Wednesday, December 6, 2017

हिरा आणि गारगोटी

हिरा आणि गारगोटी

गेल्या काही दिवसात गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध चॅनल्सवर अनेक नेते, पक्षप्रवक्ते वेगवेगळ्या चर्चासत्रात, मुलाखतीत व वादविवादात दिसून आले. अगदी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहापण मुलाखतीत दिसले. लोकसभेत भाषण करतांना चुकीची माफी मागणारे, चुकीचे ट्विट केल्याबद्दल माफी मागणारे, गुजरात  निवडणुक प्रचारात बेरोजगारांची प्रत्येक सभेत वेगळी आकडेवारी देणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी अशा मुलाखतीत, चर्चासत्रात कधी कधी दिसतायत त्याची मी वाट पहातोय.

कारण थेट वादविवादात, लाइव्ह मुलाखतीतच कळून येइल कि त्यांच्या चुकांचे प्रमाण कमी झालय कि काॅपी करतांना त्यांच्या अजूनही चुका होतायत ते. परदेशात विद्यार्थी वर्गासमोर त्यांनी दिलेली मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे, ती बघावी. त्यात दिलेली उत्तरे पहाता नीट तयारी व्हावी म्हणून प्रश्नांची यादी आधीच त्यांना दिली असावी असे वाटते कारण जे विद्यार्थी थेट प्रश्न विचारु इच्छित होते त्यांना मनाई केली गेली. (कारण अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आला तर बिंग फुटण्याची भिती)

जर अशा लाइव्ह वादविवादात, मुलाखतीत ते सामील झाले तर सपोर्ट सिस्टमशिवाय त्यांच्या किती चुका होतात हे कळेल अन्यथा चुकीबद्दल त्यांनी मागितलेली माफी ही ट्विटर हॅन्डलर किंवा त्यांच्या सल्लागारांच्या चुकांची आहे हे सिद्ध होईल ! काँग्रेसजनांनी त्यांना कितीवेळा संभाळून घ्यायचे व त्यांच्या प्रगल्भतेला, बुद्धिमत्तेला किती काळ झाकून ठेवायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी जनता हे सगळ अवलोकन करुन आपले मत बनवत असते, मुल्यांकन करत असते हे विसरता कामा नये.

गुजरातमधे हार्दिक, अल्पेश व जिग्नेश यांना स्वबळावर आंदोलनाद्वारे काही करण्यावर स्वाभाविक मर्यादा असल्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार घेतला (दुसरा पर्यायही नव्हताच) तर राहूल यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसलाही अशा रेडिमेड आंदोलनकारी प्लॅटफॉर्मची गरज होती. या एकत्रिकरणामुळे भाजपा राजवटीविरोधात (तसेच अॅन्टी एन्कंबन्सी या घटकामुळे) आव्हान निर्माण झाल्याचा आभास होतोय व परिणामतः काँग्रेसचा परफाॅरमन्स किंचित सुधारला असे वाटेलही पण यातून गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?

या प्रश्नाचे उत्तर सुजाण जनता पुनः भाजपाला कौल देऊन देतील असे वाटते कारण या एकत्रिकरणाचा पाया विकास नसून भाजपविरोध हा आहे आणि प्रत्येक घटकाच्या भाजपविरोधाचे कारण वेगळ असून त्यात परस्परविरोधही आहे. विकास ही निरंतर सुरुच रहाणारी प्रक्रिया असून या एकत्रिकरणात या विकासप्रक्रियेच्या प्रतिबिंबाचा तसेच तरुणाईच्या असंतोषावरील उपाययोजनांचा अभाव दिसतो आहे.

म्हणूनच काँग्रेस आज तरी गुजरात निवडणुकीकडे राहूल गांधीना नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी निकराचा प्रयत्न करण्याची प्रयोगशाळा म्हणून पहात आहे असे वाटते. या प्रयोगशाळेत हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांनी तापविलेल्या वातावरणाची तयार पार्श्वभूमि आहे व म्हणून यशाचा अंधूकसा कवडसा दिसतो आहे. अर्थात, या प्रयोगात खरा कस पक्षाचा लागणार आहे कारण त्यांना त्यांच्या नेत्याला सिद्ध करायच आहे. 

हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गुजरात राज्याच्या निवडणुक-मंथनात ज्याला पैलू पाडायचा काँग्रेसजन व पक्ष कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत तो "अनमोल हिरा" म्हणून उदयास येईल कि "गारगोटीच" राहील हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात, अपयश आल्यास काँग्रेसजनांनी सवयीच्या अनुभवातून राहुलची कवचकुंडले म्हणून सोइस्करपणे त्याचा ठपका अल्पेश, जिग्नेश व हार्दिक यांच्यावर टाकण्याचा पर्याय खुला ठेवलेला असेल व यश आल्यास राज्याभिषेक ठरलेला आहेच !

बिंदुमाधव भुरे.

Monday, December 4, 2017

शट डाऊन अॅन्ड रिस्टार्ट

शट डाऊन अॅन्ड रिस्टार्ट

दुपारी ४.३० ची वेळ असेल, ढगाळलेला आसमंत, कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल अस वातावरण ! चहा व त्यासोबत गरमागरम कांदा भजी असा बेत आणि गप्पांचा फड रंगला होता. "मनसोक्त खिदळणे" नावाचा एक ठेवणीतला दागिना आज प्रत्येकाने आपल्या तिजोरीतून जणू बाहेर काढला होता. मलाच काय जमलेल्या प्रत्येकाला एकमेकांना अस खिदळतांना पाहिल्यावर हा प्रश्न पडला असणार "खरच आपण इतक मनमोकळ, दिलखुलास व मनसोक्त हसू शकतो ?" आमच्या १५-२० जणांच्या ग्रुपमधे २-३ सबग्रुप होते. मित्र सगळेच असतात पण त्यांच्यातही मैत्री काही जणांबरोबर खास असते. अगदी न ठरवता सगळे तशा ग्रुपने एकत्र बसलो होतो.

सोशल मिडियाच्या माध्यमातून सदैव "कनेक्टेड" रहाण हे आजकाल काही विशेष नाही, आमचा शाळेतल्या मित्रांचा हा ग्रुप असाच हरदम कनेक्टेड. वाढदिवस, नविन फ्लॅट, कार खरेदी, मुलांच अगदी नातवंडांचही यशापयश, कौतुक व याबरोबरच कौटुंबिक समस्यांचाही उहापोह हा ग्रुपवर ठरलेला. प्रत्यक्ष भेटी मात्र क्वचितच ! पण आज जवळजवळ पाच वर्षांच्या गॅपनंतर आम्ही १५-२० जण प्रत्यक्ष भेटलो होतो. पुण्यापासून जवळ दीड तासाच्या अंतरावर एका रेस्ट हाऊसमधे ! वेलकम हाय-टी, जेवण, एक रात्रीचा मुक्काम सकाळी चहा ब्रेकफास्ट करुन निघायच असा कार्यक्रम !  भरपूर गप्पा, जुन्या आठवणी खुप काहीस शेयरिंग ... खुप एक्साइटेड होतो सगळेजण !

अजय म्हणजे अज्या, याच तोंड एकदा सुटल कि हा गडी नाॅनस्टाॅप असतो .... लाईक अ लाफ्टर मशिन. प्रदीप म्हणजे पद्या, त्याच्या तोडीस तोड ! फरक एवढाच कि पद्याने तोंड उघडले कि बरेच जण कानात बोट घालून मराठीतील त्याच्या उच्च रचना असलेले व शब्दकोशात समाविष्ट करण्याची पात्रता नसलेले दुर्मिळ शब्द ऐकण्याचे टाळत असत. हे कानात बोट घालणारे दोस्त जरा वेगळ्या कॅटेगरीतले, अगदी शाळेत असल्यापासून यांच्या तोंडातून आयला किंवा तत्सम शब्दांच क्वचित् उच्चारण असायच. चुकून असले शब्द बाहेर आलेच तर जीभेवरच्या सरस्वतीची माफी मागत दोन्ही गालांवर हात उलट सुलट ठेवत नमस्कार करणार.

सुनिल म्हणजे सुन्या, माझ्या जरा जास्त जवळचा. त्याची सद्यस्थिती गेली काही वर्ष  मी अगदी जवळून पहात होतो, कायम तणावाखाली, चिंताग्रस्त ! पण आज त्याच्या खिदळण्याकडे मी अविश्वासाने पहात होतो कारण गेल्या ४-५ वर्षात त्याला इतक मोकळ, तणावमुक्त कधीच पाहिल नाही. घरात अंथरुणाला खिळलेली आजारी आई व त्यासाठी सतत होणारा खर्च, मुलीच्या लग्नाच जमत नव्हते, मुलगा इंजिनियर झाला पण अजून नोकरीचा पत्ता नव्हता आणि ४ महिन्यांनी स्वतःची रिटायरमेंट होती. दैव परीक्षा घेत असते हे ऐकल, पाहिल आणि बऱ्याचदा अनुभवलही होते. पण परीक्षेतले सगळे पेपर अवघड असणे हे सुनीलच्याच नशीबात का ? या पार्श्वभूमिवर आज त्याच हास्य विनोदात हे अस दिलखुलास हसणे व मनापासून सहभागी होणे म्हणूनच मला कोड्यात टाकून गेल.

परवा काम्प्युटरवर बसलो असतांना अचानक मशिन रुसले, कोणतच बटण, माऊस आॅपरेट होत नव्हते. लेख चांगला जमून आला होता पण तो सेव्ह होईल की सगळ परत पहिल्यापासून करावे लागेल ? काम्प्युटरची अाख्खी हार्ड डिस्क क्रॅश तर नाही ना होणार.... ? मनापासून आवडणारी, जीवापाड जपलेली  एखादी कॅसेट टेपरेकाॅर्डरमधे अडकली तर ..... ? सगळी कॅसेट खराब होईल कि एखादी गाण ? असा विचार मनाला स्पर्श करुन जाताच मनात उलघाल सुरु होते. गेली काही वर्ष सुन्याच्या मनातली उलघाल या प्रकारची असेल का ? मुलीच लग्न कधी जमेल ? आईची सुटका कधी होईल ? मुलाला बरी का होईना एखादी नोकरी कधी लागेल ? या सगळ्या प्रेशरमुळे, मानसिक ताण असह्य होऊन सुन्या हार्ड डिस्क सारखा क्रॅश तर नाही ना होणार ? बापरे .... नको ते अन् नसते विचार डोक्यात गर्दी करत होते अन् तो मनसोक्त खिदळत होता.

कपाटाला कप्पे असतात तसे मनाला असले असते तर किती बर झाल असत नाही ! सगळ्या चिंता एकेका कप्प्यात बंद करुन ठेवायच्या व आयुष्यात समोर दिसणाऱ्या आनंदाला कवेत घेऊन कपाटातल्या कप्प्यात बंद केलेल्या दुःखाला वाकूल्या दाखवायच्या. असल एखाद असंख्य कप्पे असलेल कपाट सुन्याला गवसल तर नसेल ? आज हा इतका बिनधास्त आणि टेंशन फ्री खिदळतोय कसा ? आत्ताचा लिहितोय तो लेख गेला तरी चालेल, परत लिहू पण हार्ड डिस्कचा सगळा डेटा वाचावा अशी मनोमन देवाला प्रार्थना करत मी कंट्रोल आल्ट डिलिट ही तिन्ही बटण एकदम दाबली अन् काॅम्प्युटर रिस्टार्ट केला.

माझा पीसी पुनः सुरु झाला. लेख सेव्ह झाला होता. हुश्श करत त्यावर मी पुनः एकदा नजर टाकली आणि शेवट करतांना खूप चांगली ट्विस्ट सुचली. मनोमन खुष झालो होतो. आयुष्यात असंख्य प्राॅब्लेम्सला आपण तोंड देत असतो. हे प्राॅब्लेम्स मग एक दिवस आपल्याला घेरतात आणि विचारांची गती मंदावत जाऊन एका भल्या मोठ्या प्रश्नचिन्हात आपण अडकून बसतो ...... अगदी लेख लिहितांना पीसी हँग झाला तस ! कंट्रोल आल्ट डिलिट बटण दाबायच किंवा सरळ शट डाऊन करुन रिस्टार्ट करायच हाच एकमेव मार्ग !

त्याने प्राॅब्लेम संपतील अस नाही पण त्याला नव्याने सामोरे जाण्यासाठी एक वेगळी उमेद येते. थोडी गॅप घेऊन जेव्हा त्याच प्राॅब्लेमकडे पहातो तेव्हा सोल्यूशन सापडते. पीसी हँग झाल्यावर हतबल होऊन बसून राहिले तर मार्ग निघत नसतो. सुन्याच खिदळण पाहून मी ठरवल होत कि सुन्याला गाठायच आणि विचारायच ......
लेका, शट डाऊन रिस्टार्ट केलस कि कंट्रोल आल्ट डिलिट ? कि अनेक कप्प्यांच कपाट सापडलय ? तो काय सांगेल याची उत्सुकता आहेच पण हँग झालेला काँम्प्युटरही आयुष्यातील प्राॅब्लेमकडे बघायचा नवा दृष्टिकोण देतो हे मात्र नक्की !

सुन्याने मला गदगद हलवल अन मी भानावर आलो. "शेवटचा एक एक तुकडा आहे कांदाभजीचा, संपव " म्हणाला. मी हसत प्लेटमधला तुकडा उचलून तोंडात टाकला.

बिंदुमाधव भुरे, पुणे.