"बाॅब वारी २०२५" चा कार्यक्रम जाहीर झाला आणि सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येने बघता बघता साठी पार केली. बाॅब वारीच्या दशकपूर्ती नंतर यशस्वी आयोजनातील सातत्याची किर्ती बाॅब निवृत्तांच्या विविध कळपात पोहोचत असल्याची ही पावतीच जणू !
श्री. चव्हाण साहेबांनी अनेक वर्षांपासून व्यक्त केलेल्या एका इच्छेची पूर्तता नुकतीच झाली होती आणि बाॅब निवृत्तांच्या अर्धागिनींचा एक समूह छान पैकी आकाराला आला होता. या महिला वर्गाचा सहभाग हे या वारी २०२५ चे वेगळेपण म्हणावे लागेल. खरतर वारीतील सहभाग हा निवृत्त बाॅब परिवारापुरताच मर्यादित हा आपला नियम ! मात्र या वर्षापुरता त्याला अपवाद करत बाॅब निवृत्तांच्या परिचयातील दोन तीन जणांचा समावेश यंदा केला गेला.
रथाचे चार अश्व आणि त्याचे कुशल नेपथ्य हे समीकरण रथात स्वार असलेल्यांना निश्चिंत बनवते. रविवारी दि २२ जूनला या वारीसाठीचा पाहणी दौरा आम्ही पूर्ण केला. अर्थातच कुशल नेपथ्य प्रकाश जहागीरदार यांचे नेहमीच असते.. जोडीचे चार अश्व अनेकदा बदलते असतात. तसे यावेळी ते मी, नरेंद्र मुजुमदार, अजित नंदर्गीकर आणि रहाळकरजी हे होतो.
पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी थांबणे, न्याहारी तसेच प्रसाधन गृह वगैरेंची नेटकी व्यवस्था आहे की नाही हे पहाणे तसेच प्रवासाचा मार्ग, त्यावरील टप्प्यांची नोंद ठेवणे वगैरे विषय होते. अर्थात, नेमके पायी चालणे किती असेल ? हा महत्वाचा आणि उत्सुकतेचा विषय होता आणि त्यातच वारीचा खरा आनंद मिळणार होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर वारीच्या दिवशीच मिळणार होते ! साधारण ८-९ तासांचा हा पाहणी दौरा पार पडला आणि मग वारीचा अंतिम आराखडा / कार्यक्रम आकाराला आला.
सहभागी वारकरी माऊलींची संख्येने साठी ओलांडल्याचे सुरवातीलाच मी नमूद केल होत. यात सत्तरी पार केलेल्या मंडळींची संख्या लक्षणीय होती. जास्तीत जास्त १५ ते २० किमी चालावे लागेल हे माहिती असूनही यातील एकही जण डगमगला नाही हे विशेष.. "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती हे या स्थितीत लागू न पडणारे गीत" उगाचच माझ्या मनात तरळून गेले..
नेहमीप्रमाणे सुखकर प्रवास व्हावा म्हणून दोन उत्तम बस सकाळी ६.३० वाजता आमच्या हाॅटेल समुद्र अड्ड्यावर तयार होत्या. दोन्ही बसना "बाॅब वारकरी"चे बॅनर अडकले.. सगळ्यांना गंध टिळा लावायचा कार्यक्रम रंगला, गृप फोटोची लगबग आवरती घेतली. वारकऱ्यांना सदिच्छा निरोप द्यायला आलेल्या मंडळींनी प्रवासासाठी सोबत प्रेमाने दिलेल्या तहान लाडू भूक लाडूचा सहर्ष स्वीकार झाला. आणि माऊलींच्या जयजयकाराच्या उद्घोषात बस नियोजित वेळेत रवाना झाल्या.
वाटेत रामकृष्ण मठ, संतोष हाॅल व वडगाव पुल असे थांबे बस घेत होती. येथे प्रतीक्षा करत असलेल्या वारकरी माऊली आम्हाला जाॅइन झाल्या. आणि मग बस मार्गस्थ झाली. वाटेत श्री पोतनीस साहेबांनी दिलेल्या हरिपाठ पुस्तिकेचे वितरण झाल होतच..त्याच्या लयबद्ध पठणाने भक्तिमय वातावरण तयार झाले. अनेकांनी "वारी २०२५" गृप वर पाठवलेले अभंग, बासरीवादन बसच्या ब्ल्यू टूथ स्पीकर माध्यमातून ऐकवले गेले.
नियोजित वेळेप्रमाणे ८.४५ ला हाॅटेल आशीर्वाद येथे चहापान, न्याहारीसाठी पहिला थांबा आम्ही घेतला. मस्त ढगाळ वातावरण, प्रदूषण मुक्त मोकळी हिरवा, निसर्गाने विणलेली हिरवाई...हा माहोल आणि वाफाळणारे गरमागरम पोहे, उप्पीट मिसळ याचा मनमुराद आनंद वारकरी मंडळींनी लुटला. फोटोसाठी मोबाईल सरसावले नसते तरच नवल ! या क्षणाच्या आठवणी टिपण्यात सगळे मग्न होते.. वेळ कमी पडत होता मात्र घडाळ्याचा काटा आपल्या वेगाने पुढे चालत राहिल्याने बस प्रवास पुढे सुरु करणे भाग पडले.
आणि हो एक खास उल्लेख कि जो आवर्जून करायलाच हवा... न्याहारीचे बील अदा करायची गडबड करु नकोस असा प्रेमळ दम मला श्री आठल्येंनी भरला आणि सगळ्यांचा न्याहारी खर्च आठल्ये दांपत्यांनी उचलून एक सुखद धक्का सगळ्यांना दिला.
पालखी तरडगाव येथून सकाळीच फलटणच्या दिशेने रवाना झाली होती. रस्त्यांवर किती गर्दी असेल ? तरडगाव पासून आपल्या बस किती अंतर पालखीच्या दिशेने पुढे जाऊ शकतील ? रस्ते बंद तर नसतील ना ? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला तरडगाव पर्यंत पोहोचल्यानंतरच सापडणार होती. सगळ्या वारकरी माऊलींची मानसिक तयारी १५ किमी चालण्याची होतीच. साधारण ११ वाजता तरडगाव येथे पोहोचलो आणि मग रस्त्यांवर दुतर्फा माऊलींची वाढती वर्दळ रस्त्यावर दिसू लागली. सर्वत्र भगवे ध्वज दिसत होते, कानावर टाळ मृदंगाच्या गजरात अभंग तर कधी माऊलींच्या नावाचा उद्घोष कानांना सुखावत होता. बसचा वेग आता धीमा झाला होता.
यादरम्यान बस बऱ्यापैकी पुढे आली होती. साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही मंडळी सुरवडी गावाच्या जवळपास पोहोचलो आणि मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला. आता पायी चालण्याचे अंतर १५ किमी वरुन ६ किमी इतके कमी झाले होते. अंतर तर कमी झाले पण आता उन्हाळा असल्यासारखे उन जाणवत होते. चालताना गटागटाने चालावे, दोन गटात फार अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे सूचना पुन्हा एकदा दिल्या गेल्या आणि माऊलींचा गजर करत वारीत आमच्या पायी चालण्याला आरंभ झाला..
वाटेत निरीक्षण करताना भक्तीने भारलेल्या वातावरणात वारकरी माऊलींची विविध रुपे पहाणे, फोटो काढणे असे सुरु होते. काळज गावाच्या जवळ आम्ही जसे आलो तशी वारकऱ्यांची गर्दी दाट होत चालल्याचे लक्षात आले आणि इथेच माऊलींच्या पालखीचा विसावा असल्याचे दिसले. आतपर्यंत जाऊन दर्शन ? छे ! त्या गर्दीत शिरण्याचे धाडस होत नव्हते. मनात विचार आला.. लक्षावधी वारकरी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात आणि कळसाचे दर्शन घेऊन परततात. शेवटी भक्तीभाव मनात असला कि देव भेटतो.. आम्ही लांबूनच दर्शन घेतले.
वाटेत आमच्या गटाने एक गोल रिंगण करत विठ्ठल विठ्ठल असा सुरात जयघोष सुरु केला.. थोडा पायांना विश्राम आणि नविन उर्जा सामावून घेण्याचा तो भक्तिमय प्रयत्न ! मजल दर मजल करत आम्ही १.३० वाजता वडजल गावात पोहोचलो. येथे मीरा भोजनालय मध्ये सगळ्या वारकरी माऊलींची भोजन व्यवस्था केली होती. इथे पोहोचल्यावर लक्षात आल कि एक गट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालत होता. त्यामुळे त्यांना ना माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले ना मीरा भोजनालयाची पाटी दिसली. ही मंडळी आणखीन पुढे चालत गेली होती.
प्रचंड गर्दीमुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. शेवटी प्रकाश आणि नरेंद्र या जोडगोळीने त्यांना गाठले आणि मग मीरा भोजनालयला आमचा कोरम फुल झाला. गरमागरम घडीच्या पोळ्या, वांग्याची भाजी, रस्सा, वरण भात, चटणी पापड वगैरे खास मराठमोळा मेनू होता. मंडळी थकली असली तरी अद्यापही पायी वारी चालायची इच्छा होती. जेवणानंतर तेथेच गप्पांचे फड जमले. अचानक बाहेर रस्त्यावर गर्दी वाढली. माऊलींची पालखी पुढे रवाना होत होती. ज्या मंडळींचे दर्शन राहिले होते त्यांना दर्शनाचा खूप छान लाभ झाला.. "याच साठी केला होता अट्टाहास .." आणि मग "वारीला आल्याचे सार्थक झाले" ही समाधानाची भावना मनाला स्पर्श करती झाली.
माऊलींची पालखी फलटणच्या दिशेने पुढे सरकत होती तशी रस्त्यावरची गर्दी थोडी कमी होत होती. अखेर साडेचारच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला आरंभ केला. येताना पुन्हा सारोळा गावात हाॅटेल आशीर्वादला चहापान झाले. पुन्हा एकदा फोटो सेशन, माऊलींचा गजर झाला. दोन्ही बसमधील वारकरी माऊलींनी इथेच परस्परांचा निरोप घेतला. साडे आठच्या सुमारास म्हणजे अगदी ठरल्या वेळेला आम्ही समुद्र हाॅटेल येथे परतलो.
माऊलींच्या कृपेने सगळी वारी खूप आनंदात आणि समाधानात पार पडली. पुढचे काही दिवस या आठवणींची आणि फोटोंची उजळणी होत राहील..या वारीला प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेले श्री प्रकाश होनप आणि श्री सुहास पाटील यांनी आर्थिक सहयोग राशी देऊन अप्रत्यक्षपणे वारीत सहभाग नोंदवला. "बाॅब वारकरी" नाव असलेल्या टोप्या, उपवासाचा चिवडा, शेंगदाणा चिक्कीचे बार, लाडू, साटोऱ्या, प्यायच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे सहाय्य करत अनेकांनी वारीत आपला भक्तिमय सहभाग दिला. या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे "वारी पुराण" अपुरे ठरेल नाही का ? सहयोगाबद्दलआणि सहभागाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार !
बिंदुमाधव भुरे.







तुमचं लेखन इतकं जिवंत आहे की डोळ्यांसमोर ते दृश्य उभं राहिलं!” तुळशीबागवाले
ReplyDeleteखूप सुंदर आणि यथोचित वर्णन केले आहे! प्रसंगिक फोटोच्या समावेशामुळे वृत्तांत अगदी जिवंत झाला आहे. प्रत्यक्ष वारीला गेल्याचे समाधान मिळत आहे.
ReplyDeleteसुरेख वर्णन..वारी समोरुनच जात आहे असं वाटलं.
ReplyDeleteबॉब वारी 2025 चे यथार्थ पुर्ण दिवसाचे धावते वर्णन आपण फारच ओघवत्या अभिजात मराठी भाषेत केले। वारीला गैरहजर असल्याची अजिबात जाणीव झाली नाही। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हरि वासुदेव हरि ।
ReplyDeleteहेमंत काळकर ।
बिंदू
ReplyDeleteछानच वर्णन केलेस.
पूर्ण दिवसाचे द्दश्यांकन समोर उभे राहीले व पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला.
आता सर्व बरोडियन्स ना कळण्यासाठी Spandan च्या पुढील अंकामध्ये या लेखाचा समावेश करण्यास तुझी अनुमती असेलच
विवेक रानडे
अतिशय सुंदर व शिस्तबंध नियोजन,कोठेही थकवा जाणवला नाही, अतिशय उत्साहात वारी 2025 संपन्न झाली,पुढील वारी 2026 ची उत्सुकता
ReplyDeleteसुहास कुलकर्णी
ReplyDeleteसुंदर वर्णन, पालखीत असल्या सारखा परत अनुभव आला
ReplyDeleteश्रीपाद वाघ
ReplyDeleteबॉब वारी 2025 चे यथार्थ पुर्ण दिवसाचे धावते वर्णन आपण फारच सुंदरपणे केले आहे. मनःपुर्वक धन्यवाद,!!!
ReplyDeleteपांडुरंग नाखे
ReplyDeleteपुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला हे वर्णन वाचून. सर्व व्यवस्थापन एकदम उत्कृष्ट. प्रकाश आणि टीमचे मनःपूर्वक आभार.
ReplyDeleteअतिशय छान वर्णन 🙏 सहभागी नसून सहभागाचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद 👍
ReplyDeleteदेव भावाचा भुकेला
ReplyDeleteअतिशय उत्फूर्त आणि भक्ती रसपूर्ण वातावरणात वैष्णवांचा मेळावा सचित्र शब्दबध्द केल्या मुळे आम्हाला प्रत्ययकारी अनुभव मिळाला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वारी मध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो असे वाटले. पुढील वर्षी सहभागी होण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
ReplyDeleteसुरेख शब्दानकन, वाचताना असे वाटले की अरे खरच आपल्या सहकार्या नी किती मदत केली.
ReplyDeleteएका च्या ही मनात शंका नवहती.
आपल्या वर पूर्ण विश्वास ठेवून सगळे लोक आले.
पहिल्यांदा च येणार्याच ही कौतुक.
अतिशय सुंदर बॉब वारीचे शब्दांकन सर्व बॉब वारकऱ्यांचे अभिनंदन.70 च्या पुढे वय पण पंधरा वीस किमी चालण्याचा उत्साह वाचून कौतुक वाटले. माझे काका प्रकाश जहागिरदार आणि इतर आयोजक मंडळींचे पण कौतुक .इतक्या सगळ्यांची जायची व्यवस्था, वेळेचे नियोजन, भोजनाचे नियोजन आणि मेन्यू हे सगळे जमवून आणणे कौतुकास्पद आहे
ReplyDeleteभक्तीची ती वारी सुखाचा तो सोहळा
ReplyDeleteसफल संपूर्ण तुम्ही वर्णियेला
सेवाभाव तुमचा कष्ट घेतले अपार
यशस्वी तो माऊलीने करविला
वंद्य तो विठ्ठल आणि ज्ञाना तुकाराम
नमस्कार तुम्हाला धन्यवाद देण्या🙏🏾
नीलिमा वळामे.
ReplyDeleteराम कृष्ण हरि. आपली बाॅब फॅमिली खरंच खूप ग्रेट आहे. अध्यात्माशिवाय जीवन व्यर्थ आहे. पण आमची बाॅब फॅमिली किती यथार्थ जीवन जगत आहे, याची अनुभूती अनेक प्रकारे, वर्षभर येत असतेच. श्री. चव्हाण साहेब व त्याची सर्व सेना उत्साहाने काम करीत असते. या सर्वांना सादर वंदन.
ReplyDeleteवारीचे वर्णन खूपच सुंदर केले आहे.
खूप भक्तिमय वातावरणात वारी झाली, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
पुढील वर्षासाठी मी आत्ताच बुकिंग करत आहे.
सर्व बाॅब वारकऱ्यांचे अभिनंदन, कौतुक व शुभेच्छा.
राम कृष्ण हरी.
नर्मदे हर.
आम्ही बाणेर मधील ५० जण वारीला गेलो होतो.५००० लोकांना अन्नदान केलं. वारी कशी असते ते अनुभवलं. कृतार्थ झालो
Deleteअलका कोळपे मांगले
Deleteसौ. यशश्री विश्वास तावसे
ReplyDeleteखरेच सुंदर वर्णन. वारीचा pun:प्रत्यय आला.
ReplyDelete--- नारायण देशमुख
खुप छान वर्णन वारीला असल्याचा भास झाला बिंदुमाधव , जय श्री हरी विठ्ठल
ReplyDeleteवाह बिंदू अभिनंदन.फार सुंदर लेखन आणि योग्य त्या ठिकाणी आकर्षक छायाचित्रे!
ReplyDeleteबरोडियन माऊलींचा आणि वडजलीय माऊलींचा फुगडीचा खेळ सुध्दा मनोरंजक व प्रेक्षणीय झाला.
खुप छान वारीतला अनुभव आहे सर
ReplyDeleteअभ्यासपूर्वक लेख. वारीचे वर्णन सुंदर माणलेस.कोणताच मुद्दा शिल्लक ठेवला नाही.
ReplyDeleteवा बिंदू सर खूपच छान वारीचं वर्णन केलं आहे. बॉब रिटायर्ड स्टाफचा सुंदर उपक्रम 👌 जय जय राम कृष्ण हरी 🙏
ReplyDeleteव्वा, व्वा, सुंदर आयोजन, लेखन *नागपूरहून यावंसं वाटतं * अभिनंदन, बिंदू
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे, आयोजन केलेल्या संताना विनंती आहे की पुण्याचा बाहेरील भक्तासाठी काही जागा शिल्लक राहिली पाहिजे
ReplyDeleteखूप छान वर्णन. वाचून चांगले वाटले. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.🌹
ReplyDeleteसुरेख शब्दांत सुरेख समारंभाचे वर्णन हेमंत करंदीकर
ReplyDeleteफारच सुंदर व मुद्देसूद लिखाण. प्रत्येक टप्प्याचे यथोचित मोजके वर्णन. न आलेल्यांना वारीत सामील झाल्याचा आनंद मिळाला.
ReplyDeleteज्यांच्या अर्धांगिनी बरोबर होत्या त्यांनी बसमधे व चालताना त्यांच्या बरोबर असणं किती गरजेचे असते हे दोन इन्सीडन्स मधून लक्षात आले.याचा उल्लेख व पुढील वर्षीसाठी घ्यावयाची काळजी नमूद करणे गरजेचे वाटले.
---संजय देशपांडे
वाचुन पुन्हा एकदा वारीचा आनंद घेतला!
ReplyDeleteवारीचे वर्णन खूप छान व सविस्तर केले आहे. तसेच समर्पक फोटोंचा अंतर्भाव केल्याने त्यात जिवंतपणा आला आहे.
ReplyDeleteबिंदू फारच सुंदर वर्णन केले आहे. यावर्षी काही अपरिहार्य कारणांमुळे मला आणि मिसेस ला वारीमध्ये सहभाग घेता आला नाही. फार चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. पण तु इतके अप्रतिम लिहिले आहे आणि प्रासंगिक छान फोटो टाकलेत त्यामुळे वारीत सामील झाल्यासारखे वाटले. फारच छान!
ReplyDeleteTujhya likhana babat amhi kay bolave ?
ReplyDeletePan utkrusth ayojak ani sarva madalini
Anand upabhogalyache varnan. Mast,keep it up.
पुढच्या वर्षी नक्की येणार
ReplyDeleteमी दरवर्षी वारीत सहभागी असतो. हया वर्षी अमेरिका आणि कॅनडात असल्यामुळे माझी वारी चुकली, श्री भुरेनी वारीचे नियोजनापासुन समाप्तीपर्यंत वृतांत ग्रुपवर टाकला त्यामुळे वारीत सहभाग झाल्याचा अनुभव आला.फारच छान.
ReplyDeleteखूप छान माऊली. असाच योग नेहमी येत राहो. पांडुरंग पांडुरंग
ReplyDeleteबिंदू, तू बॉब वारीचं उत्कृष्ठ वर्णन केलं आहेस. फोटो सुद्धा छान आहेत. मी प्रत्यक्ष तिथे आहे असं वाटलं 👍👍👍🙏🙏🙏.
ReplyDeleteभूषण
श्री.बिंदुदादा खुप सुंदर निरुपण, श्री. रामकृष्ण हरी
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय,ज्यांनी प्रत्यक्ष वारीत सामील झाले ते पुन्हा एकदा,आणि जे येऊ शकले नाहीत तेसुध्दा, वारीला जाऊन आले!!!👌👌
ReplyDeleteAtishay sundar likhan kel aahe. Vachata vachata karach aapan swata sahabhagi zalyacha bhas hot hota.
ReplyDelete