Thursday, May 30, 2019

काँग्रेसची हरवलेली दिशा व झालेली दशा

काँग्रेसची हरवलेली दिशा व झालेली दशा

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा इतका दारूण पराभव होईल असे भाजप वगळता कोणीच कल्पना केली नव्हती. किमान तीन आकडी संख्या गाठू व त्याबळावर प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करू हे त्यांचे स्वप्न होते. सत्तावापसी झालेल्या चार राज्यांमधून अधिकाधिक खासदार निवडून आणायचे व तामिळनाडूत द्रमुक तसेच केरळमधील आघाडी याआधारे युपीएचा आकडा सन्माननीय स्थितीत न्यायचा. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने गेले सहा महिने उठवलेले प्रचाराचे रान व राज ठाकरेंच्या सभा यामुळे चमत्कार घडेल हा आशावादही प्रबळ होताच. प्रचाराची रूपरेषा ठळकपणे अधोरेखित केली गेली होती व त्या आधारे मोदींना घेरून त्यांची कोंडी करायची हा विचार काँग्रेस धुरिणांनी केला होता. सपा, बसपाने दिलेला धोबीपछाड वर्मी लागूनही त्यांच्या विरोधात प्रचारसभांमधून ब्र उच्चारायचा नाही हा रणनीतीचा भाग असला तरी धक्का तंत्रांचा वापर करत प्रियंकाला प्रचारात उतरवून हुकुमाची चाल खेळल्याच्या आविर्भावात संपूर्ण पक्ष वावरत होता.  

 
प्रचारासाठी आखलेल्या रणनीती नुसार काँग्रेस अध्यक्षांचा संपूर्ण निवडणूक प्रचार हा ५ प्रमुख मुद्द्यांभोवती फिरत होता आणि विविध वाहिन्यांवर पक्ष प्रवक्ते तावातावाने त्याचीच री ओढून पक्षाध्यक्षांना जणू पाठबळ देत होते.  हे प्रमुख पाच मुद्दे म्हणजे ..

 १.      मोदींनी १५ उद्योगपतींचे ३.५० लाख कोटी माफ केले. 

२. जीएसटी हा गब्बरसिंग टँक्स आहे. 

३. राफेलमधे विमानाची किंमत वाढवली व भ्रष्टाचार करत अनिल अंबानीच्या खिशात तीस हजार कोटी  घातले. 

४. नोटबंदी हा सगळ्यात मोठा घोटाळा असून त्यामुळे रोजगार बुडून गरीबांना, लघुउद्योजकांना फटका बसला व देश आर्थिक दृष्ट्या मागे पडला. 

५. दरवर्षी २ कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख या घोषणांचे काय झाल ? 

 
याच्या बरोबरीला मोदींनी ५ वर्षात काहीच केले नाही, एकही आश्वासन पूर्ण केले नाही, मेक इन इंडिया फेल गेले यासारखी वाक्ये प्रचारा दरम्यान पेरली जात होती. शेतकरी, बेरोजगारी व राफेल भ्रष्टाचार या मुद्द्यांचा प्रचारात आक्रमकपणे वापर करतांना “चौकीदार चोर है" ची घोषणा करुन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यासंदर्भात सुप्रिम कोर्टात माफीनामा दिल्यावर आवाज खाली आला तरी मिजाज, घमेंड तशीच होती. अधूनमधून तोंडी लावायला आरबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट यांची स्वायत्तता धोक्यात आल्याची आवई उठवायची आणि सुशिक्षित वर्गाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा कारण सेक्युलारिजमचा मुद्दा आता गुळमुळीत झाला होता. राम मंदिर विषय काढायचा म्हणजे सौम्य हिंदुत्वाच्या नुकत्याच ओढलेल्या नव्या कोऱ्या झूलीवर शिंतोडे उडवू देण्याची स्वत:हून आयती संधी देण्यासारखे होते. त्यापेक्षा मंदिरभेटी व दर्शनाचा गाजावाजा फलदायी ठरतोय असा आभास राजस्थाध, म.प्र. ने दिलेला असल्यामुळे ते तसेच सुरु ठेवले.

पण जाहीर झालेल्या निकालातून या पाचही मुद्द्यांना जनतेने नाकारले आहे असाच निष्कर्ष काढावा लागेल कारण 

१. ज्या १५ उद्योगपतींचे ३ लाख कोटी रुपये मोदी सरकारने माफ केल्याचा आरोप जाहीररित्या केला आहे त्या उद्योगपतींची नावे राहूल गांधीं कधीच सांगू शकले नाहीत. 

 २. जीएसटी हा गब्बरसिंग टँक्स आहे हे सिद्ध करण्यासाठी वस्तूंचे दर पूर्वीच्या तुलनेत आज भयंकर, म्हणजे गब्बरसिंग म्हणण्या इतके वाढल्याची आकडेवारी  त्यांना मांडता आलेली नाही. 

 ३ मुकेश अंबानीने ५०० कोटी रुपये देऊन ज्या अनिल अंबानीची अटक टाळली त्या अनिल अंबानीच्या खिशात मोदींनी तीस हजार कोटी घातले हा वारंवार केलेला आरोप जनतेला विसंगत वाटला, पटला नाही. 

 ४. नोटबंदीचे फायदे जनतेने अनुभवले असल्यामुळे जनतेने हा आरोप युपी निवडणुकीतच फेटाळला होता. असा मागे पडलेला विषय प्रचाराचा मुद्दा बनवला गेला. 

 ५. २ कोटी रोजगार व १५ लाख खात्यात अशा आश्वासनांचे कोणतेही भाषण नाही हे मिडीयाने वारंवार सांगूनही तो प्रचाराचा मुद्दा बनविला.

 
मतदारांच्या मनावर बिंबलेल्या मोदींच्या सच्च्या, प्रामाणिक आणि ठळक प्रतिमेला पुसणे सोडाच भ्रष्टाचारी, चोर म्हणत या प्रतिमेला धूसर करणेही शक्य नाही हे मतदानाचे सातही टप्पे संपले तरी काँग्रेसला कळालेच नाही. अध्यक्षपदाच्या मखरात बसविलेल्या काँग्रेसजनांच्या दैवताला हे कळणे शक्य नव्हते कारण ती त्याची कुवतच नव्हती पण अनुभवी ज्येष्ठ काँग्रेसजनांनाही ते समजू नये हे अनाकलनीय आहे.

 
मोदींच्या बरोबरीने किंवा तोडीस तोड राहुल आहेत हे दाखविण्यासाठी कांग्रेस धुरिणांनी त्यांच्या अध्यक्षांची नसलेली उंची वाढविण्याचा व प्रतिमा उंचावण्याचा वारेमाप प्रयत्न केला. परदेशात कुठेतरी एका पत्रकाराबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्टेजवर मुलाखतीचा कार्यक्रम केला. बेंगळूरू व पुणे येथे विद्यार्थ्यांबरोबर गप्पांचा कार्यक्रम झाला. मोदी जितक्या सहजतेने अशा कार्यक्रमात वावरून छाप पाडायचे तसेच राहुल गांधी पण आहेत असे भासविण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. पण तरुणाई काय समजायचे ते समजली आणि अशा कार्यक्रमांमुळे त्यांचे हसे मात्र झाले. प्रधानमंत्री डरपोक आहेत, ते माझ्यासमोर १५ मिनिटेही टिकणार नाहीत, ते माझ्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत वगैरे  अशी प्रचारा दरम्यान वारंवार दर्पोक्ती करून त्यांना चर्चेचे खुले आवाहन देणे हासुद्धा बरोबरी साधण्याचा केविलवाणा प्रकार होता.  

 
गुजरातमध्ये वाढलेल्या जागा, कर्नाटकात पडते घेऊन भाजपला सत्ता न मिळू देणे, राजस्थान, म.प्र. व छत्तीसगढ येथे सत्तेत वापसी ! हे म्हणजे यशाची चढती कमान आहे अशा भ्रामक समजुतीत राहून कांग्रेसने स्वत:च्या पायावर धोंडा पडून घेतला व म्हणूनच अशी व्युहरचना ही चुकीच्या गृहीतकांवर आधारलेली होती असे म्हणावे लागेल. कारण गुजरातमध्ये सलग २० वर्षांच्या भाजप सत्तेनंतर (अल्पेश, जिग्नेश व हार्दिक यांच्या आंदोलनामुळे हवा तापली असतांना) कांग्रेस ने खरे तर सत्तेमध्ये येणेच अपेक्षित होते परंतु त्यांच्या केवळ काही जागा वाढल्या. इतकी अनुकूल स्थिती असतानाही सत्ता स्थापन करू न शकल्याचे दु:ख न मानता  भाजपच्या जागा कमी झाल्या या आनंदात कांग्रेस राहिली. तीच गोष्ट कर्नाटकाबाबद  ...  येथे तर कांग्रेसच्या जागा घटल्या होत्या पण भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काहीही ... या ध्यासाने पछाडलेल्या कांग्रेसने सगळ्यात कमी जागा मिळवलेल्या धजदला पाठींबा देण्यात आनंद मानला. या प्रसंगी एकीचे अनोखे दर्शन घडविणार्या त्या सोहळ्यात स्टेजवर उपस्थित सगळ्यांनाच मनोमन पंतप्रधानपदाची दिवास्वप्ने पडली होती हे कांग्रेसने ओळखले म्हणणे धाडसाचे ठरेल. अर्थात, ती ऐतिहासिक एकी आज केवळ फोटोत शिल्लक राहिली आहे. दर पाच वर्षांने सत्तापालट करायची परंपरा राजस्थानने कायम ठेवली परंतु त्याला यश मानून गाफील राहण्याचा वेडेपणा कांग्रेसने केला अर्थात मतदारांनी वसुन्धरा राजे यांचेवरील नाराजीचे प्रदर्शन करत मतदान केलेले आहे या वस्तुस्थितीकडे काँग्रेसने डोळेझाक केली तर म.प्र. मधील यश हे नोटा मुळे प्राप्त झाले ही वस्तुस्थिती स्वीकारली नाही कारण भाजपच्या एकूण मतांची टक्केवारी ही कांग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीपेक्षा किंचित जास्त होती. केवळ छत्तीसगढ मधील यश हे निर्भेळ यश मानावे लागेल अर्थात हे कांग्रेसलाही अनपेक्षित होते.

 
अशा प्रकारे गत वर्षभराच्या वाटचालीला राहुल गांधींचे यश व प्रगती मानण्याची चूक काँग्रेसने केली अन् या चुकीच्या गृहीतकावर आधारित प्रचाराची दिशा ठरवितांना मोदींचे अपयश, चारित्र्यहनन यावर लक्ष केंद्रित करायचे व जोडीला त्याच्यावर भ्रष्टाचाराचा डाग उमटवायचा ही रणनीती आखली गेली. पण मग ज्या शेतकरी, युवा बेरोजगार, गरीब यांच्या प्रश्नांचे भांडवल करत आहोत त्यांच्यासाठी काँग्रेस काय करणार यावरही भाष्य करणे गरजेचे आहे हे या वाटचालीत अचानक लक्षात आले आणि मग स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प, २२ लाख सरकारी पदांची भरती व गरीबांना न्याय योजनेंतर्गत दरमहा रु.६,०००/- याची घोषणा झाली. याचा प्रभाव पडून मतदार भरभरून मतांचे पारडे झोळीत टाकेल या समजुतीत काँग्रेसजन राहिले. लोकशाहीमध्ये सत्ताधार्यांवर टीका झालीच पाहिजे पण आम्ही काय करणार हे सांगुन त्या टीकेला सकारात्मकतेची जोड देणेही गरजेचे असते. विरोधक जेव्हा आश्वासन देतात तेव्हा त्याची पूर्तता होऊ शकेल का याचा अंदाज बांधण्याइतका मतदार राजा आता सुज्ञ झाला आहे. त्यामुळे दरमहा ६,००० पेक्षा मोदींच्या वार्षिक ६,००० वर शेतकरी वर्गाने विश्वास ठेवला. गेल्या ४५ वर्षातील सर्वोच्च बेरोजगारी हा प्रचार खोटा ठरला होता कारण अशी वस्तुस्थिती जर खरोखर असली असती तर कोणत्याही राजकीय पक्षांच्या कुबड्याविना देशाच्या कानाकोपर्यातून बेरोजगारांचे अगणित मोर्चे निघाले असते.

 
पराभवात आत्मचिंतन करतांना काय चुकले या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तराचा शोध घ्यायचाच असतो कारण त्या चुकांचा अभ्यास केल्याशिवाय यशाचा मार्ग कोणता याच उत्तर सापडत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्येक पराभवात आमची चूक आहे सांगून जबाबदारी स्वीकारली तर प्रत्येक विजयाचे श्रेय अध्यक्षांना देण्यात धन्यता मानली. २००९ नंतर पक्षाचा संघटन पाया हा खिळखिळा होण्यास सुरुवात झाली होती. २०१३ मध्ये मोदींच्या वादळी सभांनंतर अनेक नेत्यांनी हेलकावे खाणाऱ्या काँग्रेसच्या दोलायमान भवितव्याचा अंदाज घेत पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात धन्यता मानली. तेव्हाच बुरुजाचा एक एक चिरा ढासळायला सुरुवात झाली होती. २०१९ मध्ये तर अनेक मतदार संघात उमेदवारही मिळत नव्हते अशी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी प्रियादत्त, शीला दीक्षित यासारख्या मंडळींची मनधरणी करावी लागली.

 

आज पराभवाचे परखड विश्लेषण करत़ाना, कारणमिमांसा मांडतांना "अपरिपक्व, अकार्यक्षम अध्यक्ष व त्यामुळे जर्जर झालेली संघटना" हा वास्तववादी निष्कर्ष सोडून सगळे काही निष्कर्ष काढले जातील. कारण हुजरेगिरी हा सगळ्या काँग्रेसजनांचा स्थायीभाव आहे. पक्षांतर्गत निवडणूकीत गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय अन्य कोणी समोर उभेच  राहिले नाही म्हणून अध्यक्ष निवड ही लोकशाही मार्गाने झाली असे मांडणे हे हुजरेगिरीचे द्योतक नव्हे तर काय आहे ? क्षमता नसतांना अध्यक्षपदावर बसविलेल्या राहूलना स्वतःला आधी सिद्ध करण्यासाठी या हुजऱ्यांना भीक न घालता खड्यासारखे दूर सारावे. त्यांना न जुमानता अगदी अथपासून  सुरुवात करण्याचा निर्णय घ्यावा. संघटनेत काम करण्याचा अनुभव कार्यकर्त्याला संपन्न बनवतो व त्याच्या नेतृत्वात कुशलता येण्यासाठी उपयुक्त ठरतो. भट्टीत तापल्याशिवाय सोन्याचे बावनकशीपण सिध्द होत नाही. ज्या अमेठीत पराभव स्वीकारावा लागला तेथील नगर परिषदेपासून नव्याने सुरुवात करीन असा पवित्रा घेत कोणत्याही नाटकीय दडपणाला बळी न पडता सगळी राजवस्त्रे त्यागावीत. हे राहुल गांधींसाठी योग्य राहील कारण यातून ते स्वतःची प्रतिमा, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु शकतील. त्यांच्या वयाकडे बघता अशी भक्कम सुरुवात करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर अवधी आहे.

 
२८२ वरून ३०३ वर झालेली प्रगती भाजपला सुखावणारी नक्कीच आहे. झाडाला जितकी फळे जास्त तितके ते जास्त झुकलेले असते. आपल्या गुरुंच्या आणि ज्येष्ठांच्या उपस्थितीत नवनिवार्चित खासदारांसह सगळ्यांना मोदी संबोधित करत असतांना हे यश त्यांना अपेक्षित असल्याचे व त्यांचे पाय जमिनीवर असल्याचे जाणवत होते. पक्ष संघटनेतून शिस्तबद्ध वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यावर जेव्हा नेतृत्व करण्याची आणखी एक जबाबदारी सोपवली जाते तेव्हा त्या पदाकडे एक जबाबदारी म्हणून बघत त्या जबाबदारीच्या जाणीवेचे भान ठेवत केलेले मार्गदर्शन म्हणजे हे भाषण !

 
मोदींच्या अनेक भाषणातील एक भाषण असे हे भाषण खचितच नव्हते.  सलग १४४ प्रचार भाषणे केल्यानंतरची फलश्रूती म्हणून हे भाषण एक ऐतिहासिक टप्पा ठरावा व संघटनेत काम करतांना राजकीय कार्यकर्त्याने समाज जीवनात कसे वागावे, वावरावे, बोलावे यासाठी हे भाषण पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरु शकेल इतके ते मौल्यवान ठरेल. त्यांचे हे भाषण केवळ संसद सदस्यांनाच दिशा दर्शविणारे नव्हते तर देशवासियांना, विरोधी पक्षांना व मिडीयाला विकासाच्या परिभाषेचा एक वेगळा आयाम उलगडून दाखवणारे होते. 

 
२०१४ च्या "सबका साथ सबका विकास" ला "सबका विश्वास"ची जोड २०१९ साली देतांना ती एक शाब्दिक करामत नाही हे त्यांच्या आश्वासक देहबोलीतून जाणवत होते, शब्दातून मनामनाला भिडत होते. अर्थात निवडणूक निकालातून गेल्या ५ वर्षात भेदभाव न करता विकासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे "सबका विश्वास" त्यांनी कमावल्याच मतदारांनी भरघोस मत देऊन शिक्कामोर्तब केल होत. २०१९ ते २४ या पाच वर्षात विकासाचे कोणते नवे आयाम आखले जातात, शेती व रोजगार निर्मितीसारख्या गंभीर विषयांना कसे सामोरे जातात हे पहातांना कांग्रेस पक्ष पुन: कशी उभारी धरतो हे पाहणेही औत्सुक्याचे राहिल. मोदीपर्व २ ला शुभेच्छा व सकारात्मक राजनीती करणारा प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसलाही शुभेच्छा !

 
© बिंदूमाधव भुरे, पुणे. 
९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com