Monday, December 11, 2023

चक्रव्यूह

१२ मार्च १९७१ ...या दिवशी आनंद पिक्चर रिलीज झाला होता. आपण सगळे ९ वी च्या वार्षिक परीक्षेच्या तयारीत असू. परीक्षा झाल्यानंतर केव्हातरी आपल्यापैकी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला असणार.... आणि नंतर तर अनेकदा ...

त्यातला शेवटचा सीन ! मृत्यूशय्येवर पडलेला राजेश खन्ना ... श्वास लागलेला असतो... आयुष्यातील उरलेले सगळे श्वास संपवण्याची जणू स्पर्धा चालू असावी... मॅरेथॉनच्या शेवटच्या पंधरा वीस मीटरच्या टप्प्यात जीवाच्या आकांताने धावत अंतिम रेषा पार करणारा स्पर्धकच जणू ! तिथे पदकासाठी संघर्ष तर इथे मृत्यूशी झुंज ! 

डॉक्टर असलेल्या बाबू मोशाय .... म्हणजे अमिताभ बच्चनला ती मृत्यूशी सुरु असणारी अपयशी झुंज पहावणार नाहीये म्हणून काहीतरी कारण काढून तो बाहेर पडलाय... आनंदला आता धाप लागलेली आहे ... त्याचा शेवटचा श्वास बाबू मोशायमधे अडकला असावा जणू ... डॉक्टर रमेश देव टेप सुरु करतो आणि बच्चनच्या आवाजात रेकॉर्ड केलेली कविता ऐकू येते.....

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है ....

बच्चनच्या धीर गंभीर आवाजातली कविता पुढे सरकत असते आणि मग त्यातली एक ओळ येते .... जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए.. आणि ती ओळ पूर्ण होण्यापूर्वीच आनंद आयुष्यातील शेवटची आर्त हाक देतो... बाssबू मोशाssssय... श्वास थांबलाय... लढाई संपली आहे... मृत्यूचा विजय झालेलाय.. ...... आणि .... 

बच्चन धापा टाकत येतो पण सगळ काही शांत झालेल असत. त्याला जीवनाच अंतिम सत्य समोर दिसत असत. हताश हतबल बच्चन रडवेल्या चेहऱ्याने निश्चल झालेल्या आनंदकडे पहात असतानाच.. पुन्हा तो खर्जातला धीर गंभीर आवाज कानांवर पडतो...... "बाबू मोशाssय"  ....... टेपरेकॉर्डर सुरुच असतो. जीवन आणि मृत्यू .. या दरम्यान हेलकावे खाणाऱ्या प्रत्येकाच्या  जगण्यातील वास्तव बाबू मोशायच्या कानावर आदळत असतं.‌

जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में है जहापनाह ...
उसे ना तो आप बदल सकते हैं ना हम...
हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वालों की उंगलियों में बंधी है....
कब कौन कैसे उठेगा ये कोई नही बता सकता ......
आणि शेवटी हा हा हा असे आनंदचे ते हास्य ! मृत्यूला बेडरपणे वाकुल्या दाखवणारं ... 

कितीही वेळा हा सिनेमा पाहिला तरी या दृश्याने आपल्या पापण्या ओलावतातच.... अलिकडे हा चित्रपट मी पुन्हा पाहिला आणि या शेवटच्या दृष्याने विचलित झालेल्या मनात विचारांची नव्याने झालेली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू लागली. 

मृत्यू होताच आत्मा अनंतात विलिन झाला म्हणतात आणि आप्तजन अश्रू ढाळत असतात. मात्र इवलासा जीव जन्माला येताच रडतो आणि सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पण याला परमात्मा नविन रुप धारण करुन आला वगैरे असे काही कोणी म्हटल्याच ऐकिवात नाही ... अस का बर ? भगवतगीतेमधे श्रीकृष्णाने मृत्यू, पुनर्जन्म, शरीर, आत्मा वगैरे थियरी मांडली आहे. त्यात असाव का याच उत्तर ? जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए या ओळीत त्याचा अर्थ दडला असेल का ?

राजेश खन्नाला वाटत असेल बापडा हा इहलोक एक रंगमंच ! पण याला युद्धभूमी का म्हणू नये ?  कारण ... जन्मापासूनच मानवाचा  जगण्यासाठीचा लढा सुरु होतो. लहानपणीचे भुकेसाठी रडणे हे मोठेपणी पोटासाठी लढणे होते. एखादी गोष्ट हवी म्हटल्यावर ती मिळवण्यासाठी लहान मूल जे काही करतं तो हट्ट ... मात्र मोठेपणी एखाद्याने तेच केल तर त्याला भांडण, तंटा, राजकारण यासारखी लेबलं का बरं लागतात ? नोकरीतल प्रमोशन काय किंवा व्यावसायिक यश .... त्यासाठी जे काही करायला लागतय ... ते काय असत ? धडपड, लढा कि युद्ध ? आजारपणातही माणूस आजाराशी लढतो तर डॉक्टर आजार बरा करण्यासाठी .....  ते काय असत ? लढा कि युद्ध ? आनंदची लढाई सुरु होती आणि बाबू मोशायची पण लढाईच सुरु होती ना ? 

बच्चन एका गाण्यात म्हणतो... 
जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी... 
आयुष्यभर चालणाऱ्या या लढ्यात जो जिंकतो तो सिकंदर... ! युद्धात अनेकजण फ्रंटवरुन लढा देतात तर काही सपोर्टिंग रोलमध्ये असतात. आनंद फ्रंटवरुन लढत होता तर बाबू मोशाय सपोर्टिंग म्हणून ... अस म्हणाव का ? .... कोणी कुठला रोल करायचा ते वरचा ठरवतो..... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है ! 

जन्म मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरु असते. "आनंद मरा नही आनंद मरते नहीं" या डायलॉगचा अर्थ तोच असेल का ? ती डोर तो जशी फिरवेल त्यावर ठरेल पुढचा जन्म कोणत्या रुपात दिला जाईल ते ! ... त्याने ठरवून दिलेला रोल साकारायचा आणि काम झाल की पडदा पडतोच. युद्धभूमीवर सुर्यास्ताला शंखनाद झाला की नाही का होत युद्धविराम ? तसंच काहीस .... बाssबू मोशाsssय अशी दिलेली आर्त हाक म्हणजे जणू शंखनादच.... 

द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. खूप उंचीवरुन पाहिले की या रचनेचा आकार चक्रासारखा आहे हे कळत. आजकाल अशा प्रकारची दृष्य टिपणाऱ्या कॅमेरांना म्हणूनच द्रोण कॅमेरा म्हणत असावे का ? या रचनेत प्रत्येक सैनिकाची भुमिका ठरलेली आहे. इंकिलाब चित्रपटात बच्चनसाठी म्हणून तर गीतकार म्हणतोय "अभिमन्यू चक्रव्यूहमे फस गया है तू  ... संभल सके तो संभल.. निकल सके तो निकल ... दुष्मनोंके जालसे... दोस्तोंके चालसे.."  

विधात्याने रचलेल्या या युद्धभूमीवरचं मी एक पात्र असेल तर मीच अभिमन्यू... मीच दुष्मन... आणि मीच दोस्त आहे ना ? या जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहात मी फसलोय... यात फसणे किंवा मुक्त होणे आपल्या हातात नाही. कारण ??? ..... कारण ..डोर उपरवालेके हाथमे है ! .... प्रसंगानुरूप माझी भुमिका बदलत रहाते... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है..... 

गदिमा म्हणतात ... 
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ... जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे .... 
जन्म कोणताही मिळो ... कर्माचे फळ भोगावे लागणार... त्यापासून सुटका नाही.‌ 
every action has an equal opposite reaction हा प्रकृति नियम आहे ना ? 

एकदा हे नीट लक्षात घेतल की मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना काय अर्थ उरतो ? हे षडरिपू मानवी कर्माचे कारक आहेत का ? याच कर्मावर आधारित जन्म पुनर्जन्म चक्र सुरु असते का ? सत्कर्म असो कि कुकर्म .... ते पण विधिलिखितच असते का ? 

 हम्म्म (सुस्कारा सोडत)  ... असो .... हा पण एक प्रकारे नुसत्या प्रश्नांचा चक्रव्यूह .... !  उत्तरांच्या शोधात या चक्रव्यूहात जो खोलवर शिरतो त्याला उत्तरं सापडत असतील ? मनात विचार येतो कि ... 
"गुरुविणा कोण दाखविल वाट ?" ...... 
योग्य गुरु मिळाला तर या प्रश्नांचा चक्रव्यूह भेदून तुम्ही मोक्षप्राप्ती करु शकाल अन्यथा प्रत्येकाचा अभिमन्यू होणे ठरलेल आहे .... आणि तेही विधिलिखित ! 

(थोडेसे स्मित करत) विचारांच्या या गर्दीत डोक्याच पार भज होतं नाही ? आपलं सगळ्यांच जगणं हे या अशा प्रश्नांसोबतच ....  आणि .... आयुष्याचा पडदा पडणे हे त्यांचे अंतिम उत्तर ! .... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी..... 

त्यामुळे दोस्तांनो, फार डोकं खराब करुन घ्यायच नाही ... आनंदवर उतारा म्हणून मग पुन्हा एकदा मुकद्दर का सिकंदर टाकावा आणि सलाम एक इश्क मेरी जा या सिकंदर जोहराच्या गाण्यात मनमुराद डुबून जाव.... 

किंबहुना .... या गाण्यात जोहराच कडव झाल्यानंतर किशोरदाचा आलाप सुरु होतो.... ध्यान लावताना केलेल्या ओमकारात जशी तंद्री लागावी तसा फील येतो. त्यात मग एक ओळ येते एक एहसान कर अपने मेहमानपर...असे गातांना किशोरचा आवाज असा काही लागतो ना की त्यात आकंठ बुडायला होत .... काही क्षण आपल्याला सगळ काही विसरायला होतं..! अगदी गात असलेल्या सिकंदरकडे स्तब्ध होऊन एकटक बघत राहिलेल्या जोहरासारखच ..... !  ती नशा काही औरच ..... खरय ना ? तुम्हाला काय वाटतय ? 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

वरील लेख Youtube वर ऐकण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. 

https://youtu.be/9FS7O38YaRk?si=SeM-q_3pDXwiGNzw