Sunday, February 5, 2017

शिक्षण आणि प्रगति

*शैक्षणिक प्रगती अन् वैचारिक अधोगती*

थंडीने काढता पाय घेतला तस पुण्याच्या वातावरणातील उष्मा वाढू लागलाय तर इकडे संभाजी उद्यानातील गडकरी पुतळा या विषयावरुन राजकीय वातावरण तप्त होत चालल आहे. संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एका आमदाराने हे कतृत्व करणाऱ्याचा जाहीर सत्कार करत केलेले प्रक्षोभक वक्तव्य, प्रत्युत्तरादाखल नुकताच  संभाजी उद्यानाबाहेर झालेल्या कलाप्रेमींच्या कार्यक्रमादरम्यान एका आमदाराने केलेले प्रतिआव्हानाचे वक्तव्य ..... वगैरे !

या प्रकारच्या सभोवताली घडणाऱ्या घटना पाहिल्या, ऐकल्या कि मनात संभ्रम निर्माण होतो - विद्येच माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अभ्यास करुन आपण अनेक पदव्या घेतल्या, उच्च शिक्षण घेतले पण आपण खरच "शिक्षित" झालो का ? स्मार्ट सिटी, मेट्रोची चर्चा करतांना  प्रगतीची नवनवी शिखरे आपण पादाक्रांत केली पण आपण खरच विचारांनी "प्रगत" झालो का ? 

या दोनही प्रश्नांची उत्तरे जर का होय असेल तर मग जातीजाती मधील भेदभावांची दरी दिवसेंदिवस का वाढते आहे ? किंबहुना, जातीजाती मधे असलेला भेदभाव आपल्या शिक्षणामुळे, प्रगतीमुळे संपुष्टात का नाही येऊ शकला ? अस विचारण जास्त संयुक्तिक ठरेल नाही का !

तुकारामांच्या गाथांचा अर्थ लावण्यात एक आयुष्य पुरत नाही,  ज्ञानेश्वरीवर ७०० वर्ष झाली तरी अजूनही अभ्यास होतोच आहे व नव्याने लागलेल्या अर्थाची मांडणी होते आहे. दासबोधावर आधारित काही संस्था मॅनेजमेंट ट्रेनिंगचे कार्यक्रम करत आहेत. तीच गोष्टी संत एकनाथ,नामदेव यांच्या अभंगांची !  मग असे असतांना आमचा शिक्षित व प्रगत समाजघटक इतिहासावर आधारित एखादी साहित्यकृती, एखादी नाट्यकला, एखादा प्रबंध वगैरे ... यातून एखाद्याने मांडलेला विचार हा एक वेगळा दृष्टिकोण आहे असे मानून, असे समजून त्याचा स्वीकार करतांना का दिसत नाही ? त्याचा एकांगी दृष्ट्कोनातून व वरवरचा अभ्यास करुन एकतर्फी निष्कर्ष काढत इतक्या टोकाची विरोधाची भुमिका का घेतली जाते ? अशा घटना घडू लागल्या कि घेतलेले उच्च शिक्षण, केलेली प्रगती यातील फोलपणा लक्षात येतो.

आपसातील मतभेद, उच्चनीचता यामुळे समाजाचे व पर्यायाने देशाचे किती नुकसान झाले याचा शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या समोर आहे. त्यातून काही बोध घेत ही विषमता, हा भेदभाव  नष्ट करुन  "आपण सारे एक" या भावनेने, या विचाराने पुढे जाण्याऐवजी जातीनिहाय मोर्चे काढून नकळतपणे आपण ही भेदभावाची दरी दिवसागणिक अधिक रुंद करत नाही का ? जातीपातीच्या कडा अधिक धारदार बनवित नाही का ? 

तस पाहिले तर जाती अंतर्गतही भेदभाव केला जातो, ऊच्च-नीचता पाळली जाते. आणि हे केवळ एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. ब्राम्हण, मराठा, दलित अशा प्रत्येक जातीमधे अनेक पोटजाती आहेत. अंतर्गत चालीरीतींमधे फरकावर आधारित श्रेष्ठतेची क्रमवारी, प्रतवारी मानली जाते. त्यामुळे आधी जाती अंतर्गत आपसातील भेदभाव मिटणे ही पहिली पायरी ठरावी. हे साध्य जितक्या लवकर होईल तेवढे आपण जातविरहीत, भेदभावविरहीत समाज व्यवस्थेकडे वाटचाल करु शकू.

पण आधी राज्य करायच म्हणुन इंग्रजांनी divide and rule या नीतीचा अवलंब केला व आज मतांचा जोगवा मागतांना मतदारांना झुलवत ठेवत जातीपातीच राजकारण करण फायदेशीर ठरते म्हणुन राजकीय मंडळी तेच करत आहेत. राजकारणी मंडळी ही अतिशय  चतुर जमात आहे. अशा घटनांमधुन राजकीय पोळी भाजून पुढची ५ वर्ष सत्तेची खुर्ची उबवतील पण समाजाचे, जनतेचे प्रश्न आहे तिथेच व आहे तसेच रहातील. 

तेव्हा आपण सावध राहू या ! मतभेदांचा आदर करु या व मनभेद होणार नाही याचीही काळजी घेऊ या. एकमेकांना समजून घेतांना एक पाऊल मागे येणे म्हणजे हार नव्हे किंवा समोरच्याने एक पाऊल मागे घेणे म्हणजे आपला विजय नव्हे हे आपण लक्षात घेऊ या. किंबहुना अस करणे म्हणजे एकमेकांना समजून घेेणे होय, अन् "शिक्षण व प्रगती" चा हा खरा अर्थ आहे हाच असला पाहिजे अस मला वाटते !

बिंदुमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment