Saturday, January 19, 2019

कमकुवत भिंत

*कमकुवत भिंत*

एका इमारतीची कंपाऊंड वॉल बांधण्याच काम सुरु असत. एका बाजूला विटांचा ढीगारा तर एकीकडे वाळू, बारीक खडी आणि सिमेंटची पोती.  गवंडी वाळूत थोडी बारीक खडी व थोड सिमेंट टाकतो. हे मिश्रण तयार करून त्यात आळे करुन मधे *पाणी* ओतून फावड्याने ते मिश्रण एकत्र लयबद्ध पद्धतीने कालवू लागतो.

त्या तयार मिश्रणाचा वापर आता विटांची भिंत उभी करतांना होणार होता. प्रत्येक वीट या मिश्रणामुळे एकमेकांना मजबूत करणार होती. नुसती वाळू किंवा नुसती खडी किंवा नुसते सिमेंट यांचा काय उपयोग होता ? *त्यांनी एकत्र येऊनही उपयोग नव्हता. जोपर्यंत आपापला गुणधर्म विसरुन ते एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नव्हता.*

*उद्या वाळू म्हणाली मला खडीबरोबर नाही रहायचे, ती टोचते मला. खडी म्हणाली कि वाळूलाच निसटून जायच असते, माणसाच्या मुठीत तरी कुठे टिकली आहे ती ! सिमेंटही तक्रार करेल, कि हे दोघेही एकत्र रहायला माझा वापर करुन घेतात.* पाणी हाच एक आम्हाला एकमेकांशी कायमचे जोडतो आणि आम्हाला विभक्त होऊ देत नाही. पण समजा पाण्याचा वापर नंतर केला तर ? म्हणजे वीट ठेवली कि त्यावर वाळू खडी सिमेंटच मिश्रण टाकायच व पुढची वीट ठेवायची. अस करत भिंत उभी झाली कि मग त्या भिंतीवर पाणी टाकायचे.

याप्रकारातही चार घटक एकत्र आलेतच ना ! पण, *पाणी मिश्रणात आधीच वापरले तर भिंत मजबूत बनते* आणि नंतर वापरायचे ठरवले तर ? एकतर *भिंत बनायच्या आधीच विटा कोसळतील किंवा भिंत कमकुवत राहून कधीही कोसळण्याची* भिती कायम राहील.

आज कोलकता येथे २२ घटक (पक्ष) एका मंचावर उपस्थित होते व त्यांनी एकत्र येऊन भक्कम भिंत उभी करायच ठरवलय. मिश्रण तयार झालय पण *पाण्याचे नंतर बघू* म्हणतायत. *भिंत कमकुवतच रहाणार किंवा उभी करतांनाच पडणार* हे नक्की कारण या २२ जणांच *आपसातला "स्व" विसरुन त्यांना भक्कम एकत्र ठेवणार पाणी कोणी व्हायच* हेच ठरलेल नाही.

पण आपल्याला तर पक्की भिंत नाही तर घरच हवय आणि त्याचा ठिकाणाही आपल्याला ठाऊक आहे !

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment