Saturday, July 10, 2021

आमची ९ जुलैची वारी

आळंदी ते पंढरपूर मार्ग हा वारीचा मार्ग ! दरवर्षी लाखो वारकरी तहानभूक, देहभान विसरून या मार्गावर विठू माउलीचे नाम घेत, टाळ चिपळ्या मृदंग यांच्या तालावर विठू माऊलींच्या भेटीच्या ओढीने तल्लीन होऊन भजन गात वाटचाल करत असतात. माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मार्गाला आपला पदस्पर्श झाला, त्या वाटेवर आपण चार पावले मार्गस्थ झालो तर निदान मोहरी एवढे पुण्य आपल्या पदरी पडेल या भाबड्या आशेने दरवर्षी आम्ही लुटूपुटूचे वारकरी बनून एक दिवस पायी वारी करायचा प्रयत्न करत असतो. 

गेल्या वर्षी व याही वर्षी कोरोना संकटामुळे व निर्बंधांमुळे दिवे घाट माथ्यावर असलेल्या भव्य विठ्ठलमूर्तीचे दर्शन घ्यायचे व परत यायचे असा उपक्रम आम्हाला करावा लागला. लहान मुल भातुकली खेळतात तशी आमची वारी होते होती. पण त्यातही आनंद आहे तो वारीच्या मार्गावर चार पावले चालण्याचा नेमात खंड न पडल्याचा ! 

जुलै सुरुवात होऊनही उन्हाचा चटका जाणवत होता पण काल माऊलीची कृपा झाली. वातावरण ढगाळ होत. वातावरणातील उष्मा गायब झाला होता. घाटात चालत असतांनाच बघता बघता वर्षासरींनी रेनकोट अंगावर चढवण्याचा इशारा दिला. घाटातून सर्वत्र दिसणारी हिरवळ नेत्रसुखद होती. घाट केव्हा संपला कळालेच नाही. माऊलींचे दर्शन झाले आणि वर्षासरींनी विलंबित मधून द्रूत मधे प्रवेश केला. 

वाफाळलेला चहा घेत सभोवताली नजर टाकता काही क‌ष्णमेघांनी विसाव्यासाठी डोंगरांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आपण नाही का विसाव्यासाठी म्हणुन एखाद्या  हिल स्टेशनला गर्दी करतो तसंच काहीसं वाटून गेलं.  पावसाचा जोर वाढतच होता. या पावसात घाट पायी उतरुन जायचं कि पावसाचा जोर ओसरण्याची वाट पहायची या प्रश्नाने फार त्रास नाही दिला.
एका मिसळ टपरीवर गरम कांदा भजी, बटाटेवडा व मिसळीची सोय झाली. पट्टीच्या गायकाला तबला, तंबोरा आणि हार्मोनियम या त्रिकूटाची संगत आली कि गाण रंगात येत. तसं या पावसाळी वातावरणात वडा, भजी आणि मिसळ या त्रिकुटाने आमची पंगत झकास जमली. मात्र घरुन आणलेला डबा संपविताना प्रत्येकाला दोन घास अंमळ जास्तच झाल्याच लक्षात आल तसा आम्हा वारकरी मंडळींनी "पुढच्या वेळेपासून घरुन डबा आणायचा नाही" असा ठराव एकमुखाने पारित केला. 

परत निघताना माउलींना मनोमन नमस्कार करत विनवले कि पुढच्या वर्षी मात्र वारीपूर्वीच सार वातावरण कोरोनामुक्त होऊ दे. वारीमार्गावर काही क्षण पायी चालल्याचे समाधान मनी बाळगले आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत परतीचा प्रवासाला लागलो. एव्हाना पाऊसही थांबला होता. 

बिंदुमाधव भुरे, पुणे. 

Wednesday, April 21, 2021

श्रीराम नामाची श्रेष्ठता !

श्रीराम नामाची श्रेष्ठता

।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 

श्रीराम नामाचा महिमा अपार आहे. हिंदू धर्मामधे चार वेद आधारभूत मानले गेले आहेत. या चारही वेदांचे सार महाभारतात आले आहे अशी मान्यता आहे.  म्हणूनच महाभारताला पंचमवेद असे मानले गेले आहे. भगवद्गीता ही श्रीकृष्णमुखातून उद्धृत झाली आणि भीष्माचार्य जाणत होते कि श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्रीविष्णूंचा अवतार आहे ! इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या भीष्माचार्यांनी शरपंजरी असतांनाच त्या अखेरच्या क्षणांमध्ये श्रीविष्णू सहस्त्रनामाचा जप सुरु केला होता असे म्हणतात. 

श्री रामरक्षा स्तोत्र म्हणताना त्यातील अंतिम श्लोक आहे 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे 
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने 

श्रीरामाचे एक नाम घेतल्यामुळे  सहस्त्रनाम जपण्याइतके पुण्य पदरी पडते. अर्थात, विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत भाषेत आहे. तेव्हा प्रत्येकालाच त्याचा जप करणे शक्य होईल असे नाही. मात्र या श्रीरामनामाच्या जपाने विष्णू सहस्त्रनामाचे फल प्राप्त होते, महापातकांचाही नाश होतो. 

एकैकं अक्षरम् पुसां महापातक नाशनम् 
असा उल्लेख श्री रामरक्षा स्तोत्रामधे आला आहे. 

श्रीरामाचे नाम म्हणजे "ॐकाराचा अनुकल्प"अशी उपमा पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली आहे. काही गोष्टी ग्रहण करतांना त्यांची दाहकता सौम्य करण्याची आवश्यकता असते. तद्वत, ॐकाराचे सौम्य, साधे, सोपे व सरलरुप म्हणजे श्रीरामाचे नाम ! "बहु साजिरे स्वल्प सोपे फुकाचे"असे श्रीराम नामाचे वैशिष्ट्य श्री समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केले आहे. त्यामुळे श्रीराम नामाचा जप करताना उच्चारण चुकले किंवा नियम, आसन, ध्यान वगैरेंचे पालन न झाले तरी त्याची काळजी नको. जसे जमिनीत बीज पेरतांना ते उलटे आहे कि सुलटे आहे हे तपासून बघण्याची आवश्यकता नसते, त्याची फलप्राप्ती होणे हे निश्चित असते तसेच श्रीराम नामजपाचे आहे.        

स्वामीजी म्हणतात कि श्रीराम नामात "अग्निबीजाचा र, सूर्यबीजाचा अ आणि चंद्रबीजाचा म" यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा जप हा सर्व पापांचे क्षालन करुन शीतलता प्रदान करतो. श्रीराम म्हणजे साक्षात सगूण साकार ! पण मग निर्गुण निराकार ?? .. तर यातही राम आहे आणि त्यालाच आपण आत्माराम म्हणतो. हे एक आत्मतत्त्व आहे म्हणजे स्वतःला विसरुन आत्मारामाशी एकरुप होणे. बाह्य समृद्धी व आतील आत्मशांती हे दोन्ही या नामजपाने साधले जाते. 

"देहली दीपन्याय" म्हणजे घरात असणारा एकमेव दिवा जर दोन खोल्यांच्या मधे ठेवला तर दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश मिळतो‌. तद्वत जिव्हा .. जी मध्यभागी असते, त्यावर सतत श्रीरामाचे नाम असेल तर त्यामुळे आतील शांती व बाह्य समृद्धी दोन्ही प्राप्त होईल. 

श्रीराम नामाची महती सांगणारी पुराणात एक कथा आहे. श्री रामरक्षा स्तोत्रामधे सुरवातीला श्लोक आहे. 

चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् 

देव, दानव आणि मानव या तिघांनाही हे शतकोटी श्लोक हवे होते. पण त्याचे निष्पक्षपणे वाटप कोण करणार ? म्हणून हे तिघेही जण भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांनी प्रत्येकी ३३ कोटी असे वाटप केले. पण शेवटी १ कोटी उरले. मग त्याचे वाटप प्रत्येकी ३३ लाख असे केले. शेवटी १ लाख उरले. त्यांचे वाटप मग प्रत्येकी ३३ हजार असे झाले. पण शेवटी १ हजार उरले. मग भोलेनाथांनी त्याचे  नंतर प्रत्येकी ३३३ असे वाटप केल्यावर एक श्लोक उरला. आता यांचे वाटप कसे करावे ? अनुष्टूप छंदातील श्लोक असल्यामुळे यात ३२ अक्षरे होती. भोलेनाथांनी यांचे प्रत्येकी १० असे वाटप केले. शेवटी उरलेले दोन अक्षरे भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतले. ती दोनअक्षरे म्हणजे "राम" ! 

साक्षात भोलेनाथांना ज्या रामनामाचा मोह झाला ते रामनाम सदैव ओठांवर असावे. 

जानकी जीवन स्मरण जय जय राम ! 

(संदर्भ आधार : पू. स्वामी गोविंद गिरी यांची प्रवचने)

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे 
श्रीराम नवमी, २१ एप्रिल २०२१

Tuesday, April 20, 2021

विरहातील आर्तता

विरहातील आर्तता 

अथांग नभात विखुरुन पडलेल्या तारकांचा लख्ख प्रकाश आता मंदावू लागला आहे. अशा किती रात्री उलटून गेल्या असतील बर ? अगदी रात्रीचा अंतिम प्रहर सरेपर्यंत मी कायम तुझी चातकासारखी वाट बघितली ! माझ्या उदास ... उद्विग्न मनाची अवस्था तुझ्या लक्षात ग कशी येत नाही ? किती वाट पहायची तुझी ? 

तू नसल्यामुळे हे मन खुप उदास आहे, दुःखी आहे. मला कायमचे विरहात लोटणार असशील ..... तर ... तर तसं सांग ! अगदी जड अंतःकरणाने मी सांगतो कि .... आता माझी त्यालाही तयारी आहे पण ... पण तस सांगण्यासाठी का होईना ... एकदा तरी येऊन जा. 

तुझ्यासाठी माझ्या हृदयात असणारी अपार प्रीती, प्रेमभाव .... हे सार काही आठव ना एकदा ! माझ्या हृदयात सदैव तूच असतेस आणि या ओठांवर तुझ्या प्रीतीचे गीत ! पण तुझ्या अभावी त्या गीतांना सूर नाही हे तुला कस बर समजत नाही. ते सूर बनण्यासाठी का होईना ... निदान एकदा तरी येशील का ? 

तुझ्या सहवासातील त्या धुंद क्षणांना आठवून मी कसेबसे दिवस कंठतो आहे. आपल्या त्या अमिट मिलनाच्या आठवणींचा तो मंद प्रकाश .... त्यात मी कायमच हरपून जात असतो ... त्या मंद प्रकाशाचा तो झरोका अगदी निष्ठूरपणे विजवून टाकणार असशील तरी माझी हरकत नाही पण ..... पण त्यासाठी तरी येशील ना ? 

या जीवनात मला जे जे काही हव होते ते सार काही नशिबाने मला मिळालय‌. पण अद्यापही काही अपूऱ्या क्षणांची पूर्तता होण्याची आस हे वेड मन बाळगून आहे. ते अपूरे क्षण बनून तू येशील ना ? 

मला माहिती आहे कि तू पण माझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतेस कारण तू कधी ते प्रकट केल नाहीस पण तूला ते कधी लपवताही आल नाही ग ! आयुष्यात एकदा .... फक्त एकदा तरी तो प्रेमभाव मोकळेपणाने प्रकट करण्यासाठी येशील का ? मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंतपर्यंत वाट बघत राहीन ! 

आयुष्याचा अखेरचा श्वास ...केव्हा व कधी घेतला जाईल ? काही सांगता येत नाही. पण एका क्षणासाठी का होईना, माझ्या आयुष्यात तू पुनः येणार असशील तर त्या अंतिम श्वासालाही मी थोपवेन, त्या मृत्यूलाही मी थांबण्यासाठी आर्जवे करेन आणि त्या एका अखेरच्या श्वासात माझ्या अपूऱ्या इच्छांची, अतृप्त भेटीची पूर्तता करेन. 

तू माझ्यापासून दूर निघून गेलीस.... का गेलीस ? या विरहाचे कारण मी कोणाला सांगू ? कस सांगू ? हा विरह आता मला सहन होत नाही. मी अनंतापर्यंत तुझी वाट पहात राहीन ! तू अगदी अनपेक्षितपणे, अगदी न सांगता आलीस तरी चालेल पण मग मात्र परत जाऊ नकोस.... कधीच परत जाऊ नकोस. 

                  @@##@@##@@

प्रियतमा, सखी, प्रेमिका हिच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या जीवाची घालमेल, आर्तता, उदासीनता, उद्विग्नता व्यक्त करणारी अनेक काव्ये, रचना साहित्यात आहेत. क्षणिक विरहाच्या आड असलेली सुखाची किनार कधी मृगजळासारखी तर कधी सावली सारखी भासमान असते. कधीतरी स्वप्नवत अशा मिलनाच्या आसेची तृप्ती प्रत्यक्षात येईल हा भाव प्रियकराच्या भावनातून प्रकट होत असतो. मात्र प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या या कोमल विरही मनावर कशी बरे फुंकर मारावी ? त्याची कशी बरे समजूत काढावी.  

मराठी आणि उर्दू या दोन भाषात असलेल्या दोन अजरामर अशा काव्यरचना ... अगदी समांतर जाणाऱ्या ...... ! त्यातील साम्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न ! एक कडवे मराठीचे तर एक उर्दू काव्याचे .... असा क्रमाने स्वच्छंद अनुवाद, भावार्थ वर लिहिला आहे. पण दोनही काव्यरचनां मधील आशय भिन्न असूनही या भावार्थामधे एक कंटीन्यूटी भासते. एकात आशेचा किरण आहे, प्रियतमेबद्दल मनाला असणाऱ्या प्रेमभावात लपलेला एक आदर आहे, एक लाडिक तक्रार आहे. तर दुसऱ्या रचनेत मिलनाच्या क्षणांच्या अपेक्षा धूसर होत चालल्याचा उदास भाव, उद्विग्नता डोकावते आहे. 

एक सुधीर मोघेंची रचना ... गायक बाबूजी (पं. भीमसेन यांनी पण अप्रतिम गायिले आहे) ... काव्य आहे 
"सखी मंद झाल्या तारका .. आता तरी येशील का ?"
तर दूसरी रचना शायर अहमद फराज़ यांची ...
"रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ" 
दोन्ही रचनांमधील भावनांची मांडणी गायकांनी अशा उत्कटतेने केली आहे कि दोन्ही रचना थेट हृदयाला भिडतात. गाण्यातला भाव बाबूजी तसेच मेहंदी हसन या महान गायकांनी नेमका प्रकट केल्यामुळे ही गाणी अजरामर झाली आहेत. 

या रचना खाली उद्धृत केल्या आहेत. प्रत्येक रचनेतील एक कडवे व नंतर वरील मुक्तछंदी भावार्थ असे वाचल्यास या रचनांचा आनंद घेता येईल. 

मराठी गीत - गीतकार सुधीर मोघे

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?

हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?

उर्दू गझल - रचनाकार - अहमद फराज

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही..

© बिंदुमाधव भुरे, पुणे. 


Saturday, February 20, 2021

बापाच काळीज

"बाबा, मी खेळायला जाऊ ?"
डिजिटल युगात टच स्क्रीनला चटावलेल्या पिढीतल एक निरागस पोर बापाला आर्जव करतय.  

समोरच्या लॅपीवर नजर रोखलेल्या अवस्थेत बाप नुसतच "हं" म्हणतो अन् पोरग .... ??? 
एकदाच वाचलेला धडा .. 
त्यावर गुरुजींनी विचारलेला प्रश्न ... 
टेंशन आलेल असतांना न अडखळता देता आलेल उत्तर ... 
आणि गुरुजींच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रीत मंद स्मित ...
हे पाहिल्यानंतर होणारा आनंद .‌.. 
आज बाबांनी "ह" म्हटल्यावर झालेल्या आनंदा एवढाच मोठ्ठा होता. 

आई मात्र किचन मधून ... 
"अरे, कशाला हो म्हटलं ? होमवर्क केवढा तरी राहिलाय त्याचा !"  .....
बहुतेक सगळ्या आया सेमच असतात नाही ? सेंचुरी ठोकलेल्या सचिन आऊट झाल्यानंतर "थोडा आणखी खेळायला हवा होता" म्हणणार ....  
१००% मार्क्स पडल्यावर ... आता हे टिकवून ठेवायचे बर का ? असे कौतुकाचे बोल आडवळणाने येणार ! .....
पोरगा खांदे उडवत बाबांकडे कटाक्ष टाकतो .. अन् डोळे मिचकावत त्यांना एक मिश्कीलपणे स्माईल देत बाहेर धूम ठोकतो.

चौथी आणि सातवीत स्काॅलरशिपला अट्टाहासाने बसवलेल असत ....  का ? तर १० वी चा पाया पक्का होतो म्हणे.....
पण मन कायम ओढ घेत असायच सोसायटीच्या आवारात पाट लावून उभा केलेला स्टंप, टेनिस बॉल, एकदम असली वाटेल अशी MRF CEAT वगैरेंचा स्टीकर लावलेली बॅट आणि फोर, सिक्स आऊटे या दंग्याकडे ... 

नववी संपतांना कळत कि यावर्षी मे महिन्याची सुटी  कुर्बान करायची.....
१० वीचा पाया आणखी पक्का करायचा असतो म्हणून ...
शाळेच्या उंबरठा पहिल्यांदा ओलांडला तेव्हा "मोठेपणी कोण होणार ?" घरी आलेल्या प्रत्येक आगंतुकाने विचारलेला प्रश्न ? ....
आणि चरकातून दहावेळा घातलेल्या उसाचा चिप्पाडा झाल्यागत दिलेल उत्तर .. "डाॅक्टर, इंजिनिअर, वकील !"
हे सगळ आजही कानात घुमतय ! 

खिन्न मन कायमच आक्रंदायच .....
"अरे, मला काय आवडते .. हे कधी कोणी विचारणार का ? 
एखाद्या वाढदिवसाला MRF स्टीकरवाली बॅट देत "जा बेटा, खेळ हवं तेव्हढ" असं कोणी म्हणेल ? ....्
पिक्चर संपतानाअमरीश पुरी तरी म्हणाला होता सिमरनला " जा बेटा, जी ले अपनी जिंदगी !" ...
नाही आपल्या नशिबी .... म्हणून तर बाबांनी त्याला आज "ह" म्हटलं नसेल ? 

या रेसमधे इच्छा नसली तरी माणूस ढकलला जातो, पायांचे तुकडे पडेपर्यंत धावत असतो.. बालपण आणि निरागसता कशाला म्हणतात हे तो जणू विसरुन गेलेला असतो. पण आज "बाबा, मी खेळायला जाऊ ?" यावर "ह" अस म्हणुन बाबा मूक संमती देतो तेव्हा त्या पोराच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद बाप तिरक्या नजरेने न्याहाळत स्वतःच बालपण तर त्यात शोधत तर नसेल ?

बापाने कायमच असल्या प्रश्नांचा कठोर सामना केलेला ! डोळ्यांच्या कडा पाणावल्या असे वाटायच्या आत 
"रडू नको मुलींसारख मुळुमुळू" 
म्हणुन करड्या शिस्तीचा बडगा उगारला जायचा. 
आज त्या आठवणींमुळे ओलावणाऱ्या कडा दिसू नयेत म्हणून तर आज "ह" असा प्रतिसाद बाहेर पडला नसेल ?

साॅफ्टवेअर इंजिनिअर होत त्यान बापाच स्वप्न पूर्ण तर केल पण त्यासाठी स्वतःच्या आयुष्यातले निसटलेले सुंदर क्षण मुलाच्या आयुष्यात देण्याचा प्रयत्न तो करत असावा.... 
वाळू मुठीत धरण्याचा केलेला प्रयत्न फसतो कारण वाळू निसटते. आयुष्यातील त्या क्षणांचेही असेच काहीसे असावे का ?  .....
त्यामुळे आता मुलाच्या आयुष्यातील असे क्षण ओंजळ धरुन जपण्याचा त्याचा प्रयत्न जणू काही .. 
एल आय सी च्या बॅनरवर "योगक्षेम वहाम्यहम" मधे ओंजळीने ज्योतीला सुरक्षित ठेवतात ... जणू तसा भासत होता ...

उतारवयात आधार असणारी हातातली काठीही हिसकावून घेणाऱ्या युगात पोरग आपली काठी बनून राहील ही अपेक्षा त्या "ह" मधे दडली तर नसेल ? 
बापाचे काळीज ... या काळजाला घरे पडली तरी याच्या मायेची पाखरण कधीच कळून येत नाही, उघड्या डोळ्यांना दिसत नाही .... 

पुष्पा, I hate tears म्हणणाऱ्या राजेश खन्नाच्या डोळ्यात तरंगणारे अश्रू पाहून शर्मिला त्याला प्रश्न विचारते तेव्हा नजर चुकवत तो सहज बोलून जातो "अरे ये आज बाहर कैसे आगए ?"  

पुरुष मंडळींच असंच असत काहीस !!! अव्यक्त अस अमरप्रेम ! 

(समस्त बाप जमातीला अर्पण)

©बिंदुमाधव भुरे, पुणे 
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Saturday, February 6, 2021

संस्मरणीय अकलूज

अकलूज ट्रीपचा विषय खरे तर श्री चव्हाण साहेबांनी लावून धरला होता आणि त्यातून या ट्रीपला सपत्नीक यावे हा त्यांचा आग्रह होता. एखादा निर्णय घेतला कि तो पूर्णत्वास कसा न्यायचा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री चव्हाण साहेबांनी *"ठरविली आणि प्रत्यक्षात आणली"* अशी ही *अकलूज ट्रीप !* अर्थात *श्री वाघोलेंचे निमंत्रण व जबरदस्त इच्छाशक्ती* यामागे एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्यरत होती हे काय वेगळे सांगायला हव ? 

*"हमारे आदमी"* चारो तरफ फैले हुए है हा खास फिल्मी डायलॉग ! निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी *श्री प्रकाश जहागिरदार* हा असाच एक *"खास आदमी"* ! एक कुशल संघटक म्हणून अनेक गुण त्यांच्यात उपजत सामावले असल्याचे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे. बस ठरविणे, कार्यक्रमाची रुपरेषा आखणे, माहितीचे आदानप्रदान यासाठी स्वतंत्र व्हाॅटस अप गृप करणे, त्यावर वेळोवेळी सूचना टाकणे, एकूण खर्चाचा अचूक अंदाज मांडणे, चोख हिशोब ठेवणे आणि "असू दे, राहू दे, नको नको" असे सांगूनही पैसे रिफंड करणे ... हे सगळे म्हणजे *प्रकाश के लिये बाये हाथका खेल !* 

या ट्रीप चे मला आणखी जाणवलेले वेगळेपण म्हणजे *वेळेचे काटेकोर अन् अचूक प्लॅनिंग !* रेल्वे क्राॅसिंगला फाटक उघडे पर्यंत वहानांना वाट पहायला लागते. काही वेळा रेल्वे लेट असते तर काही वेळा आपण लवकर आलेलो असतो. पण रेल्वे जावी, फाटक उघडावे आणि आपल्याला कणभरही वेटिंग न करावे लागणे. अशावेळी जो आनंद होतो तोच अनुभव काल प्रत्येक पिक-अप पाॅइंटला आम्ही घेतला. तीच बाब पुढील प्रत्येक टप्प्याची ! ब्रेकफास्ट, अकलूजला पोहोचण्याची वेळ, साइट सिइंग च्या वेळा, जेवणाची वेळ, परत निघण्याची व पुण्यात पोहोचण्याची वेळ ... *टायमिंगची इतकी परफेक्ट  किमया* साधली गेली कि त्याची तुलना सचिनने अफलातून मारलेल्या देखण्या स्ट्रेट-ड्राइव्हच्या टायमिंगशी व्हावी ! 

अकलूज आणि लावणी महोत्सव यांचे नाते सर्वश्रूत आहे. त्यामुळे कि काय या शहरा बाबद अनेकांच्या मनात वेगळीच अशी प्रतिमा अकारण तयार झाली होती. अकलाई देवी व श्री गणेश मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसृष्टी या स्थळांच्या भेटीने अकलूजची मनात असलेली प्रतिमा बदलली. एक आदर्श पर्यटन स्थळ किंवा must visit destination अशी गणना अकलूज ची केली जावी असे मला वाटते.  एखाद्या गावाचा सांस्कृतिक वारसा, तेथील परंपरा, चालीरीती, माणूसकीचा प्रवास वगैरे जाणून घ्यायचे असेल तर माणसाने त्या गावाने जपलेल्या, विकसित केलेल्या अशा ऐतिहासिक खाणाखूणांचा अभ्यास करावा असे मला उगाच वाटून गेले.

श्री वाघोले कुटूंबियांनी प्रेमाच्या व आपुलकीच्या भावनेने केलेले स्वागत, आदरातिथ्य, पाहूणचार हे सारे काही जणू *"यही तो है इस मिट्टी की खूषबू"* असे सांगून गेल्या.  त्या गावाची परंपरा जणू त्या सगळ्यांनी अलगद उलगडून दाखविली. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता करावी का असा प्रश्न मनात घोळत राहिला. मित्रांनो, आपल्या गृपच्या भविष्यात अनेक ट्रीप्स होतील, आपल्यातील कौटूंबिक नात्यांचे बंध नव्याने विकसित होतील, मैत्रीच्या नात्याला फुललेली पालवी नव्याने बहरेल पण *अकलूज ट्रीपची छबी मनाच्या एका कोपऱ्यात सदैव टवटवीत राहील ... अगदी परततांना श्री वाघोले कुटूंबियांनी भेटीदाखल दिलेल्या रोपट्यासारखी ..  हे मात्र नक्की !* 

टीप : वरील विवेचन तसेच शशांक व इतरांनी लिहिलेलया कमेंट्स वाचल्यानंतर आपण खूप काही मिस केले असे वाटणाऱ्यांनी पुढची ट्रीप चुकवू नये. 

श्री बिंदुमाधव भुरे. 
५ फेब्रुवारी २०२१

Friday, January 29, 2021

नाॅस्टॅल्जिया

**** *नाॅस्टॅल्जिया* ****
*** *मुक्काम पोस्ट पुणे****

३५-४० वर्षांपूर्वीचे दिवस अजूनही आठवले कि मस्त वाटते ! पिक्चरला जायच ठरल कि आधी थिएटर वर जाऊन पहावे लागे तिकिट मिळतायत का ? कारण पूर्वी एखादा पिक्चर थिएटरला लागला अन् तो चांगला चालतोय म्हटल कि २५ आठवडे अगदी रौप्यमहोत्सव होइपर्यंत त्याचा मुक्काम तेथेच. त्यामुळे पहिले ३-४ आठवडे अॅडव्हान्स बुकिंग न करता ऐन वेळेला थिएटरवर गेल कि  "हाऊसफुल्ल" च्या बोर्डला घातलेला फुलांचा हार लांबूनच दिसायचा अन् मूड आॅफ व्हायचा. 


पण वेडी आशा आम्हाला माघारी फिरु द्यायची नाही. कोणीतरी एक्स्ट्रा तिकिट असलेला भेटेल या खोट्या आशेवर त्या गर्दीत आशाळभूत अन् शोधक नजरेन फिरत रहायच. एकट दुकट कोणी उभ दिसल तर विचारायच "आहे का एक्स्ट्रा" ? बहुतेक वेळा खालचा ओठ मुडपून आडवी मान करत मंडळींचा नकारच यायचा नाही तर "अहो, मलाच हवी आहेत दोन तिकिट" अस उत्तर ! थिएटरमधे एंट्री सुरु झाली कि हळूहळू आवारातील गर्दी ओसरु लागायची कि आम्ही मंडळी काढता पाय घ्यायचो.


बर त्याकाळी सगळ्या थिएटरला शो ची टायमिंगही ठराविकच ... ३,६ व ९. त्यामुळे अगदी धावत धावत म्हणजे सायकल मारत दुसऱ्या थिएटरला एखादा शो मिळतोय का बघायची सोय नाही. मग आमच मित्रमंडळींच टोळक जाऊन धडकायच डेक्कनला,  सनराईज नाहीतर रिगलवर. इराण्याचा चहा हे नुसत निमित्त ! खर कारण तेथे फुकट ऐकायला मिळणारी गाणी. पाच जण असलो तर "तीन पानी कम" ची आॅर्डर सुटायची कारण अगदी सगळ्यांनी खिसे झाडले तरी पाच चहाचे पैसे निघण अशक्य ! आणि अगदी चुकून एखाद्याकडे जास्त निघालेच तर त्या श्रीमंतीचा आनंद काय वर्णावा ! अहाहा !! पण या जादा पैशांचा चहा न पिता पुढची गाणी जर चांगली नाही लागली तर आपली फर्माइशसाठी या श्रीमंतीचा वापर होत असे.


आता थिएटरला नशीब उदास असल तरी इराण्याकड साॅलिड फळायच ! गाणी अशी काही सुरु असायची की आत पाय टाकता क्षणी पिक्चरची तिकिट न मिळाल्याच दुःख काही क्षण तरी विसरायला व्हायच. गुलजार, आरडी जोडीन "आँधी"त जी काही जादू केली होती त्यान अक्षरशः तेव्हा आमच्या अख्खया पिढीला वेड लावल होत. "इस मोड़से जाते है" वाक्यातल "मोड" शब्दावर लताची नाजूक हरकत आणि "पत्थरकी हवेली" वर किशोरचा लागलेला खास संजीवकुमारसाठीचा आवाज ! कितीही वेळा ऐकल तरी कमीच, कान अतृप्तच असायचे. अशी गाणी सुरु असतांना आमची गँग एकदम चिडीचूप असायची. आपापल्या आवडीची गाण्यातली जागा आली कि नकळत "व्वाह, क्या बात है" अस मनोमन व्हायच. 


इराण्याकडे किंवा अमृततुल्यमधे येणार सगळ्यात महत्वाच दैनिक म्हणजे दैनिक प्रभात ! निम्मा पेपर डेडिकेटेड टू पिक्चरच्या जाहिराती. गाणी ऐकण्यामुळे पिक्चर पहायच्या मूडवर पडलेल्या पाण्याची काही प्रमाणात भरपाई झाली असली तरी पिक्चरचा किडा शांत होण अशक्य. त्यामुळे दोन गाण्यांच्या दरम्यान शांतता असे तेव्हा दै. प्रभात मधे मॅटिनीला म्हणजे दुसऱया दिवशी सकाळी ११.३० किंवा १२ चा शोला कोठे कोठे कोणकोणते पिक्चर्स सुरु आहेत याचा आढावा घेण्यात येई.


मॅटिनी म्हणजे थोड़े स्वस्तात काम ना आणि परत जुने पिक्चर्स ! अगदी ब्लॅक अॅन्ड व्हाइट म्हणजे दिलिप, देव किंवा राजकपूर अन् काहीच नाही तर मग शम्मीकपूर ठरलेला. राजकुमार, तिसरी मंझिल व अॅन इव्हिनिंग इन पॅरिस हे कुठे ना कुठे सुरु असायचेच. शशीकपूर, राजेन्द्रकुमार आॅप्शनला असायचे. म्हणजे अगदी काहीच नाही मिळाले तर चांगली गाणी या निकषावर मेरे नेहबूब, आरज़ू, जब जब फूल खिले किंवा ओ पी नैयरसाठी एक मुसाफिर एक हसीना, हमसाया वगैरेवरही समाधान मानत असू. क्लासिकल चा मूड आला तर गुरुदत्तना प्रथम पसंती किंवा मधुमती, अनुपमा वगैरे.


रिगल, सनराइजमधे मित्रांसोबत बसुन एकमेकांना दाद देत एकत्र गाणी ऐकण्यातला आनंद आज कानात इयरफ़ोन घालून मोबाइलमधील गाणी एकट्याने ऐकतांना नाही येत.आज घरबसल्या बुक माय शो वर सर्फिंग करुन पिक्चरच बुकिंग करता येत पण थिएटरवर जाऊन लायनीत ऊभे राहुन अॅडव्हान्स बुकिंग करतांना आपला नंबर येईपर्यंत तिकिट संपतील का या विचाराने होणारी धाकधुकीतली मजा त्यात नाही. कॅफे काॅफी डे मधे बसून काॅफीचे घोट घेत होणाऱ्या टाइमपास पेक्षा रिगल-सनराइज़च्या टिपीकल संगमरवरी टेबल व लाकडी गोल खुर्च्यांवर बसून पानी कम चहाची लज्जत न्यारीच. 


आजच्या हायटेक जमान्यातील नव्या नव्या सुविधामधे एक कम्फर्ट आहे, एक आगळी मजा आहे हे नाकारायच कशाला ? पण एक नक्की,  पुनः ते दिवस येणे नाही, आता ती इराण्याची हाॅटेल्सही नाहीत, एकपडदा चित्रपटगृह वय झाल्यामुळे केव्हाही मान टाकतील अशा त्यांची स्थिती. आज जमाना मल्टिप्लेक्सचा, माॅल्स संस्कृतीचा, स्मार्ट सिटीचा, चर्चा मेट्रोची पण भविष्याचा वेध घेतांना मागे वळून पाहिल तर तुम्हा प्रत्येकाच्या आठवणीत असे काही सोनेरी क्षण असतीलच ना ? माझ्या आठवणीत तर नक्कीच आहेत !

बिंदुमाधव भुरे.
पुणे
१२ जानेवारी २०१७