Friday, September 8, 2023

माझ्या मनातली शाळा

माझ्या मनातली शाळा 

दिनांक ६ सप्टेंबर २०२३, आमच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हाॅटस् अप गृपवर आले आणि ....
मागोमाग मिलिंद एकबोटेचा फोन आला ! "पुण्यात आहेस ना ?" 
मी "हो" म्हटले. 
"कार्यक्रमाला ये, वाट बघतोय" ! 
मी "बssर, ठीक आहे, येतो" म्हणालो खर .. पण मनात थोडी चलबिचल झाली होती. 

हा पुरस्कार आमचे आवडते व्ही. एस्. देशपांडे सर यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने दिला जाणार होता अन् तोही आमच्याच वर्गातला आमचा सवंगडी डॉ जगदीश हिरेमठ याच्या हस्ते ! त्याच्या आवाजात व्हीएसडींच्या आठवणी ऐकण्यासाठी मनातून आतूर होतो.   या निमित्ताने अनेक मित्र पुन्हा भेटणार होते. "जुमानजी" सिनेमा आठवला  ... सोंगटी फिरवली आणि ५० वर्ष मागे गेलो. त्याच वास्तूत आज पुन्हा विशू, मिल्या, जाड्या, पम्या वगैरे गॅंग भेटणार होती. .. पण सिनियर सिटीझन म्हणून ! 

शाळा सोडल्यानंतर अनेक मित्र शाळेत किमान एकदा तरी जाऊन आले असणार पण त्या दिवशी मी मात्र बरोबर ५० वर्षे आणि ३ महिन्या नंतर शाळेत आलो होतो. खर म्हणजे १९९६ ते २००२ या काळात मी शाळेसमोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेत होतो. पण शाळेत जायचा धीर कधी झालाच नाही. कारण ....

शाळेची वास्तू, आपले दरवर्षीचे वर्ग, मुख्याध्यापकांचे ऑफिस, शाळेच्या मागच्या गेटमधून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारे स्वच्छतागृह (त्यावेळी आपण मुतारी म्हणायचो), त्यामागे खडक आणि नंतर विस्तीर्ण असे क्रीडांगण, त्यालगत असलेली व्यायामशाळा वगैरे .... हे चित्र मन:पटलावरुन कधीच पुसले जाऊ नये असे मनोमन वाटायचे. त्यामुळे पाच सहा वर्षे समोर शाळा असूनही रस्ता ओलांडायचा धीर कधी झाला नाही. मनातल्या त्या चित्रावर अकारण रेघोट्या ओढल्या तर स्मृतीपटलावर असलेल्या मूळ चित्राला धक्का लागेल ही भिती मनात असायची. 

पण माझ हे वाटण फक्त शाळेपुरतेच मर्यादित होत का ? तर नाही. हा माझ्या स्वभावाचा एक भाग होता. शाळेत असताना कसबा पेठेत ज्या वाड्यात आम्ही रहात होतो तेथे नंतर अनेकदा गेलो पण आणखी एक जिना चढून रहात असणारे रहाते घर पहाण्याचा धीर कधी झाला नाही. त्या वास्तूत असलेल्या अनंत आठवणींना शब्द फुटले तर त्या आठवणींबरोबर संवाद कसा साधायचा या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसायचे. 

१९७७ ला मी चाळीसगाव येथे बॅंकेत रुजू झालो. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या वडिलांच्या घरात भाडेकरु म्हणून राहिलो. नंतर बरोबर २५ वर्षांनी एका लग्नासाठी जाण्याचा योग आला. आपण आयुष्याची वाटचाल जिथून सुरु केली त्या घराला भेट देऊ म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल या विचाराने वेळात वेळ काढून मी त्या घराला भेट द्यायला गेलो खर मात्र त्या घराची अवस्था पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आज भानुविलास समोर काही क्षण उभे राहिलो की काहीसे तसेच होते.

तेव्हापासून मनाची ही ठेवण झाली असावी. पण मिलिंद एकबोटेचा आग्रही फोन आणि अनेक मित्र भेटतील म्हणून शाळेत येण्याचे धाडस केले. मागील गेटने स्कूटर आता आणली. वाॅचमन काहीतरी बोलत होता मला. शब्द कानावर पडत होते पण माझ लक्ष नव्हत, मी नुसते बर म्हणालो. मला मागे खडक दिसल्याचा भास होत होता. ...... 

खडकावर खडूने स्टंप कोरले होते आणि क्रिकेट सुरु होते तर पुढे ग्राऊंडवर काही मुले फुटबॉल खेळत होती तर अलिकडे काही मुले बास्केटबॉल प्रॅक्टिस करत होती. वाॅचमन पाठ वळवून केव्हाच निघून गेला होता आणि स्वागतासाठी उभ्या शिक्षिकेने अत्तर लावण्यासाठी हात पुढे केला. यंत्रवत अत्तर दुसऱ्या मनगटावर घासले. अत्तराचा मंद सुवास सुखावून गेला. शाळेच्या पॅसेजमधून चालत काही वर्ग मागे टाकले आणि कार्यक्रमाच्या हाॅलमधे प्रवेश केला. 

कार्यक्रम सुरु झाला होता. पाहुण्यांची ओळख, प्रास्ताविक, सत्कार, शाल, नारळ, गुच्छ वगैरे सोपस्कार पार पडले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले. अनेक जण व्हीएसडींच्या स्मृतींना उजाळा देत होते. व्हीएसडींची कन्या बोलायला उभी राहिली. तोच तोंडावळा, काळ्या कडांची तशीच चष्म्याची फ्रेम ! कुठूनतरी अचानक व्हीएसडी येतील आणि एखाद्या इंग्रजी चित्रपटाची गोष्ट सांगायला सुरुवात करतील असे क्षणभर वाटून गेल. 

एव्हाना हृदयातील व्हीएसडींच्या आठवणींच्या कप्प्याचे दार सताड उघडले गेले होते. आणि डॉ जगदीशने माईकचा ताबा घेतला. गुरु शिष्य परंपरेत आम्हाला ठाऊक असलेला तो सर्वोत्तम शिष्य ! एव्हाना आम्हीच इतके भावूक झालो होतो तिथे त्यांची मनःस्थिती काय झाली असेल ? मेरा नाम जोकर मधे जाने कहा गए वो दिन गातांनाचा राजकपूर आठवतो. काळा गॉगल लावूनही त्याचे अश्रू स्पष्ट दिसायचे. डॉक्टर व्हीएसडींवर बोलता बोलता मध्येच थबकायचा, आवंढा गिळायला ... तेव्हा माझ्या नकळत एखादा अश्रू मनाचा आदेश धुडकावत बाहेर यायचा. कुणी पाहिल असत तर .... ? "अरे, ये आसू आज बाहर कैसे आ गए" राजेश खन्नाचा अमरप्रेम मधल वाक्य आठवून गेल. 

पसायदान डोळे मिटून ऐकल. बाहेर पडल्यावर काही क्षण मित्रांबरोबर घालवले. जातांना डॉक्टरला म्हटले एकदा साठलेल्या अश्रूंना मनसोक्त आणि मुक्त वाहून देण्यासाठी अशा आठवणी घेऊन कधीतरी सगळे मित्र भेटूया. पाहूया तो दिवस कधी येतो ते ! मी इकडे तिकडे न बघता स्कूटर सरळ गेट बाहेर काढली. आजही माझी शाळा माझ्या मनात होती तशीच आहे.

बिंदुमाधव भुरे.