Saturday, February 25, 2017

युद्ध कि भांडण ?

*युद्ध कि भांडण ?*

आपसात होत ते भांडण तर शत्रुशी होत ते युद्ध ! भांडण सहसा दोघात होते आणि ते कितीही विकोपाला गेले तरी त्याला युद्ध म्हणता येत नाही कारण युद्धात दोन सैन्य एकमेकांविरुद्ध उभी असतात. भांडणात शब्दांचा (आणि शिव्यांचाही) वापर होतो तर युद्धात शस्त्रांचा ! पण आजकाल भांडण हे युद्धात परिवर्तित होऊ लागल्याचे निवडणुकीच्या रणधुमाळीत पहायला मिळू लागले आहे. या युद्धात शस्र आहेत पण ती शब्दरुपी व सैन्य आहे ते कार्यकर्त्यांच्या रुपात !

युद्ध म्हणजे एक प्रकारे बुद्धिबळाचा डाव ! कोणते प्यादे केव्हा सरकवायचे व कोणती चाल केव्हा करायची हे प्रतिस्पर्ध्याची चाल लक्षात घेऊन ठरवावे लागते. युद्धात कूटनितीचा अवलंब कसा व केव्हा करायचा, मर्यादित सैन्यसंख्येचा वापर करतांना गनिमी काव्याने कसे लढायचे, तहाच्या बोलण्याची बतावणी करुन शत्रुला कसे झुलवत ठेवायचे, शत्रु बेसावध असतांना कसा वार करायचा, प्रसंग ओळखून व्यापक हिताचा विचार करता केव्हा माघार घ्यायची वगैरे ....

*हे शिवरायांनी लढलेल्या लढायांचा अभ्यासातून लक्षात येते. युद्धातले हे सगळे बारकावे शिवरायांना नुसते ज्ञात नव्हते तर त्याचा वापर त्यांनी वेळोवेळी मोठ्या चतुराईने केला होता.*

अफझलखानाचा वध असो वा शाहिस्तेखानाची बोटे छाटणे असो, शिवरायांच्या नुसत्या नावाने औरंगजेबाची झोप उडत असे. शिवरायांचे सल्लागार म्हणुन अष्टप्रधान मंडळाची भुमिकाही तेवढीच महत्वपूर्ण !  कारण जनतेशी थेट नाळ जुळलेली ही मंडळी होती. *महाराजांना रयतेचा राजा म्हणण्याचे हे पण एक महत्वाचे कारण असावे.*

हे सगळे विचार मनात डोकावण्याच कारण म्हणजे परवा महानगरपालिकांच्या निकालांचे विशेषतः मुंबईचे कल स्पष्ट होत असतांना शिवसेना ९३ व भाजप ७७ अशी स्थिती एकवेळ होती आणि सगळ्या चॅनलवर चर्चा करणाऱ्या चाणक्यांनी सेना बहुमतात येणार असा चर्चेचा सूर लावला होता. *या दरम्यान सेनेचे एक नेते, सल्लागार व रणनितीकार महाशयांनी "आम्ही शाहिस्तेखानाची बोट छाटली असे" विधान केले. गंमत वाटली ऐकतांना आणि कीवही करावीशी वाटली.*

शिवरायांचे नाव घेतले आणि त्यांच्या नावाने घोषणा दिल्या कि पक्षात, सैनिकात चैतन्य स्फुरणे स्वाभाविक आहे. पण म्हणुन पक्षातला प्रत्येक नेता स्वतःला शिवाजी समजू लागतो तेव्हा प्रश्न पडतो कि *शिवरायांचा वर उल्लेखिलेला कोणता गुण यांच्यात आहे म्हणुन यांना शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा भास झाला.* विधानसभेच्या वेळी अफझलखानाच्या फौजा असा उल्लेख झाला होता व आज २॥ वर्षांनी त्याच मंडळींना शाहिस्तेखान उपमा दिली जाते आहे.

*आश्चर्य याच वाटते कि सेनेला वस्तुस्थितिचे व वास्तवाचे भान नाही व असले तरी ते स्वीकारण्याची अजुनही त्यांची तयारी नाही.* २५ वर्षांपासून आपला युतीमधील सहकारी, भागीदार हा आपला शत्रु आहे का ? याबाबदचा स्पष्ट व ठाम निर्णय नेतृत्वाला घेता येत नाही. कारण शत्रु म्हणुन निर्णय घेतला तर युद्ध करावे लागेल अन् अजुनही मित्र म्हणायचे झाल्यास जे सुरु होते ते भांडण असे म्हणुन कमीपणा घेत आजची परिस्थिति लक्षात घेतां तडजोडीला तयार रहावे लागेल.

*सेनेपुढे त्यामुळे हा प्रश्न आहे कि आपला शत्रु नेमका कोण ? काँग्रेस आघाडी कि भाजप ?* २०१२ चा विचार करता तेव्हा काँग्रेस आघाडी भक्कम होती व राज्यकर्ती पण होती सबब युतीचा समाईक विरोधक निर्विवादपणे काँग्रेस आघाडी होती. त्यामुळे मुंबईत २०१२ ला युती म्हणुन निवडणुकीला सामोरे जातांना भाजप ६५ पैकी ३२ व सेना १६२ पैकी ७३ अशी स्थिती या दोन्ही पक्षांची होती. त्यानंतर आला २०१४ चा महत्वपूर्ण टप्पा. भाजपचे यश हे डोळे दिपवून टाकणारे व अविश्वसनीय असे राहिले. आजही या धक्क्यातून काँग्रेस बाहेर पडू शकलेली नाही. 

ही घोडदौड महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या निवडणुकीतही कायम होती पण आपण ती रोखली अशी समजूत सेनेची झाली. युती तुटल्यावर एकहाती प्रचार करुन मोदींचा झंजावात रोखणे हे नक्कीच मोठे आव्हान होते. *परंतु बारकाईने विचार केला तर या निवडणुका हे एक प्रकारे काँग्रेसमुक्त अभियानाचा एक भाग होता व परिणामी काँग्रेस आघाडीची वाताहत होणे स्वाभाविक होते. ही वाताहत भाजपच्या जागा वाढण्यास कारणीभूत ठरली. यात सेनेची ताकद कमी होण्याचा प्रश्न नव्हता अर्थात संघटनेचे विस्तृत जाळे व भक्कम पाठबळ असुनही जागा वाढू शकल्या नाहीत हे लक्षात घेतले तर सेनेच हे एक प्रकारे अपयश होते असे म्हणावे लागेल.*

*गेल्या २॥ वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र मोदी लाटेतून बाहेर पडून देवेन्द्रच्या सावलीत येऊन निश्चिंत झाल्याचे सेनेने समजून घ्यायला हवे होते.* जिल्हा परिषदा, ग्राम पंचायतीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल हेच सांगत होते. पण सेना नेतृत्वास हे कळले नाही कि सल्लागारांनी भ्रामक चित्र उभे करुन युती तोडण्याच्या निर्णयाची घोषणा करविली ? युती तुटली, आम्ही २५ वर्षे सडलो वगैरे भाषा वापरत सैनिकात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परिणामतः प्रचारातून एक प्रकारे भाजप विरुद्ध युद्ध छेडल्याचा आभास निर्माण केला गेला.

दोन्ही पक्ष मुंबईत प्रथमच स्वबळावर २२७ जागा लढवित होते. अशा परिस्थितिमधे ज्या भाजपला चर्चेच्या फेऱ्यादरम्यान केवळ ६० जागा देऊ केल्या (म्हणजे तहाची बोलणी व वेळ फुकट घालविणे, बोलणी करण्यासाठी अयोग्य माणसे निवडणे, शत्रुचा अंदाज न घेणे) त्या भाजपला दुप्पट म्हणजे ६४+ जागा मिळणे म्हणजे सेनेने हे युद्ध एक प्रकारे हारणे होय. प्रत्यक्षात भाजपला ८२ जागा मिळाल्या, यावरुन युती तोडण्याचा निर्णय हा आत्मघातकी होता हे स्पष्ट होते.

अशा स्थितीत जेथे ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पक्षाची पिछेहाट निकालातून स्पष्ट झाली असतांना आजही दावा केला जाते कि पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल. परंतु या दाव्याला ठोस आधारच नाही त्यामुळे तमाम जनतेला *हे पराभूत मानसिकतेत आणलेले उसने अवसान आहे असे स्वाभाविकपणे वाटू शकते.*

तेव्हा आता सेनेला आत्ममंथन करतांना हे किमान स्वतःशी तरी मान्य करावे लागेल कि हे युद्ध नव्हते त्यामुळे अफझलखानाच्या फौजा, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असल्या उपमा देणे हा पोरकटपणा होता व जनतेनेही त्यांच्या कौलाद्वारे तो स्पष्ट केला आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितित पक्षीय वर्चस्वासाठीचे हे एक भांडण होते व आहे व ते शाब्दिक चकमकींपुरते मर्यादित ठेवतांना प्रसंग ओळखून ते मिटवायचे कसे ही कला अवगत करण्याचे कसब अंगी बाणवून घ्यावे कारण *शिवरायांच्या इतिहासात योग्य वेळी तडजोड करुन व्यापक हितासाठी यशस्वी माघार घेतल्याची उदाहरणेही आहेत. त्यांच्या नावाने पक्ष चालवतांना त्यांच्या युद्धनितीतून काही धडे घेणार का हा प्रश्न पक्ष पुढील वाटचाल करतांना निर्णायक ठरु शकेल.*

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, February 17, 2017

झाकली मूठ ....

###@@  झाकली मूठ  @@###

शाळेत मराठीच्या तासाला आज सरांनी काही म्हणी शिकवल्या. "झाकली मूठ सव्वा लाखाची" ही म्हण मनात घोकत रोहन घरी आला. आल्या आल्या त्याने आईच्या मागे भुणभुण सुरु केली. आईने त्याने टाकलेल दप्तर उचलून जागेवर ठेवल, त्याचे कपडे बदलून दिले. हातपाय धुवून त्याला जेवायला वाढले. प्रश्नाचे ऊत्तर मिळत नाही म्हणून रोहनची भुणभूण सुरुच होती.

जेवणात नेमकी नावडीची भाजी आहे अन् त्यामुळे चिडचिडीत भर पडणार हे आईच्या लक्षात आल तसे ती लगेच म्हणाली "मी तुला जेवताजेवता सगळे व्यवस्थित समजावून सांगते, तू सुरुवात कर."  रोहन जेवायला बसला, भाजीवर नजर पडताच त्याचा आंबट चेहेरा पाहून आईने विचारले "आज आणखीन कोणत्या कोणत्या म्हणी शिकवल्या ?" रोहन म्हणाला "भाव तेथे देव, नाचता येईना अंगण वाकडे, वड्याचे तेल वांग्यावर आणि झाकली मूठ .... "

आई म्हणाली "बर बर असू दे.  झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ नाही ना कळाला तुला ? मी सांगते समजावून ... "

"समजा तुमच्या शाळेत एक धावपटू आहे आणि त्याला थेट राष्ट्रीय टीममधे घ्यावे, तो आपल्या शाळेला विजय मिळवून देईल असा काही शिक्षकांचा आग्रह आहे. तेव्हा परीक्षक मंडळी म्हणतात कि आधी राज्यपातळीवरील एखाद्या आंतरशालेय स्पर्धेत त्याची ट्रायल घेऊ. त्यात चांगले यश त्याला मिळाले तर त्याचा समावेश थेट राष्ट्रीय संघात करावा असा हट्ट आपल्याला धरता येईल."

गोष्ट इंटरेस्टिंग वाटल्यामुळे नावडीची भाजी नकळत पोटात जात होती. रोहनने विचारले "मग आई झाली का रेस ? जिंकला का तो ?" भाजीला न्याय मिळतोय पाहून आईचे म्हणीचा अर्थ समजावून सांगणे रंगात आलेल असते. आई म्हणाली "अरे शर्यतीची तारीख, वेळ व ठिकाण सगळ काही नक्की ठरत पण का कोणास ठाऊक, ऐन वेळेला ही रेस, शर्यतच रद्द होते. आता मला सांग कि तो मुलगा खरोखर चांगला धावपटू आहे कि नाही हे लोकांना कळेल का ?"

रोहन म्हणाला "नाही, शर्यतच नाही झाली तर कस कळणार ?" आई म्हणाली "यालाच म्हणतात झाकली मूठ ....." रोहनला म्हणीचा अर्थ बऱ्यापैकी कळाला होता पण या नादात आईने नावडती भाजी खपवल्याचे लक्षात आल्यामुळे तो आरडाओरड करणार तोच आई म्हणाली "शहाण माझ बाळ, जा हात धुवून घे."  हात धुवून आल्यावर त्याने परत त्या रेसचा विषय काढलाच अन् विचारल "आई, शर्यत खरच कॅन्सल झाली होती का ?"

आई म्हणाली "अरे तो मुलगा गल्लीतली शर्यत पण जिंकू नाही शकला, तुला म्हणीचा अर्थ कळावा म्हणुन मी तस सांगीतल." रोहनने बाहेर खेळायला धूम ठोकली आणि इतका वेळ पेपरमधे डोक घालून बसलेले रोहनचे बाबांनी तोंड उघडले.

ते म्हणाले "अग, बरोबर आहे तू म्हणतेस ते. आज रायबरेलीमधे प्रियंकाचे भाषण ऐकल्यावर मलाही झाकली मूठ ... हीच म्हण आठवली होती. कारण तिचे भाषण ऐकल्यावर वाटले कि राहूल परवडला. आणि काँग्रेसने जर ही मूठ उघडली तर .... ?"

बिंदुमाधव भुरे, पुणे

Wednesday, February 15, 2017

हत्ती, माहुत आणि त्याचा अंकुश !

हत्ती, माहुत आणि त्याचा अंकुश !

एक होता हत्ती. रोज गावातून फेरफटका मारायचा, सोंड ऊंचावून लोकांना वंदन करायचा. काही मंडळी त्याच्या सोंडेत पैसे द्यायची. तो ते घ्यायचा व सोंड वर करुन माहुताला द्यायचा. माहुत ते पैसे खिशात टाकायचा. त्यातून थोडा चारा हत्तीलाही खाऊ घालायचा. अंबारीत बसलेल्या जनतेला माहुत पैसे खिशात टाकतोय हे कळत असे पण सहजासहजी दिसत नसे. त्यामुळे माहुत (व हत्तीही) खुशीत होता.

पण काही दिवसांनी हत्ती बदलला, दुसरा आला व बरोबरीने माहुतही. या माहुताला आधीच्या हत्तीची सवय त्याच्या माहुताकडून कळली होती. त्यामुळे या नव्या माहुताला वाटले हा हत्ती आपल्यालाही पैसे मिळवून देईल. पण हा हत्ती सोंड ऊंचावून जनतेला वंदन करत असे. जनता सवयीप्रमाणे पैसे देऊ करत असे पण हत्ती सोंड ऊंचावून फक्त नमस्कार करत असे व पैसे नाकारत असे.

त्यामुळे हळूहळू माहुताचा अपेक्षाभंग होऊ लागला व तो हत्तीला अंकुशाने टोचू लागला. हत्ती सहनशील होता तो या टोचण्याला दाद देईना. माहुत विचारात पडला, अंबारीत बसलेली तमाम जनताही माहुताला सांगू लागली कि विनाकारण टोचू नका पण माहुताला वाटे कि हत्ती माझे ऐकत नाही म्हणजे काय ? तो अशा ऐटीत हत्तीवर बसे कि लोकांना वाटावे हत्ती माहुताच्या ताब्यात आहे, तो अंकुश टोचण्यामुळे माहुताला घाबरुन असतो.

या हत्तीचे वैशिष्टय असे कि तो स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नसे. पण सततच्या अंकुश टोचत राहिल्यामुळे अंबारीत बसलेली तमाम जनता मात्र हत्ती बिथरेल या शंकेने माहुताला सोडून हत्तीच्या मागोमाग कधी वाटचाल करु लागली आहे हे माहुताला कळलेच नाही.  त्याच आपल चिडचिड करुन हत्तीला टोचण सुरुच होते. हत्ती शांत राहिला व त्यामुळे जनतेची सहानुभूति त्याला मिळू लागली.

या हत्तीमुळे जनतेकडून मिळणारा पैसा बंद झाला याकारणाने माहुत हत्तीला नावे ठेऊ लागला, त्याचा राग राग करु लागला. हत्तीच्या मालकालाही वेडवाकडे बोलूं लागला. काही मंडळींना वाटले कि माहूताचे बरोबर आहे. लोकांकडून पैसे स्वीकारणे व माहुताला देणे ही प्रथा कित्येक वर्ष सुरु आहे. असे असतांना हा काल आलेला हत्ती व त्याचा मालक हे काय म्हणुन अडवणार ? त्याची हिंमत कशी होते अस वागण्याची ? 

आता माहुताला कोण सांगणार कि त्या अंकुशाची धार पुर्वीसारखी नाही राहिली, ती आता बोथट झाली आहे व असल्या टोचण्याने घाबरणाऱ्यातला हत्ती हा नाही आणि मालक तर अजिबात नाही. पण माहुत ना हत्तीवरुन ऊतरायला तयार ना अंकुश सोडायला. माहुताच्या या अशा वागण्याने तमाम जनता मात्र संभ्रमित आहे.

(कृपया ही एक गोष्ट समजावी राजकीय आघाडी बिघडणे किंवा युती तुटणे याच्याशी याचा संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा)

बिंदुमाधव भुरे, पुणे

Saturday, February 11, 2017

युद्ध

  युद्ध 

परवा इंग्लंड बरोबरची तिसरी व शेवटची ट्वेंटी २० मॅच अगदीच एकतर्फी झाली. चहलने ६ विकेट घेऊन चमत्कार घडविला व कोहली कंपनीला मॅच व सिरिज जिंकून देतांना कमाल केली. अशा मॅचेस जिंकल्या कि दुसरे दिवशी चहाच्या कट्टयावर गप्पांचा फड रंगतो. या रंगलेल्या गप्पात एकाचा डायलाग .... "चहलने अक्षरशः पानिपत केले".

 

का माहिती नाही पण "पानिपत" हा शब्द कानात मग बराच वेळ घुमत राहिला. शाळेत असतांना इतिहासाच्या पुस्तकात पानिपतची लढाई यावर धडा़ होता. पण परिक्षेत येणाऱ्या प्रश्नाचे ऊत्तर देण्यापुरताच तेव्हाचा अभ्यास ! नंतर “पानिपत” ही विश्वास पाटलांची कादंबरी वाचली, ती मनात अजुनही खोलवर रुजून बसलेली आहे. पण आज गप्पातला "पानिपत" हा शब्द मात्र अस्वस्थ का करत होता कळत नव्हते. अस म्हणतात कि मनात विचार आले कि त्यांना रोखू नये, वाट करुन द्यावी.

 

मग काय गुगलला टाकला सर्च ... "बॅटल ऑफ पानिपत."  रिझल्ट पाहिला तेव्हा कळले कि पानिपतची एकूण ३ युद्ध होती. आपण शाळेत असतांना इतिहासाच्या धड्यात होते ते पानिपतचे तिसरे युद्ध ! पहिले झाले होते सन १५२६ तर दुसरे सन १५५६ व शेवटचे झाले १७६१ मधे.

 

पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर बाबरने मुगल साम्राज्याच्या विजयाचा पाया रचला. पण यानिमित्ताने मिळालेली माहिती व त्यामुळे मनात आलेले विचार हे आजही कोठेतरी लागू पडणारे आहे म्हणुन ही विषय प्रस्तावना...

 

पानिपतच्या या पहिल्या युद्धानंतर पुढच्याच वर्षी सन १५२७ मधे आणखी एक मोठे युद्ध छेडले गेले होते. हे युद्ध बाबर व महाराणा संग्रामसिंह ऊर्फ राणा संग यांच्यात झाले.

 

त्या काळी युद्ध हे नियमानुसार म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्त यादरम्यान लढले जात असे. सुर्यास्त झाला कि युद्धविराम,  मग दोन्ही बाजूचे सैनिक हे आपआपल्या राहुट्या, तंबू यात परत जात असत. जखमांवर मलमपट्टी करणे, जेवण, विश्रांती घेऊन पुनः दुसरे दिवशी युद्धाला सज्ज ! राजा, सेनापती वगैरे मंडळी जातीने सैनिकांची विचारपूस करणे तर कधी दुसऱ्या दिवशीच्या युद्धासाठीचे डावपेच, व्यूहरचना आखणे यात मग्न असत.

 

पहिल्याच दिवशीच्या युद्ध विरामानंतर बाबर आपल्या शिबिराबाहेर ऊभा राहून शत्रुपक्षाकडील पडावाची टेहळणी करत होता. राणा संगच्या सैन्य-शिबिरातून अनेक ठिकाणाहून धूर निघतांना पाहून बाबरला वाटले कि त्यांच्या शिबिरात आग लागली. त्याने ताबडतोब सेनापती मीर बांकी याला बोलावून घेतले व शत्रु पक्षांच्या छावण्यातून असंख्य ठिकाणहुन धूर का निघतो आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

 

सेनापती मीर बांकीने त्वरित आपले गुप्तचर या कामगिरीवर रवाना केले. गुप्तचर काही वेळाने परतले व त्यांनी दिलेली माहिती सेनापतीने बाबराला कथन केली. तो म्हणाला

 

" हुजूर, राणा संगचे सर्व सैनिक हे हिंदू आहेत. पण ते सगळेजण एकत्रित बसून भोजन करत नाहीत कारण त्यांच्यात अनेक जाती, उपजातीचे गट आहेत. ते एकमेकांच्या हाताचे पाणीसुद्धा पित नाहीत मग भोजन तर दूरची बात. त्यामुळे प्रत्येक जातीचे गट आपआपले भोजन स्वतंत्रपणे बनवितात, प्रत्येक गटाची चूल वेगळी ! म्हणुन हुजूर, आपल्याला तेथील छावण्यातून इतक्या ठिकाणाहून धुर निघतांना दिसतो आहे."

 

 

हे ऐकल्यावर बाबर बराच वेळ जोरजोरात हसत राहिला. नंतर तो आपल्या सेनापतीला म्हणाला " मीर बांकी, तू आणलेल्या बातमीमुळे मी निश्चिंत झालो आहे. हे युद्ध आपणच जिंकणार हे मी तुला खात्रीने सांगू शकतो. अरे,  हे काय आपल्याशी लढणार ? जे सैन्य भोजनासाठी एकत्रित येऊ शकत नाही ते एकत्रित, एकदिलाने शत्रुशी काय मुकाबला करणार ?" अन् पुढच्या तीन दिवसात राणा संगच्या सेनेचा दारुण पराभव झाला व मुगल शासनाचा पाया अधिक  मजबूत होण्याकडे वाटचाल सुरु झाली.

 

मनात विचार येण सुरुच होत ...........

 

जातीपातीत अडकलेला हिंदू हा एकदिलाने एक राष्ट्र, एक देश म्हणुन ऊभा राहिला नाही व त्याचा या युद्धात पराभव झाला. मुगलांनी मग आपले बस्तान येथे बसविले. अर्थात, काही काळाने ही त्रुटी शिवाजी महाराजांनी दूर करण्याचा प्रयत्न केला तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन. अठरा पगड जातींना एकत्र करून  “आपण सारे हिंदू” व “आपले राष्ट्र” “हिंदवी स्वराज्य” ही भावना खऱ्या अर्थाने त्यांनी रुजवली, चेतवली. 

 

सुमारे ५०० वर्षांपुर्वीची हिंदूंची जी स्थिती होती तीच स्थिती दुर्दैवाने आजही आहे. जातीपातीच्या भीती दिवसेंदिवस उंच होतांना दिसत आहेत. आपसातील द्वेषाची भावना अधिक उग्र होताना आपण पहात आहोत. गटतट, जातीपाती यात आज आम्ही इतके अडकलो आहोत कि ........

ब्राम्हण, वैश्य, क्षत्रिय, जाट, दलित, मराठा, पाटिदार असा प्रत्येकजण आपआपल्या जातींचे महासम्मेलन, महामोर्चा यात आपल्या जातीच्या बांधवांच्या हिताच्या, प्रगतीच्या नावाखाली गुरफटत चालला आहे. “हिंदवी स्वराज्य” या शिवाजी महारांजांच्या संकल्पनेतील “हिंदवी”, ‘हिंदू’ हे शब्द आज उच्चारले कि त्याला जातीयवादी ठरवले जाते व हे ठरविण्यात फुले, शाहू आंबेडकर यांच्या नावाचा जप करुन स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आघाडीवर असतात.

 

राष्ट्रीय भावना किंवा राष्ट्रीयत्व हे खरे कोणाचे यावरून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणून कोणी राष्ट्र विरोधी, विघातक वक्तव्य केले तर त्याचा निषेध करायचा नाही.  का ? तर व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणे ! बाबरासारख्या शत्रूशी लढतांना ५०० वर्षांपूर्वी आम्ही सारे राष्ट्र भावनेने एक झालो नाही व युद्ध आणी स्वातंत्र्य गमावून बसलो. संकुचित भावना व स्वार्थ यांनी आज प्रत्येकामधील राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर जणू आक्रमण केले आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने समाज एक होऊ नये म्हणून काही शक्ती सदैव कार्यरत असतात. तेव्हा आज आमची लढाई आहे ती या शक्तींशी न कि कोणा बाह्य बाबराशी !

 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

 

Shared with https://goo.gl/9IgP7

Tuesday, February 7, 2017

मला समजलेला विकास

"विकास"म्हणजे हल्ली परवलीचा शब्द बनला आहे. पण "विकास" म्हणजे काय ? त्याची व्याख्या कशी करायची ? मला अस वाटते कि या प्रश्नांचे ऊत्तर "विकास कशाचा" ? या प्रश्नाच्या ऊत्तरावर अवलंबून आहे.


विकास कशाचा ... तर मुलांच्या बाबतीत  "बौद्धिक क्षमतेचा", खेळाडूंच्या बाबतीत "शारिरिक क्षमतेचा, तंदुरुस्तीचा", व्यावसायिक किंवा विक्रेता असेल तर "विक्रीकौशल्य, किंवा संभाषण चतुरता", पुढारी किंवा वक्ता असेल तर "वकृत्व- कौशल्य" वगैरे .... आता व्यक्ति तितक्या प्रवृत्ती त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या सोईप्रमाणे व आकलनाप्रमाणे "विकास" या शब्दाचा अर्थ लावणार, व्याख्या करणार व ते स्वाभाविक पण आहे.  


मात्र एखाद्या "गावाचा किंवा शहराचा विकास" म्हणजे नेमक काय ? याबद्दलची तुमच्या मनात व एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या मनात असलेली संकल्पना यात फरक का बर असावा ? हा एक तसा अनुत्तरित ( परंतु  प्रत्येकाला ऊत्तर माहित असलेला ) प्रश्न आहे. आपल्या अन् त्यांच्या  व्याख्येत असे ना का तफावत, पण "विकास" या शब्दाची "समान व्याख्या व एकसारखा अर्थ" लावू शकणारी मंडळी म्हणजे समस्त  "राजकारणी" !


मी अनेक वर्ष जे पाहिल त्यानुसार "विकास" शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे. म्हणजे पहा अस कि सगळ्यात प्रथम रस्ताच्या मधोमध दुभाजक बसवायचे, मग पादचारी मार्ग पेव्हिंग ब्लाॅक बसवून सजवायचे. हे झाल की रस्ता सिमेंटचा करायला घ्यायचा. (तिथल्या नागरिकांची मागणी नसतांना "विकासकाम" का सुरु केल विचारल तर ऊत्तर तयार असत .. "सिमेंट रस्ता १०-१५ वर्ष टिकतो व मेंटेनेंस फ्री असतो.")  सिमेंटचा रस्ता ऊंच झाल्यामुळे मग दुभाजकाची व पादचारी मार्गाची ऊंची कमी होते मग त्यामुळे पुनः दुभाजक व पादचारी मार्गाचे टेंडर काढायचे. या क्रमाने नियमित काम करत राहिल कि साधारण २-३ वर्ष संपतात. मग जवळपास ऊद्यान वगैरे असेल तर मग सिमेंटचे बाक (माननीय अमुक अमुक यांच्या सौजन्याने असे लिहून) बसवायचे. (मध्यंतरी काही रस्त्यांच्या कडेचे पादचारी मार्ग सायकल ट्रॅक म्हणुन बनविले गेले, त्या खर्चाच व त्या सगळ्याच ट्रॅकच काय झाल हे प्लिज विचारु नका)  


सगळे नीट छान झाल कि मग नविन आयडिया... ड्रेनेज लाईन किंवा पाण्याची मोठी लाईन टाकायची म्हणुन १०-१५ वर्ष टिकणारे या सबबीखाली केलेले रस्ते पुनः खोदायचे.  हे सगळे सुरु असतांना आपला हात जोडून " दिलगिरी व्यक्त करणारा बॅनर लावायचा. बॅनरवरच लक्षवेधी वाक्य म्हणजे ".... यांचा एकच ध्यास, आपल्या वाॅर्डचा विकास" वगैरे वगैरे.


हे अस करेपर्यंत ४-४॥ वर्ष संपतात. मग विकासाच प्रगतीपुस्तक घेऊन पक्षश्रेष्ठींकडे खेट्या मारायच्या, पुढच्या निवडणुकीसाठी तिकिट पक्क करायला ! पक्षाच्या दृष्टिने गेल्या ५ वर्षात संबंधित माननीयांनी मतदारांची, वाॅर्डची सेवा करत किती माया कमविली (कृपया गैरसमज नसावा, मतदारांचे प्रेम या अर्थाने माया शब्दप्रयोग आहे) व पक्षाची "स्थिती" किती "मजबूत" केली याला महत्व असते. 


संपूर्ण शहरातील महत्वाचे रस्ते एकदा सिमेंटचे झाले कि मग खर चॅलेंज ऊभ रहात. आपल्या शहराची निवड "स्मार्ट सिटी" साठी झाली आहे ना मग आता समान पाणीपुरवठा योजना, बीआरटी, मेट्रो इ. इ. सगळे काही येणार मग हजारो कोटी खर्च करुन बनविलेले सगळे रस्ते परत खणायचे कारण समान पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत पाईपलाईन्स टाकाव्या लागणार ना ! मेट्रो भुमिगत न्यायची म्हणजे तिथलाही नुकताच झालेला सिमेंटच्या रस्त्याचा खर्च पाण्यात ! बीआरटीचा खेळ गेली ८-१० वर्ष सुरुच ! त्यांच्या मते प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणीपुरवठा केला म्हणजे सगळ्यांना समान पाणी मिळणार, धरणातल्या पाणीसाठ्याचा, सदोष यंत्रणेचा किंवा पाणीगळतीचा त्याच्याशी काय संबंध ? आम्ही तर बुवा यालाच खरा विकास म्हणतो. 


कचऱ्याचे ढीग, वाहतूक समस्या, प्रदूषण, सार्वजनिक ऊद्याने, क्रिडांगणे वगैरे ...  यासारख्या प्रश्नांवर विचार करुन नियोजन पूर्वक खर्च करणे म्हणजे "विकास" अस काही हुषार व चाणाक्ष करदात्यांचे मत असल्याच कानावर आलय. पण त्याला काहीच अर्थ नसतो, त्यांनी फक्त कर भरावा अन् करवाढ केली तर आरडाओरडा करावा. असो... ! 


गावाचा किंवा शहराचा विकास यावर लोक काहीही बरळत असतात. त्यांना कळतच नाही कि विकास करायचा असतो, पण तो "कशाचा" ? यापेक्षा "कोणाचा" ? हे जास्त महत्वाच नाही का ? तुम्हाला काय वाटत ?

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Sunday, February 5, 2017

शिक्षण आणि प्रगति

*शैक्षणिक प्रगती अन् वैचारिक अधोगती*

थंडीने काढता पाय घेतला तस पुण्याच्या वातावरणातील उष्मा वाढू लागलाय तर इकडे संभाजी उद्यानातील गडकरी पुतळा या विषयावरुन राजकीय वातावरण तप्त होत चालल आहे. संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एका आमदाराने हे कतृत्व करणाऱ्याचा जाहीर सत्कार करत केलेले प्रक्षोभक वक्तव्य, प्रत्युत्तरादाखल नुकताच  संभाजी उद्यानाबाहेर झालेल्या कलाप्रेमींच्या कार्यक्रमादरम्यान एका आमदाराने केलेले प्रतिआव्हानाचे वक्तव्य ..... वगैरे !

या प्रकारच्या सभोवताली घडणाऱ्या घटना पाहिल्या, ऐकल्या कि मनात संभ्रम निर्माण होतो - विद्येच माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अभ्यास करुन आपण अनेक पदव्या घेतल्या, उच्च शिक्षण घेतले पण आपण खरच "शिक्षित" झालो का ? स्मार्ट सिटी, मेट्रोची चर्चा करतांना  प्रगतीची नवनवी शिखरे आपण पादाक्रांत केली पण आपण खरच विचारांनी "प्रगत" झालो का ? 

या दोनही प्रश्नांची उत्तरे जर का होय असेल तर मग जातीजाती मधील भेदभावांची दरी दिवसेंदिवस का वाढते आहे ? किंबहुना, जातीजाती मधे असलेला भेदभाव आपल्या शिक्षणामुळे, प्रगतीमुळे संपुष्टात का नाही येऊ शकला ? अस विचारण जास्त संयुक्तिक ठरेल नाही का !

तुकारामांच्या गाथांचा अर्थ लावण्यात एक आयुष्य पुरत नाही,  ज्ञानेश्वरीवर ७०० वर्ष झाली तरी अजूनही अभ्यास होतोच आहे व नव्याने लागलेल्या अर्थाची मांडणी होते आहे. दासबोधावर आधारित काही संस्था मॅनेजमेंट ट्रेनिंगचे कार्यक्रम करत आहेत. तीच गोष्टी संत एकनाथ,नामदेव यांच्या अभंगांची !  मग असे असतांना आमचा शिक्षित व प्रगत समाजघटक इतिहासावर आधारित एखादी साहित्यकृती, एखादी नाट्यकला, एखादा प्रबंध वगैरे ... यातून एखाद्याने मांडलेला विचार हा एक वेगळा दृष्टिकोण आहे असे मानून, असे समजून त्याचा स्वीकार करतांना का दिसत नाही ? त्याचा एकांगी दृष्ट्कोनातून व वरवरचा अभ्यास करुन एकतर्फी निष्कर्ष काढत इतक्या टोकाची विरोधाची भुमिका का घेतली जाते ? अशा घटना घडू लागल्या कि घेतलेले उच्च शिक्षण, केलेली प्रगती यातील फोलपणा लक्षात येतो.

आपसातील मतभेद, उच्चनीचता यामुळे समाजाचे व पर्यायाने देशाचे किती नुकसान झाले याचा शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या समोर आहे. त्यातून काही बोध घेत ही विषमता, हा भेदभाव  नष्ट करुन  "आपण सारे एक" या भावनेने, या विचाराने पुढे जाण्याऐवजी जातीनिहाय मोर्चे काढून नकळतपणे आपण ही भेदभावाची दरी दिवसागणिक अधिक रुंद करत नाही का ? जातीपातीच्या कडा अधिक धारदार बनवित नाही का ? 

तस पाहिले तर जाती अंतर्गतही भेदभाव केला जातो, ऊच्च-नीचता पाळली जाते. आणि हे केवळ एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. ब्राम्हण, मराठा, दलित अशा प्रत्येक जातीमधे अनेक पोटजाती आहेत. अंतर्गत चालीरीतींमधे फरकावर आधारित श्रेष्ठतेची क्रमवारी, प्रतवारी मानली जाते. त्यामुळे आधी जाती अंतर्गत आपसातील भेदभाव मिटणे ही पहिली पायरी ठरावी. हे साध्य जितक्या लवकर होईल तेवढे आपण जातविरहीत, भेदभावविरहीत समाज व्यवस्थेकडे वाटचाल करु शकू.

पण आधी राज्य करायच म्हणुन इंग्रजांनी divide and rule या नीतीचा अवलंब केला व आज मतांचा जोगवा मागतांना मतदारांना झुलवत ठेवत जातीपातीच राजकारण करण फायदेशीर ठरते म्हणुन राजकीय मंडळी तेच करत आहेत. राजकारणी मंडळी ही अतिशय  चतुर जमात आहे. अशा घटनांमधुन राजकीय पोळी भाजून पुढची ५ वर्ष सत्तेची खुर्ची उबवतील पण समाजाचे, जनतेचे प्रश्न आहे तिथेच व आहे तसेच रहातील. 

तेव्हा आपण सावध राहू या ! मतभेदांचा आदर करु या व मनभेद होणार नाही याचीही काळजी घेऊ या. एकमेकांना समजून घेतांना एक पाऊल मागे येणे म्हणजे हार नव्हे किंवा समोरच्याने एक पाऊल मागे घेणे म्हणजे आपला विजय नव्हे हे आपण लक्षात घेऊ या. किंबहुना अस करणे म्हणजे एकमेकांना समजून घेेणे होय, अन् "शिक्षण व प्रगती" चा हा खरा अर्थ आहे हाच असला पाहिजे अस मला वाटते !

बिंदुमाधव भुरे, पुणे