Sunday, March 31, 2019

विलिनतेतून एकात्मकता

*विलिनतेतून एकात्मकता*

आप आपले संसार थाटलेल्या मुलांच आपल एक विश्व तयार झाल. या भावविश्वात ती रमली. लहानपणी रोज होणाऱ्या गप्पा, खेळणे, भांडणे, रुसवे फुगवे या कालांतराने आठवणी बनून गेल्या. कधी काळी एकमेकांच्या बऱ्या वाईट प्रसंगात, सुख दुःखात सहभागी होणारे, एखाद्याच्या पायात काटा टोचला तर इतरांच्या डोळ्यात पाणी दाटणारे आज अस काही कळाल कि त्यांचा आपसात चौकशीचा फोन होतो. *नात्यातला ओलावा आपुलकी प्रेम प्रसंगानुरुप प्रकट होते.* माध्यम असत कधी प्रत्यक्ष भेट, कधी फोन तर कधी व्हॉटस् अप ! *प्रसंग काय यावर आणि आपल्याला सोइच काय यावर सार काही ठरत असत.*

थोरल्याकडे असलेल्या थोरलेपणामुळे आणि सगळ्यांना समजून व सामावून घेण्याच्या स्वभावामुळे सणासुदीला त्याच्याकडे एकत्र येण ठरलेल ! प्रसंगी एखादा मुक्कामही होतो. तेव्हा मात्र सहवास घडतो आणि गप्पांमधून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि मग आपआपल्या सवयीत बदल झाल्याच जाणवत. *विचार करण्याची पद्धत अन् त्याला अनुकूल वागण्यातून येणाऱ्या प्रतिक्रीया यामधे आलेले वेगळेपण सुखद स्वीकारार्ह असत तर कधी ते खटकणार, न पटणार असत.*

आज मात्र बदललेल्या परिस्थितीत *दोन्ही धाकली पाती  आपल घर सोडतायत. आपल सर्वस्व घेऊन थोरल्याकडे कायमच येतायत. यामुळे घराच्या चौकटीला आणखी मजबूती येणार आहे.* या एका छताखाली एखादी रात्र काढणे वेगळ आणि कायमस्वरुपी रहायला येण वेगळ. आपल वेगळेपण त्यागण्यासाठी मनाची तयारी झाली असली तरी धाकल्यांना आता त्यांची मानसिकता बदलावी लागेल. *या घरातील रीती व पद्धतीनुसार आपल्या जुन्या सवयीत परिवर्तन घडवून आणावे लागेल तर थोरल्याला हे परिवर्तन सुखद होण्यासाठी कधी तडजोडीची तर कधी कठोर भुमिका स्वीकारावी लागेल* आणि आपसी नात्यातली ही नव्याने घातली जात असलेली वीण भक्कम राहील हे पहावे लागेल. *एकत्र येतांना विलिनीकरणाच एक सूत्र नकळत तयार होत असत.* यातून निर्माण होत असलेल्या नात्यात *समरसता आली कि प्रत्येकाचे असलेले वेगळेपण गळून पडत* अन् एकच ओळख ठळकपणे सगळ्यांपुढे येते.

जसे *बीज तेच असल तरी त्या बहरलेल्या आम्रवृक्षाच्या फळांच्या चवीत विविधता असते.* एखाद गोड, एखाद कमी गोड किंवा जरा आंबट ! अर्थात या प्रत्येक चवीचे आपल आगळ एक वैशिष्ट्य आहेच. पण सगळ्यांचा रस एकत्रित केल्यानंतर त्याची गोडी वेगळीच असते. कमी गोडीच्या आणि जरा आंबट असलेल्या फळालाही गोड फळाचा *सहवास लाभला कि बदल घडून येतो* आणि त्या रसाच्या गोडीत हे घटक विलीन होतात.

*आज विजया आणि देना यांचा विलय होतोय. एका उज्ज्वल भवितव्यासाठी आपले वेगळेपण ते बँक ऑफ बरोडात विलीन करतायत. त्या समरसण्यातून एक आगळी-वेगळी ही गोडी निर्माण होईल व ती सगळ्यांना भावेल अशी अपेक्षा बाळगत त्यांनी यशाची नवनविन शिखरे सर करावीत यासाठी शुभेच्छा देऊया !*

© बिंदुमाधव भुरे, पुणे.
९४२३००७७६१ (what's app)
८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Wednesday, March 27, 2019

रिव्हर्सल डीबीटी योजना

*डीबीटी रिव्हर्सल योजना* (एक गंमत 😊😊)

*प्रिय तळागाळातील गरीब नागरिकांनो,*

*४८ वर्ष झाली त्या घोषणेला !* आता बास झाले गरीबीत रहाणे. या देशातील *गरीबीवर शेवटचा प्रहार 🤺🤺 करुन तिचा समूळ नायनाट* आता आम्ही करणार आहोत. रोजंदारीवर काम करणारे बांधकाम मजूर, गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन्स, शेतमजूर, हमाल, माथाडी कामगार, घरेलू कामगार, हॉटेल कामगार *(इतके प्रकार असल्याचे मला नुकतेच कळाले 🤔🤔)* आणि असे विविध क्षेत्रातील माझे सगळे असंख्य गरीब देशबांधव, माता-भगिनी यांना तुटपूंजी कमाई / रोजंदारी / पगार रोखीत मिळत असतो पण त्याची बऱ्याचदा कुठेही नोंद नसते. या सगळ्यांची गरीबी कायमस्वरुपी संपवून मी *त्यांना न्याय ⚖देणार आहे.*
🤭🤭

अशा मंडळींनी फक्त एक करायचय. आमच्या स्थानिक एजंटकडे बेरोजगार म्हणून *गुपचूप 🤫🤫*
*नोंदणी करावी.* (ता.क. :- जिल्हा, तालुका व गावपातळीवर आकर्षक कमिशनवर एजंट नेमणे आहे. संपर्क - स्थानिक अध्यक्ष डीबीटी रिव्हर्सल कक्ष, खांग्रेस) बेरोजगार असल्याचे (खोटे) शपथपत्र, आधार कार्ड व आधार जोडणी केलेला खाते क्रमांक असे तीन डॉक्यूमेंट व ३ फोटो आणावेत. नोंद झालेल्यांना काही अटींवर आम्ही वर्षाला ७२,०००/- देऊ. *आश्चर्य वाटतय ना ? कि शॉक बसला ? 😳😳 (असा शॉक आम्ही पहिल्यांदा दिला त्याला आता ४८ वर्ष झाली) अहो माझी ही योजना आहेच मुळी भन्नाट !* 😂😂

हे पैसे थेट बँक खात्यात डीबीटी योजनेअंतर्गत जमा होतील. पण (आपण कामधंदा, रोजंदारी वा नोकरी करत असूनही) खोटे प्रमाणपत्र देत असल्यामुळे तुम्हाला दंड आकारला जाईल व या *जमा पैशातील काही हिस्सा दंड म्हणून आपल्या बँक खात्यातून परस्पर वळता केला जाईल.* आपल्या बँक खात्यातून तसे पैसे कापण्याचा अधिकार देणारा इसीएस चा एक फॉर्मही वरील तीन डॉक्युमेंट्स सोबत सही करुन द्यावा लागेल. *यालाच म्हणतात डीबीटी रिव्हर्सल !* पण मग तुमचा काय फायदा ? असा प्रश्न पडलाय न ? 🙄🙄काळजी नका करु, सांगतो .... ! 👇👇

*क्रिकेटमधे रिव्हर्स स्विंग असतो ना अगदी त्याच धर्तीवर ही दंडवसुलीची डीबीटी रिव्हर्सल योजना* मला सुचली आहे. *(क्रिकेटमधे रिव्हर्स स्विंगमुळे फलंदाज फसतो.)* माझ्या गरीब मित्रांनो, काळाप्रमाणे आम्हीही बदलतोय. पूर्वी रुपया दिला तरी १५ पैसेच गरीबाच्या हातात पडायचे (आताही तेवढेच खात्यात रहातील. फरक इतकाच कि ) आता *आधी शंभर जमा होतील आणि मग पंच्याऐशीचे डीबीटी रिव्हर्सल !* आमच्या पुर्वजांना खोटे पाडणारे कोणतेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. ही आहे विन विन सिच्युएशन ! *तुम भी खुष हम भी खुष !*😬😬

या देशाच्या (सरकारने) श्रीमंत (केलेल्या) तिजोरीत कित्येक लाख कोटी 💰💰गेल्या ३-४ वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. *श्रीमंत उद्योगपती पैसा लूटतात आणि आपल्याला (हिस्सा न देता) ठेंगा दाखवून पळून जातात.* त्या तिजोरीवर आपणही हक्क सांगणार आहोत. 🗝🗝तुम्ही मला एक संधी द्या. *मला तुमचे हाल, दैन्यावस्था पाहवत नाही. आणि गेली ३-४ वर्षे मी पण ही भयानक गरीबी स्वतः कुटूंबासमवेत अनुभवतो आहे, सोसतो आहे.* 😭😭आपण जगाला दाखवून देऊ कि दोन गरीब एकत्र येऊन एकमेकांना कशी मदत करतात ते !
*तुम्ही संधी दिल्यास (माझ्या कुटूंबाच्या) गरीबीवर* अखेरचा व निर्णायक हल्ल्याची ही योजना येत्या जून नंतर टप्प्याटप्प्याने सुरु होईल.

६४ वर्षांपूर्वी श्री ४२० मधे हीरो राजकपूर गरीबांना शंभर रुपयात घराच स्वप्न दाखवतो. 🏡🏡गरीब मंडळी, भांडी कुंडी विकून, पै पै जमवून त्याच्याकडे मोठ्या विश्वासाने पैसे सोपवतात *(आणि कंगाल होऊन भिकेला लागतात)* पण काळ बदलला आहे, आता तुम्ही असल काही करायच नाही  उलट मीच तुम्हाला पैसे देणार आहे. (म्हणजे पुनः इथेही रिव्हर्सल आहे.😂😂) *तुम्ही त्याबदल्यात फक्त एक बटण दाबायच आहे.*🖕👆

तुमचाच (पण परिस्थितीमुळे) गरीब असलेला,

लुच्चारुल धांगी
अ.भा. खांग्रेस अध्यक्ष

ता.क. याचा धागा कृपया राजकारणाशी जोडू नये. Just Read & Enjoy 😂😄😁😀

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

Thursday, March 21, 2019

बच्चनराज

*बच्चनराज*

जंजीर, दीवार, डॉन, शोले मधला बच्चन आम्हाला आवडला होता. अन्याय करणाऱ्या, शोषण करणाऱ्या सामाजिक व्यवस्थेविषयी संताप व्यक्त करणारे अँग्रेशन आम्हाला भावल होत. प्रेक्षक ते कुठेतरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी कनेक्ट करायचे. त्याच्या खर्जातल्या आवाजातल्या डायलॉग डिलिवरीवर आम्ही जाम फिदा होतो. त्याच्या आवाजात असणाऱ्या जबरदस्त कॉन्फिडन्समुळे मरगळलेल्या मनाला एक वेगळाच हुरुप मिळायचा आणि बस्स आता सार काही ठीक होणार अस वाटून मन आश्वस्त व्हायच. चुपके चुपकेतली हलकी फुलकी कॉमेडी जितकी आवडली तितकाच नमकहलाल मधला आपल्या दद्दूवर प्रेम करणारा, धन्याचे प्राण वाचविणारा इमानदार सेवक व त्याच्याआड दडलेला नकलाकारही !

पण नंतर एक काळ असा अवतरला कि बच्चन पहावेना. *आपण काहीही केल तरी लोकांना ते आवडेल असा फाजील आत्मविश्वास* त्याच्या चित्रपटातील वावरण्यातून जाणवत होता. खर सांगतो वेगळ्या धाटणीत उभा केलेला विजय दिनानाथ चौहान तेव्हा मनापासून नव्हता आवडला. अन् देशप्रेमी, महान, अजूबा वगैरे पाहिल्यावर ठरवल कि बास आता आणखी बच्चनची फालतुगिरी पहाणे नाही. *आपणच सेट केलेला बेंचमार्क पाळला नाही* तर पब्लिकच्या टाळ्या, शिट्ट्या राहिल्या दूर आख्खी इंडस्ट्री तुमच नाण आता वाजत नाही समजून तुम्हाला पर्याय शोधू लागते. एक कलाकार म्हणून त्याच्या कुवतीबाबद, क्षमतेबाबद कोणालाच शंका नव्हती पण *चूकतय म्हटल्यावर मायबाप प्रेक्षकांनी पाठ फिरवली.*

परवा टीव्हीवर मनसेचे सर्वेसर्वा राजसाहेबांच लाइव्ह भाषण ऐकतांना माझ्या मनात उगाचच बच्चन डोकावत होता. आपले पिक्चर्स चालत नाहीत म्हणून गोंधळून जाऊन नसत्या दिग्दर्शकाच्या नादी लागत हातात पडलेल दर्जाहीन स्क्रिप्टवर बच्चन बरळला तर कस वाटेल तस काहीस भाषण ऐकतांना भासत होत. *अभ्यास करुन विषय मांडणी करणारा, आपल्या भुमिकेशी ठाम रहाणारा मनस्वी नेता* म्हणून प्रथमदर्शनी मनात ठसलेल्या प्रतिमेला तडे पडण्यास पूर्वीच सुरुवात झाली होती. माणूस एक एक पायरी चढतांना प्रत्येक पायरीगणिक एक उंची गाठत असतो तेव्हा लोकांच्या अपेक्षाही उंचावत असतात. मात्र वर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येत कि या पायऱ्या घसरगुंडीच्या होत्या. आता त्यावर बसायच कि नाही हे ठरविण्याचा विवेक हरवून कस चालेल ?

चित्रपट असो कि राजकारण .. *जनतेचा कौल लक्षात घेऊन वेळीच आपली दिशा कोणती असावी हे ठरवावे लागत* अन्यथा घसरगुंडी अटळ असते! त्यानुसार घेतलेल्या माघारीचा निर्णय हापण एक प्रकारचा विजय आहे हे ठसवण्याचे कौशल्य एका ठाकरेंनी चतुराईने साधल. मात्र त्याचवेळी दुसऱ्या ठाकरेंनी घेतलेल्या विचित्र भुमिकेतून निर्माण झालेला विरोधाभास हा स्वतःच्या प्रतिमेला जात असलेले तडे आता सांधण्यापलिकडे गेल्याच द्योतक होता कारण मोदी शहा विरोधात केलेल्या आवाहनाला उपस्थितांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात नेहमीचा जोश उत्स्फुर्तपणाचा अभाव स्पष्ट दिसत होता. *आपण जे काही करतोय ते आपल्या चाहत्यांना आवडत नाही हे बच्चनने ओळखले आणि आपल्या भुमिकेत बदल केला. त्यामुळे बदलेला बच्चन आम्हाला आजही तितकाच आवडतो.*

©बिंदूमाधव भुरे, पुणे.