महाराष्ट्रातील २९
पालिका, महानगरपालिका
निवडणूकांचा धुरळा येत्या १५ जानेवारीला उडणार असला तरी सगळ्यांना खरी उत्सुकता
मुंबईत काय होणार हीच आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मुंबई वगळता उर्वरित
महाराष्ट्रात जनतेला काय वाटतय हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसून
आलय आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू यांनी मुंबई मनपा मधील सत्ता अबाधित
राखण्यासाठी पाच महिन्यांच्या मनोमिलन प्रवासाची सांगता म्हणून जाहीर केलेली
युती !
वीस वर्षांपूर्वी विभक्त झालेले हे बंधू ज्या मुद्द्यांवर एकत्र "आले" (एकत्र "झाले" म्हणणे धाडसाचे वाटतय) आहेत ते मुद्दे म्हणजे मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या "वर्चस्वाला" बसत असलेले धक्के अन् आता त्यांच्या "अस्तित्वाला" पोहोचत असलेली बाधा, त्यांचा होणारा अपमान त्याचप्रमाणे मराठी माणसांचे प्रश्न आssणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र या दर पाच वर्षांनी नित्य नियमाने उगवणाऱ्या मुद्द्याला (काॅंग्रेस संगतीचा परिणाम म्हणून झालेल्या इन्फेक्शनमुळे) आता दिलेली अदानीच्या फोडणीची जोड !
या वरकरणी एकच
वाटणाऱ्या पण अनेक पदर असणाऱ्या मुद्द्यांना एकत्रित करुन त्याला उफाळलेल्या
बंधूप्रेमातून विकसित झालेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे एक भावनिक वेष्टण गुंडाळत हे
पॅकेज आकर्षक करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून या दोन्ही बंधूंचे प्रयत्न
सुरु आहेत. सरासरी १८% वरुन खाली घसरलेली वोट बँक म्हणजे आख्खा महाराष्ट्र अशा
समजुतीने वावरणाऱ्या संजय राऊतांना तसेच येताजाता हे "भाऊ-बंधन" नाट्य वारंवार उगाळणाऱ्या मिडियाला या नविन पॅकेजिंगमुळे "ठाकरे ब्रॅंड" पुन्हा प्रस्थापित झाल्याचा साक्षात्कार झालाय.
गेल्या पाच महिन्यात जमिनीवरील कार्यकर्त्यांमध्ये असणारा दुरावा कमी करणे आणि त्यांचेही मनोमिलन व्हावे म्हणून बहुतेक स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील असावेत. मात्र जनमानसावर आजकाल ज्या सोशल मिडियाचा प्रभाव आहे तेथे फक्त कौटुंबिक मनोमिलनाच्या बातम्या एखाद्या सोहळ्यासमान नटवून रंगवून दाखवल्या जात होत्या. कोण कोणाच्या घरी किती वेळा गेले या बातम्या दाखवण्यामागे एकेकाळी "आमच्यातील भांडणे" कशी होती हे जनतेने आता विसरावे हा उद्देश असावा. भळभळणाऱ्या जखमांवर यथावकाश खपली धरते आणि काही दिवसांनी राहतात ते केवळ व्रण ! पण जणू काहीच झाल नाही, ऑल इज वेल अस दाखवण्यासाठी मग त्या व्रणांवर एखादे क्रीम लावून ते झाकण्याचा प्रयत्न केला तर तो फक्त पहाणाऱ्याची फसगत करण्याचा प्रयत्न असतो आणि स्वतःसाठी आत्मवंचना !
यांच्या एकत्र
येण्यामुळे एखादी जादूची कांडी फिरवावी तसा मराठी माणूस आणि भाषा यांना सन्मान
प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुंबईकरांत निर्माण करण्याचा प्रयत्न
केविलवाणा वाटतोय .... उंचावरुन खोल
पाण्यात उडी मारल्यावर माणूस ज्या वेगाने खूप खोल पाण्यात अगदी तळाशी जातो
त्यापेक्षा दुप्पट वेगाने तो उसळी घेऊन पुन्हा पृष्ठभागावर येतो. तद्वत हा
"बंधू-मिलाप" अशीच किमया घडवून आणणार अशी चित्रे या बंधूप्रेमी
मंडळींकडून माध्यमात रंगवली जात आहेत. पण खरंच असं होईल ? वास्तव काय
आहे ? सोळा तारखेला काय होईल
?
निमित्त झाले हिंदी भाषा सक्तीचे आणि त्याला राज ठाकरे यांनी त्यांच्या आजवरच्या वाटचालीला पूरक वाटेल अशीच भूमिका घेतली. त्याला नेहमीप्रमाणेच चांगली प्रसिद्धी मिळाली आणि मग तिकडे भाऊरायाला हाच मराठी मुद्दा आपल्या घसरत्या प्रतिमेला सावरेल, पुन्हा हात देईल अशी आशा वाटायला लागली. पण... संपलेल्या पक्षाशी कशी काय बुवा जवळीक साधायची ? लोक काय म्हणतील ? आणि मग नियतीने आणखी एक संधी प्रदान केली. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उच्चारलेले ते वाक्य ! "आमच्यातील भांडणापेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे." आता हा महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी छोटा होता का ? आणि आत्ता (अदानींमुळे) मोठ्ठा झाला का ? असे बालिश प्रश्न विचारायचे नसतात.
यानंतर उद्धव ठाकरे
सातत्याने जाहीरपणे म्हणत रहातात कि "आम्ही एकत्र आलोय ते एकत्र
रहाण्यासाठी" तर राज ठाकरे एकदा म्हणाले कि *"हिंदी सक्ती किंबहुना
मराठी या मुद्द्यावर आम्ही एकत्र"* आलो आहोत. यादरम्यान जेव्हा जेव्हा हे
बंधू सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा तेव्हा उद्धव यांनीच कायम राजचा हात
हातात घेणे, त्याला आलिंगन देणे
... वगैरे पहायला मिळाले जणू म्हणत असावेत "देर ना हो जाए कही देर ना हो
जाए" आणि प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात हे "जनाब सहारा देने के लिये
बेताब है" असे दिसत असल तरी राज मात्र सदैव सावध पवित्रा घेत आहेत हे
लक्षात येत होते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, अर्ज दाखल करायचे दिवस जवळ आले तरी युतीची अधिकृत घोषणा होत नव्हती. शेवटच्या क्षणी ज्या पत्रकार परिषदेचा मोठा गाजावाजा केला ती चक्क १५ मिनिटांच्या आत संपली आणि त्यात राज ठाकरे यांनी "आम्ही युती केली आहे" हे जाहीर करण्यापलीकडे काहीच भाष्य केले नाही. इतिहासात बसलेले चटके, धक्के मन लवकर विसरायला तयार होत नसाव..
या बंधूंचे हे
"एकत्र येणे" ते "आम्ही युती केली आहे" असे जाहीर करणे या
दरम्यान जो मोठा कालापव्यय झाला तो या बंधूंना दुर्दैवाने बराच महाग पडणार असे
दिसते आहे. "देर लगी आनेमें तुमको" पण हा उशीर पाच महिन्यांचा का पाच
वर्षांचा ? कि एकत्र येणे ही
मराठी माणसाची नविन फसगत ? याचे उत्तर
येणारा काळच देईल. राज ठाकरे यांचे शिवसेनेतून बाहेर पडणे यामागे महाराष्ट्र, मराठी माणूस
यांचे हित रक्षण करणे हे मुद्दे नव्हतेच. बाळासाहेब राजना नाशिक देत होते आणि
त्यांना मुंबई पण हवी होती. शिवसेनेची धुरा पुढे वहाण्याची सुप्त
महत्वाकांक्षाही त्यामागे लपून राहिलेलेली नव्हती.
त्यामुळे मनसे स्थापने
नंतर महाराष्ट्राविषयी किंबहुना मुंबईविषयी या दोघांच्या मनात असलेल्या
विचारांमध्ये, संकल्पनांमध्ये मुलभूत
अंतर आहे हे स्पष्ट होत गेले. बाळासाहेबांनी शिवसेनेची घडी बसवताना मराठी हाच
मुद्दा घेतला होता. आठवा ती घोषणा .. "बजाव पुंगी हटाव लुंगी" .. कायम
बाळासाहेबांची सोबत करणाऱ्या राजनी मनसे स्थापनेपासून मग तोच कित्ता नव्या
स्वरूपात गिरवतांना स्पष्ट भुमिका घेतली कि मुंबईत येणारे परप्रांतीय घोळके यांनी मुंबईचे प्रश्न अधिक वाढवले असून त्यामुळे मराठी माणसांवर अन्याय होतोय.
या भूमिकेत आजही त्यात बदल नाही. परप्रांतीय इथे रोजगारासाठी येतात आणि आपली
मतपेढी तयार करतात हा स्पष्ट आरोप राज ठाकरे यांचा आहे. पण बाळासाहेबांनी
काळानुरूप भुमिका बदलल्या. एखाद्या धुरंधर राजकारण्याप्रमाणे आपला राजकीय
प्रवासात त्यांच्यावर हिंदुहृदयसम्राट या बिरुदावली श्री मोहोर उमटवली गेली.
मात्र राज ठाकरेंचा मात्र हा प्रवास फसला आणि हा हिंदू जननायक रील्स आणि टीकेचा
धनी बनला.
तर उद्धव ठाकरे
यांच्याकडे शिवसेनेची धुरा आल्यानंतर त्यांनी मुंबई मनपाची सत्ता राबवताना
सत्ताकारण आणि अर्थकारण यांचा मेळ घातला. किंबहुना सत्ता हे कमाईचे एक माध्यम आहे
आणि मुंबई मनपा हे त्यांचे एक एटीएम आहे असे मानत त्यांनी कारभार केला. मात्र या
दरम्यान संघटना बांधणी कडे दुर्लक्ष झाले. त्यांचे कारभारी नियमितपणे सोन्याची
अंडी देत होते त्यात समाधान न मानता त्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापायची
इच्छा झाली आणि ते मुख्यमंत्री बनले. संवैधानिक पदावर पक्षप्रमुखाला बसवले कि
एकचालकानुवर्ती असलेला पक्ष खिळखिळा होतो हे शरद पवार या धुर्त आणि अनुभवी
राजकारण्याला ठाऊक असल्यामुळे त्यांनी फेकलेल्या मुख्यमंत्री पदाच्या जाळ्यात
उद्धव ठाकरे अडकले. परिणामी नंतर पक्षाची झालेली वाताहत हा ताजा इतिहास आहे.
असो.. सांगायचा मुद्दा
हा कि राजकारणाकडे बघण्याचा दोन्ही भावांच्या दृष्टीकोनात जमिन आसमानाचा फरक
आहे. युतीत पंचवीस वर्षे सडली म्हणत सत्तेसाठी काॅंग्रेस बरोबर केलेला घरोबा
त्यांच्या सहकाऱ्यांनाच नव्हे तर मतदारांनाही तो रुचलेला नाही हे वास्तव हा माणूस
आजही स्वीकारायला तयार नाही. हिंदुत्वाची आपली व्याख्या भाजपच्या
हिंदुत्वापेक्षा कशी अधिक चांगली हे सांगताना मुस्लिम मतांसाठी करत असलेले
लांगुलचालन हे मतदारांच्या पचनी पडत नाही हे कटू वास्तव उबाठा लक्षात घेत नाही
हे पक्षाचे दुर्दैव !
तर राज ठाकरेंच्या
बाबतीत त्यांच्या इतिहासातील भुमिका त्यांच्या राजकारणातील अन्य पक्षांबरोबर
युतीसाठी बाधा ठरत आहेत. परप्रांतीय, अमराठी या
मुद्द्यांमुळे स्वीकारार्हतेला आलेल्या मर्यादा तोडण्यासाठी हिंदू जननायक म्हणून
प्रतिमा रुजविण्याचा प्रयत्न मात्र कुंभमेळ्या संदर्भात उडवलेली खिल्ली तर एकदा
भाजपला बिनशर्त पाठिंबा देणे मग पुन्हा विरोधी भूमिका घेणे.. यांसारख्या घटनांमुळे
"एक गोंधळलेला" हुषार राजकारणी वक्ता अशी प्रतिमा आज रुजत चालली आहे.
पक्ष स्थापून दोन दशकांचा कालावधी लोटला पण अद्याप सत्तेची द्राक्षे आंबट अशी
अवस्था आहे. कार्यकर्ते आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना किती दिवस स्वप्नात
झुलवत ठेवायचे ?
त्यामुळे एकिकडे
काॅंग्रेस सोबत केलेला घरोबा आता फसलाय आणि हिंदुत्ववादी प्रतिमा गोत्यात आली आहे
तर दुसरीकडे भाजपने परतीचे दोर कापलेले आहेत अशा स्थितीत मुंबई मनपा हातची गेली तर
उपासमारीची वेळ येईल हे नक्की शिवाय उरला सुरला पक्षही गुंडाळला जाण्याची भिती !
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची झालेली आठवण गेम चेंजर ठरेल अशी भाबडी आशा उद्धव
ठाकरे यांना आज आहे. राज ठाकरे यांनाही आपला पक्ष आणि जनाधार टिकविण्यासाठी बाकी
पर्याय बंद झालेले असल्यामुळे पुन्हा एकदा मूळ धारेकडे परतणे योग्य वाटले असावे.
दोघांच्या स्वभावातील कंगोरे लक्षात घेता *कत्रितपणे वाटचाल करण्याची कसरत दोघांनाही यशस्वी करुन दाखवावी लागेल, भविष्यात ती टिकवून ठेवावी लागेल.. भूतकाळातील कटू अनुभव, आठवणी लक्षात घेता हे प्रत्यक्षात येणे स्वप्नवत वाटतय.
श्रीगजानन विजय
ग्रंथातील एका ओवीचे स्मरण होते..
सारखाच मिळे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी ।
विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे ।।
त्यामुळे दोन्ही
भावांनी आपल्या एकत्र येण्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे, मराठी माणूस
आणि मराठी धोक्यात वगैरे घिसेपिटे मुद्दे मांडत मराठी माणसांना, मतदारांना
भावनिक साद घातली आणि आता नाही तर कधीच नाही, तुम्ही संपाल
वगैरे भिती घातली तरी त्याला मतदार भुलेल ? एकवेळ तुम्ही
आज बिबट्यांची भिती घाला लोकांना खरे वाटेल. पण बिबट्यांच्या जमान्यात तुम्ही
डायनासोरची भिती घातलीत तर कोण घाबरेल ? अहो गब्बरलाही
पन्नास वर्षे होऊन गेली. आज मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान या
मुद्द्यालाही पाच दशके उलटली.
या बंधूंचे राजकारणात हे निवडणूका केंद्रीत असते. लाखांच्या सभा भरवून प्रभाव पडेल आणि आपण जिंकू या भ्रमात हे रहातात. सभेला तुफान गर्दी पण मतपेटी रिकामी ! संघटना बांधणी नाही, जनसंपर्क कायम रहावा म्हणून कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम नाही, जिल्हा स्तरावरील पक्षाच्या शाखा कार्यशील नाहीत हे वास्तव या दोन्ही पक्षांचे आहे. निवडणूक बिनविरोध कशी होते हा आक्षेप घेतला जातो पण तिथे द्यायला या पक्षांकडे उमेदवारच नाही ही वस्तुस्थिती हे भाऊ कधी स्वीकारणार ? पायाला भिंगरी लावल्यासारखे एकनाथ शिंदें, अजित पवार, शरद पवार, फडणवीस हे सतत फिरत असतात आणि त्या मेहनतीची फळे त्यांना मिळतात.
या पार्श्वभूमीवर, या दोघा भावांनी "एकत्र आलो आहोत ते एकत्र रहाण्यासाठी" हे येणाऱ्या काळात सकारात्मक राजकारण करत, पक्ष संघटना मजबूत करत दाखविलेत तर लोकांच्या मनात पुन्हा विश्वासाहर्ता निर्माण होईल. राजकारणात भुमिकेत ताठरपणा असून चालत नाही तर लवचिकता दाखवावी लागते कारण त्यामुळेच दाराशी आलेल्या संधीचे सोने करता येते .. हे बाळासाहेबांनी केले पण ही कला टीपकागदा सारखी टिपण्यात हे भाऊ कमी पडले. राजकारणात अहंकार तुमची प्रगतीला खीळ घालतो, माणूस सारासार विवेक हरवून बसतो. या अहंकारापोटीच या भावांना एकत्र यायला वीस वर्षे लागली तर याच अहंकारापोटी आलेल्या संवादाच्या अभावामुळे सोन्यासारखे चाळीस मावळे गमावले.
तुटे वाद
संवाद तेथें करावा,
विविके अहंभाव हा पालटावा ॥
अहंकार हा मोठा दोष
आहे आणि तोच बंधनाचे मूळ कारण असून ऱ्हासाला कारणीभूत ठरतो. आणि जेथे अहंकार
असतो तेथे योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती नष्ट होते.
तेव्हा येत्या सोळा
तारखेला तरी दोन्ही भावांचे प्रयत्न अयशस्वी ठरतील अशी शक्यता दिसते कदाचित एकनाथ शिंदें
या दोन्ही भावांच्या एकत्रित जागांपेक्षा जास्त जागा निवडून आणू शकतील. अर्थात, हल्ली अनेक
विश्लेषक पंडित, माध्यमे यांचे अंदाज, भाकिते यांना
मतदारांनी धोबीपछाड देत खोटे ठरवलय; माझीही गत तीच
झाल्यास नवल वाटणार नाही.
मात्र दोन्ही भावांनी
एकत्र "येण्यापेक्षा" एकत्र "होऊन" अहंकाराचा त्याग केला, राजकारणात
आवश्यक ती लवचिकता आणत पुन्हा गेलेल्या सगळ्या मावळ्यांना परत घेत एक सर्वसमावेशक, हिंदुत्वाची
कास धरणारा, महाराष्ट्र आणि
मराठीचे हितसंवर्धन करणारा पक्ष बांधला तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना समाधान
लाभेल ! हे होईल का ? येणारा काळच हे ठरवेल.
मकरसंक्रांतीच्या
निमित्ताने राजकारणातील, पक्ष-पक्षातील कटूता संपून सौहार्दाचे, सलोख्याचे वातावरण पुन्हा प्रस्थापित व्हावे
यासाठी शुभेच्छा !!
*© श्री.
बिंदुमाधव भुरे, पुणे.*
