Friday, January 29, 2021

नाॅस्टॅल्जिया

**** *नाॅस्टॅल्जिया* ****
*** *मुक्काम पोस्ट पुणे****

३५-४० वर्षांपूर्वीचे दिवस अजूनही आठवले कि मस्त वाटते ! पिक्चरला जायच ठरल कि आधी थिएटर वर जाऊन पहावे लागे तिकिट मिळतायत का ? कारण पूर्वी एखादा पिक्चर थिएटरला लागला अन् तो चांगला चालतोय म्हटल कि २५ आठवडे अगदी रौप्यमहोत्सव होइपर्यंत त्याचा मुक्काम तेथेच. त्यामुळे पहिले ३-४ आठवडे अॅडव्हान्स बुकिंग न करता ऐन वेळेला थिएटरवर गेल कि  "हाऊसफुल्ल" च्या बोर्डला घातलेला फुलांचा हार लांबूनच दिसायचा अन् मूड आॅफ व्हायचा. 


पण वेडी आशा आम्हाला माघारी फिरु द्यायची नाही. कोणीतरी एक्स्ट्रा तिकिट असलेला भेटेल या खोट्या आशेवर त्या गर्दीत आशाळभूत अन् शोधक नजरेन फिरत रहायच. एकट दुकट कोणी उभ दिसल तर विचारायच "आहे का एक्स्ट्रा" ? बहुतेक वेळा खालचा ओठ मुडपून आडवी मान करत मंडळींचा नकारच यायचा नाही तर "अहो, मलाच हवी आहेत दोन तिकिट" अस उत्तर ! थिएटरमधे एंट्री सुरु झाली कि हळूहळू आवारातील गर्दी ओसरु लागायची कि आम्ही मंडळी काढता पाय घ्यायचो.


बर त्याकाळी सगळ्या थिएटरला शो ची टायमिंगही ठराविकच ... ३,६ व ९. त्यामुळे अगदी धावत धावत म्हणजे सायकल मारत दुसऱ्या थिएटरला एखादा शो मिळतोय का बघायची सोय नाही. मग आमच मित्रमंडळींच टोळक जाऊन धडकायच डेक्कनला,  सनराईज नाहीतर रिगलवर. इराण्याचा चहा हे नुसत निमित्त ! खर कारण तेथे फुकट ऐकायला मिळणारी गाणी. पाच जण असलो तर "तीन पानी कम" ची आॅर्डर सुटायची कारण अगदी सगळ्यांनी खिसे झाडले तरी पाच चहाचे पैसे निघण अशक्य ! आणि अगदी चुकून एखाद्याकडे जास्त निघालेच तर त्या श्रीमंतीचा आनंद काय वर्णावा ! अहाहा !! पण या जादा पैशांचा चहा न पिता पुढची गाणी जर चांगली नाही लागली तर आपली फर्माइशसाठी या श्रीमंतीचा वापर होत असे.


आता थिएटरला नशीब उदास असल तरी इराण्याकड साॅलिड फळायच ! गाणी अशी काही सुरु असायची की आत पाय टाकता क्षणी पिक्चरची तिकिट न मिळाल्याच दुःख काही क्षण तरी विसरायला व्हायच. गुलजार, आरडी जोडीन "आँधी"त जी काही जादू केली होती त्यान अक्षरशः तेव्हा आमच्या अख्खया पिढीला वेड लावल होत. "इस मोड़से जाते है" वाक्यातल "मोड" शब्दावर लताची नाजूक हरकत आणि "पत्थरकी हवेली" वर किशोरचा लागलेला खास संजीवकुमारसाठीचा आवाज ! कितीही वेळा ऐकल तरी कमीच, कान अतृप्तच असायचे. अशी गाणी सुरु असतांना आमची गँग एकदम चिडीचूप असायची. आपापल्या आवडीची गाण्यातली जागा आली कि नकळत "व्वाह, क्या बात है" अस मनोमन व्हायच. 


इराण्याकडे किंवा अमृततुल्यमधे येणार सगळ्यात महत्वाच दैनिक म्हणजे दैनिक प्रभात ! निम्मा पेपर डेडिकेटेड टू पिक्चरच्या जाहिराती. गाणी ऐकण्यामुळे पिक्चर पहायच्या मूडवर पडलेल्या पाण्याची काही प्रमाणात भरपाई झाली असली तरी पिक्चरचा किडा शांत होण अशक्य. त्यामुळे दोन गाण्यांच्या दरम्यान शांतता असे तेव्हा दै. प्रभात मधे मॅटिनीला म्हणजे दुसऱया दिवशी सकाळी ११.३० किंवा १२ चा शोला कोठे कोठे कोणकोणते पिक्चर्स सुरु आहेत याचा आढावा घेण्यात येई.


मॅटिनी म्हणजे थोड़े स्वस्तात काम ना आणि परत जुने पिक्चर्स ! अगदी ब्लॅक अॅन्ड व्हाइट म्हणजे दिलिप, देव किंवा राजकपूर अन् काहीच नाही तर मग शम्मीकपूर ठरलेला. राजकुमार, तिसरी मंझिल व अॅन इव्हिनिंग इन पॅरिस हे कुठे ना कुठे सुरु असायचेच. शशीकपूर, राजेन्द्रकुमार आॅप्शनला असायचे. म्हणजे अगदी काहीच नाही मिळाले तर चांगली गाणी या निकषावर मेरे नेहबूब, आरज़ू, जब जब फूल खिले किंवा ओ पी नैयरसाठी एक मुसाफिर एक हसीना, हमसाया वगैरेवरही समाधान मानत असू. क्लासिकल चा मूड आला तर गुरुदत्तना प्रथम पसंती किंवा मधुमती, अनुपमा वगैरे.


रिगल, सनराइजमधे मित्रांसोबत बसुन एकमेकांना दाद देत एकत्र गाणी ऐकण्यातला आनंद आज कानात इयरफ़ोन घालून मोबाइलमधील गाणी एकट्याने ऐकतांना नाही येत.आज घरबसल्या बुक माय शो वर सर्फिंग करुन पिक्चरच बुकिंग करता येत पण थिएटरवर जाऊन लायनीत ऊभे राहुन अॅडव्हान्स बुकिंग करतांना आपला नंबर येईपर्यंत तिकिट संपतील का या विचाराने होणारी धाकधुकीतली मजा त्यात नाही. कॅफे काॅफी डे मधे बसून काॅफीचे घोट घेत होणाऱ्या टाइमपास पेक्षा रिगल-सनराइज़च्या टिपीकल संगमरवरी टेबल व लाकडी गोल खुर्च्यांवर बसून पानी कम चहाची लज्जत न्यारीच. 


आजच्या हायटेक जमान्यातील नव्या नव्या सुविधामधे एक कम्फर्ट आहे, एक आगळी मजा आहे हे नाकारायच कशाला ? पण एक नक्की,  पुनः ते दिवस येणे नाही, आता ती इराण्याची हाॅटेल्सही नाहीत, एकपडदा चित्रपटगृह वय झाल्यामुळे केव्हाही मान टाकतील अशा त्यांची स्थिती. आज जमाना मल्टिप्लेक्सचा, माॅल्स संस्कृतीचा, स्मार्ट सिटीचा, चर्चा मेट्रोची पण भविष्याचा वेध घेतांना मागे वळून पाहिल तर तुम्हा प्रत्येकाच्या आठवणीत असे काही सोनेरी क्षण असतीलच ना ? माझ्या आठवणीत तर नक्कीच आहेत !

बिंदुमाधव भुरे.
पुणे
१२ जानेवारी २०१७