Friday, July 1, 2022

आम्ही वारकरी

बॅन्केतील निवृत्त मंडळींचा आमचा एक गट नित्य नियमाने वारीचा एक टप्पा काही वर्षे भक्तीभावाने करतो आहोत. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनमुळे वारी बंद होती.‌ प्रतिकात्मक म्हणून आम्ही काही मोजकी मंडळी वारी मार्गावर काही पावले चालून परत येत होतो. यावर्षी माऊली कृपेने सगळी बंधने दूर झाली आणि आमचा उत्साह दुणावला. दरवर्षी १५ ते २० दरम्यान असणारी संख्या यावर्षी २६ झाली. 

तर असे हे "स्पेशल २६" वारकरी शनिवारी दि २५ जूनला सकाळी ६ वाजता नळ स्टाॅप चौकात जमायला सुरुवात झाली. सगळ्यांनी पांढरा झब्बा, डोक्यावर पांढरी टोपी असा वेष तर काहींच्या हातात टाळ दिसून येत होता. भाली टिळा लावण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच बसचे आगमन झाले आणि आम्ही विठू माउलीचा जयघोष करत सासवड मार्गे जेजुरीला रवाना झालो. सासवडला पालखीचा मुक्काम होता, मनी विठ्ठलाचा भाव होता, त्यामुळे सगळ्यांनी भक्तीभावाने दुरुनच पालखीचे दर्शन घेतले. 

यावेळी जेजुरी ते वाल्हे असा टप्पा आयोजकांनी ठरवला होता. जेजुरीला उतरलो आणि वारीमार्गावर पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती आली. जणू एका अदृश्य लहरीच्या स्पर्शाने मनात खोलवर दडलेला भक्तीभाव अलगद, तरंगत वर मन:पटलावर यावा असे काहीसे वाटून गेले‌ आणि आम्ही वारकरी बनून गेलो. 

वारकऱ्यांसोबत पाय चालत होते, मुख विठ्ठल नाम घेत होते त्यामुळे थकवा जाणवला नाही. वारी मार्गाची धूळ आपल्या चरणांना लागते आहे ही भावना एक वेगळीच उर्जा, चैतन्य शरीरात निर्माण करते, एक वेगळे समाधान मनाला लाभते याचा पुनरानुभव आला, अन्य वेळी आपण सलग इतकी पायपीट करुच शकत नाही, खरय ना ? 

शरीरात असलेल्या मनात खोलवर दडलेला विठ्ठलाचा भक्तीभाव आपल्याला एक दिवसाचा वारकरी बनवतो आणि पुढच्या वारीची ओढ मनात रुजवतो. वारीत सहभागी होताना आपल्या मनात भक्तीभाव तर असतोच, पण त्याचबरोबरीने आपल्या मनात एका छोट्या सहलीचा उद्देशही असतो. जुन्या सहकाऱ्यांसोबत दिवसभराच्या सहवासाची ओढ आणि गत काळातील आठवणींना मिळणारा उजाळा यांचे आकर्षणही असते पण मनात भाव मात्र विठ्ठल भक्तीचाच असतो. 

नामाचे महत्त्व विषद करतांना जसे गोंदवलेकर महाराज सांगतात कि भोजनाचा स्वाद प्रत्येक घासा गणिक कौतुक करत घेणे काय किंवा भोजन पोट भरण्यासाठी करणे काय शेवटी ते योग्य स्थळी पोहोचून आपले काम करत असते. त्यामुळे मनात अन्य कोणत्याही विचारांची गर्दी असली तरी मुखी सदैव राम नाम घेत रहावे. कालांतराने मन स्थिरावेल आणि जीवन राममय होईल. तद्वत वारीत सहभागी होणे महत्त्वाचे !

हे उदाहरण आमच्या वारीलाही तंतोतंत लागू होईल. त्यामुळे याच उत्साहात पुढील वर्षी वारीत सामील होतांना वारी अधिक भक्तिमय करण्याचा प्रयत्न करुया, माऊली चरणी लीन होऊया. दरवर्षी वारीचे यशस्वी आयोजन करणारे वारकरी, वारी भक्तीमय करणारे गायक वारकरी आणि अन्य सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण हीच ओढ दरवर्षी या वारीकडे मला आकर्षित करत असते. यावर्षी माझा मुक्काम मुंबईत असूनही केवळ वारीसाठी एक दिवस मला यावेसे वाटणे आणि वारी घडविणे ही विठू माउलीचीच कृपा ! 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩

©बिंदुमाधव भुरे, पुणे

19 comments:

  1. किती वर्षे जातोस रे ? मस्तच - - पालखी बरोबर किंवा पालखीच्या मागे पुढे जाणे ह्याचा आनंद वेगळाच असतो - - keep it up जो पर्यंत शरीर साथ देत आहे तो पर्यंत आपोआप होणारच - - पांडुरंग हरी - - - -
    मी एकदाच स्वामींच्या पालखी बरोबर सोलापूर ते अक्कलकोट गेलो होतो - -

    ReplyDelete
  2. जुन्या सहकाऱ्यांच्या संगतीत आणि विठ्ठलाच्या स्मरणात केलेली वारी नक्कीच अविस्मरणीय!
    छान वर्णन आणि फोटो.
    अभिनंदन!

    ReplyDelete
  3. विठ्ठल विठ्ठल जय पांडुरंग!🚩🚩🚩

    ReplyDelete
  4. वा छान उपक्रम. श्री पांडुरंग हरी.

    ReplyDelete
  5. या वेळेस च्या वारी में पेंशनर्स मित्रानी जाब्ता संख्येने उपस्थिति नोंदवली व वारी चा मामले विठ्ठलाचा भक्ति भाव टेंशन मनसोक्त आनंद घेतला,पुढील वारी साठी आगाज शुभेच्छा

    ReplyDelete
  6. 👌 ..ज्ञानेश्वर माऊली .. ग्यानबा तुकाराम 🙏🏻👏👏

    ReplyDelete
  7. विठ्ठल करुन घेणारा आहे. आपण फक्त कर्ता आहोत.अशीच तुमच्याकडून सेवा व्हावी.सर्वांना हा योग नसतो.श्रद्धा असु द्यावी. पांडुरंग पांडुरंग

    ReplyDelete
  8. खूप सुंदर!
    यावर्षी परदेशी बाबू झाल्याने,वारी चुकली याचे दुःख वाटते!बघू पुढच्या वर्षी विठू राया बोलावतोय का?

    ReplyDelete
  9. राम क्रृष्ण हरी!
    आम्ही पुणे सासवड केले.

    ReplyDelete
  10. खूप छान ओघवते लेखन नेहमीच्या ख़ुमासदार शैलीत केले आहेस. सरळ सोपी भाषा.. सहजता हां तुझा स्थायीभाव ईथेही सहज उतरतो.. बारीक निरीक्षणाचे कंगोरे आहेतच.. सुरेख! असच उत्तमोत्तम घटनाचें साक्षीदार होण्याचीं संधी आपल्या सर्वांना मिळत राहो.. लेखनही घड़त राहो… सर्वांवर कृपा बरसत राहो🙏
    छान रे! शुभेच्छा!
    दिलीप घाटे

    ReplyDelete
  11. नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर शब्दांकन 👌

    ReplyDelete
  12. अजय नवरे

    ReplyDelete
  13. शब्दांकन उत्तम ! वर्णन वाचून प्रत्यक्ष वारीचा आनंद घेता आला .आपले लेखन नेहमीच मुद्देसूद असते व त्या ओघात बरेच संदर्भ व्यवस्थित येतात !

    ReplyDelete
  14. अशोक जोशी

    ReplyDelete
  15. अतिशय सुरेख अनुभव कथन.... प्रत्यक्षात वारीत सहभागी असल्याची अनुभुती.....

    ReplyDelete
  16. करोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला पण त्यानंतर यंदा वारी करतांना आनंद द्विगुणित झाला असेलच. हा अनुभव छान शब्दबध्द केला आहेस.

    ReplyDelete
  17. व्वा !!! सुरेख वर्णन केलेस. वारीत सहभागी होण्याची ईच्छा असून येऊ शकलो नाही, पण तुझा लेख वाचून तुझ्या बरोबर मीही ती अनुभूती घेऊ शकलो. हारामध्ये अनेक रंगी फुले गुंफली की तो अधिकच सुंदर दिसतो तदवत फोटो मुळे हा लेख अधिकच खुलला आहे. ही शब्द माला त्या पांडुरंगाला अर्पण. पांडुरंग.पांडुरंग.

    ReplyDelete