Thursday, November 14, 2019

वळणाचे पाणी वळणावर जाईल ?




 वळणाचे पाणी वळणावर जाईल ?

जगातील  सगळ्यात मोठी व जागृत लोकशाही म्हणून आपल्याकडे जग कुतुहलाने पाहते. भल्या भल्यांचे अंदाज चुकविणारी, राजकारण्यांना त्यांची योग्य जागा योग्य वेळी दाखविणारी सुजाण लोकशाही असेही मतदारांनी दिलेले कौल पाहून म्हटले जाते. २०१४ साली लोकसभेत अनपेक्षितपणे भाजपला एकहाती सत्ता सोपवितांना अन्य पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला व मतदारांना गृहीत धरण्याची चूक करू नका असा संदेश पुन: एकदा या लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना मिळाला. २०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान विरोधकांनी जे वातावरण निर्माण केले त्यावरून असे वाटत होते कि भाजपला पुनः २०१४ सारखी कामगिरी करून दाखविणे अवघड आहे.  प्रचार माध्यमे व विविध पक्षाच्या अंतर्गत सूत्रांची माहिती यंत्रणा यांनीही भाजपला एकट्याला बहुमत मिळणे शक्य नाही अशी हवा केली होती. राहूलचा राफेल व चौकीदारचोर रागात लागलेल्या टीपेच्या (बे)सूरावर मतदार डोलत असल्याचा भास वाहिन्या व माध्यमांनी निर्माण केला होता. परिणामी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेने बरोबर (अन् बिहारमधे जेडीयू) जागावाटपात नमते घेत तडजोडीची भूमिका भाजपने स्वीकारली हे उघड सत्य आहे. प्रत्यक्षात निकालांनी सगळ्या माध्यमांना खोट ठरवित विरोधकांना चितपट केले अन राहूलबाबा मौनात गेले. या निकालाचा भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला असावा.  

२०१९ च्या लोकसभेच्या उत्तुंग यशामुळे भाजपा सुखावली तर सेना भविष्यात येऊ घातलेल्या विधासभेत युतीला उत्तम यश मिळणार याबाबत आश्वस्त झाली. मोदी मॅजिक संपलेल नाही तर जबरदस्त चालतंय यावर २०१९ च्या यशाने शिक्कामोर्तब केले होते. २०१४ पर्यंत कायम मोठा भाऊ म्हणवून दादागिरी करणाऱ्या सेनेला दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्यावर होणाऱ्या यातना काय असतात याचा अनुभव आला असावा असे त्यांनी गेली पाच वर्षे वठविलेल्या "सत्ताधारी विरोधक" या भुमिकेवरुन लक्षात येते. लोकशाहीमधे मतदारांनी पक्षाच्या पदरात टाकलेले मतांचे दान हे त्या पक्षाने केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन असते. त्या मूल्यांकनानुसार सत्तेत बसायचे कि विरोधात हे ठरते असते. दोन पक्षांनी युती करून एकत्रित सत्ता स्थापन करायची असल्यास मतदारांनी केलेल्या मुल्यांकनाच्या आधारे सत्तेतील वाटा ठरायला हवा. बाळासाहेबांनी सेना मोठा भाऊ असतांना ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हेच सत्तासूत्र मांडले होते. 

जन्माने मिळालेले मोठेपण कायम रहाते तर कर्माच्या आधारे मिळालेले मोठेपण टिकवावे लागते. बाळासाहेबांचा करिश्मा त्यांच्या पश्चात मतदारांना अपेक्षित नसला तरी ती उणीव मतदारांना जाणवत असतांना राजकीय पटलावर उदयास आलेल भाजपचे जहाल नेतृत्व व आक्रमक विस्तारीकरण मतदारांना जास्त भावत गेल. अन् स्वाभाविकच कर्तृत्वाच्या, कामगिरीच्या आधारावर मोठेपण त्यांच्याकडे चालत गेले. बाळासाहेंबाची सेना आता राहिली नाही ही मतदारांमधील धारणा दिवसागणिक दृढ होत गेली. त्यांचा करिश्मा ओसरला तसा सेनेचा जनाधारही आक्रसत गेला.  बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना भाजपकडून मिळणाऱ्या मान सन्मान व आदराचे उद्धव व राज साक्षीदार होते. त्यामुळे बाळासाहेबांच्या नंतर ज्या सेनेमुळे महाराष्ट्रात भाजपला आपली मुळे रुजविण्याची संधी मिळाली त्या सेनेला कायम मोठे समजावे व तसाच मान भाजपने देत राहावे अशी हटवादी अपेक्षा सेना नेतृत्व उराशी कवटाळून होती. पण नेमके त्या विपरित मिळणाऱ्या वागणूकीतून त्यानी स्वतःची प्रतिमा गेल्या पाच वर्षात “सत्ताधारी विरोधक” अशी बनविली.  

ही प्रतिमा मतदारांना भावली नाही हे २०१९ चे निकाल सांगतात. भाजप असो वा सेना दोनही पक्षात मेगाभरती झाली. याचे एकमेव कारण युतीत असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणात दोघांनाही पूर्ण वर्चस्व हव होते. मेगाभरती हा एक किळसवाणा प्रकार होता कि जो मतदारांना भावला नाही आणि स्वाभाविकच या पक्षांच्या पारड्यात अपेक्षित असे मतांचे दान पडले नाही. आपला आक्रसणारा जनाधार वाढविण्यासाठी निवडणूकीत प्रथमच ठाकरे कुटूंबातील व्यक्ती उतरवून निवडणूकीचे आकर्षण केंद्र बनविण्याचा केलेला प्रयत्नही सेनेचा स्ट्राइक रेट वाढवू शकला नाही तर प्रचारादरम्यान ३७० वर दिलेला अवाजवी भर भाजपच्या प्रचारातील मुद्द्यांचे संतुलन गमावून बसला व भाजपलाही अपेक्षित यश मिळाले नाही. 

निकालाऩतर युतीला स्पष्ट बहुमत असूनही सेनेने मुख्यमंत्री पदाबाबद भूमिका घेत ताणून धरले. अशा दबावतंत्राचा वापर राजकारणात करणे हे नवीन नाही. मतदारांनी केलेल्या मूल्या़कनापेक्षा अधिक वाटा सत्तेत मिळावा म्हणून काही अंशी हे क्षम्य आहे. परंतु, हे करतांना कुठे थांबायचे व कुठे तडजोड करायची हे मनात ठरलेले असावे लागते. मुंबइकडे वेगवेगळ्या दिशेने धावणाऱ्या सेंट्रल व वेस्टर्नच्या लोकल ट्रेन दादर येथे एकत्र येतात. सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलतांना भाजप सगळ्या मुद्द्यांवर चर्चेस तयार आहे असे स्पष्ट केले होते. त्यावर २।। - २।। वर्ष मुख्यमंत्री या विषयावर पण चर्चा करणार का असे विचारले असता त्यांनी सगळे विषय असे पुनः स्पष्ट केले होते. या सूचक विधानात दडलेली संधी सेनेने साधायला हवी होती पण तसे लेखी द्या असा ताठरपणा दाखवून सेनेने आपली गाडी दादरवरुन पुढे नेत वेगळी दिशा पकडली.

पवार हे अत्यंत चाणाक्ष व धूर्त राजकारणी आहेत हे उभा महाराष्ट्र जाणतो. राजकारण साधतांना कोणाचा कसा उपयोग ते करुन घेतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मेगाभरतीतून राष्ट्रवादीला पडलेले खिंडार हा त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न होता. लोकसभेच्या आधीपासून राज ठाकरेंच्यासारखी मुलुख मैदान तोफ त्यांनी गळाला लावली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात त्याचा उपयोग करून घेतला तरी अपेक्षित यश त्यांच्या पदरात पडले नाही. विधानसभेच्या कॉंग्रेस सोबतच्या महाआघाडीत मनसेला स्थान मिळेल या आशेवर त्यांनी मनसेला ठेवले व शेवटी राजना एकट्यानेच लढावे लागले. कॉंग्रेसच्या जागा व जनाधार घटला असला तरी त्यांनी सेनेच्या अंगानेच वाटचाल करणाऱ्या मनसेला दूर ठेवणे पसंद केले हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय पटलावर एके काळी असलेला हा कट्टर विरोधक पवारांनी संपवला. निकाल जाहीर झाल्यानंतर सेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षांना धुमारे घालण्याचे काम करत त्यांनी सेनेला आघाडीच्या पाठिंब्याचे  गाजर दाखवत झुलवत ठेवले. सेनेने एनडीए मधून बाहेर पडण्याचा सल्ला देत गाजर आणखी जवळ आणले. एकीकडे राज्यपालांनी दिलेली मुदत उलटली तरी कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्याचे पत्र नाही तर दुसरीकडे केंद्रातून सेना बाहेर अशा विचित्र कोंडीत सेनेला पकडून पवारांनी मेगाभरतीचा जणू बदला घेतला.  

संजय राउत यांच्या जहाल विधानांमुळे भाजप व सेनेतील दरी वाढत होती. ही जहाल विधाने उद्धवजींना भेटल्यानंतर येत होती कि पवारांना भेटल्यानंतर हा संशोधनाचा विषय ठरावा. किमान समान कार्यक्रमच्या नावाखाली कॉंग्रेसचा चर्चेचा घोळ सुरु आहे तर पवार आमची आघाडी असल्यामुळे आधी आमच्यात एकमत होणे आवश्यक आहे हे सांगतांना अधून मधून आम्हाला मतदारांनी विरोधात बसण्याचा कौल दिलाय हे पालुपद सुरु ठेवतायत. सत्तेच वाटप कसे करायचे यासाठी चर्चेच्या फेर्या सुरु आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी अधून मधून शेतकऱ्यांचा कळवळा घ्यायचा किंवा शेतकऱ्याच्या बांधावर भेट देऊन वाहिन्यांमध्ये चमकायचे हे प्रकार सुरु आहेत. नेत्यांच्या स्तरावर एकमेकांवर अद्यापही अविश्वास असणारी महाशिव आघाडी अस्तित्वात आली आहे. पण, ज्या बाळासाहेबांकडे पाहून कट्टर शिवसैनिकांनी सेना गावकूसात वाढवली, तेथील स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी अंगावर घेतल ते सैनिक आज मनाने महाशिव आघाडी मान्य करत नाहीत. नेते मंडळी सत्तेसाठी एकत्र येतात पण हे मनोमिलन कार्यकर्ता पातळीवर होऊ शकत नाही या दाहक वास्तवाकडे डोळेझाक करणे सेनेला भविष्यात खूप त्रासदायक ठरू शकते.


कोणी काय गमावल व कोणी काय कमावल हे सरकार स्थापन झाल्यावर ते कसे चालते यावर ठरेल. आज वाटाघाटीअंती “जितं मया”च्या अविर्भावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता स्थापन होईल. कॉंग्रेसला गाडण्याच्या आणाभाका घेणाऱ्या बाळासाहेबांचे नाव घेऊन त्याच कॉंग्रेसच्या पाठींब्यावर बाळासाहेबांचे मुख्यमंत्री पदी शिवसैनिक बसविण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचा जयघोष साजरा होईल. उभ्या महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची यापेक्षा मोठी फसवणूक दुसरी कोणतीही नसेल. अशा प्रकारचा विजय हा त्या क्षणाचा जल्लोश असेल कारण नंतर पाच वर्षे सरकार चालविण्याची कसरत पार पाडायची आहे. सद्य परिस्थितीत राज्याचे सिंहासन हे काटेरी आहे. ते प्रत्येकाला हवय पण काटे मात्र दुसऱ्याच्या नशिबी असावेत ही आंतरिची सुप्त इच्छा ! आज होऊ घातलेल्या त्रिपक्षीय सरकारमधे राष्ट्रवादी व काँग्रेस दोघांनाही गमवायचे काहीच नाही. सरकार उत्तम चालले तर त्यांना त्यांची गमावलेली स्पेस पुनः मिळवता येणार आहे व ही स्पेस भाजपकडची असावी ही सेनेसह सगळ्यांची इच्छा असणार. पण सरकार अपयशी ठरल्यास त्याच खापर सेनेवर फुटाव म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी दोषारोप करतील कारण त्यांची जुनी आघाडी आहे व त्यात सेना उपरी आहे. एकंदरित सेनेसाठी हा मोठा आतबट्ट्याचा डाव आहे. जनमानसात आजच त्यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. मुख्यमंत्रीपद मिळवल्यामुळे ती सुधारेल असे समजण्याचे कारण नाही. पुनः मध्यावधी झाल्या तर सेना महाशिव आघाडी म्हणून लढल्यास त्यांच्या वाट्याला किती जागा येतील अन् स्वतंत्र लढली तर काय स्थिती होईल याचा विचार सेनेने केला असेल काय

तुर्त तरी काँग्रेस आघाडी भरपूर ताणणार व मुख्यमंत्री पदासाठी घायकुतीला आलेल्या सेनेला ते नमवणार. सत्ता स्थापनेत होणारा प्रत्येक क्षणाचा विलंब हा सेना आमदारांची चलबिचल वाढविणार आहे. कॉंग्रेस आघाडीच्या जाचक अटी  मान्य न झाल्यास भाजपकडे पुनः वळण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहील व त्यासाठी उद्धव ज्यांना मोठा भाऊ म्हणतात त्या मोदींची मध्यस्ती हा हुकूमी एक्का असेल. कारण सेना व भाजपा यांचा भगवा हा हिंदुत्वाचा आहे. हा भगवा केवळ झेंडा म्हणून एकवेळ राष्ट्रवादी काही काळ मान्य करेल पण कॉंग्रेस कदापि मान्य करणार नाही. तेव्हा वळणाचे पाणी वळणावर जाईल ही अपेक्षा बाळगूया.

सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी ।
विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे ।।
(श्री गजाननविजय अध्याय ६ श्लोक ५२)

© बिंदुमाधव भुरे, पुणे

 ९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

Wednesday, November 6, 2019

संजयचा अज्ञातवास आवश्यक !

*संजयचा अज्ञातवास आवश्यक*

सामान्य जनतेला न दिसणारा महाभारताचा *सामना संजय* पाहू शकत होता व त्याचे सविस्तर वर्णन तो धृतराष्ट्राला करत होता. कानावर पडणारे वर्णन ऐकून दुःखी व कष्टी होणे इतकेच धृतराष्ट्राच्या हाती होते. आत्यंतिक उद्वेगाने तो मनातील खदखद व्यक्त करतांना संजयला "हे अस का" असे विचारायचा पण *संजयने कधीच कौरव कसे चुकले किवा पांडवांची बाजू कशी बरोबर यावर भाष्य केल नाही.* जणू रणांगणात घडणाऱ्या सामन्यांचे *फक्त वर्णन करण्याऱ्या पत्रकाराच्या* भूमिकेत तो होता. 

कौरव पांडव यात *"ठरल्याप्रमाणे घडाव"* पण ते न झाल्यामुळे महाभारत घडल. आजचा संजय दुहेरी (?) भुमिकेत अवतरला आहे. तो पत्रकारही आहे आणि एक सैनिकही ! वार्तांकनात न्यायाची बाजू घ्यावी कि सोईची ? बाजू मांडतांना मी *सैनिक कि पत्रकार ?* बाळासाहेबांचा शिष्य म्हणवून घ्यायचे तर ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री या *तत्वाचा सोईस्कर विसर* का पडावा ? संजय उवाच वर पक्षप्रमुखांनी अवाक्षरही न उच्चारण्यामागे *पुत्रप्रेम कि पक्षभूमिका ?* 

आज प्रत्येकवेळी संजय उवाच होतात तेव्हा "ही पक्षप्रमुखांची भूमिका" असे ते आवर्जून सांगतात. महाभारतात डावपेचाचा भाग म्हणून युद्धात *शिखंडीला पुढे केल होत.* त्यामुळे काही वेळा पत्रकार व सैनिक असणारा संजय कधी *शिखंडी भासतो* पण बहुतांश वेळा *शकूनीच वाटतो* कारण हा पक्षप्रमुखांच नाव पुढे करुन स्वतःच फासे टाकतोय.

महाभारताचे युद्ध १३-१४ दिवस चालले होते अस म्हणतात. त्यात सत्याचा विजय झाला तरी दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती. आज जनमानसात असलेल्या दोन्ही पक्षांच्या प्रतिमेची हानी होते आहे. *आजच्या भांडणात ना कोणी कौरव ना कोणी पांडव !* मतदान करतांना हे *दोघेही आपलेच अस मतदारांनी मानले*. भाजपला मिळालेल्या जागांचा आकडाही *१०५* आहे. काँग्रेसी विचारसरणी विरोधात लढतांना *आपण एक आहोत हेच जणू हा आकडा सांगतोय.* 

त्यामुळे आता कोणत्याही *कृष्णशिष्टाईची वाट न बघता दोघांनीही एक पाऊल माघार घ्यावी कारण यातच दोघांचाही विजय आहे.* घराच्या चौकटीबाहेर सल्ला देणारे अनेक *कळीचे नारद* टपून बसले आहेत. त्यांच्या जाळ्यात अडकू पहाणाऱ्या *संजयला आता काही काळ अज्ञातवासात धाडावे.* जनतेचा कौल आम्ही विरोधात बसाव अस दोन्ही काँग्रेस वारंवार सांगतायत याचाच अर्थ *जनतेचा कौल भाजप सेना या दोघांनी सत्ता एकत्रित स्थापन करावी हाच आहे* त्याचा झालेल्या दिरंगाईबद्दल माफी मागावी व आदर करावा. 

*© बिंदुमाधव भुरे, पुणे.*