Thursday, July 5, 2018

तो आठवणीतला दिवस

आठवणीतला तो दिवस !

अजुनही स्पष्ट आठवतोय तो दिवस ! पदवी नुकतीच मिळाली होती, ग्रँज्युएट झालो होतो, लौकिक अर्थाने शिक्षणाचा एक टप्पा पार पडला होता. कॉलेज सुरु असतांना गंमत म्हणून केलेला अर्ज मग झालेली लेखी परीक्षा व अशी काही परीक्षा आपण दिली होती याचे विस्मरण झालेले असतांना अचानक एक दिवस आलेले मुलाखतीचे पत्र अन ध्यानीमनी नसतांना हाती पडलेले नेमणूकीचे पत्र ! ही सगळी प्रक्रिया एक वर्षाहून अधिक काळ सुरु होती आणि प्रत्येक टप्प्यावर म्हणजे लेखी परीक्षेचा निकाल, मुलाखतीचे यश असे सुखद धक्के बसत असतांनाच पदवी परीक्षेचा निकाल लागला होता आणि त्या आनंदात असतांनाच नेमणूकीचे पत्र आले, अन लगोलग नोकरीही !

 

सगळ शिक्षण पुण्यात झालेल, मित्रमंडळी सगळे नातेवाईक पुण्यातच. यांना सोडून व त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे आई वडिल, शालेय शिक्षण संपवण्याच्या मार्गावर असलेला धाकटा भाऊ तर प्राथमिक शिक्षण नुकतेच सुरु झालेली धाकटी बहीण यांना (तेही पुणे) सोडून एका लहानशा तालुका ठिकाणी एकटे जाऊन रहायचे या विचारांनी खूप गलबलून यायचं, मनात कालवाकालव होत असायची पण पहिल्या नोकरीच व तेही त्या काळात एक स्टेटस असलेला बँक जॉबच, एका नवलाईचे आकर्षण त्या क्षणिक खिन्नतेवर मात करुन जायच.

 

नोकरीवर रुजू व्हायचा दिवस नक्की ठरला, ट्रेनच रिझर्वेशन झाल. आख्ख कॉलेज आयुष्य दोन ड्रेसवर निघून गेल होते पण “नोकरीच्या ठिकाणी जरा बरे दोन ड्रेस तरी हवेत” असे म्हणून वडिलांनी तेव्हा पैसे काढून दिले होते. टेलरकडून शिवून आलेले ड्रेस बँगेत भरत असतांना वडिलांचे ते वाक्य जेव्हा कधी नवीन ड्रेस विकत घेतो तेव्हा ते अजूनही आठवत. निघायचा दिवस उजाडला, आईने लाडू, चिवडा एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला व त्याला वरून दोऱ्याने पक्के बांधले. किराणा सामानाच्या पुड्या सोडल्यावर सगळे दोरे एका कागदाला गुंडाळून ठेवलेले असायचे त्याचा उपयोग झाला होता.

 

सगळे सामान भरून झाल, वडीलांनी नेमणूक पत्र घेण्याची आठवण परत एकदा केली व सोबत छत्री ठेव म्हणाले. गेल्या गेल्या कुठे उतरायचे, कुठे जेवयाचे वगैरे प्रश्न त्यांनी सोडवले होते. त्यांच्या ऑफिसमधल्या एका मित्राकरवी एक दिवसाची व्यवस्था झाली होती. रात्रीचे जेवण आटोपता आटोपता दोघे तिघे मित्र आले. आता रोजचे भेटणे, गप्पा हे कायमचे दुरावणार याची मला झालेली जाणीव त्यांच्या येण्यामुळे जास्तच तीव्र झाली होती कारण वरकरणी हसून खेळून आम्ही बोलत असलो तरी कंठाशी जडपणा दाटलेला होता. डोळ्यांच्या पापण्या न ओलावू देता आवंढा गिळत तो जडपणा घालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेचजण करत होतो.

 

देवाला, आई वडिलांना नमस्कार केला. भाऊ म्हणाला “दादा, हँपी जर्नी”, मी खिन्नपणे हसलो. बहिण बावरुन गेलेली, काय बोलाव सुचत नसाव बहुदा तिला. खोटखोट हसत "गावाला जाऊन लगेच परत येणार ना ?” कस म्हणाली अन आईला जाऊन बिलगली. मी चेहऱ्यावर उसने हास्य आणून “होSS” म्हटले व बँग उचलली. त्या क्षणाला आई म्हणाली “जायलाच पाहिजे कारे बिंदू ? इथेच पुण्यात नाही का मिळणार एखादी नोकरी ?” या दोन वाक्यांनी पाय जड केले. आईच्या आवाजातले ते आर्जव, वाणीतले ते मार्दव यामधे बांधून ठेवण्याची काय ताकद असते त्याचा प्रत्यय आला अन काय प्रतिक्रिया द्यावी सुचेना. वडिलांनी ती भावनिक कोंडी फोडली. “अग, घरट्यातली पिल ही कधीतरी मोठी होणार, गगनाला गवसणी घालणार, त्यांच्या त्या उडण्यातील आनंद पाहण्यातही आगळ सुख असते, जाऊ दे त्याला !”, आई त्यांच्या वाक्यांकडे दुर्लक्ष केल्यासारखे करत नुसते “हु” म्हणाली. “नीट रहा, दर दोन दोन दिवसांनी पत्र पाठवत जा” वगैरे तत्सम सूचना सुरु झाल्या.

 

आजच्या दिवशी, ५ जुलैला ४१ वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या चाळीसगाव शाखेत मी रुजू झालो होतो पण ४ जुलैचा तो पूर्ण दिवस व विशेषत: संध्याकाळ अजूनही स्पष्ट आठवते आहे. मी बँग उचलल्यावर “जायलाच पाहिजे कारे” या वाक्यातला तो कातर स्वर व तिच्या डोळ्यात साठलेले अश्रू आजही मन ओले चिंब करून टाकतात. वडिलांनी त्यांच्या भावनांना केव्हा व कशी वाट मोकळी करून दिली असेल या प्रश्नांची उत्तरे मला मी.वडील झाल्यावरच मिळाली. कॉंम्प्युटरयुगात कंट्रोल, आल्ट डिलिट बटण दाबल कि सगळ काही एका क्षणात पुसल जाते. मनाच्या कोपरा व्यापलेल्या या रम्य आठवणी मात्र तशाच राहू शकतात यासाठी "त्याला" मनोमन धन्यवाद !

 
बिंदुमाधव भुरे, पुणे.