Wednesday, February 12, 2020

दिल्ली गेल्ली

दिल्ली गेल्ली !

दोनही वेळा लोकसभा निवडणूका भाजपने विकासाच्या मुद्द्यावर जिंकल्या होत्या. आठवा मोदींची भाषणे ! सबका साथ सबका विकासला आता त्यांनी सबका विश्वास अशी जोड देऊन आणखी एक दमदार पाऊल त्यांनी पुढे टाकले होते. मात्र विधानसभा निवडणूकांमधे विकासाचा मुद्दा भाजपने जेव्हा जेव्हा सोडला तेव्हा तेव्हा त्यांच्या पदरी पराभव आला. 

भाजपला विकासाच्या मुद्द्यावरुन अन्य मुद्द्यांवर खेचायचे हे विरोधकांचे डावपेच भाजपने वेळीच लक्षात घ्यायला हवे होते. सुरवातीच्या काळात असा प्रयत्न अवॉर्ड वापसी सारखे विषय ऐरणीवर आणून करण्यात आला मात्र तेव्हा  भाजपने विकासमंत्र न त्यागता परिस्थिती यशस्वीपणे हाताळली होती. राज्यांच्या निवडणूकीत त्या त्या राज्यांचे विषय घेऊन मोदी प्रचारात उतरत तेव्हा राज्यांना विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठरविण्याचे त्यांचे वचन आश्वासक वाटत असे. 

विरोधक मात्र कधी त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडव तर कधी संघ, मनूवाद या विषयांना प्रचारात ओढण्याचे प्रयत्न करायचे. परिणामी गेल्या काही निवडणूकांत विकासाच्या मुद्द्याला बगल देऊन राज्यांच्या निवडणूकीत राष्ट्रवादाचा मुद्दा ऐरणीवर आणायचा व त्याभोवती प्रचार फिरत ठेवायचा भाजपचा हा प्रयोग अपयशी ठरतोय कारण अशा प्रचारात विषय वहावत जाऊन भारत पाक, हिंदू मुस्लीम विषय चर्चेत येतात. 

राष्ट्रीय अभिमानाचे, प्रखर देशभक्तीचे मुद्दे मतदारांना विधानसभा निवडणूकीत नको असतात. केजरीवालांनी विकासावर प्रचार केंद्रित केला तर भाजपला राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर वहावत जायला शाहीनबाग निमित्त ठरले. हा सापळा २ महिन्यांपूर्वीच लागला होता. त्यात शेवटच्या १५ दिवसात भाजप अडकली हे दिल्ली निकालांनी सिद्ध होतय. काँग्रेसमुक्तचे धोरणही दिल्लीत महागात पडले कारण त्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळालाच नाही. काश काँग्रेसने अच्छे नंबरसे वोट लिये होते असे भाजप धुरीणांना आतून वाटत असणार !

असे असले तरी आजही दिल्लीकरांना देशासाठी मोदीच हवे आहेत असा सर्व्हे सांगतोय मात्र दिल्लीसाठी त्यांना भाजप नकोय. भाजपला राष्ट्रवाद व ध्रुवीकरणाच्या सापळ्यात अडकवून त्यांचे विकासमंत्र हे प्रचाराचे सूत्र  विरोधक चाणाक्षपणे निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे भाजपने विकासमंत्रावरुन लक्ष विचलित न होऊ होता हे सूत्र अधिक कुशलतेने, हुषारीने वापरण्याची वेळ आली आहे. अर्थात, त्यासाठी विकासनीतीचा त्यांचा आराखडाही त्यांना मांडावा लागेल कारण जनतेसमोर तुलनेसाठी आता गुजरात ऐवजी दिल्ली मॉडेल आहे. 

©बिंदुमाधव भुरे, पुणे.
bnbhure@rediffmail.com
9423007761
8698749990