Friday, June 26, 2020

खंडित वारीचे वारकरी











खंडित वारीचे वारकरी

 

दिवे घाट ... पुण्याहून पंढरपुरच्या दिशेने जाणारा माऊलींच्या पालखीचा मार्ग ! पुणे सासवड या सुमारे ३० किमी मधल्या टप्प्यात दिवेघाटाच्या चढाची सुरवात करण्यापूर्वी मस्त वाफाळलेल्या चहाचा कार्यक्रम पार पडतो. टाळमृदंगाच्या ठेका धरायला लावणाऱ्या व ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आमचीही पाऊले चालू लागतात.  हजारो वारकऱ्यांचे जथ्थे तहान भूक विसरुन माऊलींच्या ओढीने नामगजरात तल्लीन होऊन चालत असतात.  घाटात ठराविक अंतरांवर असणाऱ्या विविध वाहिन्यांच्या ओबी व्हँन्सपाण्याचे टँकर्स व वैद्यकीय पथके ! उजव्या हाताला घाटडोंगर तर डाव्या बाजूला घाटातून दिसणारे भव्य विस्तारलेल पुणे. मान्सूनची कृपा असेल तर वातावरण प्रसन्न आल्हाददायक असणार. दूरवर डोंगरावर उतरलेले ढग जणू माऊलींच्या स्वागताला आले असावेत. चढण चढतांना थकलेल्या जीवाला पावसाचा एखादा शिडकावाथंडगार वाऱ्याची झुळूक पुनः प्रसन्न व ताजेतवान करुन जाते.

        

आज आम्ही सहा वारकरी जेव्हा दिवेघाटाकडे पाहत होतो तेव्हा माझ्या  मनातल्या झरोक्यातून आठवणीचा कवडसा हलकेच डोकावत होता व या सगळ्या आठवणी पुनः ताज्या करत होता. कोरोनाने यंदा वारी रद्द झाली होती. त्यामुळे वारीच्या मार्गावर आपला पदस्पर्श यावर्षी होऊ शकणार नाही ही भावना मन अस्वस्थ करत होती. वारीचा दिवस उलटून गेला तसतशी अस्वस्थता वाढत होती आणि whatsapp वर ती प्रकटही होत होती. आणि अचानक काही मोजक्या समुद्रियन वारकऱ्यांंच्या सोबतीने एक प्रातिनिधिक स्वरूपात वारी चालण्याचा योग जुळून आला.

 

दिवे घाटमाथ्यावर श्री विठ्ठलाच्या भव्य पाषाणमूर्तीचे दर्शन घेऊन परत यायचे असा कार्यक्रम ठरवून आम्ही सहा मंडळीनी दिवे घाटातील सुरुवातीची माऊलींच्या पालखीची स्वागत कमान ओलांडली. पालखीच्या दिवसात वाहनांसाठी बंद असलेल्या या रस्त्यावर अखंड वहातुक आज सुरु होती. एखाद उत्साही तरुण जोडपे निसर्गाच्या रम्य वातावरणात सेल्फी घेत होते तर कुठे तरुण मुलांचा घोळका ग्रुप फोटो घेण्यात मश्गुल होता. लाँकडाऊन मधून मिळालेली सूट किती आनंद देऊन जाते हे त्यांच्या चेहेर्यावरील ओसंडून वाहणारा आनंद सागत होता.

 

पाय घाट चढत होते पण त्याला दर वर्षी असणारी हजारो वारकर्यांची सोबत नव्हती, ना टाळ-मृदंग अन झांजांच्या साथीत भक्तीरसात भिजलेले अभंग ! त्यामुळे कि काय जेमतेम २-३ कि.मी. अंतर पार होत नाहीत तोच पाय बोलू लागल्याचा भास व्हावा ? घाटाच्या कठड्याआडून काही अनोखी झाडांची पाने डोकावत होती. सभोवताली असणाऱ्या हिरव्या गार पानाची सोबत असूनही काही पाने वाळून गेलेली दिसली. ती पाने म्हणजे वारी रद्द झाल्याची रुखरुख लागून गेलेला वारकरी असल्याची उपमा उगाचच मनाला स्पर्शून गेली.

 

या विचारात चालता चालता श्री विठुरायाच्या भव्य मूर्तीचे लांबूनच दर्शन झाले. ढगाळ वातावरण व काळ्या मेघांची दाटी दूर सारण्याचा प्रयत्न करणारी सूर्य किरणे यामुळे मूर्ती अस्पष्ट दिसत होती. वर जाऊन चरणस्पर्श करायची सगळ्यांचीच इच्छा होती पण उत्साह अमाप असला तरी पावसाळ्यामुळे निसरड्या झालेल्या वाटेने चढून वर जाऊ नये याची प्रत्येकाचे वय आठवण करून देत होते. एका खाजगी मालमता असलेल्या जागेतून रस्ता होता. आज विठूरायाची विशेष कृपा म्हणायची ! तिथल्या वाँचमनने आम्हाला आत येण्याची परवानगी दिली. त्या भव्य मूर्तीच्या पायावर आम्ही माथा टेकला आणि मन भरून पावले. एका निवांत ठिकाणी पोटपूजा आटोपून आम्ही परतीचा रस्ता धरला तो वारीत खंड न पडल्याचे मनात एक समाधान घेऊन !  

 

श्री बिंदुमाधव भुरे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com

 

Saturday, June 13, 2020

निमित्त नवीन PPO चे

निमित्त नवीन PPO चे 


काल परवा नवीन PPO ची उलट सुलट चर्चा आणि गमती वाचल्यावर मला २००९-१० च्या आसपास मी सेनापती बापट रोड शाखेत UT म्हणून कार्यरत असतांनाचा एक मजेशीर किस्सा आठवला ! तो सोमवार होता, Branch ला पोहोचून मी ९.४५ ला मस्टरवर सही करत होतो अन् Accountant श्री राममूर्ती माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले

 

"भूरेजी, कँशमे बैठनेसे पहले आप उपर साहबसे मिल लेना, आपको उन्होने याद किया है"

 

ती Branch दुमजली आहे. Chief Manager ची केबिन व Advances Dept वरच्या मजल्यावर होते. मी मस्टरवर सही करून लगेच वर गेलो. साहेबांनी समोर इमेलचा प्रिंट ठेवला. मी कागद हातात घेऊन वाचला. रिजनल ऑफिसने शनिवारी दुपारी २.३० वा मेल पाठवून सांगितले होते कि कोणत्याही परिस्थितीत (without any excuse असा शब्द होता) सोमवारी BCC Br ला जाऊन आपल्या रिजनची Gold Coins collect करायची. झोनमधील सगळ्या रिजन्सला जे दिवस वाटून दिले होते त्यात पुणे रिजनला सोमवार दिला होता.

 

मी वाचून झाल्यावर साहेबांकडे नजर टाकली.

 

साहेब - "भुरेजी, आपको जाना है इस कामके लिए"

 

मी - "ओके, नो प्रॉब्लेम ! सर, लेकीन मुझे कुछ अरेंजमेंट करनेकेलिए आधा घंटा चाहिए उसके बाद मै निकल जाऊंगा"

 

साहेब - " Take your own time. Security van will be arriving by 10.30"

 

बायकोला फोन केला व कल्पना दिली कि आज घरी यायला उशीर होईल. युनियनचे २-३ फोन करायचे होते ते केले आणि Security van ची वाट पहात केबिनमध्ये साहेबांसमोर बसलो होतो.

 

मी – “ सर, एक बात पुछू ? आपने मुझेही क्यो इस कामके लिये चुना ? आजकल कँशमे बहोत ज्यादा workload है. अगर UT नही रहा तो customer services बहोत ज्यादा affect होती है.माझा थेट customers शी रोज संबंध येत असल्यामुळे आपल काम सोडून दुसऱ्या कामासाठी तात्पुरते बाहेर जातांना आपल्या department च कस होईल ही काळजी डोक्यात असतेच ना ?

 

साहेब – “भुरेजी, यह एक जिम्मेदारीवाला काम है, इसमे Risk भी involve है. और आपसे बेहतर इसे कोई नही संभल सकता. दुसरी बात आपको काम सौपनेके बाद मुझे किसीभी बातकी चिंता नही रहती.वगैरे ... अपेक्षित उत्तर कानावर पडले.

 

Executive मंडळींच एक बर असत. जबाबदारीचे काम पार पाडायला काही चांगली मंडळी हाताखाली असली कि ते निर्धास्त होत असतात. युनियनच्या कामासाठी, meetings साठी अनेकद RO, ZO जाण होत असे. चहुकडे नजर टाकली कि हमखास याची प्रचिती यायची. 

 

इतक्यात Security van आल्याची Armed Guard ने सूचना दिली. मी माझी धोपटी उचलली व निघालो. साहेबही माझ्याबरोबर Security van पर्यंत सोडायला आले. Gold Coin ही मोठी जोखीम होती त्यामुळे मी Security van check केली. लक्षात आल कि van च्या आत असलेल greel door चे lock defective होते, म्हणजे ते operate होतच नव्हते.

 

साहेब शेजारीच उभे होते त्यामुळे मी त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून देत म्हटले कि

 

सर, यह Security van ही insecured है. हमे इसे बदलना पडेगा और दुसरी Security van बुलानी होगी.

 

साहेबांनी त्वरित रिजनल ओफिसला फोन लावला व security officer शी बोलणे करून दुसरी van  arrange करण्याबाबद सांगितले. Van जाणार, दुसरी येणार आणि traffic यात किती वेळ जाईल याचा विचार केला. साहेबांना म्हटले कि

 

"सर, मै इस van के साथही निकलता हू. दुसरी van मिलनेपर वहीसे सीधा मुंबईकेलिए निकल पडेंगे. फिरसे branch मे आनेका समय बचेगा और हम BCC समयपर पहुचेंगे."

 

साहेबांनी मंद स्मित करत मान डोलावली. हे असले निर्णय न सांगता घेण्याच्या माझ्या सवयीला दिलेली दाद त्या मंद स्मितात दडलेली असावी. 

 

स्टेट बँक कँप शाखा व ट्रेझरी ऑफिस या मधील भागात असलेल्या मोकळ्या प्रांगणात अनेक vans उभ्या होत्या.  गाडीचा driver armed guard १० मिनिटात आले व म्हणाले "साहेब, van मिळाली आहे, चेक करुन घ्या" Van एकदम चकाचक होती. आम्ही थेट मुंबईच्या दिशेने निघाल्याचे साहेबांना मोबाईलवर कळवले.

 

साधारण २.३० वाजता आम्ही BCC branch ला पोहोचलो. Branch मधे चौकशी करुन संबंधित Sr Manager च्या टेबलला पोहोचलो. त्यांचा lunch time झाला होता. जुने दिवस आठवले .. आपला नंबर यावा आणि खिडकीच्या आतून "तिकीट संपली"चा आवाज आणि पाठोपाठ हाऊसफुल्ल असा बोर्ड पुढे येत खिडकी बंद ! चिडून तरी काय करणार त्यामुळे मनातल्या मनात हसू आले. 

 

भूक लागली होती. साहेब येईपर्यंत पटकन् डबा खाऊन घ्यावा का ? असा मनात आलेला विचार झटकला. साहेब आल्या आल्या आपला नंबर लागावा म्हणून बसून रहायच ठरवल. दरम्यान reached BCC असा text message आमच्या साहेबांना केला. फार तिष्ठत नाही बसावे लागले. 

 

ते Sr Manager आले आणि खुर्चीत बसत त्यांनी माझ्याकडे पाहिल. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकल्याने मलाही बर वाटल. माझ्या branch ने मला दिलेल deputation चे लेटर त्यांच्यापुढे सरकवत मी माझी ओळख करुन दिली. 

 

"क्या लोगे, चाय ? कॉफी ?" असा प्रश्न माझे पत्र वाचता वाचता त्यांनी विचारला. मी हसत म्हटले "सर, चाय कॉफी मै कुछ नही लेता हू बस gold लेने आया हू वोही दे दो!" विनोद केल्याच्या थाटात मी हसलो.

 

साहेब - " अरे यार, किस पागलने बोला आपको gold coin आया है ? " या वाक्याच्या झटक्याने माझा विनोद क्षणभंगूर ठरला होता. मी त्यांना म्हणालो “सर, Chief Manager साहबने letter देकर भेजा है. और मेरी branch को RO से mail आया है.” असे म्हणत मी त्या mail ची झेरोक्स त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी ती mail वाचली. आणि थोडे ओशाळल्यासारखे हसले. या हसण्यात त्यांनी पागल शब्द वापरून केलेला प्रश्न त्यांना आठवला असावा असे मला उगाच वाटून गेले.

 

“Mr Bhure, we will inform you once we receive it. हमेही नही मिला तो हम कहासे देंगे ?” त्यानी असे म्हणताच मी उठलो व मला branch ने दिलेल्या deputation च्या पत्रावरच त्यानी remark लिहावा व सही शिका द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. हो, उगाच उद्या कोणी म्हणायला नको कि तुम्ही BCC ला गेलाच नव्हता. मी केलेल्या विनंतीचा रोख त्यांच्या लक्षात आला असावा.

 

MR Bhure reported this branch @2.30 pm. At present no gold coins are in stock. We will inform you as & when we receive it”

 

खाली सही व branch चा stamp होता. त्यांना मी वेळही टाकण्याचे विनंती केली. पत्र खिशात ठेवले व मी बाहेर पडलो. Security van च्या दिशेने चालत असतांना फोनवर आमच्या साहेबांच्या कानावर सगळ्या घटना घातल्या. Security van मध्ये बसून डबा खाल्ला व परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी ७.३० ला branch च्या दारात पोहोचलो. साहेब वाट बघत होते. त्यांना मग त्या Sr Manager ने विचारलेला प्रश्नाची गंमत सांगितली. त्यावर हसून ते म्हणाले

 

“यार, या तो मै पागल हु या RO ! हमनेही आपको भेजा था. घरी आल्यावर बायकोने विचारले “काय काय झाल ?” मी हसून सगळा किस्सा कथन केला व म्हणालो “आज डबा खायला मुंबईला गेलो होतो, तेही बँकेच्या खर्चाने !”

 

HO म्हणते PPO पाठवले आहेत, branches मधून collect करा. branches म्हणतात RO ला विचारा आणि RO म्हणते आमच्याकडेच अजून आले नाहीत. या खो खो वरून जुना किस्सा ठवला तो share केला.

 

बिंदुमाधव भुरे

bnbhure@rediffmail.com

8698749990/9423007761

 

Sunday, June 7, 2020

खरे सोने

खरे सोने !

 

लहानपणी लाकूडतोड्याची ऐकलेली गोष्ट आठवत असेल. बबलू रोज जंगलात जायचा, लाकूड तोडून त्याच्या विक्रीतून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवायचा ! गरीबीत जगणारा बबलू अतिशय स्वाभिमानी व हुशार होता. एकदात जंगलातून परत येताना एका विहिरीजवळ तो पाणी पिण्यासाठी थांबला असता त्याची कुऱ्हाड चुकून विहीरीत पडते. बिचारा रडकुंडीला येतो कारण या कुऱ्हाडीवरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून होता. आता सगळ्यांना उपाशी राहावे लागणार या काळजीने तो दु:खी होतो. 

 

 

तो परमेश्वराची मनोमन प्रार्थना करतो. त्याची आर्त हाक ऐकून विहिरीतून देवी प्रकट होते व बबलूला प्रश्न करते कि बाबा रे का रडतो आहेस ? काय हवय तुला ? पाणी पिताना कुऱ्हाड चुकून विहिरीत कशी पडली याची कहाणी सांगत तो देवीला प्रार्थना करतो कि या कुऱ्हाडीवरच माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तेव्हा मला माझी कुऱ्हाड परत आणून दे बाकी मला काही नको. 

 

 

देवीला वाटले कि या लाकूडतोड्याची परीक्षा घ्यावी. ती विहिरीतून एक सोन्याची कुऱ्हाड काढते व लाकूडतोड्याला देते. ती सोन्यानी चमकणारी कुऱ्हाड पाहिल्यावर देवीला वाटते कि लाकूडतोड्या खुश होईल, त्याला मोह होईल कि आता आयुष्यभर कष्ट करायची गरज नाही. परंतु, बबलूने हात जोडून देवीला सांगितले कि ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड काढून देते पण बबलू ती कुऱ्हाडही स्वीकारण्यास नकार देतो. 

 

 

मग त्याची खरी लोखंडी कुऱ्हाड काढून देवी त्याला दाखवते व विचारते कि ही तरी आहे का ? आपली हरवलेली कुऱ्हाड पाहून बबलूला परमानंद होतो व त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती कुऱ्हाड स्वीकारत तो देवीला नमस्कार करतो.  देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होत त्याला लोखंडी कुऱ्हाडी बरोबरच त्या दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस देते. जीवनात मेहनत करत राहिलास तर तुझी उन्नती होईल पण ज्या दिवशी या सोन्याचांदीचा मोह तुला होईल तुझ्या अधोगतीस सुरवात होईल असे बोलून देवी अंतर्धान पावली.

 

आता नंतर काय होत ?

 

बबलू घरी परत येतो व सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीना एका पेटीत बंदिस्त करून ठेऊन देतो. गावात ही बातमी सगळ्यांना कळाली तशी त्याची किर्ती चहुकडे पसरु लागली. परमेश्वरावर श्रद्धा असलेला, प्रामाणिक, कष्टाळू व सच्च्या मनाचा हा लाकूडतोड्या वेळप्रसंगी मग पदरमोड करुन अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देऊ लागला. लोखंडी कुऱ्हाड ही मेहनतीचे प्रतीक होती. ती त्याच्या जवळ सदैव असल्यामुळे त्याला काही कमी पडत नसे. हळूहळू त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींचा ओघ वाढू लागला. अंत्या, मन्या, दिव्या, नारू वगैरे त्याचा जिवलग मित्रपरिवार होता. त्याच्या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे ही जिवलग मित्रमंडळी त्याच्या सांगण्या बरहुकूम समाजकार्यात सहभागी होऊ लागली. समाजामध्ये त्याच्या नावाला वलय प्राप्त होऊ लागले, गरीबांच्या हृदयातला तो ताईत बनला आणि समाजसेवक म्हणून नवी ओळख त्याला मिळाली.

 

त्याची वाढती लोकप्रियता पाहून शंकऱ्या, सुश्या, वश्या, शर्या, अंत्या वगैरे अनेक   राजकारणी मंडळी सावध झाली. बबलूच्या विरोधामध्ये कट-कारवाया, कारस्थाने करून तो बदनाम कसा होईल हे पाहू लागली. परंतु, आपल्या जिवलग सवंगड्यांच्या मदतीने या विरोधी कारवायांचा मुकाबला बबलू सहजपणे करू लागला. समाजकार्य करत असतांना अनेक क्षण मोहाचे आले तरी बबलूने चांदीच्या, सोन्याच्या कुऱ्हाडीला कधी स्पर्श केला नाही. त्याच्यासाठी ती मोहाची प्रतीके होती अर्थात लोखंडी कुऱ्हाडीवरील आपली पकडही त्याने कधीच सैल होऊ दिली नाही.

 

 

समाजसेवेतून सुरु झालेला हा प्रवास आता बबलूला राजकारणाकडे खुणाऊ लागला. अधिक चांगल्या प्रकारे समाजकार्य करायचे तर हातात काही निर्णय घेण्याचे अधिकार हवे, अन अधिकार हवे असतील तर सत्ता हवी ! या विचाराने त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने राजकारणात प्रवेश केला. जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्याचे समाजकार्य अधिक जोमाने  सुरु झाले. त्याच्या कार्याला आदर्श मानणारी मंडळी प्रत्येक गावात तयार होत होती, तसे फलक ठिकठिकाणी झळकू लागले होते. २०% राजकारणाच्या बळावर केलेले ८०% राजकारणाचे हे सूत्र जनतेला भावले होते. 

 

यशाची चढत्या कमानीसोबत विरोधकही आक्रमक होत होते. बलाढ्य शत्रूला थोपवायच होत, मात्र त्याला मात द्यायला आता स्वबळ कमी पडू लागल. मग शत्रूचा शत्रू तो मित्र नात्याने अन्य समविचारी मंडळी सपोर्टला पुढे आली. प्रम्या, गोप्या, नाथा वगैरे अनेक मंडळी हे त्याचे जुने मित्र होते. त्यांच्या साथीने लढा यशस्वी झाला, खुर्ची मिळाली. सत्ता आली तसा समाजकारण मधील काही प्रसंगी पुसट होऊ लागला होता. सत्तेबरोबर अहंकार, गुर्मी डोकावू लागली. सत्तेच्या राजकारणाची लागण घरातही झाली आणि सत्तासोपानाची स्पर्धा सुरु झाली. परिणाम व्हायचा तोच झाला, सत्ता गेली, खुर्ची गेली. 

 

 

अनेक वर्षे उलटली, बबलू आता थकला होता. आपल्या मुलगा उदय याने हे समाजकारण पुढे न्याव अस त्याला मनोमन वाटत होत. मुलाची इच्छा काहीही असली तरी लाकुडतोड्यावर जनमानसात असलेला एक प्रचंड विश्वास व राजकारणात त्याने बसवलेली घडी यांच्या रेट्यामुळे उदयला ही गादी पुढे चालवण भाग पडल. पण लोखंडी कुऱ्हाडीने करावी लागणारी मेहनत व कष्ट यासाठी त्याची मनापासून तयारी होती का ?

 

 

काळ बदलला होता, कार्यकर्ते बदलले होते, अन् त्यांचे विचारही !  कष्ट करायचे पण कंफरटेबली करायचे अन् कंफर्ट हवा म्हणजे साधने हवीत आणि साधन म्हणजे नगद नारायण ! अल्पावधीतच उदयला चांदीची कुऱ्हाड खुणावू लागली. त्याच्या मते ८०% समाजकारण म्हणजे लष्करच्या भाकऱ्या ! त्याच्या जोरावर २०% राजकारण करणे परवडणारे नव्हते. मग राजकारण व समाजकारण यांचे प्रमाण बदलले, फिफ्टी फिफ्टी झाले. लोखंडी कुऱ्हाडीचा वापर कमी झाला अन् चांदीची कुऱ्हाड आता चमकू लागली.

 

 

एकदा सत्तेची चटक लागली कि ती नशा उतरल्याचे उदाहरण अपवादानेच दिसते. सत्तेत वाटा प्रत्येकाला हवासा वाटत असतो. समाजकार्य सत्तेविना करता येत या वडिलांच्या कर्तृत्वाचा त्याला विसर पडला असला तरी त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या वलयाचा वापर तो धूर्तपणे करून घेत होता. आता लोखंडी कुऱ्हाड अडगळीत पडली होती. मनात विचार आला कि चांदीच्या कुऱ्हाडीने किती दिवस राजकारण करणार सोन्याची चमक काही वेगळीच. आणि ती संधी अखेर मिळाली. शत्रूला थोपविण्यासाठी म्हणून ज्यांचा सपोर्ट घेतला त्या मित्रांना अंधारात ठेवत त्याने सत्तेसाठी थेट शत्रूशी संधान बांधले. कावेबाज शत्रूही मित्र बनायला तयार झाला कारण सत्ता सगळी गणिते उलटवून टाकत असते.  

 

 

सोन्याची कुऱ्हाड त्याला मिळाली पण आपल्या वडिलांना ज्या लोखंडी कुऱ्हाडीने नावलौकिक दिला, समाजात मान दिला, पत दिली, समाजकार्य करतांना अनेक जिवाभावाचे मित्र दिले दुर्दैवाने त्याच कुऱ्हाडीचा विसर त्याला पडला. आज त्याला सत्ता मिळाली पण कमावलेली प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान याला धक्का लागला होता. देवीने परीक्षा बघण्यासाठी म्हणून वडिलांना दिलेली सोन्याची कुऱ्हाड ही मोहापासून चार हात दूर रहाण्याचे प्रतीक होती हेच तो विसरला. सोन्याच्या कुऱ्हाडीने मेहनत करता येत नाही तर ती विलास आणि भोगवादाला आकर्षित करते व परिणामी लोखंडी कुऱ्हाडीवरील पकड सैल होत जाते. २०% राजकारणाचा वाढत गेलेल्या या टक्क्याने ८०% समाजकारण संपवून टाकले होते, त्याच्या सत्तेचा पाया डळमळीत झाला होता.

 

उद्या सोन्याची चमक जाईल, सत्तेच्या खुर्चीवर दावा करायला कावेबाज धूर्त मित्र पुढे येतील. तेव्हा लोखंडी कुऱ्हाडीचे वैभव हेच खरे सोने आहे हे कळेल पण तोपर्यंत उशीर झालेला असेल का ? याचे उत्तर काळाच्या पोटात दडलेले आहे हे मात्र खरे.

 

बिंदुमाधव भुरे, पुणे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com