Monday, March 20, 2023

नियती

नियती

 दैव, नशिब, नियती या सगळ्या गोष्टी मानण्यावर असल्या तरी भारतात बहुसंख्य जनता याला मानते. कोणी नवस बोलतो आणि फेडायला विसरतो, कोणी वचन देतो आणि पाळत नाही, कोणी दिलेला शब्द फिरवतो. अन् मग जेव्हा काही विपरित घडते तेव्हा हे भगवान, अरे देवा, ओह गाॅड किंवा या अल्ला यांचा पुकारा होतो आणि पहाणारा सहानुभूती दाखवत दैव, नशिब, नियती वगैरेंवर सगळे सोपवून मोकळा होतो. बुद्धीवंतांची श्रद्धा, अंधश्रद्धा यावर चर्चासत्र झडतात. कलियुगात असच घडायच म्हणे ! करावे तसे भरावे ही म्हण त्यामुळेच आली असावी का ?

आपल्या खाजगी जीवनात एखाद्याने आयुष्यभर जोपासलेली तत्वप्रणाली, केलेला निर्धार म्हणजे त्याची कठोर तपस्या ! त्या मार्गाने आपल्या मुलांनीही मार्गक्रमण करावे हा काही नियम नाही मात्र अपेक्षा असू शकते. मुले त्याचे आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळी असतात. त्यांचे आदर्श, त्यांची जीवनमूल्ये वेगळी असण्यात चूक काहीच नाही. आणि या वाटचालीत ती आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकतात. "हा" अमूक अमूक यांचा मुलगा बर का ! किंवा ते अमूक अमूक "याचे" वडिल बर का ! ... समाजात आपली कशी ओळख निर्माण करायची हे तुमचे कतृत्व ठरवत असते. मात्र राजकीय जीवनातील गणिते वेगळी असतात. 

"आयुष्यात काॅंग्रेस सोबत कधीही जाणार नाही अन् तशीच वेळ आली तर हे दुकान बंद करेन." हा बाळासाहेबांनी व्यक्त केलेला निर्धार होता. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी शिवसेनेसाठी आखलेली ती तात्विक चौकट होती कारण काॅंग्रेसचा भोंदू सर्वधर्मसमभाव त्यांच्या हिंदुत्वाला कधीच मान्य नव्हता. पक्षाची सुत्रे मुलाकडे आली. आता याचे पालन मुलाने करायला हवे कारण बाळासाहेबांचा निर्धार ही काही खाजगी बाब नव्हती तर ती त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षासाठी आखलेली लक्ष्मणरेषा होती. कायद्याच्या भाषेत शिवसेना पक्षासाठी घालून दिलेली अलिखित घटनात्मक चौकट म्हणूया. 

आता वडिलांनी केलेला हा पण, निर्धार जगजाहीर होता मात्र मुलाने वडिलांना दिलेले वचन गुप्त होते, बंद खोलीतले होते.... "एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेन." वडिलांच्या पश्चात त्यांना दिलेल्या या वचनाचा उल्लेख सार्वजनिक व्हायला ६ वर्षे का लागली ? वडिलांनी केलेला ठाम निर्धार पायदळी तुडवून त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करणे याला काय म्हणावे ? मी खूप खूप श्रीमंत होईन असे वचन दिले आणि ते पाळायला गैरमार्गाचा अवलंब केला तर त्या वचनपूर्तीची किंमत ती काय ! हिंदुत्वाला न मानणारे, सावरकरांचा अपमान करणारे, पालघर साधू हत्याकांडात सत्ता असूनही तोंड न उघडणारे काॅंग्रेसजन बाळासाहेबांना जवळचे वाटले असते का ? आणि पवार जरी खास मित्र असले तरी ते त्यांच्यासाठी राजकीय शत्रूच होते हे बाळासाहेबांनी उघडपणे आणि जाहीरपणे सांगितले होते. 

पण राजकारणी मंडळींना सिलेक्टिव्ह मेमरीचे वरदान लाभलेले असते. सत्तेपुढे त्यांना मतलबाचे लक्षात रहाते आणि गैरसोयीचे आठवत नसते. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती केली आणि २५ वर्षे ती टिकली. याच युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली म्हणताना आपण बाळासाहेबांना चूक ठरवत असतो.‌ आणि दोन पाऊले पुढे टाकून बाळासाहेबांनी कठोर निर्भर्त्सना केलेल्या दोन्ही काँग्रेसशी आघाडी करत असतो तेव्हा वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या आणि त्यांनी आखलेल्या ध्येयधोरणांची चौकट आपण उध्वस्त करत असतो, पक्षाची तत्वे पायदळी तुडवत असतो. बाळासाहेबांचे विचार आणि भुमिका नको पण त्यांचे नावाचा वापर पुरेपूर हवा अशा प्रकारचे चित्र यातून उभे रहाते. "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी अशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते."

मविआ स्थापन होणे ही शिवसेनेची वैचारिक चौकट खिळखिळी होण्याची सुरुवात होती. भाजपशी मतभेद विकोपाला जात असतांनाही राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची चाल खेळली आणि २०१४ ला सेना निमूटपणे भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" हे राष्ट्रवादी ओळखून होती. शिवसेनेची दुखरी नस त्यांनी बरोबर हेरली होती आणि आज बाळासाहेब नाहीत याचा फायदा घेत २०१९ च्या निकालानंतर फासे टाकले गेले. त्यात शिवसेनेचे नेतृत्व अडकले. सत्तातूर सल्लागार मंडळी भरीस टाकणारी होतीच. मविआ स्थापन झाली. शिवसेनेच्या वैचारिक चौकटीला हादरे बसण्याची ती सुरुवात होती. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही जबाबदाऱ्या पेलणे अशक्य होईल आणि पक्षाकडे ठाकरेंचे दुर्लक्ष होईल हा चाणक्याचा कयास अचूक ठरला. पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री बनवून घटनात्मक चौकटीत बंदिस्त करुन टाकले आणि पक्षसंघटनेपासून त्याची जणू नाळच तोडून टाकली.  

२०२२ ला पक्षाकडे सत्ता आणि मुख्यमंत्री पद असूनही चाळीस आमदार बाहेर पडले. राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतोय हे या मंडळींचे म्हणणे होते. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" या तत्वावर राष्ट्रवादीचे काम सुरु होते. बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर चार हात लांब ठेवले त्यांचीच संगत अखेर भोवली. मतभेद होण्यासाठी मतांची देवाणघेवाण व्हावी लागते. पण तो रस्ता सेना नेतृत्वाने बंद ठेवला होता. आजकाल राजकारणात पक्षात विरोधी किंवा वेगळे मत मांडणाऱ्यांना पक्षात वाळीत टाकले जाते किंवा पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून निलंबित करण्यात येते. पक्षांतर्गत लोकशाही हा केवळ शब्दप्रयोग उरला आहे. 

घटस्फोट हा एका दिवसात होत नाही तर ती दीर्घ काळ चालणाऱ्या मतभेदांची परिणती असते. विसंवाद हा संवाद असेल तरच होतो पण येथे संवादाचाच अभाव असल्यामुळे पक्षात मतभेदांना चालना मिळत राहिली. आणि बघताबघता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असूनही चाळीस मंडळींनी वेगळी भूमिका घेतली. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या याच चाळीस मंडळींना गद्दार म्हणून हिणवले जात आहे. यातील अनेकांनी तर आयुष्याची तीस चाळीस वर्षे पक्ष वाढवण्यासाठी खर्ची घातली आहेत. बाळासाहेबांकडे माणसे जोडण्याची हातोटी विलक्षण होती. ती जादू हरपली, तत्व विसरली आणि पक्षाची दैना झाली. हा नियतीचा खेळ आहे का ? 

ठाकरे कंपूची सारी मदार आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आहे. सोळा आमदार अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे यात कोर्ट हस्तक्षेप करत नाही. ही पक्ष फूट नाही तर आम्हीच खरा पक्ष आहोत याचा हा वाद आहे. खरी शिवसेना कोणाची हे पण कोर्ट ठरवत नाही कारण तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा ? चिन्ह कोणाला ? यावर निर्णय देताच "त्यांनी शेण खाल्ले" असा उन्मत्त शेरा दिला गेला. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचा पक्षपाती वापर केला असा एक दावा सुनावणी दरम्यान केला गेला आहे.‌ कारण बहुमत सिद्ध करायला सांगितले नसते तर ही वेळ आली नसती अशी वकिलांनी बाजू मांडली. पण हे म्हणणे पश्चात बुद्धी आहे. उठसूट कोर्टाचे दार ठोठावणारांनी राज्यपालांच्या या निर्णयाला लगेचच कोर्टात आव्हान का दिले नाही ? उलटपक्षी आमदारांना अपात्र ठरविण्याची चालून आलेली नामी संधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकरली आणि स्वतःच्या हातानेच सगळा खेळ खल्लास का केला ? अशी बुद्धी होणे हा पण नियतीचा खेळ म्हणायचा का ? 

सत्याची बाजू नेहमीच वरचढ ठरते आणि न्यायाचे पारडे त्या बाजूलाच झुकते. नियतीच्या मनात काय असेल ? शिवसेनाप्रमुखांची भुमिका आणि हिंदुत्वाचा विचार यांच्याशी प्रतारणा हे पतनाकडे नेणारे ठरतय का ? या प्रश्नाचे उत्तर आज तरी होकारार्थी आहे. सिब्बल प्रभृतींनी दोन दिवस किल्ला जबरदस्त लढवला. मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरवणे शक्य नसते. त्यामुळेच कि काय त्यांच्या मुद्द्यांमध्ये कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त भर भावनिक आवाहनावर होता.‌ हरिष साळवे प्रभृतींनी मोजकाच युक्तीवाद केला पण तो परिणामकारक होता. सुनावणी दरम्यान जजनी काही प्रश्न विचारणे याचा अर्थ खुलासा घेणे असा होतो. पण त्यावरुन केसचा निकालाचा अंदाज बांधणे अवघड असते. नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येणे कठीण आहे. पण आज तरी हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागेल असे वाटते असे धाडसाने म्हणावे लागेल कारण "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते" हे सूत्र आहे आणि नियतीचा नियम तसाच लागू होतो.

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी उर्वरित गट पुन्हा एकदा अपिलात जाईल अर्थात तशी निकालात तरतूद असेल तरच ! पण जनहितासाठी हा पक्ष वाचविण्याचा लढा आहे वैयक्तिक अहंकाराचा नाही हे पक्षप्रमुखांनी लक्षात घेऊन चार पावले माघार घेत खेळी केल्यास पक्षाचे भवितव्य पुन्हा उजळून निघेल कारण परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यावर मात करण्याची नियती नेहमीच एक संधी देत असते. ती ओळखण्याची दृष्टी देव्हाऱ्यातील पूजेचा धनुष्य बाण देईल कि पुन्हा एकदा खुषमस्करे डाव साधतील ? नियतीच्या मनात काय असेल ? 
(सदर लेखातील मते ही व्यक्तिगत आहेत. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही)

© बिंदुमाधव भुरे, पुणे.‌
२० मार्च २०२३


No comments:

Post a Comment