Saturday, January 19, 2019

कमकुवत भिंत

*कमकुवत भिंत*

एका इमारतीची कंपाऊंड वॉल बांधण्याच काम सुरु असत. एका बाजूला विटांचा ढीगारा तर एकीकडे वाळू, बारीक खडी आणि सिमेंटची पोती.  गवंडी वाळूत थोडी बारीक खडी व थोड सिमेंट टाकतो. हे मिश्रण तयार करून त्यात आळे करुन मधे *पाणी* ओतून फावड्याने ते मिश्रण एकत्र लयबद्ध पद्धतीने कालवू लागतो.

त्या तयार मिश्रणाचा वापर आता विटांची भिंत उभी करतांना होणार होता. प्रत्येक वीट या मिश्रणामुळे एकमेकांना मजबूत करणार होती. नुसती वाळू किंवा नुसती खडी किंवा नुसते सिमेंट यांचा काय उपयोग होता ? *त्यांनी एकत्र येऊनही उपयोग नव्हता. जोपर्यंत आपापला गुणधर्म विसरुन ते एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नव्हता.*

*उद्या वाळू म्हणाली मला खडीबरोबर नाही रहायचे, ती टोचते मला. खडी म्हणाली कि वाळूलाच निसटून जायच असते, माणसाच्या मुठीत तरी कुठे टिकली आहे ती ! सिमेंटही तक्रार करेल, कि हे दोघेही एकत्र रहायला माझा वापर करुन घेतात.* पाणी हाच एक आम्हाला एकमेकांशी कायमचे जोडतो आणि आम्हाला विभक्त होऊ देत नाही. पण समजा पाण्याचा वापर नंतर केला तर ? म्हणजे वीट ठेवली कि त्यावर वाळू खडी सिमेंटच मिश्रण टाकायच व पुढची वीट ठेवायची. अस करत भिंत उभी झाली कि मग त्या भिंतीवर पाणी टाकायचे.

याप्रकारातही चार घटक एकत्र आलेतच ना ! पण, *पाणी मिश्रणात आधीच वापरले तर भिंत मजबूत बनते* आणि नंतर वापरायचे ठरवले तर ? एकतर *भिंत बनायच्या आधीच विटा कोसळतील किंवा भिंत कमकुवत राहून कधीही कोसळण्याची* भिती कायम राहील.

आज कोलकता येथे २२ घटक (पक्ष) एका मंचावर उपस्थित होते व त्यांनी एकत्र येऊन भक्कम भिंत उभी करायच ठरवलय. मिश्रण तयार झालय पण *पाण्याचे नंतर बघू* म्हणतायत. *भिंत कमकुवतच रहाणार किंवा उभी करतांनाच पडणार* हे नक्की कारण या २२ जणांच *आपसातला "स्व" विसरुन त्यांना भक्कम एकत्र ठेवणार पाणी कोणी व्हायच* हेच ठरलेल नाही.

पण आपल्याला तर पक्की भिंत नाही तर घरच हवय आणि त्याचा ठिकाणाही आपल्याला ठाऊक आहे !

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

Tuesday, January 8, 2019

शिवभक्ताला पत्र

परमशिवभक्त दत्तात्रेय गोत्रोत्पन्न राहूल,

पक्षाचा उपाध्यक्ष होईपर्यंत माध्यमांसाठी विशेषतः सोशल मिडियावर तू चेष्टेचा विषय होतास. त्यामुळे तुला घडवणे हे पक्षासमोर एक आव्हान होत. चित्रपटामधे भूमिका साकारणाऱ्या नटाला अनेक तज्ञ मदतीला असतात. नृत्यदिग्दर्शक, फाईट मास्टर, पार्श्वगायक, मेकअपमन, ड्रेसडिझायनर वगैरे वगैरे. पण कितीही आटापिटा केला तरी अनिल धवन किंवा नविन निश्चल हे जितेंद्र कसे होतील ? तद्वत तुझ्या तैनातीला अनेकजण असायचे पण तरीही व्हायच्या त्या चूका व्हायच्याच. चित्रपट असेल तर एडिटींगमधे दुरुस्ती होऊ शकते पण स्टेजवर .... जेव्हा लाइव्ह परफॉरमन्स असतो तेव्हा किती संभाळणार आणि कस झाकणार ?

पक्षाच्या व्यासपीठावर अनेकदा तुझे विचार मांडण्याची नियोजने केली गेली. शाळेच्या गँदरींगला नाही का नाट्यछटा सादर करणाऱ्या मुलांची तयारी करुन घेतात आणि सादरीकरण झाल कि सगळे कौतुकाने टाळ्या वाजवतात. कितीही चुका झाल्या तरी त्याला शाबासकी देतात सगळेजण .... तस तुझ्या बाबतीत सुरु होत. पं. मनमोहनसिंग यांनी एकदा भाषणानंतर तुला कौतुकाने मिठी मारल्याच दृष्य आम्ही टीव्हीवर पाहिल आहे. एक महान अर्थशास्त्री, देशाचा पंतप्रधान यांची शाबासकी म्हणजे गोल्ड मेडलच की ! तूझे महान विचार समजून घेण्यात आम्हीच कमी पडलो, आमची बहुदा पात्रताच नसणार.

अर्थात याच पंतप्रधानांचा अध्यादेश तू पत्रकार परिषदेत फाडलास तेव्हा आम्हाला शंका आली कि खरच पं. मनमोहनसिंग इतके हुषार आहेत ?  एकदा एका स्टेडियममधे हजारो कार्यकर्त्यांसमोर भाषण करतांना एक कथा सांगून तू काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होतास. सारे काही समजल्याच्या आविर्भावात सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमच्यासारख्या अनेकांना अद्यापही त्यातल ओ कि ठो कळालेल नाही. तूझे महान विचार समजून घेण्यात पुनः आम्हीच कमी पडलो, आमची बहुदा पात्रताच नसणार. असो ....

पण तरीही पक्षाने धाडसी निर्णय घेत तूला उपाध्यक्ष बनवले. सगळी टीम दिमतीला होती पण अपयशाचा शिक्का ठळक होत होता आणि पप्पूब्रँडही !  एकापाठोपाठ निवडणूका हरणे सुरुच होते. हरले कि इव्हीमवर खापर फोडायच. नापास झालेला मुलगा नाही का सबबी सांगत .. पेपर अवघड होता, यावेळी अवघड तपासले वगैरे. आमच्या बाळबोध बुद्धीनुसार खर तर नीट अभ्यास केलेला नसणे हेच कारण असायच. तीनचा पाढा म्हणतांना एक मुलगा सारखा चूक करायचा. तीन चोक पंधरा म्हणायचा आणि परीक्षक नापास करायचे. कोणी विचारले कि पालक कौतुकाने सांगायचे अहो पूर्वी तीन चोक सतरा म्हणायचा, बघा किती छान प्रगती केली आहे त्याने ते ! असो ....

तशात गुजरात, कर्नाटक निवडणूका आल्या. सलग चार पाच टर्न काँग्रेस सत्तेबाहेर होती. अगदी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवयुवकाने तर कधीच गैरभाजप शासन पाहिले नव्हते त्यामुळे या परीक्षेचा पेपर सोपा निघणार हे नक्की होत. त्यात हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांनी तुला कॉपी पुरवल्यामुळे थोडे गुण वाढले पण तरीही पुनः नापासच ! कर्नाटकातही खर तर सीट कमी झालेल्या पण दोन नापासांचे गुण एकत्र करुन पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा झाला. या उत्सवात नापास होण्याची भिती वाटणारे सगळे एकत्र आले होते. स्टेजवरचे ते चित्र पाहून क्षणभर वाटल कि तू युनिव्हर्सिटीत डिस्टिंक्शन विथ गोल्ड मेडल मिळवल आहेस.

गुजरात, कर्नाटक निवडणूकीत तुझ श्रद्धाळू अन् देव देव करणार रुप आम्ही प्रथमच पाहिल. तुझी प्रगती न बघविणारे तुला नाव ठेवू लागले, मग तुझ्या हिंदुत्वावर शंका घेऊ लागले. बर झाल तू जानव दाखवून ब्राह्मण असल्याच उघड केलस ते. एक सल्ला देऊ का ? गणपतीची आणि शंकराची आरती पाठ करुन ठेव, या लोकांचा काही नेम नाही. तेलंगणात तुला मुस्लिम तुष्टीकरण करतांना बघितल्यामुळे तुझे हिंदुत्व खोटे म्हणून टीका करतील तेव्हा या पाठ केलेल्या आरत्या प्रेस कॉन्फरन्समधे म्हणून दाखव अन् सगळ्यांची तोंडे गप्प करुन टाक. हाय काय अन् नाय काय ! असच वर्ष दोन वर्ष सुरु ठेवलस ना तर विहिंप वाले राममंदिरासाठी तारणहार म्हणून तुझ्याकडेच झेपावतील बघ अगदी साधूसंत तुला भगवा करुन तुझ्या गळ्यात माळा घालायला यागेपुढे पहाणार नाहीत. असो....

नुकतीच सेमिफायनल झाली. निवडणूक कलचाचणी अंदाजानुसार तीन राज्यात काँग्रेसला यश मिळाले तर दोन राज्यात सुपडा साफ झाला. समस्त काँग्रेसजनांनी शिरस्त्याप्रमाणे तुझे कौतूक केले, धूर निघणेही बंद झालेल्या राखेत फुंकर मारुन मारुन त्यात धुगधूगी शिल्लक असल्याचा आनंद पाठिराख्यांना झाला. तीन चोक चौदा पर्यंत तुझी गाडी आल्याचा आनंद होता तो !

असेल दोन वर्ष गेहलोत, पायलट, कमलनाथ, सिंदीया यांनी केलेली मेहनत. पण विजयाच श्रेय तुझच बर का !   शेतकरी, बेकार युवा, नोटबंदी, जीएसटी व राफेल या पाच मुद्द्यांभोवती फिरणारा प्रचार तेलंगण, मिझोराम या दोन राज्यातही केला होतास पण तेलंगणात नायडूमुळे पराभव झाला अस आमच स्पष्ट मत आहे आणि मिझोरामकडे लक्ष द्यायला तुला वेळच मिळाला नसणार ! एखाद्या पेपरमधे नापास व्हायची भिती वाटत असतांना त्यात वर्गात हाययेस्ट याव तस झारखंडमधे झाल नाही ? कोणालाच खर वाटत नाहीये तिथल्या निकालाच ! असो ....

देव देव करणारी श्रद्धाळू मंडळी सत्याची कास धरणारी असतात असा आमचा आपला एक समज आहे. तू अगदी हरिश्चंद्राचा अवतार नाही पण खोटेपणाची चीड येणारा असावास अस वाटत होत. परंतू वाढत्या मंदिरभेटी बरोबर तुझा खोटेपणा वाढत गेलाय रे ! गँदरींगमधल्या शोला टाळ्या वाजविल्यामुळे तू निर्ढावलास, तुला कोणी तुझ चुकतय अस सांगायचा प्रयत्नच कधी केला नाही किंबहूना तुझ्या चुकांवर पांघरुणच घालायचा प्रयत्न झाला. त्या चूका नसून तेच बरोबर आहे या अभिनिवेशात मग तू वागू लागलास. खोटेपणाने मुद्दे मांडण्यात तू आता इतका सरावला आहेस कि खरी बाजू पुढे आली तरी तूला ती कळेनाशी झाली आहे. लहानपणी हट्ट करणाऱ्या मुलांना शेवटी "बर बाबा तुझ खर" अस म्हटल कि ती गप्प तरी बसायची. पण आम्ही सांगू आता सुप्रीम कोर्टला कि म्हणा एकदा त्याला "बर बाबा तुझीच ..... ???

मध्यंतरी एका हिंदी चँनेलने सगळ्या जुन्या भाषणांचा अभ्यास करुन निष्कर्ष मांडला कि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करु व दर वर्षी २ लाख नोकऱ्या देऊ अशी आश्वासने असणारे भाषणच अस्तित्वात नाही पण प्रत्येक ठिकाणी तू हे आरोप करतोच आहेस. तीच गोष्ट जीएसटीची. जीएसटी कौसिलमधे सारे निर्णय होत असतात केंद्रात नाही. हे माहित असूनही तू गब्बरसिंग टँक्स असा ओरडा करत असतोस. खरी कमाल तर राफेलवरुन केलीस. फ्रांसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केल, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल, सिन्हा भूषण गप्प झाले, संसदेत जेटली, सीतारामन हे ३ तास बोलले तरी तुझ्या त्याच शंका व तेच आरोप सुरुच आहेत. होळीच्या दिवशी भांग प्यायलेली व्यक्ती नाही का तेच तेच पुनःपुनः बडबडत असते .... तस तर नाही ना झालय तुझ ?

अगदी खर सांग राफेलवर तू रोज रोज बेंबीच्या देठापासून इतका बोंबलतो आहेस पण तुझ्या सुरात किती राजकीय पक्षांनी सूर मिळवला रे ? शरद पवार एकदा बोलले. येचूरी, मायावती, अखिलेश, मायावती, ममता, देवेगौडा सगळेच शांत का ? बर आरोप करतोस ना ? मग तुमच्या कराराचे कागद तरी दाखव, अंबानीच्या खिशात तीस हजार कोटी घातले म्हणतोस ना ? मग त्याचा पुरावा म्हणून एखादा कागद दाखव, पंधरा उद्योगपतींचे तीन लाख कोटी माफ केले अस म्हणतोस ना ? मग त्यांची नावे जाहीर कर. नुसती टप्पल मारुन पळतोस आणि पळतांना दुसऱ्याला म्हणतोस "थांबा, पळू नका, हिंमत असेल तर माझ्याशी दोन हात करा."

गँदरींगच्या स्टेजवर काहीही केल तरी चालायच रे, सगळे टाळ्या वाजवत होते. पण आता तू मोठा झाला आहेस, जरा डोळ्यावरही नियंत्रण ठेवायला शिक आणि जबाबदारीने वाग. एकदा पशुपतीनाथाचे दर्शनाला जाऊन ये, अभिषेक वगैरे कर आणि खरच दत्तात्रेय गोत्र असेल तर खोट न बोलण्याचे त्याला वचन दे. त्याच्या दरबारी खोटे चालत नाही आणि जनतेच्या दरबारी टिकत नाही हे लक्षात घे. रात्रीची पूर्ण उतरली की ती मंडळीही एकदा खर बोलतात. बाकी तुझ्या हुषारीच्या आम्ही जवळपासही नाही, आमची तेव्हढी पात्रताही नाही तरीही या पत्राबद्दल क्षमस्व.

तुझ्याकडून नसत्या अपेक्षा बाळगणारे,
भारतीय मतदार

©बिंदुमाधव भुरे, पुणे.