Wednesday, April 20, 2022

भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?

"भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे" ? असा एक प्रश्न विचारणारी गृहिणी खूप वर्षांपूर्वी घरच्या छोट्या पडद्यावर यायची. ती जाहिरात आठवते ना ? मग लगेच वीज कडाडत एक कपडे धुवायचा साबण पडद्यावर दिसायचा आणि एक डायलाॅग .. ये है सुपर रिनका कमाल ! वगैरे ..

पण ही खरी कमाल स्पर्धेचे चटके बसायला लागल्याची होती.‌ नाहीतर पूर्वी घरी बनवलेली वाॅशिंग पावडर, दगडी साबण अस काहीही खपायच. पण प्रत्येकाला आपल्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी झाली कि असुरक्षितता जाणवायला लागते. मग असल्या क्लृप्त्या लढवून आपला ग्राहक जनाधार टिकवायचे प्रयत्न सुरु होतात.

विहिंपच्या राम जन्मभूमी आंदोलनापासून हिंदू समाज एकवटू लागला. या आंदोलनातील एका टप्प्यात बाबरी ढाचा कोसळला. "हे कृत्य जर माझ्या शिवसैनिकांनी केल असेल तर मला त्याच्या अभिमान आहे" असे तेव्हा बाळासाहेब ठाकरे उद्गारले होते. या घटनेनंतर शिवसेनेने आपल्या मराठी बाण्यावर चाणाक्षपणे हिंदुत्वाची झूल ओढून घेतली अन् "हिंदूह्रदयसम्राट" शब्दाचा उदय झाला. पेशवाईत "ध चा मा" सोईस्करपणे झाला होता. तसे बाळासाहेबांच्या वाक्यातील "जर" शब्द सोईस्करपणे कालांतराने गळून पडला आणि आम्हीच तो ढाचा पाडला अशी टिमकी वाजवणे सुरु राहिले ते कायमचेच. 

या आंदोलनात विहिंपने, संघ परिवाराने तमाम हिंदूंना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला. "भेदभाव विरहित हिंदू एकता" हे एक सातत्याने चालणारे कार्य आहे आणि या कार्याची मुहूर्तमेढ १९२५ साली रोवली गेली होती. या कार्याच्या वाटचालीतील रामजन्मभूमी आंदोलन हा केवळ एक टप्पा होता. बाबरी पतनाची घटना ही हिंदू समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाची आणि सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली तुष्टीकरणाच्या राजनितीच्या निषेधाची उमटलेली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र या घटनेचे श्रेय एका रात्रीत घेण्याचा प्रयत्न झाला. आणि आजही पक्षीय घसरता आलेख सावरण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा, हिंदुत्व, अयोध्या या पालुपदाचा वापर सोइने चालू आहे.  

हिंदुत्वाच्या समान धाग्याने भाजप सेना युती २५ वर्षे टिकली. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. कारण त्यामागे होते त्यांचे कार्य, कर्तृत्व, रोखठोकपणा, निर्णयक्षमता, धाक, दरारा ! आणि या कमावलेल्या वश्याची पुण्याई वारसाहक्काने पुढील पिढीला मिळाली. मात्र अशी पुण्याई कायमस्वरूपी उपयोगी पडत नसते. 

भाजपला वाजपेयी,आडवाणी यांच्या नावाचा वापर फार काळ करावा लागला नाही. पक्षबांधणी आणि कार्यकर्ते जोडणीच्या आधारावर त्यांनी पक्षविस्तार केला, यश संपादन केले. सेनेच्या वारसदारांना नेमकं हेच जमल नाही. मात्र तरीही पूर्वपुण्याईवर मिळणारा आदर, मानमरातब आजही कायम रहावा ही अपेक्षा ते बाळगून होते. बाळासाहेबांनाही या नेतृत्वाची ही अकार्यक्षमता जाणवली असावी. अन्यथा शिवतीर्थावर त्यांच्या शेवटच्या दसरा मेळाव्यात "माझ्या उद्धव, आदित्यला संभाळून घ्या" अशी आर्जवे करायची वेळ आली नसती.

भाजप सेना युती तुटली, दुभंगली तरी हिंदुत्व कुणाचे यावरुन कधी रण पेटले नव्हते. परंतु, सेना नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला तसे त्यांच्या कट्टर हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. जी सेना आयुष्यभर (?) हिंदुत्वासाठी लढली आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला प्राणपणाने विरोध केला त्यांच्याच वळचणीला भाजपशी फाटल म्हणून जाऊन बसावे हे न पटणारे होते. गेल्या दोन अडीच वर्षांत सेनेच्या हिंदुत्वातील भगवा रंग फिका पडत चाललाय ही धारणा जनमानसात रुजायला लागली होती. सेना जरी तोंडाने प्रखर आणि जहाल हिंदुत्वाची भाषा बोलत असली तरी कृती मात्र सर्वधर्मसमभावाकडे झुकणारी जाणवत होती. संगतीचा परिणाम कि अपरिहार्यता ? 

सेनेच्या पायाखालून हिंदुत्वाची जमिन सरकत चालली हे चाणाक्ष मनसे प्रमुख न ओळखते तरच नवल ! गेल्या एक दशकचा वनवास संपवून नव्याने प्रस्थापित होण्यासाठी यापेक्षा मोठी संधी पुन्हा चालून येणार नाही हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी "राजपटलावर" आपल्या फासे टाकले. पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदुत्वाकडे इंजिनाची दिशा वळवली. रामनवमीला अंगावर भगवा परिधान केला. मशिदींवरील भोंगे आणि त्यावर होणारी अजान हा विषय घेऊन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आणि शिवसेना या फेकलेल्या फास्यात अलगद अडकली, घेरली गेली. बाकी दोन्ही काँग्रेसला हिंदुत्वाशी कधीच घेणेदेणे नव्हते. पण गंमत म्हणजे आज त्यांच्या पक्षातील भलेभले भगवा लपेटून हनुमान चालीसा गुणगुणतायत. 

मुंबईतील सभा, पुण्यातील कार्यक्रम आणि आता लक्ष्य आहे औरंगाबाद ! मुंबई सोडल्यावर सेनेची दुसरी आणि सगळ्यात जुनी कर्मभूमी म्हणजे औरंगाबाद ! सेनेची हिंदुत्वाची जागा मनसे व्यापू पहातय. "भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?" मनसेमुळे आपल हिंदुत्व झाकोळतय ही अस्वस्थता सेनेच्या देहबोलीतून डोकवायला लागली. आणि आम्ही कसे कट्टर आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटू लागलाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पुरस्कृत सर्वधर्मसमभावाने सेनेचा एक हात धरलाय आणि दुसऱ्या हातातल असलेल हिंदुत्व मनसे ओरबाडतय. 

पत्रकार परिषदेत राज ठाकरे अयोध्या भेटीची जूनमधील तारीख जाहीर करतात. आणि सेनेच्या गोटात खळबळ माजते. सेनेचा अयोध्या दौरा मे महिन्यात ठरवायची मातोश्रीवर खलबते सुरु होतात. "भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?"' आमच हिंदुत्व अस्सल आणि इतरांचे नकली हे कंठशोष करुन सांगताना पुन्हा बाळासाहेबांचे स्मरण ! गोवा, युपी निवडणुकीत अपयशी मुद्रा उमटविल्यावर आता अयोध्या भेट ..  आदित्य ठाकरेंना नेता म्हणून रुजविण्याची ही केविलवाणी धडपड काय संकेत देते ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा शेवटचा हुकूमी पत्ता आहे कि त्यांची अगतिकता आणि असमर्थता ? 

सेना मनसेतील कोणाची "कमीज अधिक सफेद" हे यथावकाश कळेलच.  दरम्यान, मनसेने फेकलेल्या भोंगा, हिंदुत्व या जाळ्यात न अडकण्याची आणि त्याच वेळी सेनेला नाराज न करण्याची कसरत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमेल कि पुन्हा "जाणता चाणक्य पाॅवरगेम" करतील ? आपण महाराष्ट्राच्या प्रगतीवर टाळ्या वाजवाव्यात, वीज कपात झाली तर मेणबत्त्या लावाव्यात आणि मविआ चा नायक सगळी सुत्रे हातात घेऊन विकासाचा वारु कधी चौफेर उधळून लावेल याची आतुरतेने वाट बघावी. मात्र असा धुरळा उडालाच तर ... "अपनी कमीज मैली होनेसे बचाके रखना"

© बिंदुमाधव भुरे, पुणे

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

मला आठवतय एकदा दिल्लीला संघटनेचे अधिवेशन होते आणि मग आमच्या सगळ्यांच्या मुखी एकच नारा होता "चलो दिल्ली" ! या अधिवेशनाच्या निमित्ताने मग अनेक जुन्या सहकाऱ्यांना भेटायची, गप्पा मारायची संधी मिळायची. त्यामुळे असे अधिवेशन म्हणजे एक पर्वणीच असायची ! 

गेल्या महिन्यात इंदौरहून सौ ज्योतीचा फोन आला आणि प्रणवच्या लग्नाचे आग्रही निमंत्रण ! तेव्हाच ठरवून टाकल .. "चलो इंदौर" ! गेली दोन अडीच वर्ष कोरोनाने सगळ्यांना बंधनात जखडून ठेवले होते. नुकतेच सगळी बंधने हटली होती. त्यामुळे हा लग्नसोहळा म्हणजे सगळ्यांना खूप वर्षांनंतर भेटायची, गप्पा मारायची एक पर्वणीच होती. अनेक नातेवाईक कित्येक वर्षांनी एकत्र येणार होते. सगळेचजण एकमेकांना फोन करुन "इंदौरला भेटुन हं" असे बजावत होते आणि मग बघता बघता पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडे "चलो इंदौर" वातावरण बनून गेल. 


इंदौरला आमचे आगमन जरा उशीराच झाले होते. त्यामुळे आम्ही थेट रिसेप्शन कार्यक्रमाला पोहोचलो. उन्हाचा चटका मावळून हवेत आल्हाददायक थंडावा आला होता.‌ लाॅनमधील दिव्यांच्या झगमगाटात पायाखाली असलेली हिरवळ म्हणजे निसर्गाने अंथरलेला गालिचाच जणू ! वातावरणात संगीताचे सूर निनादत होते. भव्य स्टेज नवपरिणीत दांपत्याच्या प्रतिक्षेत होते. लाॅनच्या कडेने आणि मध्यभागी खाण्यापिण्याचे बुफे स्टाॅल्स सजले होते. माझ्या काही मित्रांनी "इंदौरला गेलात कि खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. खाण्याच्या पदार्थांची विविधता नाविन्य आणि चविष्टता जगात कुठेही अनुभवायला मिळणार नाही" असे छातीठोकपणे सांगितले होते. पण त्यांचा दावा फोल ठरावा इतकी खाद्यपदार्थांची रेलचेल आणि चंगळ इथे उपलब्ध होती. एका पोटात एकवेळ असंख्य गुपिते मावतील पण इतके खाद्यपदार्थ मावणे केवळ अशक्य ! 


पाहुणे मंडळींच्या आगमनापासून ते परतीपर्यंत सगळ्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था होती. लग्नकार्य होणार असलेले ठिकाण आणि निवास यादरम्यान जाण्या-येण्यासाठी कारसेवा जय्यत तयार होती. दुसरे दिवशी संपूर्ण कार्यक्रम हा एसी हाॅलमधे तर सकाळच्या न्याहारी पासून ते भोजन व सायंकाळचे चहापान यासाठी या हाॅललगतच एक भव्य मांडव सज्जता होती. मोठमोठे डेझर्ट कूलर्स बाहेरच्या तापमानाची आठवणही होऊ देत नव्हते. आदल्या दिवशीप्रमाणेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केटरिंग सज्ज होते. हा इंदौरी पाहुणचार केवळ अविस्मरणीय ! 


या कार्याच्या तयारीसाठी अनेक हातांनी मदत केली असणार आणि ही तयारी अनेक दिवसांपासून सुरु असणार हे लक्षात येत होत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी त्याचे पूजन करतो. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हा विश्वास आपल्या मनात असतो. दोनही दिवस हा आशीर्वाद श्री. अरविंदकाका आणि श्री भैय्याजी या दोन ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांच्या उपस्थितीने आम्हा सकल जनांना लाभला. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. 

हा संपूर्ण सोहळा अखंड स्मरणात राहील इतका नीटनेटका आणि देखणा झाला. त्याच्या आयोजनाचे शिल्पकार श्री उदय, सौ ज्योती, श्री तुषार, सौ. स्वाती तसेच श्री शिरिष यांचे मनापासून अभिनंदन ! सौ. सुवर्णाची भेट होऊ न शकल्याची रुखरुख मात्र सगळ्यांना लागली. या निमित्ताने अनेक जुन्या नातेवाईकांच्या नव्याने ओळखी झाल्या हे ही खरच ! परतल्यानंतर आठवले तसे आणि सुचले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अनावधानाने कोणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व ! पुनः एकदा समस्त भौरस्कर आणि जोशी परिवाराला मनापासून धन्यवाद ! 

सौ शुभदा आणि श्री बिंदुमाधव भुरे, पुणे