Showing posts with label मुक्तछंद. Show all posts
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts

Friday, September 8, 2023

माझ्या मनातली शाळा

माझ्या मनातली शाळा 

दिनांक ६ सप्टेंबर २०२३, आमच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हाॅटस् अप गृपवर आले आणि ....
मागोमाग मिलिंद एकबोटेचा फोन आला ! "पुण्यात आहेस ना ?" 
मी "हो" म्हटले. 
"कार्यक्रमाला ये, वाट बघतोय" ! 
मी "बssर, ठीक आहे, येतो" म्हणालो खर .. पण मनात थोडी चलबिचल झाली होती. 

हा पुरस्कार आमचे आवडते व्ही. एस्. देशपांडे सर यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने दिला जाणार होता अन् तोही आमच्याच वर्गातला आमचा सवंगडी डॉ जगदीश हिरेमठ याच्या हस्ते ! त्याच्या आवाजात व्हीएसडींच्या आठवणी ऐकण्यासाठी मनातून आतूर होतो.   या निमित्ताने अनेक मित्र पुन्हा भेटणार होते. "जुमानजी" सिनेमा आठवला  ... सोंगटी फिरवली आणि ५० वर्ष मागे गेलो. त्याच वास्तूत आज पुन्हा विशू, मिल्या, जाड्या, पम्या वगैरे गॅंग भेटणार होती. .. पण सिनियर सिटीझन म्हणून ! 

शाळा सोडल्यानंतर अनेक मित्र शाळेत किमान एकदा तरी जाऊन आले असणार पण त्या दिवशी मी मात्र बरोबर ५० वर्षे आणि ३ महिन्या नंतर शाळेत आलो होतो. खर म्हणजे १९९६ ते २००२ या काळात मी शाळेसमोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेत होतो. पण शाळेत जायचा धीर कधी झालाच नाही. कारण ....

शाळेची वास्तू, आपले दरवर्षीचे वर्ग, मुख्याध्यापकांचे ऑफिस, शाळेच्या मागच्या गेटमधून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारे स्वच्छतागृह (त्यावेळी आपण मुतारी म्हणायचो), त्यामागे खडक आणि नंतर विस्तीर्ण असे क्रीडांगण, त्यालगत असलेली व्यायामशाळा वगैरे .... हे चित्र मन:पटलावरुन कधीच पुसले जाऊ नये असे मनोमन वाटायचे. त्यामुळे पाच सहा वर्षे समोर शाळा असूनही रस्ता ओलांडायचा धीर कधी झाला नाही. मनातल्या त्या चित्रावर अकारण रेघोट्या ओढल्या तर स्मृतीपटलावर असलेल्या मूळ चित्राला धक्का लागेल ही भिती मनात असायची. 

पण माझ हे वाटण फक्त शाळेपुरतेच मर्यादित होत का ? तर नाही. हा माझ्या स्वभावाचा एक भाग होता. शाळेत असताना कसबा पेठेत ज्या वाड्यात आम्ही रहात होतो तेथे नंतर अनेकदा गेलो पण आणखी एक जिना चढून रहात असणारे रहाते घर पहाण्याचा धीर कधी झाला नाही. त्या वास्तूत असलेल्या अनंत आठवणींना शब्द फुटले तर त्या आठवणींबरोबर संवाद कसा साधायचा या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसायचे. 

१९७७ ला मी चाळीसगाव येथे बॅंकेत रुजू झालो. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या वडिलांच्या घरात भाडेकरु म्हणून राहिलो. नंतर बरोबर २५ वर्षांनी एका लग्नासाठी जाण्याचा योग आला. आपण आयुष्याची वाटचाल जिथून सुरु केली त्या घराला भेट देऊ म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल या विचाराने वेळात वेळ काढून मी त्या घराला भेट द्यायला गेलो खर मात्र त्या घराची अवस्था पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आज भानुविलास समोर काही क्षण उभे राहिलो की काहीसे तसेच होते.

तेव्हापासून मनाची ही ठेवण झाली असावी. पण मिलिंद एकबोटेचा आग्रही फोन आणि अनेक मित्र भेटतील म्हणून शाळेत येण्याचे धाडस केले. मागील गेटने स्कूटर आता आणली. वाॅचमन काहीतरी बोलत होता मला. शब्द कानावर पडत होते पण माझ लक्ष नव्हत, मी नुसते बर म्हणालो. मला मागे खडक दिसल्याचा भास होत होता. ...... 

खडकावर खडूने स्टंप कोरले होते आणि क्रिकेट सुरु होते तर पुढे ग्राऊंडवर काही मुले फुटबॉल खेळत होती तर अलिकडे काही मुले बास्केटबॉल प्रॅक्टिस करत होती. वाॅचमन पाठ वळवून केव्हाच निघून गेला होता आणि स्वागतासाठी उभ्या शिक्षिकेने अत्तर लावण्यासाठी हात पुढे केला. यंत्रवत अत्तर दुसऱ्या मनगटावर घासले. अत्तराचा मंद सुवास सुखावून गेला. शाळेच्या पॅसेजमधून चालत काही वर्ग मागे टाकले आणि कार्यक्रमाच्या हाॅलमधे प्रवेश केला. 

कार्यक्रम सुरु झाला होता. पाहुण्यांची ओळख, प्रास्ताविक, सत्कार, शाल, नारळ, गुच्छ वगैरे सोपस्कार पार पडले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले. अनेक जण व्हीएसडींच्या स्मृतींना उजाळा देत होते. व्हीएसडींची कन्या बोलायला उभी राहिली. तोच तोंडावळा, काळ्या कडांची तशीच चष्म्याची फ्रेम ! कुठूनतरी अचानक व्हीएसडी येतील आणि एखाद्या इंग्रजी चित्रपटाची गोष्ट सांगायला सुरुवात करतील असे क्षणभर वाटून गेल. 

एव्हाना हृदयातील व्हीएसडींच्या आठवणींच्या कप्प्याचे दार सताड उघडले गेले होते. आणि डॉ जगदीशने माईकचा ताबा घेतला. गुरु शिष्य परंपरेत आम्हाला ठाऊक असलेला तो सर्वोत्तम शिष्य ! एव्हाना आम्हीच इतके भावूक झालो होतो तिथे त्यांची मनःस्थिती काय झाली असेल ? मेरा नाम जोकर मधे जाने कहा गए वो दिन गातांनाचा राजकपूर आठवतो. काळा गॉगल लावूनही त्याचे अश्रू स्पष्ट दिसायचे. डॉक्टर व्हीएसडींवर बोलता बोलता मध्येच थबकायचा, आवंढा गिळायला ... तेव्हा माझ्या नकळत एखादा अश्रू मनाचा आदेश धुडकावत बाहेर यायचा. कुणी पाहिल असत तर .... ? "अरे, ये आसू आज बाहर कैसे आ गए" राजेश खन्नाचा अमरप्रेम मधल वाक्य आठवून गेल. 

पसायदान डोळे मिटून ऐकल. बाहेर पडल्यावर काही क्षण मित्रांबरोबर घालवले. जातांना डॉक्टरला म्हटले एकदा साठलेल्या अश्रूंना मनसोक्त आणि मुक्त वाहून देण्यासाठी अशा आठवणी घेऊन कधीतरी सगळे मित्र भेटूया. पाहूया तो दिवस कधी येतो ते ! मी इकडे तिकडे न बघता स्कूटर सरळ गेट बाहेर काढली. आजही माझी शाळा माझ्या मनात होती तशीच आहे.

बिंदुमाधव भुरे. 

Friday, July 1, 2022

आम्ही वारकरी

बॅन्केतील निवृत्त मंडळींचा आमचा एक गट नित्य नियमाने वारीचा एक टप्पा काही वर्षे भक्तीभावाने करतो आहोत. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनमुळे वारी बंद होती.‌ प्रतिकात्मक म्हणून आम्ही काही मोजकी मंडळी वारी मार्गावर काही पावले चालून परत येत होतो. यावर्षी माऊली कृपेने सगळी बंधने दूर झाली आणि आमचा उत्साह दुणावला. दरवर्षी १५ ते २० दरम्यान असणारी संख्या यावर्षी २६ झाली. 

तर असे हे "स्पेशल २६" वारकरी शनिवारी दि २५ जूनला सकाळी ६ वाजता नळ स्टाॅप चौकात जमायला सुरुवात झाली. सगळ्यांनी पांढरा झब्बा, डोक्यावर पांढरी टोपी असा वेष तर काहींच्या हातात टाळ दिसून येत होता. भाली टिळा लावण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच बसचे आगमन झाले आणि आम्ही विठू माउलीचा जयघोष करत सासवड मार्गे जेजुरीला रवाना झालो. सासवडला पालखीचा मुक्काम होता, मनी विठ्ठलाचा भाव होता, त्यामुळे सगळ्यांनी भक्तीभावाने दुरुनच पालखीचे दर्शन घेतले. 

यावेळी जेजुरी ते वाल्हे असा टप्पा आयोजकांनी ठरवला होता. जेजुरीला उतरलो आणि वारीमार्गावर पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती आली. जणू एका अदृश्य लहरीच्या स्पर्शाने मनात खोलवर दडलेला भक्तीभाव अलगद, तरंगत वर मन:पटलावर यावा असे काहीसे वाटून गेले‌ आणि आम्ही वारकरी बनून गेलो. 

वारकऱ्यांसोबत पाय चालत होते, मुख विठ्ठल नाम घेत होते त्यामुळे थकवा जाणवला नाही. वारी मार्गाची धूळ आपल्या चरणांना लागते आहे ही भावना एक वेगळीच उर्जा, चैतन्य शरीरात निर्माण करते, एक वेगळे समाधान मनाला लाभते याचा पुनरानुभव आला, अन्य वेळी आपण सलग इतकी पायपीट करुच शकत नाही, खरय ना ? 

शरीरात असलेल्या मनात खोलवर दडलेला विठ्ठलाचा भक्तीभाव आपल्याला एक दिवसाचा वारकरी बनवतो आणि पुढच्या वारीची ओढ मनात रुजवतो. वारीत सहभागी होताना आपल्या मनात भक्तीभाव तर असतोच, पण त्याचबरोबरीने आपल्या मनात एका छोट्या सहलीचा उद्देशही असतो. जुन्या सहकाऱ्यांसोबत दिवसभराच्या सहवासाची ओढ आणि गत काळातील आठवणींना मिळणारा उजाळा यांचे आकर्षणही असते पण मनात भाव मात्र विठ्ठल भक्तीचाच असतो. 

नामाचे महत्त्व विषद करतांना जसे गोंदवलेकर महाराज सांगतात कि भोजनाचा स्वाद प्रत्येक घासा गणिक कौतुक करत घेणे काय किंवा भोजन पोट भरण्यासाठी करणे काय शेवटी ते योग्य स्थळी पोहोचून आपले काम करत असते. त्यामुळे मनात अन्य कोणत्याही विचारांची गर्दी असली तरी मुखी सदैव राम नाम घेत रहावे. कालांतराने मन स्थिरावेल आणि जीवन राममय होईल. तद्वत वारीत सहभागी होणे महत्त्वाचे !

हे उदाहरण आमच्या वारीलाही तंतोतंत लागू होईल. त्यामुळे याच उत्साहात पुढील वर्षी वारीत सामील होतांना वारी अधिक भक्तिमय करण्याचा प्रयत्न करुया, माऊली चरणी लीन होऊया. दरवर्षी वारीचे यशस्वी आयोजन करणारे वारकरी, वारी भक्तीमय करणारे गायक वारकरी आणि अन्य सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण हीच ओढ दरवर्षी या वारीकडे मला आकर्षित करत असते. यावर्षी माझा मुक्काम मुंबईत असूनही केवळ वारीसाठी एक दिवस मला यावेसे वाटणे आणि वारी घडविणे ही विठू माउलीचीच कृपा ! 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩

©बिंदुमाधव भुरे, पुणे

Wednesday, April 20, 2022

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

मला आठवतय एकदा दिल्लीला संघटनेचे अधिवेशन होते आणि मग आमच्या सगळ्यांच्या मुखी एकच नारा होता "चलो दिल्ली" ! या अधिवेशनाच्या निमित्ताने मग अनेक जुन्या सहकाऱ्यांना भेटायची, गप्पा मारायची संधी मिळायची. त्यामुळे असे अधिवेशन म्हणजे एक पर्वणीच असायची ! 

गेल्या महिन्यात इंदौरहून सौ ज्योतीचा फोन आला आणि प्रणवच्या लग्नाचे आग्रही निमंत्रण ! तेव्हाच ठरवून टाकल .. "चलो इंदौर" ! गेली दोन अडीच वर्ष कोरोनाने सगळ्यांना बंधनात जखडून ठेवले होते. नुकतेच सगळी बंधने हटली होती. त्यामुळे हा लग्नसोहळा म्हणजे सगळ्यांना खूप वर्षांनंतर भेटायची, गप्पा मारायची एक पर्वणीच होती. अनेक नातेवाईक कित्येक वर्षांनी एकत्र येणार होते. सगळेचजण एकमेकांना फोन करुन "इंदौरला भेटुन हं" असे बजावत होते आणि मग बघता बघता पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडे "चलो इंदौर" वातावरण बनून गेल. 


इंदौरला आमचे आगमन जरा उशीराच झाले होते. त्यामुळे आम्ही थेट रिसेप्शन कार्यक्रमाला पोहोचलो. उन्हाचा चटका मावळून हवेत आल्हाददायक थंडावा आला होता.‌ लाॅनमधील दिव्यांच्या झगमगाटात पायाखाली असलेली हिरवळ म्हणजे निसर्गाने अंथरलेला गालिचाच जणू ! वातावरणात संगीताचे सूर निनादत होते. भव्य स्टेज नवपरिणीत दांपत्याच्या प्रतिक्षेत होते. लाॅनच्या कडेने आणि मध्यभागी खाण्यापिण्याचे बुफे स्टाॅल्स सजले होते. माझ्या काही मित्रांनी "इंदौरला गेलात कि खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. खाण्याच्या पदार्थांची विविधता नाविन्य आणि चविष्टता जगात कुठेही अनुभवायला मिळणार नाही" असे छातीठोकपणे सांगितले होते. पण त्यांचा दावा फोल ठरावा इतकी खाद्यपदार्थांची रेलचेल आणि चंगळ इथे उपलब्ध होती. एका पोटात एकवेळ असंख्य गुपिते मावतील पण इतके खाद्यपदार्थ मावणे केवळ अशक्य ! 


पाहुणे मंडळींच्या आगमनापासून ते परतीपर्यंत सगळ्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था होती. लग्नकार्य होणार असलेले ठिकाण आणि निवास यादरम्यान जाण्या-येण्यासाठी कारसेवा जय्यत तयार होती. दुसरे दिवशी संपूर्ण कार्यक्रम हा एसी हाॅलमधे तर सकाळच्या न्याहारी पासून ते भोजन व सायंकाळचे चहापान यासाठी या हाॅललगतच एक भव्य मांडव सज्जता होती. मोठमोठे डेझर्ट कूलर्स बाहेरच्या तापमानाची आठवणही होऊ देत नव्हते. आदल्या दिवशीप्रमाणेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केटरिंग सज्ज होते. हा इंदौरी पाहुणचार केवळ अविस्मरणीय ! 


या कार्याच्या तयारीसाठी अनेक हातांनी मदत केली असणार आणि ही तयारी अनेक दिवसांपासून सुरु असणार हे लक्षात येत होत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी त्याचे पूजन करतो. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हा विश्वास आपल्या मनात असतो. दोनही दिवस हा आशीर्वाद श्री. अरविंदकाका आणि श्री भैय्याजी या दोन ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांच्या उपस्थितीने आम्हा सकल जनांना लाभला. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. 

हा संपूर्ण सोहळा अखंड स्मरणात राहील इतका नीटनेटका आणि देखणा झाला. त्याच्या आयोजनाचे शिल्पकार श्री उदय, सौ ज्योती, श्री तुषार, सौ. स्वाती तसेच श्री शिरिष यांचे मनापासून अभिनंदन ! सौ. सुवर्णाची भेट होऊ न शकल्याची रुखरुख मात्र सगळ्यांना लागली. या निमित्ताने अनेक जुन्या नातेवाईकांच्या नव्याने ओळखी झाल्या हे ही खरच ! परतल्यानंतर आठवले तसे आणि सुचले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अनावधानाने कोणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व ! पुनः एकदा समस्त भौरस्कर आणि जोशी परिवाराला मनापासून धन्यवाद ! 

सौ शुभदा आणि श्री बिंदुमाधव भुरे, पुणे