Sunday, May 20, 2018

शेवटचे पान

एक काळ होता, उच्चवर्गीय, श्रीमंत मंडळींची अभिरुचिसंपन्नता दिवाणखान्यातील कोपरा व्यापलेल्या ग्रामोफोन व छान रचून ठेवलेल्या रेकार्ड्समुळे ठळकपणे नजरेत भरायची. टेपरेकाॅर्डर व कॅसेट असे पण काहीतरी गाणी ऐकण्यासाठी असत असे तेव्हा कानावर होते. हव ते गाणे हव तेव्हा ऐकण्याऱ्या शौकीनांसाठी ती एक महागडी सोय होती. पण बाकी आपल्यासारख्यांना गाणी ऐकण्याचा शौक भागवण्यासाठी विविधभारती आणि दर बुधवारी रात्री रेडियो सिलोनवर बिनाका गीतमाला हेच माध्यम ! अर्थात रेडियोवरील या दोन्ही कार्यक्रम  प्रकारात पुढचे गाणे कुठले लागणार ? याची उत्सुकता सदैव असायची.

त्यामुळे कि काय अगदी लांबून एखाद्या गाण्याचे सूर कानावर पडले तर आजूबाजूच्या आवाजात फक्त त्या सुरांवर लक्ष केंद्रित राहील इतके मन एकाग्र करुन ते गाण ओळखायचा प्रयत्न व्हायचा. स्त्री गायिका असेल तर लता किवा आशा अन् पुरुष गायक असला तर रफी, किशोर, मन्नाडे किंवा महेन्द्रकपूर ! बऱ्याचदा कितीही मन एकाग्र करुन ऐकायचा प्रयत्न केला तरी पुसटआवाजाच्या आधी वाद्यांची सुरावट कानावर पडायची. गाणी ओळखायला एखादा म्युझिकल पीसही पुरेसा ठरायचा.

आज घर आवराआवरी करतांना कॉलेजमधे असतांनाच्या जुन्या वह्या सापडल्या. रुपेरी केस आणि चेहेऱ्यावरील सुरकुत्या वय वृद्धत्वाकडे झुकल्याच्या खुणा असतात तर पिवळी व जीर्ण झालेली वहीची पानेही तीच जाणीव करुन देतात. वयोपरत्वे एक एक पाऊल जसे सावकाश टाकले जाते तद्वत एक एक पान सावकाशीने उलटत होतो. अनेक वर्ष हवा न लागलेल्या वहीचे प्रत्येक पान उलटतांना येणारा उग्र दर्प जाणवतही नव्हता कारण या शेवटच्या पानावरच्या मजकूरातील जुन्या आठवणींच्या सुंगंध मनाला प्रफुल्लित करत होता.

जिया ले गयो - अनपढ़ चित्रपटातले आख्ख गाणे लिहिलेल शेवटच पान असलेली एक वही सापडली. फक्त पहिले कडवे संपल्यानंतरची सुरावट अर्धवट होती. पुनः कधी गाणे कानावर पडेल तेव्हा लिहू अशा विचाराने दोन ओळी मोकळ्या सोडून दिल्या होत्या. जेव्हा सुरावट कानी पडायची तेव्हा वही सोबत नसायची अन पाठ करु म्हटल तर इतके निवांत कधी तेव्हा ऐकायला मिळाले नाही.

आज हवे ते गाणे हवे तेव्हा ऐकायची सोय आहे अगदी नुसते गाण्याचे बोल हवे असतील तर तेही एका क्लिकवर उपलब्ध आहेत. पण शेवटच्या पानावर लिहिलेल ते गाणे वाचतांना त्याच्याशी जोडलेल्या आठवणी ? त्या मात्र आज संगणकावर केलेल्या त्या क्लिकमधे कशा येतील ? अशी एखादी जुनी वही मिळतेय का पहा, शेवटच्या पानाशी जोडलेल्या आठवणी किती सुखदायक असतात ते नक्की अनुभवा !

बिंदुमाधव भुरे, पुणे ©