Saturday, February 4, 2017

मनष्य स्वभाव आणि वागणूक

दोन सेकंदाचा उशीर आणि सिग्नल रेड पडला. झेब्रा क्राॅसिंगच्या अलिकडे थांबलो होतो. तब्बल दोन मिनिट वेळ होता त्यामुळे स्कूटरची किल्ली फिरवत इंजिन बंद केल. इंधनाचा अपव्यय व प्रदुषण दोन्हीचा विचार डोक्यात होताच. तेव्हढ्यात आणखीन दोन चार टू व्हीलरवाले डावी उजवीकडून आले. माझ निरिक्षण सुरु होत.


माझ्या डावीकडून आलेला माझ्यापुढे एक सहा इंच त्याच्या शेजारी नंतर आलेला झेब्रा क्राॅसिंग वर उभे राहिले तर लोक काय म्हणतील अस वाटून लोक लज्जेखातर क्राॅसिंगवर स्कूटरच फक्त पुढचे चाक येइल याची काळजी घेत थांबला व आजूबाजूला नजर टाकत त्याने खात्री केली कि फार कोणी विचित्र नजरेने पाहात नाही ना ? 


नंतर एक बुलेटस्वार ! काळा गाॅगल, लिनन कडक शर्ट वगैरे, गुंठेवारीकिंग असावेत.  हे महाराज थेट झेब्रा क्राॅसिंगवर जाऊन थांबले. आपल्याला कोण काय म्हणणार ? आहे का कोणाची हिंमत ? असे भाव चेहेऱ्यावर ! या महाशयांमुळे मागून येणारे अन्य स्कूटरस्वार व रिक्षाचालक यांना त्याच्यामुळे जणू परवाना मिळाला या थाटात सगळ्यांनी तो झेब्रा क्राॅसिंग दिसेनासा करुन टाकला. 


दोन मिनिटे संपतात अन् पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याकरीता ग्रीन सिग्नल पडतो. नागरिकांसह काही सिनियर सिटिझन्स रस्ता आता कसा, कोठून ओलांडायचा या विवंचनेत जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडायचा प्रयत्न करतात. त्यातले एक दोन वैतागलेले झेब्रा क्राॅसिंग अडविलेल्या स्कूटरस्वारांना नियम सांगुन मागे गाडी थांबवत जा असा सल्ला त्या धावपळीतही देण्याचा प्रयत्न करतात. 


एकदोघे जण  दोन्ही पाय जमिनीवर रेटत स्कूटर दोन चार इंच मागे घेतल्यासारखे करतात. एक जण "ओ काका, आहे ना पलिकडून जागा" तर दुसऱ्याची गुर्मी बोलून गेली "चले ए चल, नको शिकवू जास्त" वगैरे. अवघ्या दोन मिनिटांचा सिग्नल पण मंडळी किती तरी प्रकारांनी रिअॅक्ट होतांना दिसली.


वाहन चालकांना नियम पाळण्याविषयी कोणी बोलले तर प्रतिक्रिया किती प्रकारच्या असू शकतात याचा अनुभव चौकाचौकात आपण रोज घेत असतो. आपण काही चुक करतो आहोत याबद्दल काहीच न वाटणे, आपली चुक जर कोणी दाखवून दिली तर प्रचंड अपमान झाल्यासारखे वाटणे, पोलिसांनी पकडले तर हुज्जत घालणे,  विनाकारण कर्कश हाॅर्न वाजविला म्हणुन वाद, ओव्हरटेक करायला साईड दिली नाही म्हणुन वाद, राँग साईडने वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातातून निर्माण होणारे वाद वगैरे.


हे केवळ वाहतूक, ट्रॅफिक या विषयाशी संबंधित झाल.  दैनंदिन व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात रोज अशा अनेक प्रसंगांना आपण नकळत सामोरे जात असतो. तेव्हा आपण कधी प्रेक्षक असतो तर कधी त्या प्रसंगाचा भाग असतो. कुटुंबात, नातेवाईकांत घडणारा प्रसंग असेल, नोकरीच्या ठिकाणी सहकारी किंवा वरिष्ठ यांच्याशी होणारा वाद असेल किंवा दुकान, भाजीवाला, सरकारी कार्यालय, पोस्ट आॅफिस, बँक, विमा कार्यालय येथे घडणारा एखादा प्रसंग असेल. संवादातून सुरु झालेल्या प्रसंगाचे रुपांतर वादात केव्हा परिवर्तित होते हे कळत नाही.


दोन व्यक्तिंमधे वाद होतो तेव्हा कोणीतरी चूक व कोणीतरी बरोबर असणे साहजिकच आहे पण वादाच मूळ कारण दोघांनाही मीच बरोबर व समोरचा चूक वाटणे हे असते. वाद मिटून प्रश्न निकाली निघावा म्हणुन कोणीतरी थांबणे, किंवा बर ठिक आहे, जाऊ द्या अस म्हणुन पडते घेण्याची गरज असते. पण हे करण म्हणजे माझी हार व समोरच्याचा विजय अस दोघांनाही वाटत.  मग अनेकदा प्रकरण विकोपाला जाते. मारामारी, गुंडागर्दी, पोलिस केस अशा चक्रात माणसे फसत जातात. 


या सगळ्यमुळे आपण आयुष्यात काय गमावतो आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. आयुष्यातील एक मोठा काळ मत्सर, द्वेष, अहंकार, मीपणा यात घालवून आपण खऱ्या सुखापासून वंचित रहातो. माझ्या मनात त्यामुळे एक प्रश्न कायम घोळत असतो कि मिळालेला एक मनुष्यजन्म या अशा वागणूकीने लोक खरोखरच का वाया घालवत असतात ?


मध्यंतरी NASA ने बनविलेली एक शाॅर्ट फिल्म पहाण्यात आली. Tour of galaxy अस काहीतरी नाव असाव. पृथ्वीतलावर उभा असलेल्या एका माणसावरुन कॅमेरा अवकाशात दूर जाऊ लागतो. या अॅनिमेटेड फिल्ममधे कॅमेऱ्याचा प्रवास हा सुमारे एक लाख ऐशी हजार किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने सुरु असतो. त्यामुळे या प्रवासात काही सेकंदातच पृथ्वी एका छोट्या टिंबाप्रमाणे दिसायला लागते व क्षणार्धात आपण चंद्रालाही मागे टाकतो. 


त्यानंतर मंगळ, बुध, गुरु या क्रमाने सुर्यमालेतील सगळे ग्रह साधारण दोनच मिनिटात आपण मागे पडतात. कॅमेरा पुढे सरकतो तसे आपल्या संपूर्ण सुर्यमालेचे त्यातील सर्व ग्रह, त्यांचे चंद्र यासह सुंदर दर्शन होते. पुढच्याच क्षणाला ही महाप्रचंड सुर्यमाला लहान होत होत रांगोळीतल्या लहान ठिबक्या एवढी दिसू लागते. कॅमेऱ्याची वेग व गती कायम असल्यामुळे नंतरच्या काही सेकंदात असे असंख्य रांगोळीच्या ठिबक्यांचा समुह लंबवर्तुळाकृती आकारांत पसरलेला दिसतो. अतिशय तेजःपुंज अस हे रुप पाहून वाटते कि जणू अवकाशात पांढरा, दुधाळ रंगाचा सडा शिंपला गेला आहे.


शास्रज्ञांच अस अनुमान आहे कि आपल्या सुर्यमालेसारख्या, त्या किंवा त्याहुनही मोठ्या आकारांच्या सुमारे अकरा हजार सुर्यमाला अवकाशात असाव्यात. यालाच  ब्रम्हांड म्हणत असावेत. अशा या ब्रम्हांडाच हे अतिविशाल स्वरुप पाहिल्यावर एक क्षणभर मनात आल कि या ब्रम्हांडाच्या तुलनेत आपली पृथ्वी सुईच्या टोकाच्या आकाराची तरी असेल का ? मग या तुलनेत भारत केव्हढा असेल ? हिमालय केव्हढा असेल ? आणि सगळ्यात महत्वाचे या ब्रम्हांडाच्या तुलनेत एक साधारण मानव म्हणुन आपल दखल घेण्याइतक तरी अस्तित्व आहे का ? 


कित्येक कोटी वर्ष वय असलेल्या या ब्रम्हांडाच्या तुलनेत ७०-८० वर्ष वयाचे मानवी आयुष्य म्हणजे त्या ब्रम्हांडाच्या डोळ्याची पापणी लवते त्यापेक्षाही कमी वेळाचे आहे. असे असतांना कशाला ठेवायचा आपल्या वागणुकीत अहंकार, गर्व, मस्ती ? कशाला हव्यात आपसातील ऊच्च-नीचता, श्रेष्ठता-कनिष्ठता ?


या मानवी आयुष्याच्या प्रवासात आपल्याला काही व्यक्ति या आयुष्यभर सोबत करणाऱ्या (पत्नी, नातेवाईक), काही अल्पकाळासाठी (कार्यीलयीन सहकारी, मित्रमंडळी) तर काही सिग्नलला भेटतात तसे क्षणिक भेटणारे असतात. व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय ... आपल आयुष्य कसेही असु दे, त्यात प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्द्यावर एकवाक्यता असेलच असे नाही. वेगळा विचार, मतभेद हे असणारच.  

फुल झाडावर शोभून दिसतसे, पुष्पगुच्छातही सुंदर दिसते. पण त्यासाठी त्याला झाडावरुन दूर व्हावे लागते. ज्यानी ते फूल तोडले त्याच्यावर फूल कधीच राग धरत नाही उलट त्याला, पुष्पगुच्छ बनविणाऱ्याला, तो विकत घेणाऱ्याला, मिळणाऱ्याला प्रत्येकाला आनंदी करत जाते. काही क्षण मिळणारे आयुष्य दुसऱ्याला आनंद देण्यात जाणाऱ्या फुलासारखे व्यतीत करायचे असे प्रत्येकाने ठरविले तर ? 


बिंदुमाधव भुरे, पुणे 

No comments:

Post a Comment