Tuesday, July 18, 2023

प्रबळ प्रादेशिक पक्ष - वर्चस्वासाठी लढाई

कोणाला पटो अगर न पटो पण मी २०१४ नंतर पासून एक मत मांडत आलो आहे कि एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष प्रबळ बनून राहू शकत नाहीत. राष्ट्रवादीला शिवसेनेला बाजूला सारल्याशिवाय ही स्पेस मिळणार नव्हती. आणि त्यासाठी भाजप पासून सेना विभक्त होणे (करणे) गरजेचे होते. २०१४ ला भाजपला एकतर्फी पाठिंबा देणे ही त्यासाठी राष्ट्रवादीची एक धूर्त चाल‌ होती. परिणामी शिवसेना नाके मुरडत का होईना तेव्हा सत्तेत सहभागी झाली.  मात्र २०१४-१९ या काळात सेना सत्तेत राहूनही विरोधात असल्यासारखे वागत राहिली. 

सेनेची दुखरी नस बरोबर हेरुन २०१९ ला राष्ट्रवादीने त्यांना भाजप पासून पूर्ण दूर केले. मुख्यमंत्री पद देऊन त्यांची पक्ष संघटनाही कमकुवत केली. शिवसेना दुभंगणे  हा त्याचा एक स्वाभाविक परिणाम होता. मग आपल्या कूटनीतीचे पुढचे पाऊल टाकताना  राष्ट्रवादी नुकतीच सत्तेत सहभागी झाली. मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटला असे म्हणण्याचे धाडस आजही अनेक समीक्षक करायला धजावत / तयार नाहीत. 

कालांतराने पूर्ण राष्ट्रवादी सत्तेत आणि शिवसेना (कदाचित १६ आमदारांचे निमित्त) बाहेर हे चित्र भविष्यात दिसू शकते. २०१४ ला योजिल्यानुसार एकमेव प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आता स्पेस व्यापू पहात आहे. यासाठी आणि येथून पुढे अजितदादा यांचे "आक्रमक नेतृत्व" हे कार्ड हुशारीने खेळले जात आहे. पवारांच्या राजकीय प्रेमात पडलेल्या संजयने उबाठाच्या नेतृत्वाला  धृतराष्ट्र बनवले आहे कारण राष्ट्रवादीचे प्रत्येक पाऊल हे उबाठाची प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली राजकीय स्पेस आक्रसून टाकत आहे. 

दोन्ही पक्षांच्या विभाजित घटकांना आपल्या चूका शोधणे किंवा आत्ममंथन करण्यापेक्षा भाजपला दूषणे देणे सोईचे आहे व ते पक्ष हे काम चोख पार पाडत आहेत. गंमत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना टोकाचे शिव्याशाप देणे टाळत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. मिंधे सरकार, खोके सरकार, घटनाबाह्य सरकार आणि आपल्याच लोकांना शिव्याशाप देणे हे उबाठा मंडळींनी गेले वर्षभर सुरु ठेवलय त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील "विसंवादातील (धूर्त) संवाद माधुर्य" उठून दिसते आहे. 

शिवसेनेला मागे टाकून राष्ट्रवादी प्रबळ आणि एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे येईल का ? कि उबाठा पुन्हा एकसंध शिवसेना म्हणून गतवैभव पुन्हा मिळवेल ? वगैरे प्रश्नांची उत्तरे नजिकचा भविष्य काळ देईल. तोपर्यंत राजकारणाच्या या चिखलात कोणता पक्ष वेगळी काही भूमिका घेतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

©श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे