Showing posts with label आध्यात्मिक. Show all posts
Showing posts with label आध्यात्मिक. Show all posts

Monday, June 30, 2025

"बाॅब वारी २०२५"



 

 "बाॅब वारी २०२५" चा कार्यक्रम जाहीर झाला आणि सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येने बघता बघता साठी पार केली. बाॅब वारीच्या दशकपूर्ती नंतर यशस्वी आयोजनातील सातत्याची किर्ती बाॅब निवृत्तांच्या विविध कळपात पोहोचत असल्याची ही पावतीच जणू ! 


श्री. चव्हाण साहेबांनी अनेक वर्षांपासून व्यक्त केलेल्या एका इच्छेची पूर्तता नुकतीच झाली होती आणि बाॅब निवृत्तांच्या अर्धागिनींचा एक समूह छान पैकी आकाराला आला होता. या महिला वर्गाचा सहभाग हे या वारी २०२५ चे वेगळेपण म्हणावे लागेल. खरतर वारीतील‌ सहभाग हा निवृत्त बाॅब परिवारापुरताच मर्यादित हा आपला नियम ! मात्र या वर्षापुरता त्याला अपवाद करत बाॅब निवृत्तांच्या परिचयातील दोन तीन जणांचा समावेश यंदा केला‌ गेला. 


रथाचे चार अश्व आणि त्याचे कुशल नेपथ्य हे समीकरण रथात स्वार असलेल्यांना निश्चिंत बनवते. रविवारी दि २२ जूनला या वारीसाठीचा पाहणी दौरा आम्ही पूर्ण केला. अर्थातच कुशल नेपथ्य प्रकाश जहागीरदार यांचे नेहमीच असते.. जोडीचे चार अश्व अनेकदा बदलते असतात. तसे यावेळी ते मी, नरेंद्र मुजुमदार, अजित नंदर्गीकर आणि रहाळकरजी हे होतो. 


पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी थांबणे, न्याहारी तसेच प्रसाधन गृह वगैरेंची नेटकी व्यवस्था आहे की नाही हे पहाणे तसेच प्रवासाचा मार्ग, त्यावरील टप्प्यांची नोंद ठेवणे वगैरे विषय होते. अर्थात, नेमके पायी चालणे किती असेल‌ ? हा महत्वाचा आणि उत्सुकतेचा विषय होता आणि त्यातच वारीचा खरा आनंद मिळणार होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर वारीच्या दिवशीच मिळणार होते ! साधारण ८-९ तासांचा हा पाहणी दौरा पार पडला आणि मग वारीचा अंतिम आराखडा / कार्यक्रम आकाराला आला.‌


सहभागी वारकरी माऊलींची संख्येने साठी ओलांडल्याचे सुरवातीलाच मी नमूद केल होत. यात सत्तरी पार‌ केलेल्या मंडळींची संख्या लक्षणीय होती. जास्तीत जास्त १५ ते २० किमी चालावे लागेल हे माहिती असूनही यातील एकही जण डगमगला नाही हे विशेष.. "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती हे या स्थितीत लागू न पडणारे गीत" उगाचच माझ्या मनात तरळून गेले.. 


नेहमीप्रमाणे सुखकर प्रवास व्हावा‌ म्हणून दोन उत्तम बस सकाळी ६.३० वाजता आमच्या हाॅटेल समुद्र अड्ड्यावर तयार होत्या. दोन्ही बसना "बाॅब वारकरी"चे बॅनर अडकले.. सगळ्यांना गंध टिळा लावायचा कार्यक्रम रंगला, गृप फोटोची लगबग आवरती घेतली. वारकऱ्यांना सदिच्छा निरोप द्यायला आलेल्या मंडळींनी प्रवासासाठी सोबत प्रेमाने दिलेल्या तहान लाडू भूक लाडूचा सहर्ष स्वीकार झाला. आणि माऊलींच्या जयजयकाराच्या  उद्घोषात बस नियोजित वेळेत रवाना झाल्या.



वाटेत रामकृष्ण मठ, संतोष हाॅल व वडगाव पुल असे थांबे बस घेत होती. येथे प्रतीक्षा करत असलेल्या वारकरी माऊली आम्हाला जाॅइन झाल्या. आणि मग बस मार्गस्थ झाली. वाटेत श्री पोतनीस साहेबांनी दिलेल्या हरिपाठ  पुस्तिकेचे वितरण झाल होतच..त्याच्या लयबद्ध पठणाने भक्तिमय वातावरण तयार झाले. अनेकांनी "वारी २०२५" गृप वर पाठवलेले अभंग, बासरीवादन बसच्या ब्ल्यू टूथ स्पीकर माध्यमातून ऐकवले गेले. 


नियोजित वेळेप्रमाणे ८.४५ ला हाॅटेल आशीर्वाद येथे चहापान, न्याहारीसाठी पहिला थांबा आम्ही घेतला. मस्त ढगाळ वातावरण, प्रदूषण मुक्त मोकळी हिरवा, निसर्गाने विणलेली हिरवाई...‌हा माहोल आणि वाफाळणारे गरमागरम पोहे, उप्पीट मिसळ याचा मनमुराद आनंद वारकरी मंडळींनी लुटला. फोटोसाठी मोबाईल सरसावले नसते तरच नवल ! या क्षणाच्या आठवणी टिपण्यात सगळे मग्न होते.. वेळ कमी पडत होता मात्र घडाळ्याचा काटा आपल्या वेगाने पुढे चालत राहिल्याने बस प्रवास पुढे सुरु करणे भाग पडले.‌ 



आणि हो एक खास उल्लेख कि जो आवर्जून करायलाच हवा... न्याहारीचे बील‌ अदा करायची गडबड करु नकोस असा प्रेमळ दम मला‌ श्री आठल्येंनी भरला आणि सगळ्यांचा न्याहारी खर्च आठल्ये दांपत्यांनी उचलून एक सुखद धक्का सगळ्यांना दिला. 


 

पालखी तरडगाव येथून सकाळीच फलटणच्या दिशेने रवाना झाली‌ होती.‌ रस्त्यांवर किती गर्दी असेल ? तरडगाव पासून आपल्या बस किती अंतर पालखीच्या दिशेने पुढे जाऊ शकतील ? रस्ते बंद तर नसतील ना ? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला तरडगाव पर्यंत पोहोचल्यानंतरच सापडणार होती. सगळ्या वारकरी माऊलींची मानसिक तयारी १५ किमी चालण्याची होतीच. साधारण ११ वाजता तरडगाव येथे पोहोचलो आणि मग रस्त्यांवर दुतर्फा माऊलींची वाढती वर्दळ रस्त्यावर दिसू लागली. सर्वत्र भगवे ध्वज दिसत होते, कानावर टाळ मृदंगाच्या गजरात अभंग तर कधी माऊलींच्या नावाचा उद्घोष कानांना सुखावत होता.‌ बसचा वेग आता धीमा झाला होता.‌ 



यादरम्यान बस बऱ्यापैकी पुढे आली होती. साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही मंडळी सुरवडी गावाच्या जवळपास पोहोचलो आणि मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला. आता  पायी चालण्याचे अंतर १५ किमी वरुन ६ किमी इतके कमी झाले‌ होते. अंतर तर कमी झाले पण आता उन्हाळा असल्यासारखे उन जाणवत होते. चालताना गटागटाने चालावे, दोन गटात फार अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे सूचना पुन्हा एकदा दिल्या गेल्या आणि माऊलींचा गजर करत वारीत आमच्या पायी चालण्याला आरंभ झाला.. 


वाटेत निरीक्षण करताना भक्तीने भारलेल्या वातावरणात वारकरी माऊलींची विविध रुपे पहाणे, फोटो काढणे असे सुरु होते. काळज गावाच्या जवळ आम्ही जसे आलो तशी वारकऱ्यांची गर्दी दाट होत चालल्याचे लक्षात आले आणि इथेच माऊलींच्या पालखीचा विसावा असल्याचे दिसले. आतपर्यंत जाऊन दर्शन ? छे ! त्या गर्दीत शिरण्याचे धाडस होत नव्हते. मनात विचार आला.. लक्षावधी वारकरी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात आणि कळसाचे दर्शन घेऊन परततात. शेवटी भक्तीभाव मनात असला कि देव भेटतो.. आम्ही लांबूनच दर्शन घेतले. 

 



वाटेत आमच्या गटाने एक गोल रिंगण करत विठ्ठल विठ्ठल असा सुरात जयघोष सुरु केला.. थोडा पायांना विश्राम आणि नविन उर्जा सामावून घेण्याचा तो भक्तिमय प्रयत्न ! मजल दर मजल करत आम्ही १.३० वाजता वडजल गावात पोहोचलो. येथे मीरा भोजनालय मध्ये सगळ्या वारकरी माऊलींची भोजन व्यवस्था केली होती. इथे पोहोचल्यावर लक्षात आल कि एक गट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालत होता. त्यामुळे त्यांना ना माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले ना मीरा भोजनालयाची पाटी दिसली. ही मंडळी आणखीन पुढे चालत गेली होती.


प्रचंड गर्दीमुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. शेवटी प्रकाश आणि नरेंद्र या जोडगोळीने त्यांना गाठले आणि मग मीरा भोजनालयला आमचा कोरम फुल झाला. गरमागरम घडीच्या पोळ्या, वांग्याची भाजी, रस्सा, वरण भात, चटणी पापड वगैरे खास मराठमोळा मेनू होता. मंडळी थकली असली तरी अद्यापही पायी वारी चालायची इच्छा होती. जेवणानंतर तेथेच गप्पांचे फड जमले. अचानक बाहेर रस्त्यावर गर्दी वाढली. माऊलींची पालखी पुढे रवाना होत होती. ज्या मंडळींचे दर्शन राहिले होते त्यांना दर्शनाचा खूप छान लाभ झाला.. "याच साठी केला होता अट्टाहास .." आणि मग "वारीला आल्याचे सार्थक झाले" ही समाधानाची भावना मनाला स्पर्श करती झाली. 



माऊलींची पालखी फलटणच्या दिशेने पुढे सरकत होती तशी रस्त्यावरची गर्दी थोडी कमी होत होती. अखेर साडेचारच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला आरंभ केला. येताना पुन्हा सारोळा गावात हाॅटेल आशीर्वादला चहापान झाले. पुन्हा एकदा फोटो सेशन, माऊलींचा गजर झाला. दोन्ही बसमधील वारकरी माऊलींनी इथेच परस्परांचा निरोप घेतला. साडे आठच्या सुमारास म्हणजे अगदी ठरल्या वेळेला आम्ही समुद्र हाॅटेल येथे परतलो. 


माऊलींच्या कृपेने सगळी वारी खूप आनंदात आणि समाधानात पार पडली. पुढचे काही दिवस या आठवणींची आणि फोटोंची उजळणी होत राहील..या वारीला प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेले श्री प्रकाश होनप आणि श्री सुहास पाटील यांनी आर्थिक सहयोग राशी देऊन अप्रत्यक्षपणे वारीत सहभाग नोंदवला. "बाॅब वारकरी" नाव असलेल्या टोप्या, उपवासाचा चिवडा, शेंगदाणा चिक्कीचे बार, लाडू, साटोऱ्या, प्यायच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे सहाय्य करत अनेकांनी वारीत आपला भक्तिमय सहभाग दिला. या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे "वारी पुराण" अपुरे ठरेल नाही का ? सहयोगाबद्दल‌आणि सहभागाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार ! 


बिंदुमाधव भुरे.

Wednesday, April 21, 2021

श्रीराम नामाची श्रेष्ठता !

श्रीराम नामाची श्रेष्ठता

।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 

श्रीराम नामाचा महिमा अपार आहे. हिंदू धर्मामधे चार वेद आधारभूत मानले गेले आहेत. या चारही वेदांचे सार महाभारतात आले आहे अशी मान्यता आहे.  म्हणूनच महाभारताला पंचमवेद असे मानले गेले आहे. भगवद्गीता ही श्रीकृष्णमुखातून उद्धृत झाली आणि भीष्माचार्य जाणत होते कि श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्रीविष्णूंचा अवतार आहे ! इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या भीष्माचार्यांनी शरपंजरी असतांनाच त्या अखेरच्या क्षणांमध्ये श्रीविष्णू सहस्त्रनामाचा जप सुरु केला होता असे म्हणतात. 

श्री रामरक्षा स्तोत्र म्हणताना त्यातील अंतिम श्लोक आहे 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे 
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने 

श्रीरामाचे एक नाम घेतल्यामुळे  सहस्त्रनाम जपण्याइतके पुण्य पदरी पडते. अर्थात, विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत भाषेत आहे. तेव्हा प्रत्येकालाच त्याचा जप करणे शक्य होईल असे नाही. मात्र या श्रीरामनामाच्या जपाने विष्णू सहस्त्रनामाचे फल प्राप्त होते, महापातकांचाही नाश होतो. 

एकैकं अक्षरम् पुसां महापातक नाशनम् 
असा उल्लेख श्री रामरक्षा स्तोत्रामधे आला आहे. 

श्रीरामाचे नाम म्हणजे "ॐकाराचा अनुकल्प"अशी उपमा पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली आहे. काही गोष्टी ग्रहण करतांना त्यांची दाहकता सौम्य करण्याची आवश्यकता असते. तद्वत, ॐकाराचे सौम्य, साधे, सोपे व सरलरुप म्हणजे श्रीरामाचे नाम ! "बहु साजिरे स्वल्प सोपे फुकाचे"असे श्रीराम नामाचे वैशिष्ट्य श्री समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केले आहे. त्यामुळे श्रीराम नामाचा जप करताना उच्चारण चुकले किंवा नियम, आसन, ध्यान वगैरेंचे पालन न झाले तरी त्याची काळजी नको. जसे जमिनीत बीज पेरतांना ते उलटे आहे कि सुलटे आहे हे तपासून बघण्याची आवश्यकता नसते, त्याची फलप्राप्ती होणे हे निश्चित असते तसेच श्रीराम नामजपाचे आहे.        

स्वामीजी म्हणतात कि श्रीराम नामात "अग्निबीजाचा र, सूर्यबीजाचा अ आणि चंद्रबीजाचा म" यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा जप हा सर्व पापांचे क्षालन करुन शीतलता प्रदान करतो. श्रीराम म्हणजे साक्षात सगूण साकार ! पण मग निर्गुण निराकार ?? .. तर यातही राम आहे आणि त्यालाच आपण आत्माराम म्हणतो. हे एक आत्मतत्त्व आहे म्हणजे स्वतःला विसरुन आत्मारामाशी एकरुप होणे. बाह्य समृद्धी व आतील आत्मशांती हे दोन्ही या नामजपाने साधले जाते. 

"देहली दीपन्याय" म्हणजे घरात असणारा एकमेव दिवा जर दोन खोल्यांच्या मधे ठेवला तर दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश मिळतो‌. तद्वत जिव्हा .. जी मध्यभागी असते, त्यावर सतत श्रीरामाचे नाम असेल तर त्यामुळे आतील शांती व बाह्य समृद्धी दोन्ही प्राप्त होईल. 

श्रीराम नामाची महती सांगणारी पुराणात एक कथा आहे. श्री रामरक्षा स्तोत्रामधे सुरवातीला श्लोक आहे. 

चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् 

देव, दानव आणि मानव या तिघांनाही हे शतकोटी श्लोक हवे होते. पण त्याचे निष्पक्षपणे वाटप कोण करणार ? म्हणून हे तिघेही जण भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांनी प्रत्येकी ३३ कोटी असे वाटप केले. पण शेवटी १ कोटी उरले. मग त्याचे वाटप प्रत्येकी ३३ लाख असे केले. शेवटी १ लाख उरले. त्यांचे वाटप मग प्रत्येकी ३३ हजार असे झाले. पण शेवटी १ हजार उरले. मग भोलेनाथांनी त्याचे  नंतर प्रत्येकी ३३३ असे वाटप केल्यावर एक श्लोक उरला. आता यांचे वाटप कसे करावे ? अनुष्टूप छंदातील श्लोक असल्यामुळे यात ३२ अक्षरे होती. भोलेनाथांनी यांचे प्रत्येकी १० असे वाटप केले. शेवटी उरलेले दोन अक्षरे भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतले. ती दोनअक्षरे म्हणजे "राम" ! 

साक्षात भोलेनाथांना ज्या रामनामाचा मोह झाला ते रामनाम सदैव ओठांवर असावे. 

जानकी जीवन स्मरण जय जय राम ! 

(संदर्भ आधार : पू. स्वामी गोविंद गिरी यांची प्रवचने)

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे 
श्रीराम नवमी, २१ एप्रिल २०२१

Thursday, July 4, 2019

माझा वारीतला एक दिवस

*माझा वारीतला एक दिवस*

माउलींच्या पालखीचे आगमन पुण्यात झाले कि त्यांचा येथे एक दिवस मुक्काम ठरलेला. आगमनाचे दिवशी रात्री किंवा दुसरे दिवशी केव्हातरी पादुकांच्या दर्शनासाठी वडील मंडळी आम्हाला नेत असत. नंतर एक दोन वेळा फर्गसन कॉलेज रस्त्यावर गर्दीत दर्शन घेतल्याचे आठवतंय. त्यानंतर अनेक वर्ष बँक आटोपल्यावर घरी जातांना अनुभवलेला ट्राफिक जाम ! २०१७ साली माझा निवृत्त सहकारी प्रकाश बँकेत आला आणि सहजच वारीचा विषय निघाला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ही सगळी दृश्य तरळली आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्याला म्हणून गेलो “यावर्षी मीही येणार !" त्यानेही आठवणीने वारीच्या पहिल्या मिटींगला मला बोलावले. वारीला जाण्याचा माझा जबरदस्त योग असावा कारण त्या मिटींगला जाण्याची बुद्धी मला झाली.

 

*वारीचे प्रचंड कुतूहल अनेक वर्षांपासून होत.* काही लाख वारकरी २०-२१ दिवस घरदार सोडून पंढरीच्या दिशेने पायी कसे जात असतील ? सतत २०-२१ दिवस पायी चालून त्यांना काही त्रास होत असेल का ? विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ म्हणजे नेमक काय ? आषाढीला पंढरपुरला जमणाऱ्या ८-१० लाख भाविकांपैकी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन किती लोक घेत असतील ? वगैरे ... यासारख्या *अनेक प्रश्नांची उत्तरे मला वारीत मिळणार होती.* कोपऱ्यावरच्या किराणा दुकानातून काही सामान आणायचे झाले तर लहानपणी मला सायकल लागायची आता स्कूटर लागते. पण"पायी जा" असे सांगितले कि "वेळ वाचतो" हे माझे उत्तर ठरलेले. त्यामुळे *वारीबाबद सर्वाधिक कुतूहल होत ते सतत २०-२१ दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे आणि त्यांच्या दैनंदिनीचे !*

शिवाजीनगर ब्रँचला असतांना एकदा बँकेतून निघायला खूप उशीर होऊन गेला होता. स्कूटर सुरु होईना म्हणून मागे गावठाणात असणारा आमचा नेहमीचा बाळू मेकँनिक फोन करताच धावत आला. काहीतरी मेजर प्रॉब्लेम होता. उद्याच होईल दुरुस्त म्हणाला आणि स्कूटर घेऊन गेला. मी धोपटी उचलली व रिक्षाने जाऊ अशा विचारात रस्त्यावर आलो अन् लक्षात आले कि पैशाचे पाकीट आज घरीच विसरल आहे. *खिशात दमडा नाही त्यामुळे आपसूक मानसिक बळ आल असाव आणि म्हणूनच “जाऊ चालत” असा विचार मनात आला* अन् जे एम रोड वर चालू लागलो. दत्तवाडीत घरी पोहोचेपर्यंत एक तास लागला. *खूप खूप चालायचा एव्हढाच काय तो अनुभव ! पण बॉबच्या अनुभवी वारकरी टीमने पुणे - सासवड हे २८ किमी अंतर भक्तिमय वातावरणात कसे सहज पार होते हे रंगवून सांगितले असल्यामुळे मनात कुठेही भीती नव्हती, किंबहुना उत्सुकताच होती.*

 

पसायदान पूर्ण पाठ नाही ना त्याचा अर्थ नीटसा ठाऊक, ज्ञानेश्वरीतली एक ओवी, एक अभंग येत नाही, लहानपणी कानावर पडलेला ग्यानबा तुकारामचा जयघोष, टाळ चिपळीचे स्वर आणि मृदुंगाचा ठेका केवळ या आठवणींच्या शिदोरीवर वारीच्या मार्गावर मार्गस्थ होणार होतो. १८-२० जण सोबत होते पण मन मात्र स्वत:शी बोलत होते, डोळे सभोवतालचे निरीक्षण करत होते. खातांना हातातल बिस्कीट खाली पडल तर मुलांना ते धुळीत पडल्याने घाण झाले असे म्हणणारे आपण ... पण वारीच्या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना त्याच *रस्त्याला वाकून नमन करायच आणि तिथली धूळ मस्तकी लावायची हा निरिक्षणातून मिळालेला पहिला धडा !*

माऊलींची पालखी या रस्त्याने जाणार म्हणून किंवा गेली म्हणून पवित्र झालेला हा रस्ता ही त्यामागील वारकऱ्यांची भावना असावी ! इतकी पवित्र भावना बाळगण्या इतका मोठा भाविक मी नक्कीच नव्हतो. त्यामुळे ज्या मार्गावर लक्षावधी श्रद्धाळू, भाविक, वारकरी यांच्या पाऊलखूणा उमटतात त्या पवित्र पाऊखुणांना आपला पदस्पर्श व्हावा व वारी केल्याचे आभासी पुण्य पदरात पडावे या नुसत्या विचारानेच *मनाच्या अडगळीत पडलेल्या भक्ती भावनेवर साचलेली धुळ क्षणात दूर झाली आणि माऊली म्हणून कोणीतरी आपल्याला हाक मारताच अंतर्मनात श्रद्धेचा भाव जागृत झाल्याची प्रचिती आली.*

मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्याचे काही कारण नव्हते, त्यांचा मुक्त संचार मनात अनेक प्रश्नांचे तरंग उमटवत होता. *या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास बुद्धी तोकडी पडावी कारण त्यांची उत्तरे "श्रद्धा" या एकाच शब्दात येतात.* शरीराला एखादा रोग झाला कि डॉक्टर सांगतात "इंफेक्शन" झालय किंवा "व्हायरल" आहे आणि मग "अँटिबायोटिक"चा एक डोस देतात. आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी पंचकर्माला महत्व ! दोष निर्मूलनासाठी वर्षातून एकदा पंचकर्म कराव. पण अनेक विचारांनी आणि विकारांनी ग्रस्त असलेल्या *मनाचे "इंफेक्शन" किंवा मनाचे "दोष निर्मूलन" केवळ आणि केवळ वारीतच होते. ही विठूमाऊलीच्या नामोच्चाराची किमया म्हणावी कि भक्तिमय, मंगलमय वातावरणाने भारलेल्या वातावरणाचा परिणाम ?*

कधी नापिकी तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी बाजारभाव नाही यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे चित्र नित्याचेच ! पण घर कोसळू द्यायच नाही, सगळ दुःख मनात ठेवायच आणि संसाराचा गाडा हाकायचा हे कसब त्या त्या घरच्या माऊलींना साधावच लागत. अनवाणी पायाने वारीच्या गर्दीत वाट चालतांना तळपायांना बसणारे चटके, होणाऱ्या वेदना तर कधी पावसामुळे झालेला चिखल याची पर्वा न करता डोईवरच तुळशी वृंदावन लिलया संभाळण्याची कसरत करणाऱ्या माऊली पाहिल्या कि फाटलेल्या संसाराला ठिगळ लावून प्रपंच संभाळण्याच त्यांचे हे कौशल्य उपजत आहे कि  विठूमाऊलीचे नाम घेत केलेल्या वारीमुळे साधल गेलय ? याचे उत्तर वारीत मिळत. *एक बँकर म्हणून लेजर बँकिंगच्या काळातील "बँलंसिंग" शब्दाचा नवा अर्थ वारीत कळत होता.*

वारीचे माझे हे तिसरे वर्ष ! सुसंस्कृत व बुद्धिजीवी म्हणविणाऱ्या वर्गात मागच्या पिढीतली परंपरा पुढची पिढी संभाळतांना अभावानेच दिसते मग वारीची परंपरा पिढ्यान पिढ्या कशी संभाळली जात असेल ? या प्रश्नाचे उत्तर पुढच्या वर्षीच्या वारीत सापडेल कदाचित ! उच्च शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या बाजारात जेव्हा आजची तरुण पिढी प्रवेश करते तेव्हा त्यांच्या वयाची पंचविशी (नविन गणिताप्रमाणे - वीस पाच) उलटलेली असते. तर वयाच्या २१ व्या वर्षी अवतार कार्य संपले म्हणून समाधिस्थ होणारे ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रचनांचा अर्थ अजूनही लावला जातोय. पुढच्या वर्षीपर्यंत एका तरी ओवीचा अर्थ समजावून घ्यावा हा विचार पुण्यात परतत असतांना मनात दृढ झाला होता आणि वारीचे आयोजन नियोजन करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल मनोमन कृतज्ञतेचा भावही !

बिंदूमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१
८६९८७४९९९०