Tuesday, May 5, 2020

आंतरराज्य प्रवास व दारुविक्री निर्णय


आंतरराज्य प्रवास व दारुविक्री निर्णय

दारुविक्री खुली करण्याच्या निर्णयावरुन सोशल मिडीयावर सध्या धमाल सुरु आहे. दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा हे त्या समुहाच्या अस्वस्थ व बेचैन मानसिकतचे निर्देशक आहे. परराज्यातील कामगारांना पाठविण्याच्या निर्णयामुळे अशाच प्रकारची अनियंत्रित गर्दी वैद्यकीय प्रमाणपत्र व प्रवासाकरिता लागणारी परवानगी मिळवण्यासाठी उसळते आहे. या गर्दीकडे पाहिल्यास या समुहाचा असुरक्षिततेच्या भावनेतून नैराश्याकडे सुरु असलेला प्रवास लक्षात येतो. 

आर्थिक दृष्टाकोन व सरकारी महसूल याचा विचार करता आंतरराज्य वाहतूकीतून सरकारला महसूल न मिळता आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. अशा वाहतूकीच्या निर्णयामुळे कोरोना मात्र सगळीकडे पसरण्याचा मोठा धोका आहे. (जर आगामी २-३ आठवड्यात या कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केल तर ते या निर्णयामुळेच असा आरोप करत त्याच खापर मोदींच्या माथी मारायला किती जण दबा धरुन बसले असतील ?)

दारुविक्रीकडे मात्र केवळ महसूल या नजरेतुन पाहून टीका केली जात आहे. अर्थात, त्याची निकड अमान्य करण्याचा प्रश्न नाही.  (तो पेट्रोल विक्री खुली केली तरी मिळणार आहे) दारु ही सवय नसून ज्यांचे व्यसन आहे अशा मंडळींचा असंतोष सामूहिक रौद्ररुप धारण करु शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. हिंसक जमावाला आवरायला पोलिसबळ अपुरे पडते हे दृष्य आपण पाहिले आहे. व्यसनमुक्ती केंद्रात ही मंडळी बंदिस्त नसून लॉकडाऊनमुळे बंदिस्त आहेत व त्यामुळे अशा समुहाला कायद्याने किती काळ नियंत्रित ठेवता येईल ? मेल कोंबड आगीला भित नाही याची प्रचिती घेणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखे आहे !

त्यामुळे रोग नियंत्रण व त्याचे समूळ उच्चाटन याला लागणारा दीर्घ वा अनिश्चित कालावधी ध्यानात घेता, रोग प्रसरणाची कमीतकमी किंमत मोजण्याची तयारी ठेवत व सामाजिक मानस-संतुलन टिकवण्यासाठी आंतरराज्य प्रवास व दारु विक्री या दोन निर्णयांकडे पहावे लागेल. 

पंतप्रधान सातत्याने विविध यंत्रणांशी व मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असतात. त्यांना मिळालेल्या सूचना, सल्ले या आधारावर हा निर्णय सहमतीने झाला असावा असे वाटते. 

जी मंडळी "या" गटात नाहीत त्यांचा या प्रकाराला तीव्र विरोध असणे स्वाभाविक आहे पण परिणामांची चिंता न करता पुण्यात व अन्य शहरातही भाजी खरेदीसाठी उसळणारी गर्दी पाहता तळीराम शिस्तबद्ध आहेत का ? असा गंमतीशीर प्रश्न मनात डोकावतो. 

वरील मत माझे वैयक्तिक आहे. विविध माध्यमे, सोशल मिडीयावर यावर येणाऱ्या व दिसणाऱ्या बातम्या या आधारावर ते बनले आहे. 

टीप :  मी अन्य राज्यातला येथे अडकलेला व्यक्ती नाही व दारुला मी कधी स्पर्शही केलेला नाही.
😀😀

श्री बिंदुमाधव भुरे
९४२३००७७६१
८७९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com