Saturday, May 27, 2017

३ वर्षांनंतर .. अच्छे दिन .. एक वेगळा दृष्टिकोन

*३ वर्षांनंतर ..... अच्छे दिन*
*एक वेगळा दृष्टिकोन*

जागतिक किर्तीचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अॅडम स्मिथ, मिल्टन फ्रेडमेन पासून ते कार्ल मार्क्स व अगदी अमर्त्य सेन पर्यंत किंवा हिंदू अर्थशास्त्र - एक तिसरा पर्याय अशी या देशाला अनुरूप अर्थशास्त्रीय मांडणी करणारे चिंतक डाॅ बोकारे .. यापैकी प्रत्येकाच्या विचारात व मांडणीत परस्पर विरोध हा आभासी असला तरी अर्थशास्त्रातील एक मूलतत्व मात्र कायमच सर्वमान्य अगदी आजही आहे व ते म्हणजे ... "मनुष्याच्या गरजा अमर्याद आहे परंतु साधने मात्र मर्यादित आहेत - Human want are unlimited but resources are limited."

सायकल चालविणाऱ्याला स्कूटर घ्यावीशी वाटणे, स्कूटर वाल्याला कार, साधी कार असणाऱ्याला आणखी एखादी सेदान, लक्झरी कार असावी असे वाटणे, भाड्याच्या घरात राहणाऱ्याला स्वतःचे घर असावे असे वाटणे, वन रूम फ्लॅट असेल तर आणखी मोठा फ्लॅट असावा, मोठ्या फ्लॅट असणाऱ्याला बंगला असावा असे वाटणे वगैरे... ! अशा प्रकारची इच्छा मनात निर्माण होण्यामागे गरज, आवड, इर्षा, चैन यासारखे विविध घटक कारणीभुत असतात. उत्पन्न थोडेसे का होईना वाढले कि माणूस लगेच एखादी गरज त्यातून भागवत असतो व ती भागताच नवीन गरज, इच्छा मनात निर्माण होते. या मनाला थोपविण्याची पद्धति कोणत्याच शास्त्रात नमूद केल्याचे मात्र  ऐकिवात नाही.

पण गंमत पहा उत्पन्न वाढीला मर्यादा असल्या तरी ते वाढेपर्यंत वाट पहायची गरज नाही आणि हल्ली तेव्हढा संयमही क्वचितच आढळून येतो. मार्केटमध्ये आज हप्त्यावर, उधारीवर, क्रेडीट कार्डवर मनात इच्छा निर्माण झालेली वस्तू आपण त्वरित घेऊ शकतो किंबहुना ती आपण घ्यावी अशा मोहात पाडणाऱ्या जाहिरातींचा सतत भडीमार आपल्यावर विविध माध्यमातून होत असतो. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर घरात मोबाइल, फ्रीज, फ्लॅट टीव्ही अगर मोटरसायकल आणायची असेल तर दुकानात जायचे, काही रक्कम रोख द्यायची बाकी पैसे बँकेतून परस्पर हप्त्यांनी वळते होतात किंवा त्याच दुकानात बसल्या जागी एक दोन पेपर सह्या करायचे आणि एखाद्या फायनान्स कंपनीचे लोन घ्यायचे कि झाले !

थोड्या फार फरकाने अशा प्रकारची आर्थिक परिस्थिति असलेल्या बहुतेक सर्व मध्यमवर्गातील कुटुंबांची हीच मानसिकता आज पहावयास मिळते. कोणत्याही कारणामुळे जर महिन्याच्या आर्थिक बजेटच्या चौकटीला धक्का लागला कि आहे त्या मासिक ऊत्पन्नात भागत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिक मग दैनंदिन खर्च वाढू लागला कि आरडा ओरड करू लागतो. भाववाढ ही भाजीपाला, किराणा माल, दूध या दैनंदिन गरजांची असो कि वीज, पेट्रोल, बस तिकिट किंवा रिक्षा भाडे असो वा दवाखाना, हाॅस्पिटलचा खर्च असो कि वार्षिक घरपट्टी म्हणजे प्राॅपर्टी टॅक्स वगैरे असो, प्रत्येकाला या गोष्टी कायम स्वस्त व्हाव्यात / रहाव्यात असे वाटत असते. मल्टिप्लेक्स व हाॅटेलचे दर वाढले तर मात्र काही मंडळींना प्राॅब्लेम नसतो हा भाग वेगळा.

आपण एक बाब लक्षात घेत नाही कि वरील प्रकारात केलेला प्रत्येक खर्च म्हणजे कोणाचे तरी उत्पन्न आहे. जसे नोकरदार व्यक्तिला   त्याचा पगार वाढावा असे वाटते तसेच व्यावसायिकाला धंद्यात सदैव बरकत रहावी असे वाटत असते. एखादी संस्था असेल तर ती नफ्यात रहावी म्हणून उत्पन्नाचे स्रोत कसे वाढतील याकडे त्यांचे लक्ष असते. पाणी, रस्ते, वाहतूक वगैरे सार्वजनिक सुविधा नागरिकांना देता याव्यात म्हणुन ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगर पालिका, राज्य सरकारे, केंद्र सरकार या सगळ्यांनाच उत्पन्न वाढावे असे वाटत असते व त्यात गैर ते काय ?

पण टोमॅटो, कांद्यासह शेतमालाच्या कोणत्याही वस्तुचा भाव वाढला कि उपभोक्ता म्हणून नागरिकांची ओरड व भाव कोसळले तर शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी ! सरकार शेतकरी वर्गासाठी काहीच करत नाही म्हणुन बुद्धिजीवी वर्गाच विविध वाहिन्यांवर ठरलेल आक्रंदन ! बँकेने स्वस्त दरात कर्जे उपलब्ध करुन द्यावीत ही उद्योजक वर्गाची अपेक्षा तर त्यामुळे ठेवींवरील व्याजदर कमी झाले तर नागरिकांचा रोष ! या रस्सीखेचीत बँकेच्या हाती रहाणाऱ्या नगण्य नफ्यावर कर्जमाफीची टांगती तलवार सदैव आहेच. सार्वजनिक वाहतूक, रस्ते, चोवीस तास पाणी, चांगली उद्याने हे तर हवे पण वार्षिक घरपट्टीत वाढ नको. ही मानसिकता ओळखून कि काय निवडणुक जाहीरनाम्यात घरपट्टी माफीची घोषणा मध्यंतरी एका पक्षाने केली होती. लोकप्रिय घोषणा व लोकानुनय करण्याचा नादात राजकारणी स्वतःची फरपट करुन घेतांना नागरिकांच्या नको त्या अपेक्षांना खतपाणी घालतात.

ही सगळी कसरत साधायची तर पैसा हवा ना ? पण अर्थशास्त्र सांगते कि ऊत्पन्नांचे स्रोत मर्यादित आहेत, Resources are limited. या मर्यादित स्रोतातूनच समाजातील प्रत्येक घटकाची इच्छापूर्ती करायची आहे. या रचनेत प्रत्येक जण देणारा आहे व तसेच घेणाराही आहे. देणाऱ्याला देतांना कमीत कमी द्यायच आहे तर घेणाऱ्याला घेतांना ते अधिकाधिक ओरबाडून घ्यायच आहे. याच रचनेत घेणारा वर्ग हा बव्हंशी सत्ताधारी आहे तर देणारा बहुसंख्य असुनही कोठेतरी असहाय्य व दीन झाला आहे. आणि या असहायतेपणाच्या, दीनपणाच्या मुळाशी कोठेतरी संपूर्ण व्यवस्थेत, रचनेत प्रचंड भ्रष्टाचार हे कारण घट्टपणे रुतुन बसले आहे. ते जेव्हा मुळापासून उखडून फेकले जाईल तेव्हा घेणाऱ्याचे ओरबाडणे थांबेल व देणाऱ्याचा आखडलेला हात मोकळा होऊ लागेल.

गेल्या अनेक दशकांची ही चौकट फक्त तीन वर्षात बदलू शकणार नाही मात्र त्यादिशेने पावले नक्कीच पडलेली दिसतात. सरत्या तीन वर्षात या देशात कोणताही भ्रष्टाचार तर नाहीच पण उलटपक्षी काळा पैसा बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न होतांना दिसले आहेत. त्यामुळेच या मर्यादित स्रोतांचा प्रामाणिक विनियोग होतो आहे व होईल हा विश्वास आजच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला आहे. माझ्या दृष्टिने हीच खऱ्या अच्छे दिनची सर्वमान्य परिभाषा असायला हवी.

आपल्या पैकीही अनेकांना हे कळतय, जाणवतय पण यालाच अच्छे दिन म्हणायच असते हेच आपल्याला उमजत नाही कारण अच्छे दिनची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे आणि ती कोठेतरी संकुचित विचारांनी वलयांकित असून त्याला स्वार्थाची अदृश्य किनारही आहेे. अच्छे दिनची नेमकी व सर्वमान्य परिभाषा नागरिकांपर्यंत भासमान स्वरुपात येणाऱ्या दोन वर्षात पोहोचविण्याचे आव्हान या राज्यकर्त्यांपुढे आहे व तेही अर्थशास्त्राच्या तात्विक चौकटीत राहून. म्हणुनच येणारा हा काळ खरा कसोटीचा आहे असे मला वाटते.

बिंदुमाधव भुरे, पुणे

Friday, May 19, 2017

देशभक्ति व देशद्रोह ...

काल कन्हैयाकुमारची पुण्यात वार्ताहर परिषद झाली. " ज्याचा भाऊ देशाच्या सीमेवर लढतांना शहीद झाला त्याला देशभक्तिचे धडे दिले जात आहेत. " असे म्हणतांना सरकारवर त्याने सडकून टीका केली, तो म्हणाला " आम्ही सांगू तसे वागाल, आम्ही सांगू तसे खाल तर तुम्ही देशभक्त अन्यथा तुम्ही देशद्रोही. यांनी देशभक्तीचे दाखले देण्याचे दुकान उघडले आहे." वगैरे वगैरे.

त्याच्या म्हणण्याला माध्यमांनी फार ठळक प्रसिद्धि दिली नाही. सीमेवर देशासाठी शहीद होणाऱ्या वीर जवानाचा हाच भाऊ कन्हैयाकुमार अफज़ल गुरुला फाशी दिली यावर आक्षेप घेतांना म्हणतो कि (कृपया दिलेल्या लिंकमधील क्लिप ऐका)

१.संविधानाचे पालन झाले नाही व
२.म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.

या गोष्टीचे समर्थन करतांना त्याने मांडलेला तर्क - "आपली घटना म्हणते कि १०० दोषी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये."

हा तर्क कन्हैयाकुमार अफज़लचे बाबतीत मांडतोय म्हणजे अफज़ल निरपराध होता असे म्हणायचे आहे का ? कि तो दोषी असून सुटला तरी हरकत नाही असे म्हणाचय ?

समाजाच्या नजरेआड गुपचुप चोरी, मारामारी किंवा बलात्कारी कृत्य करणार्यांना व उघड उघड देशविघातक कृत्य करणाऱ्यांना समान मापदंड लावायचा का ?

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानाच्या भावाकडून अफज़लचे बाबतीतची ही भूमिका व तर्क १००% चूक व चीड आणणारा आहे.

असे तर्क जर कोणीही घटनेला पुढे करुन वा घटनेचा हवाला देऊन एका देशविघातर कृत्य करणाऱ्यासाठी मांडत असेल तर राजकीय पक्षांचे जाऊ द्या एक सर्वसाधारण नागरिकही त्याला एकदा नाही १०० वेळा देशद्रोही म्हणेल मग असलेला तर्क मांडणारा अगदी शहीद जवानाचा भाऊ असला तरी !

कन्हैयाकुमारने लोकशाही व संविधान चे बचाव करतांना दिलेला विचित्र तर्क ऐका

http://dai.ly/x55lbdu

बिंदुमाधव भुरे, पुणे

Shared with https://goo.gl/9IgP7

Wednesday, May 3, 2017

आठवणीतला अविस्मरणीय सेवानिवृत्तिदिवस

२९ एप्रिल २०१७, बँकेतील सेवेचा शेवटचा दिवस संस्मरणीय ठरला. सकाळी अंचल कार्यालयात सपत्नीक नियोजित वेळेला पोहोचलो. नैमित्तिक प्रार्थनेनंतर प्रथेनुसार एप्रिल महिन्यात निवृत्त होणाऱ्या मंडळींचा निरोप समारंभ कार्यक्रमास सुरुवात झाली.

पुणे क्षेत्राचे उपमहाप्रबंधक श्री गुप्ता साहेब तसेच अंचलप्रमुख श्री परुळकरसाहेब यांची गौरवोद्गार करणारी भाषणे झाली. श्री परुळकर साहेबांबरोबर आम्ही दोघांनीही (मी व पत्नी सौ शुभदा) काम केल असल्यामुळे त्यांचे भाषण आमची मुक्तकंठाने स्तुती करणारे होते. या दोघांच्याही भाषणानंतर परंपरागत शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.

बँकेत रुजू होतो तेव्हा जन्मतारखेची नोंद असल्यामुळे वयाची साठी आणि निवृत्तिची तारीख दोन्ही निश्चित असते. माझ्याबाबतीत जन्मतारीख २४ एप्रिल १९५७ असल्यामुळे  निवृत्तिची तारीख ३० एप्रिल २०१७ निश्चित होती ! परंतु हा दिवस रविवार येत असल्यामुळे सेवानिवृत्ति शनिवार, २९ एप्रिल २०१७ रोजी पार पडली.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना मी या ३९ वर्ष ९ महिने २६ दिवसांच्या सेवेला "एक संस्मरणीय, चैतन्यदायी व आनंददायी असा दीर्घ प्रवास" अशी उपमा दिली. खरच हा एक दीर्घ प्रवासच असतो. बँकेत रुजू झालेल्या शाखेपासून ते निवृत्त झालेली शाखा अशा या प्रवासात ज्या विविध शाखात काम केल ते "प्रवासातील महत्वाचे थांबे" व ज्यांच्यासोबत काम करायला मिळाले ज्या ग्राहकांबरोबर रुणानुबंध जुळले ते सगळे "सहप्रवासी" ! आपण बँकर्स म्हणजे सेवा क्षेत्रात काम करणारी मंडळी, "ग्राहकसेवेच्या माध्यमातून सर्वोच्च आनंद देण्याचा प्रयत्न" हा दृष्टिकोन सदैव बाळगला तर व्यवसाय आपोआप मिळतो हा माझा अनुभव !

अर्थात, सत्काराला उत्तर देतांना किती बोलायच ? समोर उपस्थितात बहुतांश तरुण असलेल्या मंडळींना आपले बोलणे कितपत रुचेल, आवडेल ? यासारख्या प्रश्नांबरोबरच आपल्याला या सत्कारप्रसंगी आज भावनाविवशतेमुळे बोलता तरी येईल का ? यासारख्या प्रश्नांच दडपण जाणवत होते. त्यात श्री परुळकर साहेबांनी त्यांच्या भाषणात "श्री भुरे हे अतिशय मॅच्युअर्ड ट्रेड युनियन लिडर व त्याचबरोबर खुप चांगले काम करणारेही आहेत. ते खूप चांगले लिहितात व तितकेच छान बोलतात" अशी स्तुती केल्यामुळे उपस्थित ५०-६० व्यक्तिंच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असाव्यात असा माझा समज झाला व दडपण वाढण्याचे तेही एक प्रमुख कारण होते. तसेच उपस्थितांमधे बहुतांश मंडळी अमराठी, त्यामुळे मराठी ऐवजी हिंदीत बोलले तरच उपयोग, या विचाराने दडपणाची पातळी आणखीनच वाढली होती.

सकाळी उठल्यापासून "आज बँकेतला शेवटचा दिवस, आजवर ४० वर्ष उराशी कवटाळून ठेवलेल्या सगळ्याचा मनात विरक्तिची भावना आणून त्याग करायचा दिवस वगैरे" अस सारख मनातल्या मनात घोकत होतो. पण ही "विरक्तिची भावना" मनात आणायची कशी अन् कोठून ? बँकेवर वर्षानुवर्ष केलेले जिवापाड प्रेम अशा ओढूनताणून आणलेल्या विरक्तिच्या भावनेने कसे पुसुन टाकता येईल ? सत्काराच उत्तर देतांना मनावर आलेल्या दडपणाला ही पण एक भावनिक किनार होती.

श्री परुळकर साहेबांच भाषण सुरु असतांना मनात या सगळ्या विचारांची गर्दी झाली होती. सत्कारातला "तो क्षण" म्हणजे साहेबांनी माझ्या खांद्यावर सत्काराची शाल घातली आणि प्रसन्नपणे हसून माझ्याकडे बघितले, मोठ्या धीराने मी नजरेला नजर दिली. ह्रदयात खोलवर झालेली कालवाकालव, डोळ्यातून अश्रु बाहेर पडू नयेत म्हणुन जे काही प्रयत्न करावे लागतात त्यामुळे घशात दाटलेला आवंढा ! हे केवळ ती शाल अंगावर पडली तसे एक सेकंदात घडून आले, कोठेतरी त्यांच्याही डोळ्यात मला विषण्णतेची झाकली दिसली. कदाचित् माझ्या पापण्याच्या आत लपलेले अश्रु त्यांच्या नजरेने टिपले असावेत. मागे थाळीत श्रीफल घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तिकडून श्रीफल घेण्यासाठी ते वळाले तसे मीही उपस्थितांकडे चेहेऱ्यावर उसने हास्य आणत एक कटाक्ष टाकला पण आत खोलवर "काहीतरी तुटल्याचा" भास होत होता !

आता बोलायच, सत्काराला उत्तर द्यायच. श्री परुळकर साहेबांनी एवढ गुणगान केल्यावर बोलणे क्रमप्राप्त होते. पुणे अंचलके महाप्रबंधक ... अशी हिंदीत सुरुवात केली खरी पण पुढे काय ? एकदम ब्लँक होणार का ? आवंढ्यामुळे दाटलेला गळा अजून मोकळा होत नव्हता. काय बोलायच कि फक्त थँक्स म्हणत रुमालाने डोळ्यांच्या ओलसर कडा पुसत, हात जोडून कोरड हसायच ? या विचारात असतांना क्षणार्धात वीज चमकावी तसा एक विचार मनात चमकून गेला. बँकिंग जीवनाची सुरुवात केली त्यावेळचे पहिले शाखा प्रबंधक कै. ओकसाहेब, आयुष्याभर ज्यांच्या शिकवणीचा संपूर्ण प्रभाव आहे असे माझे आई-वडिल या सगळ्यांचे पुण्यस्मरण करुन त्यांचेप्रती आदर व्यक्त करावा व हेच भाषणाचे सूत्र ठेवावे असे मनोमन वाटले.

विचारांच्या अंधारात चाचपडत असतांना अचानक हा धागा मिळाला तस मनावरच दडपण कमी होऊ लागल, गळ्याशी दाटलेला आवंढाही मोकळा झाला व भाषणासाठी, तेही हिंदी, अचानक शब्द ओठावर येऊ लागले जणू देवी सरस्वती कृपावंत झाली होती. १० ते १२ मिनिटांच छोटस मनोगत व्यक्त करुन संपल तस हुश्श झाल, हायस वाटल.

"गेल्या वर्षभरात अनेकजणांनी निरोप समारंभाच्यावेळी मनोगत व्यक्त केले पण इतक सुंदर बोलणे खुप दिवसांनी ऐकल" अशा प्रतिक्रिया देत अनेकजणांनी मला निवृत्तिच्या शुभेच्छा दिल्या. श्री परुळकर साहेबांकडे चहापान झाल व सगळ्यांचा निरोप घेऊन अंचल कार्यालयास मनोमन नमस्कार करत बाहेर पडलो.

ब्रँचला येईपर्यंत ११.४५ झाले होते. संजय कान्हेरे, घोले, जहागिरदार इत्यादिंची मोठी गँग वाट पहात होती. त्यानंतर कदम साहेब दुपारी वळामे, शिरिष कुळकर्णी काही कस्टमर्स अस कोणी ना कोणी दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी येतच होते. ब्रँचमधला निरोप समारंभ कार्यक्रम संध्याकाळी ५ नंतर सुरु झाला. या कार्यक्रमाला माझें संपूर्ण कुटूंबच उपस्थित रहाण्याचा योग जुळून आला. पण ब्रँचमधल्या  सगळ्या मंडळींना पडलेला एक मोठा प्रश्न -  भाषण कोणी करायच ?

हा प्रश्नही मग चुटकीसरशी आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवला. नेहमीसारखी खुर्च्यांची मांडणी न करता आम्ही गोलाकारात खुर्च्या मांडून बसलो. दंडक एकच कि कोणीही उभ राहून भाषण करायच नाही कि बोलायच नाही, बसून मनसोक्त, भरपूर गप्पा मारायच्या. स्काॅन प्रोजेक्टचा अशोक रोज बँकेत येणारा जणू आमच्या स्टाफपैकी एक तोही हजर होता. आणि मग सातपुतेसाहेबांनी ट्वेन्टी २० च्या ओपनिंग बॅट्स्मनसारखी जोरदार सुरवात करुन वातावरणात रंग भरतांना संपूर्ण वातावरण खेळीमेळीच करुन टाकल. जवळजवळ ७ वाजेपर्यंत या गप्पा रंगल्या. यादरम्यान मला शाल, श्रीफल व शाखेतर्फे कायमस्वरुपी लक्षात राहिल अशी भेटवस्तू म्हणुन एक अप्रतिम वाॅलक्लाॅक, सौ शुभदाला साडी व मुलांना गिफ्ट असा कार्यक्रम पार पडला.

गप्पा मारत, हसतखेळत सगळेचजण बाहेर पडलो. सकाळचा अंचल कार्यालयातील एक "कार्पोरेट सेंड आॅफ" व संध्याकाळी ब्रँचमधला एक "ह्रद्य घरगुती कार्यक्रम" हे दोन्ही अप्रतिम ! श्रेयसमधल जेवण जितके आवडायच तितकीच बेडेकरची मिसळही ! दोन्हीची अप्रतिम चव, स्वाद आणि लज्जत आपल्या जागी, तुलना कशाला करा ? लक्षात तर दोन्ही आयुष्यभर रहाणारच. असो.

पदवी परिक्षेत उत्तीर्ण झाल कि नावापुढे पदवी चिकटते पण आज मी घरी परतलो ते नावाच्या अलिकडे कायमस्वरुपी चिकटलेली  ex staff नामक उपाधी घेऊन !

बिंदुमाधव भुरे
बँक आॅफ बडोदा, पौड रोड शाखा, पुणे.