मनिष पाठक
८ समर्थ फणसळकर
९ सारंग नांदेडकर
१० संदीप स्वामी
११ सिद्धार्थ बर्वे
१२ योजना सुपेकर
१३ संगिता पुरंदरे
१४ प्राची बापट
१५ मुग्धा कुळकर्णी
१६ दिनेश तांबोळी
१७ संकेत रोहगावकर
१८ संतोष करमरकर
१९ सुधीर कौलगुड

या हंगामी समितीची पुढील बैठक लवकरच होईल. जे सदस्य आज येऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या सुचना वादविवाद टाळण्यासाठी आपल्या ग्रुपवर न टाकता अॅडमिनपैकी कोणाकडेही व्यक्तिगत पाठवाव्यात. आजच्या बैठकीनंतर उपस्थित सर्व सदस्यांचा निर्धार हा आता दृढनिश्चयात परावर्तित झाला आहे हे नक्की, अर्थात प्रत्येक सदस्यांच्या शुभेच्छा त्यामागे एक अदृश्य शक्तीच्या स्वरुपात होत्या म्हणूनच हे शक्य झाले. बैठकीचे हे इतिवृत्त आपल्यासमोर ठेवतांना आम्हा अॅडमिन मंडळींना अतिशय आनंद होत आहेत.

शेवटी श्री प्रसाद कुळकर्णी यांनी या बैठकीच्या यशस्वितेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचे आभार मानले. हे इतिवृत्त बैठक सुरु असतांना लिहून काढले त्या आपल्यातील सगळ्यात ज्येष्ठ अशा श्री वाकणकरांचे विशेष आभार ! बैठक खास ब्राह्मणी भोजनाच्या आस्वादानंतर संपली.

आपले स्नेहांकित,

श्री जयंत मुळे
श्री संतोष करमरकर
श्री किरण दिक्षित
श्री श्रीकांत वाकणकर
श्री प्रसाद कुळकर्णी व
सौ विद्या कुळकर्णी.