Sunday, September 13, 2020

भावना आणि कर्तव्य

भावना आणि कर्तव्य

जवळ जवळ १८ तासांचा प्रवास संपवून अविनाश मुंबईत विमानतळावर उतरणार होता. लँडिंगची अनाउन्समेंट झाली तसा तो अधिरतेने खिडकीबाहेर पाहू लागला. धावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र ढगांच्या आड खाली दिसणारी रांगोळीच्या ठिबक्यांसारखी छोटी छोटी घरे व हिरवी गार शेते मागे पडत होती तसा ठिबक्यांच्या दाटीत हिरवा गालिचा लुप्त होत चालला होता. ठिबके मोठे होत होते, बहुमजली ईमारती दिसू लागल्या होत्या. विमानाच्या पायऱ्या उतरुन मायभुमीवर त्याने पाऊल ठेवल तस एक क्षणभर जागेवर उभे रहात त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. "अपने मिट्टीकी खुशबू" कशाला म्हणतात ते आज तो अनुभवत होता. आजूबाजूचे व मागून येणारे प्रवासी बघत होते पण त्याला परवा नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरील मंद स्मित खूप काही सांगून जात होत.

 

कधी एकदा घरी पोहोचतो असे त्याला झाले होते. बेल्टवरून आलेले लगेज त्याने उचलले आणि विमानतळाबाहेर आला. बुक केलेली कँब समोर आली तसे त्याने घाईने सामान डिकीत टाकले. आताआणखी तीन तासांनी घरी असेन या विचाराने तो सुखावला होता. या दोन वर्षांच्या काळात त्याचा आई वडिलांशी नियमित संपर्क होता. पण गेल्या दोन महिन्यात आईशी मात्र त्याच बोलण झाल नव्हत त्यामुळेच कधी एकदा घरी पोहोचतो अस त्याला झाल होत.

 

एका महत्वाच्या प्रोजेक्टवर कंपनीने त्याला दोन वर्षांपूर्वी युएसला पाठवले होते. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास कंपनीला मोठी व्यावसायिक झेप घेण शक्य होणार होत आणि देशासाठीही ती अभिमानाची बाब ठरणार होती. त्यामुळे कोणाला पाठवायचे हा प्रश्न पुढे आला तेव्हा बोर्ड मिटिंगमधे अविनाशचेच नाव एकमुखाने पुढे आले होते. अविनाशनेही कंपनीचा विश्वास सार्थ ठरवला होता. तो भारतात पोहोचण्या आधीच अनेक नव्या ऑफर्सचे इमेल कंपनीला येणे सुरु झाल होत.

 

अविनाश लहानपणापासून हुषार होताच पण विशेष म्हणजे मोठे झाल्यावर काय व्हायच, काय करायच हे त्याने नववीत असतांनाच ठरवले होते. स्मार्ट फोनच्या आहारी गेलेल्या समवयस्क मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही त्याचा आदर्श ठेवावा, इतरांना सांगावा इतका तो परफेक्ट होता. सचिनच्या बँटमधून निघणारा स्ट्रेट ड्राइव्हचा नेत्रदीपक फटका जसा कॉपी बुक स्टाईल असतो, अमीरखान जसा मि. परफेक्शनिस्ट असतो तसच अविनाशच त्याच्या करियरबाबदच्या विचारांच होत. म्हणूनच संगणक तज्ञ अविनाश आज एका आघाडीच्या कंपनीत उच्च पदावर होता. 

 

युएसमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी त्याला गलेलठ्ठ पगार देतांना कायमचे नागरिकत्व मिळवून देण्याची तयारी दर्शवली होती. पण आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग या देशाच्या प्रगतीसाठीच करायचा हा त्याचा तात्विक, वैचारिक चौकटीतला द्रुढनिश्चय होता. आई वडिलांच्या उतारवयात जेव्हा त्यांना आधारासाठी आपली खरी गरज असते तेव्हा करियरचा मुखवटा पुढे करुन आपला स्वार्थ, प्रगती साधण्यासाठी त्यांना कधीही सोडून जायच नाही हा त्याचा असाच आणखी एक तात्विक ठाम निर्णय ! त्याच्या आई वडिलांना त्याच्या अशा विचारांचा, अशा निर्णयांचा अभिमान वाटत असला तरी "प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तेव्हा  आमची काळजी न करता तू नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस" असे त्याला वेळोवेळी त्यांनी स्पष्ट केले होते. 

 

सलग तीन दिवस मिटींग वर मिटींग सुरु होत्या. युएस प्रोजेक्टची जबाबदारी अविनाशवर येणार हे पहिल्या दिवशीच जवळजवळ नक्की झाल होत. प्रोजेक्टचे डिटेल्स निश्चित करण्यासाठी अविनाशने मिटींग तीन दिवस लांबवली असे वरकरणी दिसत असले तर या तीन दिवसात अविनाश आई वडिलांना एकटे सोडून जाण्यासाठीची स्वतःच्या मनाची तयारी करत होता. आज निर्णयावर कंपनीने शिक्कामोर्तब केल होत. पासपोर्ट, व्हिसा व अन्य तयारीसाठी १५ दिवसांचा अवधी होता. घरी गेल्यावर जेवतांना आजच आई वडिलांच्या कानावर घालायला हव. आपल्या मनाला निर्णय घेतांना तीन दिवस किती त्रास झाला हे लक्षात घेता आई वडिलांना आज सांगितल म्हणजे १५ दिवसांनंतर निरोप देतांना त्यांच्या मनाची तयारी झालेली असेल. या विचारांनी त्याला क्षणभर गलबलून आले. 

 

जेवणाच्या टेबलवर तिघेही बसले होते. काय हव नको पाहून आई नंतर बसली. अविनाशचे जेवतांना आज असलेल अबोलपण लक्षात येण्यासारखे होते त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे पहात होते तर कशी व कुठून सुरवात करायची या विचारात अविनाश घास तोंडात टाकत होता. "आज ऑफिसमधे फार काम होत का रे ? थकलेला दिसतोस खूप आज !" बाबांनी शांततेचा भंग करुन कोंडी दूर केली. "गेल्या दोन दिवसांपासून बघते आहे मी. एक आठ दिवस रजा घेऊन विश्रांती घे जरा म्हणजे बर वाटेल" आईच्या ममतेने बाबांच्या बोलण्याची री पुढे ओढली. “आई, थोडी खिचडी वाढ अजून” अविनाश आपल्याच विचारात होता. गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या तब्येतीची कुरबुर सुरु होती. अविनाश म्हणालाही होता कि “एकदा डॉक्टरांना दाखव, काही टेस्ट करायच्या असतील तर करून घे."  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टेस्ट झाल्या, रिपोर्ट आले होते. आज अविनाशच्या कानावर सगळ काही घालायचं हे दोघांनीही ठरविले होते. पण अविनाशच्या या स्थितीत एका नवीन चिंतेची भर जेवतांना टाकायचे धाडस दोघांनाही झाले नाही.

 

जेवणे आटोपून तिघेही हॉल मध्ये बसले असता अविनाश मनाचा निर्धार करून बोलता झाला. “बाबा, कंपनीचा एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे व तो मीच हँडल करावा असा कंपनीचा निर्णय झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्याच मिटींग्ज सुरु होत्या. मी हा प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी घ्यावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण मनातून मलाही हे पूर्णपणे माहित होते कि माझ्याशिवाय हे दुसरे कोणी हँडल करू शकणार नाही.” इतक बोलून होताच अविनाशला निम्म मानसिक दडपण कमी झाल्यासारखे वाटून गेले. “अरे, मग चांगले आहे कि ! नवीन जबाबदाऱ्या, नवीन आव्हाने यांना सामोरे जायला तर तुला आवडतेच ना ? तुझ्या हुशारीचा ज्ञानाचा कंपनीला व देशाला उपयोग होतो आहे ही तर अभिमानाची गोष्ट आहे.” बाबा लहानपणी एखादी गोष्ट समजावून सांगतांना पाठीवरून मायेने हात फिरवायचे तसा आभास अविनाशला खूप वर्षांनी पुन: आज झाला. 


संभाषण सुरु होते आणि आई मूक श्रोता होती. “बाबा, तुम्ही म्हणता आहात ते अगदी बरोबर आहे, मला पटतेही आहे. पण, यासाठी मला यूएसला जावे लागणार आहे व तेही तब्बल दोन वर्षांकरिता !” या वाक्यानिशी आईचा चेहरा एकदम उतरला, डोळे पाणावले व ती एक टक अविनाशकडे पाहू लागली. “कालावधी वाढूही शकतो आणि तुम्हाला इतक्या मोठ्या कालावधीसाठी एकटे सोडून जाण्याचे धाडस अजून होत नाहीये माझ !” अविनाशचा आवाजतला कातर स्वर दोघांनाही जाणवला.

 

“कधी निघायचं आहे ?” आईने धीर एकवटून प्रश्न केला. “साधारण १५ दिवस ते तीन आठवडे आहेत अजून !” या अविनाशच्या उत्तरावर आई म्हणाली “काय काय तयारी करायची आहे सांग. मला जमेल तसे रोज थोडे थोडे करत जाईन. हल्ली मला खूप थकवा येतो रे ! ती असली असती तर मला काही बघायला लागले नसते आणि दुसरे लग्न कर म्हणणे आम्ही कधीच थांबवलंय.” नकळत आईच्या मनातली वेदना आज खूप दिवसांनी पुन: एकदा बाहेर पडली होती. जेमतेम दोन वर्षांचा लग्नाचा सहवास. काही चूक नसतांना एका ट्रकने अवनीला उडविले होते. तिच्या अपघाती मृत्यूचे दु:ख अविनाश विसरू शकत नव्हता. अवनीच्या दोन वर्षांच्या सहवासातील सुखद आठवणी त्याला पुसायच्या नव्हत्या. आपल्या विचारांवर व निर्णयांवर ठाम रहाण्याचा अविनाशचा स्वभाव आई वडिलांना माहित होता त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी दुसऱ्या लग्नाचे टूमणे लावणे बंद केले होते.

 

निघण्याची तयारी सुरु होती. अविनाशने एक लँपटॉप आणला होता. त्याचा स्काईप कँमेरा वापरून एकमेकांशी कसे बोलायचे ते या १५ दिवसात दोघांनाही त्याने शिकवून ठेवले. युएसला गेल्यानंतर दर शुक्रवारी व सोमवारी एकमेकांशी बोलायचे असे त्यांनी एकमताने ठरवून टाकले होते. जाण्याचा दिवस उजाडला. अविनाशने दोघांनाही नमस्कार केला. आईने हातावर दही ठेवले व खालच्या आवाजात म्हणाली, “विमानतळावर येऊन काय करायच ? नाहीतरी आतपर्यंत येऊ देत नाहीत ! त्यापेक्षा इथेच तोंडभरून पाहू दे.” अविनाशने डाव्या हातानी आईला जवळ घेतले व म्हणाला “अग, असे काय करतेस, स्काईपवरुन आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत आपण. फक्त तुझा मायेचा स्पर्श व तुझ्या हातचे जेवण मिस करणार बघ मी दोन वर्ष ! पण आल्यावर त्याची भरपाई करणार आहे बर का मी पुरेपूर !” चेहऱ्यावर उसने हास्य आणत अविनाश गाडीत बसला व गाडी दिसेनाशी होईपर्यंत आई बाबा हात हलवून निरोप देत होते.

 

कँब पुण्याकडे भरधाव वेगाने निघाली असतांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या कंपनीच्या निर्णयापासून ते घर सोडेपर्यंतच्या सगळ्या आठवणी अविनाशच्या बंद डोळ्यासमोर क्रमाक्रमाने येत होत्या. यूएसला गेल्यानंतर पहिला एक महिना स्काईपवर गप्पा मारतांना अडचणी आल्या पण नंतर मात्र आई बाबांना सराव झाल्याचे त्याने अनुभवले होते. मात्र गेल्या दीड महिन्यात स्काईपवर केवळ दोनच वेळा बोलणे झाले व तेही फक्त बाबा बोलले होते. एकदा आई दवाखान्यात गेली आहे म्हणाले तर दुसऱ्या वेळी म्हणाली कि ती झोपली आहे व हे बोलता बोलता काहीतरी बिघाड होऊन स्काईप बंद पडला होता. बहुतेक स्काईपला किंवा कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला असावा या समजुतीने अविनाशने थोडे दुर्लक्ष केले.  आणि दुसरे म्हणजे प्रोजेक्ट ठरल्यावेळेपेक्षा १५ दिवस आधेच पूर्ण होत होता. त्यामुळे आता प्रत्यक्षच भेटूनच सरप्राईज देऊ असा त्याने विचार केला.

 

साहेब, मॉलला थांबायच का ?” कँब ड्रायव्हरने विचारले तशी अविनाशची तंद्री भंग पावली. “नको अरे, डायरेक्ट जाऊ आपण. पण तुला चहाची तल्लफ असेल तर थांबूया रे बाबा. माझ्यासाठी तुझी तल्लफ नको मारूस !” अविनाश म्हणाला तसे ड्रायव्हर नुसताच हसला. कँब घराच्या दारासमोर उभी होती. अविनाशने सामान घेतले व दारावरची बेल दोनवेळा दाबली. मी जेव्हा जेव्हा बाहेरून येईन तेव्हा अशी दोन वेळा बेल वाजवत जाईन असे अविनाशने सांगितलेले होते. गेल्या दोन वर्षात मात्र आई बाबांची अशी डबल बेल ऐकायची सवय मोडली असणार आणि ही बेल ऐकून त्यांना मी आल्याचा भास होईल, दार उघडून मला प्रत्यक्ष बघतील तेव्हा .... “ नुसत्या कल्पनेने अविनाशच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले.

 

बाबांनी दार उघडले आणि त्याला पाहताच “अविनाश” असे म्हणून त्याला मिठीच मारली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत अविनाशने त्यांना नमस्कार केला. बँगा घेऊन तो आत आला तसा त्याने टेबलवर आईचा हार घातलेला फोटो पहिला आणि त्याच्या हातातून बँगा खाली गळून पडल्या. त्याने रडवेल्या आवाजात विचारले “बाबा, हे काय ? कधी झाल ?” “तीन आठवडे झाले अवि. जाईपर्यंत तुझी सारखी आठवण काढत होती. मी म्हटले तिला कि स्काईपवरून आपण बोलू त्याच्याशी, सगळे काही सांगू त्याला. पण नको म्हणायची ! त्याला कळले तर सगळे सोडून येईल तो. इतकी मोठी जबाबदारी आणि काम संपत आले असतांना कशाला थोडक्यासाठी त्याला डिस्टर्ब करताय. तिच्या या हट्टाला न जुमानता मी त्या दिवशी स्काईपवर तुला सगळे काही सांगणार होतो पण तिने काहीतरी बटणे दाबून स्काईप बंद करून टाकला व मला शपथ घातली. तेव्हापासून तो लँपटॉप बंद करुन ठेवलाय.”

बाबा सगळ काही सांगत होते अन अविनाश स्तब्ध होऊन ऐकत होता. “अविनाश, अरे ज्या दिवशी तु यूएसला जाण्याचा निर्णय आम्हाला सांगितलास ना त्याच दिवशी तिचे रिपोर्ट्स आले होते. जेवतांना तुला कसे सांगायचे याचा विचार करत आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. तूच आम्हाला खूप टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत असल्यामुळे तिने ठरविले कि तुला दोन तीन दिवसानंतर सांगू. पण तुझे युएस चे जाणे तू सांगितल्यानंतर दुसरे दिवशी तिने मला बजावले कि माझ्या या आजाराविषयी अविनाशला एक अक्षरही कळता कामा नये. आपण त्याला अनेकदा सांगितले आहे ना कि प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तर आमची काळजी न करता नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस म्हणून ! मग आता त्याच्या पायात खोडा नाही घालायचा आपण ! त्याला जाऊ दे, भरारी घेऊ दे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचा निश्चय पक्का होता. तुझीच आई ती, प्रत्यक निर्णयावर ठाम राहणारी.”

 

कंपनीचे नाव व देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज ऑफिसमध्ये अविनाशचा विशेष सत्कार होत होता. सत्कारानंतर बोलतांना अविनाशने या यशाचे सारे श्रेय आईला बहाल केले. तिच्या आजाराबद्दल कळले असते तर कदाचित हा प्रोजेक्ट अर्धवट सोडून मी परतलो असतो, कदाचित करार मोडल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक दंड बसला असता, देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही तिची शिकवण ! कदाचित् माझ्याकडून या शिकवणीला तडा गेला असता म्हणून तिने मला काहीच कळू दिले नाही पण ती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत ही शिकवण जगली. अविनाश बोलत होता, कंपनीचा सगळा स्टाफ भावूक होऊन हे सगळे ऐकत होता. पहिल्या रांगेत बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान, आनंद याचे संमिश्र भाव होते अन डोळ्यात अश्रू !

 

 © बिंदुमाधव भुरे, पुणे  
२ नोव्हेंबर, २०१८
९४२३००७७६१/८६९८७५९९९०
bnbhure@rediffmail.com