Saturday, July 22, 2017

कर्ज काढून २४ तास पाणीपुरवठा कशाला ?

पुणे शहराला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी २४०० कोटी रुपयांची रक्कम, म्हणजे दरडोई ₹६,०००/- (४० लाख लोकसंख्या गृहीत धरुन) कर्जाच्या माध्यमातून उभी करण्याचा पुणे मनपाचा निर्णय काही पक्षांचा विरोध असूनही तो राबविण्याचा ठाम निर्धाराच्या पार्श्वभुमिवर मनात काही प्रश्न निर्माण झाले.

१) २४०० कोटी रुपयांचे कर्ज अगदी १५ वर्ष मुदतीचे आहे असे मानल्यास दरवर्षी मुद्दल म्हणून १६० कोटीची + व्याज अशी परतफेड आवश्यक ठरते. (खर्च प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त होण्याची शक्यता अधिक आहे)

२) या कर्जाचा बोजा नागरिकांवर पडू देणार नाही याची ग्वाही सत्ताधारी देत असले तरी दरवर्षी पाणीपट्टीत वाढ करण्याचे नियोजन आहे. पण मुळात मुद्दलाचे १६० कोटी + व्याज इतकी वार्षिक परतफेड करण्याइतका शिलकी अंदाजपत्रक पुणे मनपाचे आहे का ?

३) रस्ते, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन यासारखे प्रश्न तसेच पुणे मनपा हद्दीच्या आसपासच्या गावांमधे अनेक मुलभूत सुविधांची वानवा असतांना २४ तास पाणी पुरवठ्याच्या चैनीसाठी या कर्जाचा अट्टाहास म्हणजे पैशांची उधळपट्टीच नाही का ?

इथे तर इतरही अनेक मुद्दे विचारात घेणे आवश्यक ठरते. जसे.....

१) २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची उपलब्धता ही सर्वस्वी मान्सून पावसावर अवलंबून आहे. तो पुरेसा पडला नाही तर ?

२) गेली काही वर्ष अधूनमधून पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना पाणीबचतीचे धडे सतत दिले जातात. पुणेकरांच्या दरडोई पाणीवापरावरही विविध माध्यमातून व राज्यकर्त्यांकडून झालेली टीका आपण ऐकतो.

३) धरणातून पुणे मनपा ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्ती पाणी उचलते म्हणून एकिकडे पाटबंधारे खात्याची तक्रार तर पुरेसे व पुरेश्या दाबाने पाणीपवरवठा होत नाही म्हणून नागरिकांची तक्रार !

४) अवैध नळजोड कनेक्शनवर तर कोणाचेच नियंत्रण नाही.

५) मीटरद्वारे पाणीपुरवठा म्हणजे मीटर रिडिंग, बिलिंग त्याची वसूली यासाठी स्वतंत्र यंत्रणा व त्याचा कायमस्वरुपी खर्च.

६) मीटर बिघडणे, सदोष मीटर यामुळे बिलाच्या रक्कमेबाबद वादाचे प्रसंग निर्माण होेणे. वगैरे वगैरे ...

या पार्श्वभूमिवर ही कर्ज उभारणी म्हणजे  "रुण काढून सण साजरे करणे" आहे कारण २४ तास पाणीपुरवठा ही निव्वळ चैन आहे. या मागणीसाठी नागरिकांनी निवेदने दिली किंवा आंदोलने केली असे काही ऐकिवात नाही. किंबहुना, पुण्यातील बहुसंख्य नागरिकांची "एकवेळ पाणी द्या पण पुरेशा दाबाने द्या" अशी मागणी आहे.

यासाठी आवश्यक आहे २४ तास नव्हे तर  "समान पाणीपुवरवठा योजनेची !" पुणे शहराची ऊंच व सखल रचना लक्षात घेऊन सडलेल्या व जुन्या पाईपलाईन्स बदलून नविन लाईन्स शास्त्रीय पद्धतिने टाकण्याची गरज आहे जेणेकरुन पाणी गळतीमुळे होणारे प्रचंड नुकसान टळेल व समान पाणीपवरवठ्याच्या नियोजनामुळे सगळ्यांना पुरेसे पाणी मिळेल. मीटर व त्या यंत्रणेवर कायमस्वरुपी खर्चाची गरज उरणार नाही. या कामासाठी २४०० कोटीची गरज नाही. स्वतःच्या आर्थिक ताकदीवर पुणे मनपा हे करु शकेल.

स्वबळावर सत्तेवर येणे ही चांगली गोष्ट आहे, नंतरची ५ वर्ष कोण सत्तेत येईल हे काळ ठरवेल. मतांच्या राजकारणासाठी नागरिकांवर करवाढ लादली नाही तर विकासकामासाठी निधी येणार कोठून ? निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी मग कर्ज उभारणीचा मार्ग स्वीकारायचा.

पण स्वतःच्या कार्यकाळात उभारलेले कर्ज स्वतःच्याच कार्यकाळात फेडता येईल इतकीच रक्कम उभी करण्याची मर्यादा असावी. त्याचे ओझे नंतर येणाऱ्या सत्ताधारी पक्षावर पडू नये व जनतेवर तर बिल्कुल पडता कामा नये. कारण "परतफेडीची क्षमता" हा मुद्दा महत्वाचा आहे मग ती व्यक्ति असो वा संस्था !

"परतफेडीची क्षमता" नसेल तर सामान्य व्यक्तीला कर्ज नाकारणाऱ्या बँका पुणे मनपाला एक संस्था म्हणून एका क्षणात २०० कोटी देतात व याची दखल राष्ट्रीय पातळीवर कौतुकाने घेतली जाते हे विशेष. कर्ज हे शेवटी "कर्ज" आहे ते "उत्पन्न" नाही.  विकसनशील देशाच्या अर्थनीतिनुसार विकासाची ही नविन व्याख्या तर नाही ?

बिंदुमाधव भुरे.

वरील लेख महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीमधे १९.७.२०१७ रोजी प्रसिद्ध झाला.

Tuesday, July 4, 2017

आठवणी

आठवणी ... निमित्त पावसाच !

वळवाचा पाऊस संपून आषाढात पडणाऱ्या मान्सूनची सुरु झालेली रिमझिम ! आसमंतात गर्दी करुन असलेले काळे ढग जणू वसुंधरेला प्रश्न करतायत "शांत झालीस कां ?" 

रविवारचा दिवस, कसलीही घाई नाही. हाफ कव्हर्ड टेरेसवर बसून गरमागरम अफ्रेशचे घोट घेत वर्तमानपत्र चाळत निवांत बसायच किंवा लांबवर असलेल्या नारळीच्या झाडाच्या फांद्यांमघून डोकावणारा आणि रिमझिम सरींमुळे धूसर दिसणारा  सिंहगडावरचा दूरदर्शनचा मनोरा पहायचा. रिटायरमेंट नंतर असे क्षण निवांतपणे एन्जाॅय करायचे हे स्वप्न ! आज ते प्रत्यक्षात अनुभवत असतांना एक वेगळात आनंद होत होता.

 

काय गंमत आहे पहा अशा वेळी  रिलॅक्स मूडमधे असतांना आपल मन अनेक विचार, ताणतणाव यापासून आपल्या नकळत निसर्गाशी एकरुप होण्याच्या प्रयत्न करत असते आणि म्हणून कि काय, मनात अन्य कसलेच विचार येत नाहीत. ग्रीष्मातली तप्तता, वातावरणातील धूरळा प्रदूषण सारे कसे हा पहिला पाऊस एका क्षणात दूर करुन वातावरणात टवटवीतपणा, प्रसन्नता घेऊन येतो. निसर्गाच हे रुप पहातांना मग मनाने तरी का बर आपली चंचलता, अवखळपणा सोडून शांत, स्थिर होऊ नये ?

 

एव्हाना पाऊस थांबला होता. टेरेसवरुन दिसणाऱ्या घरामागच्या पत्र्याच्या बैठ्या घरातून लहान मुलांचा गलका ऐकू येऊ लागला म्हणून खुर्चीतून टेरेसच्या कठड्यालगत येऊन पाहू लागलो. लहानपणीच्या आवडत्या खेळात मुले दंग होती. आजूबाजूला साठलेल्या पाण्यात त्यांचे कागदी होड्या बनवून सोडणे चालू होत. हे दृश्य पाहता क्षणी जगजितसिंग चित्रासिंग यांची मला आवडणारी एक गजल मनाच्या गाभाऱ्यात नकळत डोकावून गेली. 

 

"ये दौलत भी ले लो

ये शोहरत भी ले लो

भले छीन लो मुझसे मेरी जवानी

मगर मुझको लौटा दो

बचपन का सावन

वो कागज की कश्ती

वो बारीश का पानी"

 

गजल गातांना जगजित-चित्रा या दोघांच्याही स्वरातली आर्त व्याकूळता आपल्याला भूतकाळात नेते व बालपणातल्या रम्य आठवणीत मन तरंगू लागते. आपणही कधी ना कधी हा आनंद मनसोक्तपणे उपभोगलेला असतो. पण आज कितीही किंमत मोजली तरी ते दिवस परत नाही आणू शकत. नेमका हाच भाव जगजीत-चित्रा यांच्या मखमली स्वरातून थेट आपल्या ह्रदयाला भिडतो व नकळत पापण्या ओलावतात. का बरे या "आठवणी" याव्यात ?

 

"आठवणी",....विश्वनिर्मात्याने निर्माण केलेली सगळ्यात अद्भुत गोष्ट !

आपल्याच लहानपणीचे ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो पाहताना किवा मुलांना त्या आठवणी सांगतांना किती नोस्टॅल्जिक व्हायला होते ते वर्णन करून नाही सांगता येणार !  शाळेतला एखादा गॅदरिंग चा फोटो ! फोटोत फक्त त्यावेळीचा तो क्षण दिसत असतो पण फोटो पाहतांना मात्र मनात त्यावेळेच संपूर्ण गॅदरिंग जसेच्या तसे उभे राहते ना ? त्या वेळेचे मित्र, वर्ग शिक्षक, त्या वेळी केलेली धमाल किवा खाल्लेला मार ... काहीही !

आई वडील असोत व आजी आजोबा ! जर आज “फोटोत” असतील तर मन शांत करून त्यांच्या फोटोपुढे एकटक फक्त एक मिनिट बघत रहाव. जे काही या एक मिनिटात मनामध्ये येईल ते व्यक्त करता येईल का ?

हे सगळे असे प्रसंग मनात साठवायला आजच्या काॅम्पुटरच्या भाषेत  "किती जीबी" जागा लागेल ? नाही सांगता यायच ! पण अशा आठवणी जाग्या व्हायला "एक फोटो" म्हणा किवा "पाण्यात होडी" सोडायचा एक प्रसंगही पुरेसा ठरतो.

 

अशाच पावसात जर अचानक किशोरकुमारचे “रिमझिम गिरे सावन”चे ओले चिंब करून टाकणारे स्वर कानावर पडले तर मनात उठणारे तरंग आणी उत्कट भावना आठवणींच्या वेगळ्या विश्वात घेऊन जातात तर “याद पियाकी आये” चे सूर मग ते बडे गुलाम अलींचे असोत वा बेगम अख्तर अगर कौशिकी चक्रवर्ती चे ! मन घायाळ करणाऱ्या आठवणी या सुरांमुळे मनाच्या दडलेल्या कोपऱ्यातून उसळी मारून बाहेर येतात अन जुन्या आठवणींच्या जखमेवरची खपली अलगद निघून येते !

 

त्या न वाहणाऱ्या पाण्यात त्या मुलाच्या १०-१२ होड्या बनवून सोडणे झाले होते. बाजूच्या कचऱ्यात पडलेल्या ओल्या खराट्याच्या एका काडीने मुलांचा त्या होड्या चालविण्याचा प्रयत्न चालू होता तर काही जण त्याच्याच शेजारच्या बाजूला साठलेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारून पाणी एकमेकावर उडवत धमाल एन्जाॅय करत होते.

तेव्हड्यात टेरेसच दार उघडल अन गरम वाफाळलेल्या कांदापोह्याचा खमंग वास दरवळला. हातात पोह्याचा ट्रे घेऊन सौ उभी होती अन मी आठवणीच्या फ्लॅशबॅकमधून मी बाहेर पडलो.

बिंदुमाधव भुरे