Thursday, October 23, 2025

राळेगणसिद्धी भेट

 

राळेगणसिद्धी भेट – एक अविस्मरणीय दिवस

 

१५ सप्टेंबरचा दिवस.. आमचा शालेय मित्र मिलिंद चौगुलेचा फोन आला.. 

"पुण्यात आहेस कि मुंबईत ?" नेहमीप्रमाणे प्रश्न..

"सध्या तरी पुण्यातच आहे" ... मी

पुढचा प्रश्न

"४ ऑक्टोबरला फ्री आहेस का ?"

मिलिंद गुगल्या टाकण्यात पटाईत त्यामुळे प्रश्न आला कि उत्तर देताना काळजीपूर्वक बोलावं लागतं..

मी सावधपणे..

"का रे ? काही कार्यक्रम आहे का ?"

मिलिंद..

"डॉक्टर...  एक दिवसाची राळेगणसिद्धी भेट अरेंज करतोय..बाकी डिटेल्स नंतर सांगतो."

डॉक्टर म्हणजे आपला हृदय मित्र जगदीश हिरेमठ...

चितळे म्हटल कि बाकरवडी... बाटलीबंद पाणी म्हटल कि बिसलरी... तसं राळेगणसिद्धी म्हटलं कि आण्णा हजारेंच नाव डोळ्यांपुढे येतं...

 

आण्णा गेल्या ८-१० वर्षांपासून प्रकाशझोतात नाहीत.. पण नाव‌ घेताच आजही दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलन आठवते.. तिरंगा फडकवत वंदे मातरम् आणि इंकिलाब झिंदाबादच्या घोषणा देणारे आण्णा, वृत्तपत्रे आणि वाहिन्या प्रतिनिधींना आपल्या मराठमोळ्या हिंदीत ठामपणे सामोरे जाणारे आण्णा, प्रचंड उत्साहाचा खळखळता वाहणारा झरा असलेले आण्णा...


मनात हे चित्र तरळले तसं क्षणाचाही विलंब न करता मी हो म्हणून मोकळा झालो. मला ही संधी दवडायची नव्हती कारण आण्णांची भेट होईल, त्यांना निदान पहाता येईल हा विचार एकिकडे जसा मनात होता तसा आणखी एक मॅग्नेटिक फोर्स होता अन् तो म्हणजे एक आख्खा दिवस शाळेतल्या मित्रांसोबत घालवता येणार होता.. आणि त्यातही सामाजिक, वैचारिक, वैद्यकीय आणि अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या असामान्य कामगिरीने, कर्तृत्वाने एक असाधारण "उंची गाठलेला" डॉ जगदीश हिरेमठ हा पूर्ण दिवस आमच्या सोबत असणार होता..

 

४ तारीख उजाडली.. सकाळी ७.४५ .. बस निघायची वेळ.. आम्ही बारा जण होतो.. लकी ट्वेल्व मध्ये मी आहे याचा आनंद वेगळाच होता..‌ अन्यथा कसल्याही लकी ड्रॉ मध्ये कधीच आपला नंबर लागत नसतो हे माझे ठाम मत ! कर्म करा.. फुक्कट काही मिळत नसत..

 

वाटेत ब्रेकफास्ट कुठे ? किती वाजता ? राळेगणसिद्धी जवळ आल्यावर आम्हाला वाटाड्या मार्गदर्शक म्हणून कोणीतरी येणार.....  वगैरे कार्यक्रमाचा तपशील डॉक्टरने बसमध्ये सांगितला.. संपूर्ण दिवसभरात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, काय हव नको याची विचारपूस करणारा आमच्या टीमचा कॅप्टन म्हणा किंवा आमचा माॅनिटर म्हणून मिलिंद आपले काम चोख बजावत होता.‌



ब्रेकफास्टला मिसळ, भेळ, भजी असा जबरदस्त टेस्टी मेनू आपला प्रभाव दाखवत होता.. ब्रेकफास्ट नंतर मंडळी जराशी सुस्तावली होती..


  



एका शाळेच्या आवारात जीप थांबली.. मागोमाग बसही .. वाटाड्या आणि त्याचा चक्रधर सारथी सोबती यांच्याशी परिचय झाला. पानघट हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर पूर्णतया आण्णांच्या कार्याला वाहून घेतलेले आण्णांचे एक निष्ठावान सेवक ! राळेगणसिद्धी मधील आण्णांच्या कार्याची खडानखडा माहिती असलेले, आण्णांची दिनचर्या सांभाळणारे, त्यांना काय हवे नको त्याची इत्यंभूत माहिती असणारे हे पानघट... यांच्या बोलण्यातून आण्णांविषयी असलेला आदर शब्दा शब्दांत जाणवत होता.. माहिती सांगताना मधूनच हसत हसत...




"मी जरा जास्तच बोलतो"  अस म्हणायचे.. आणि हे वाक्य सवयीने पेरलेल असावं असं अगदी या माणसाला पहिल्यांदा ऐकतांनाही कळत होत..

 

मला हा माणूस म्हणजे राम रुपी आण्णांचा हनुमान असल्याचा भास एक क्षण झाला..

 

पानघट यांचेच नातेवाईक म्हणजे चक्रधर सारथी सोबती श्री.‌बाळासाहेब गट ! हे गृहस्थ डॉ जगदीशच्या पाया पडले आणि सांगू लागला कि "माझा हा पुनर्जन्म आहे आणि मृत्यूच्या दारातून मला डॉक्टरने परत आणलय... डॉ हिरेमठ म्हणजे माझ्यासाठी देव आहे.." वगैरे बरेच काही...

 

ऐकताना अंग शहारून गेल.. जगदीशचे हे रुप ऐकून होतो पण आज ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो.. डॉ जगदीशचे असे किती तरी पेशंट असतील पण त्यात असा एखादा भक्त विरळाच ! त्यानेच डॉक्टरला घरी या असे आग्रही निमंत्रण अनेकदा दिले होते आणि मग हा भेटीचा सोहळा प्रत्यक्षात आला होता..

 

आण्णांच्या कल्पनेतून आकाराला आलेली शाळा, त्याचे विस्तारीत बांधकाम, यादवबाबा मंदिर वगैरे पाहून झाल्यावर आम्ही संग्रहालयाच्या आवारात पोहोचलो.. एव्हाना पानघटांनी आण्णांपर्यत आमच्या आगमनाचा निरोप पाठवायची व्यवस्था केली‌ होती.

 

संग्रहालयात काय पहायला मिळणार ? मनात उमटलेला प्रश्न..

हे स्किप करुन थेट आण्णांना भेटूया.. अधीर मनाची अवस्था..


    

  


एखाद्या शाळेच्या मोठ्या वर्गाएवढी खोली.. चारही भिंतींवर शोकेसमध्ये मांडलेल्या होत्या ट्राॅफीज्, पदके, स्मृती चिन्हे.. प्रत्येकावरील लिहिलेला मजकूर वाचावा म्हटले तर दिवस‌ अपूरा पडेल. 




एका दालनात चित्र प्रदर्शिनी.. आण्णांच्या तरुण वयातील लष्करी वेषातील फोटोपासून, विविध आंदोलनातील प्रसंग, अनेक नामवंत मंडळींनी राळेगणसिद्धीला दिलेल्या भेटी, आण्णांनी राळेगणसिद्धीत राबविलेले उपक्रम आणि उपलब्धी.. वगैरे बरेच काही..

 

   

आज १०-१२ दिवसांनंतर लिहिताना अनेक प्रसंग, घटना नमूद करायच्या राहिल्या असतीलही मात्र एका बाबतीत आश्चर्य व्यक्त करावे का ? हा प्रश्न मनात येतोच आणि ते म्हणजे... आण्णांनी आजवर केलेल्या आंदोलनातील पत्रव्यवहार, पेपर मधील बारीकसारीक बातम्यांची कात्रणे या सगळ्या पेपर्सचे लॅमिनेशन करून त्याची केलेली अप्रतिम मांडणी .... हे नेमके कोणाला आणि कधी सुचले असावे ?



असो...एक आदरणीय व्यक्तीमत्व अशी सकाळी निघताना मनात असलेली प्रतिमा एव्हाना बदलत चालली होती. देशभक्तीच्या यज्ञात जीवनाच्या प्रत्येक क्षणाची आहूती समिधा म्हणून अर्पण करणाऱ्या आण्णांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वासमोर बसण्याची तरी आपली पात्रता आहे का ? संग्रहालय आणि चित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर अंतर्मुख होत असतांनाच मनात उमटलेला स्वाभाविक प्रश्न !

 

श्री. पानघट आणि श्री.‌ बाळासाहेब यांच्या सोबत आण्णा हळूहळू चालत येत असल्याचे लांबून दिसले‌. पानघट यांनी

"आण्णांना प्रश्न विचारा बर का ?"

असे आधीच बजावले होते. असंख्य प्रेक्षकांसमोर उभे राहिल्यावर एखादा वक्ता ब्लॅंक होतो. आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर बसल्यावर आम्ही ब्लॅंक झालो होतो..., काय प्रश्न विचारायचे ?



  



       


पण डॉ जगदीश सोबत असल्यामुळे मनाला दिलासा होता.. कडक उन्हात एका वृक्षाच्या छायेचा आधार मनाला दिलासा देतो तसेच काहीसे.. श्री.‌पानघट यांनी ओळख करुन देण्याचे सोपस्कार पार पाडले. जगदीशने आमच्या सगळ्यांच्या वतीने आण्णांना पुष्पगुच्छ दिला..     निशब्द वातावरणातील ताण हलका होत होता..

   

        


जगदीशने एका मागोमाग प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आण्णा बोलत होते.... आण्णांचे विचार, त्यांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये त्यांच्या उत्तरातून शब्दांचे आकार घेत बाहेर पडत होती.


.


https://youtu.be/DcUEV2DFsXo

तो आवाज कानात साठवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न सुरु होता. आण्णांच्या बोलण्यात एक आत्मीयता होती, आपलेपणा होता..

त्यामुळे भीड चेपली जात होती. आमच्यातील एक एक जण प्रश्न विचारायला पुढे येत होता.




  


श्री.‌ पानघट हे गेली दोन दशके आण्णांना सोबत करत आहेत. त्यांच्या जीवनपटावर ते सविस्तर बोलतात. त्यांची भेट झाल्यापासून आण्णांबद्दल ते भरभरून बोलत होते..

मला ते एका क्षणी श्री. दासगणू वाटले. श्रीगजानन विजय ग्रंथात महाराजांच्या कार्याचे, त्यांच्या लीलांचे वर्णन श्री दासगणू करतात तसेच काहीसे...



श्री. पानघट यांच्या कार्याचे कौतुक करायचे म्हणून मी उठलो आणि आण्णांच्या शेजारील खुर्चीत जाऊन बसलो... मनात आलेला हा विचार सांगितला तसे त्यांनी मंद स्मित केले. आण्णांचे तपस्वी जीवन पाहिल्यावर आठवलेले एक पद्य

"दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चालता है"

त्यांना वाचून दाखवले...

ही तीन चार मिनिटे म्हणजे आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे हे मला आज अधिक ठळकपणे जाणवतय.

 


https://youtu.be/p18cGJnMpTU


१५-२० मिनिटांच्या भेटीनंतर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे भोजनासाठी मार्गस्थ झालो. श्री. पानघट यांच्याकडे लिंबाचे सरबत झाले आणि श्री. बाळासाहेबांकडे भोजन ! या दोघांच्याही आदरातिथ्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. भारतीय संस्कृतीत असणारा पाहुणचार आम्ही आता टिपीकल "पुणेरी" असणारे सगळे जण नव्याने अनुभवत होतो. आपली मूळ..roots आणि मूल्ये..values हे अद्यापही शाबूत आहे याची खात्री कुटुंबियांनी दिलेल्या सन्मानाने झाली. परतीच्या प्रवासाला पाच वाजता सुरुवात झाली..

 

ध्यानीमनी नसतांना आज राळेगणसिद्धी आणि आण्णांची भेटीचा योग जुळून आला आणि याच श्रेय केवळ आणि केवळ जगदीशला बहाल करायला हवंय..

 

प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका उत्तरात आण्णा म्हणाले कि "माणसाने जीवनातून "मी" काढून टाकला कि मग बाकी मागे काही उरत नाही... माझ्या हातून हे कार्य करवून घेणारी शक्ती वेगळी आहे... मी केवळ माध्यम !"

 

दिवसभराच्या प्रवासातील दमणूक झाल्यावर पाठ टेकतांना मनात विचार आला की...     "माझ्यात मी पणा नाही" असे वाटणे म्हणजे एक प्रकारे माझ्यात "मी" पणा असणे आहे का ?

 

परंतु हा विचार मी क्षणात मनातून काढून टाकला.. आण्णांच्या बाबतीत अशा प्रश्नांना मनात स्थान नाही.. जसे आण्णांच्या आंदोलनाचा इतिहास मांडणाऱ्या चित्रप्रदर्शनात कुठेही अरविंद केजरीवाल नाहीत !!

 

डोळे मिटले तेव्हा "दिव्य ध्येय कि ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है" या ओळीच मनात घोळत होत्या..

 

श्री. बिंदुमाधव भुरे.

१४ ऑक्टोबर २०२५. 

2 comments:

  1. बिंदू, नेहमीप्रमाणेच खूप छान वर्णन. प्रत्यक्ष तिथे असल्याच चित्र डोळ्यांसमोर उभं केलंस. असंच वारंवार आम्हाला काही बाही गोष्टी सांगत जा. मस्त. लय भारी 🙏

    ReplyDelete
  2. खूप छान आधी कळले असते तर नक्कीच बरोबर यायला आवडले असते.

    ReplyDelete