Thursday, October 26, 2017

२७ आॅक्टोबर १९६७ - ५० वर्ष ज्वेल थीफची

https://m.youtube.com/watch?v=BXp0mPoU2rQ

२७ आॅक्टोबर १९६७ - ५० वर्ष ज्वेल थीफची

बाॅलीवुडसाठी १९६७ साल खूप महत्वाच ठरल. मनोकुमारच्या उपकारमधून आपला खलनायकी ठसा पुसण्याचा प्राणचा प्रयत्न यशस्वी ठरला होता. याssहू करत जंगली द्वारे आपला वेगळी ओळख व नृत्याची खास शैली घेऊन आलेल्या शम्मीकपूरने अॅन इव्हनिंग इन पॅरिस हा आणखी एक हिट चित्रपट याचवर्षी दिला होता. ट्रॅजेडिकिंग म्हणून ओळख निर्माण केलेल्या दिलीपकुमारने राम और शामद्वारे दुहेरी भूमिका साकार करून धमाल उडवून दिली होती. त्याच्याच अभिनयाची कॉपी करणाऱ्या मनोजकुमारचा पत्थरके सनम यशस्वी झाला होता. मिलन, मेहेरबान यासारखे कौटुंबिक चित्रपट तर हमराज हा सस्पेन्स चित्रपट असे तीन चित्रपट देत सुनीलदत्तने आपले वेगळेपण जपले होते. याssहू च्या आरोळीने शम्मीचे नशीब बदलून टाकल होते तर तशीच उःहऊ अशी आरोळी टाकत एक धसमुसळी व नायिकेची हाड खिळखीळी करून टाकणारी बेफाम नृत्यशैली घेऊन जितेंद्रने फर्ज नामक एक यशस्वी बाँडपट याचवर्षी दिला.

याच्या बरोबरीने राजेश खन्नाचा बहारोके सपने व राज, राजेन्द्रकुमारचा अमन व पालकी, शशीकपुरचा दिलने पुकारा व आमने सामने, धर्मेंद्रचा दुल्हन एक रातकी, मझली दीदी व चंदनका पलना, राजकपूरचा दिवाना व अराऊंड द वर्ल्ड, जॉय मुखर्जीचा शागीर्द यासारखे दाखल घेण्यासारखे अन्य चित्रपटही येऊन गेले पण माझ्या दृष्टीने खास लक्षात ठेवावा असा या वर्षीचा सगळ्यात महत्वाचा चित्रपट म्हणजे “ज्वेल थीफ” ! आज (२७ आॅक्टोबर २०१७) हा चित्रपट रिलिज होऊन ५० वर्ष झाली पण पुनः पुनः पहावासा वाटणाऱ्या या चित्रपटाने रहस्यपटाचा एक आकर्षक ट्रेंड नक्कीच सेट केला असे म्हणता येईल. 

नवकेतनच्या बॅनरखाली जरी देवआनंदने या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी विजयआनंदने पटकथा, संवाद, दिग्दर्शन व संकलन या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे संभाळल्या व आपला खास "गोल्डीटच" देत हा रहस्यपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. 

 
अमर नामक एक आभासी व्यक्तिरेखा निर्माण करून ती हुबेहूब विनयसारखीच दिसते व अमर आणि विनय अशी देवआनंदची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे अशी ठाम समजूत हा चित्रपट पहिल्या काही मिनिटात आपल्याला करून देतो.  तो दुसरा देवआनंद आपल्याला कधी दिसणार याची आपण पुढचे दोन तास उत्कंठेने वाट पहात रहातो यातच चित्रपटाचे मोठ यश आहे अस मला वाटते. चित्रपटाच्या टायटलला सुरवातीला एका मागोमाग येणारी ज्वेलरीच्या चोरीची दृष्ये व नंतर पडद्यावर विविध वृत्तपत्रातील "ज्वेल थीफ"च्या बातम्यांची कटिंग्ज दिसतात. या पार्श्वभूमीवर हा “ज्वेल थीफ” कोण आणि कसा असेल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच टायटल्स संपतात आणि प्रेक्षक सरसावून बसतात.

 
टायटल संपताच कुठल्यातरी समारंभात वैजयन्तीमालाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व नर्तकी म्हणून पुरस्कार एका राजघराण्यातील व्यक्तीच्या हस्ते प्रदान करण्यात येतो व तेव्हाच तिला राजवाड्यात नृत्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले जाते. कॅमेरा प्रेक्षकांच्या टाळ्या टिपत असतांना आपल्याला एक बालकलाकार (सचिन) तसेच अशोककुमार दृष्टीस पडतो. नंतरच्या दृश्यात रस्त्यावरून याच बालकलाकाराचे अपहरण होते.  आपल्याला काही टोटल लागायच्या आत या अपहरणानंतरच्या दृश्यात थेट पोलीस मुख्यालय दिसते पण येथे विषय या मुलाच्या अपहरणाचा नसून “ज्वेल थीफ” चा असतो. प्रेक्षकांना झटकन चित्रपटाशी एकरूप करतांना त्यांना गुंगवून टाकण्याचे हे खास विजयआनंद टेक्निक !

 
आता विनय म्हणजे देवआनंदची एन्ट्री व तीही एका ज्वेलेरीच्या दुकानाबाहेरील ज्वेलरी न्याहाळतांना ! त्याला पाहून एक खबऱ्या पोलिसांना फोन करतो असे आपल्याला वाटते कारण कारण लगेचच पोलीस विशंभरदास ज्वेलर्सच्या दुकानात शेठ विशंभरदासच्या भेटीला येतात व त्याला खबरदार करतात कि त्याने सावध रहावे व कोणताही चोरीचा ऐवज खरेदी करू नये. हे संभाषण सुरु असतांना विनय तोंड लपवतो व पोलिस निघून जाताच खिशातून एक हिरा काढून काऊटरवर सेल्समनला दाखवतो. परंतू, सेल्समन त्याला शेठ विशंभरदासना भेटण्याविषयी सुचवितो. 

 
पोलिस जाताच विशंभरदास त्यांच्या केबिन मध्ये शिरतात व त्यांच्या पाठोपाठ विनयही ! सप्रू म्हणजेच शेठ विशंभरदास व देवआनंदची ही भेट व त्या वेळची देवआनंदची डायलॉग डिलिवरी ही खास देवआनंद स्टाईलची आणि हा सीन चित्रित करतांना ज्या अँगल्सने कॅमेरा फिरतो तेथेही दिग्दर्शक गोल्डीची हुकूमत दिसून येते. (याच प्रकारच्या फ्रेम्स तिसरी मंझिलमधेही आढळतात)

 
विनय दुकानातून बाहेर पडतो तेव्हाच अंजू म्हणजे तनुजा आपल्या गाडीत बसून निघते. पडद्यावर काठीला बांधलेला मासा दिसतो बॅगराऊंडला किशोरकुमारचे योडलिंग !  ती काठी खांद्यावर घेऊन खास हॅट घातलेला, दुडकत चालणारा पाठमोरा देव आनंद म्हणजे विनय तनुजाच्या गाडीची वाट अडवत पुढे चालतांना दिसतो.  तनुजा वैतागलेली असते आणि किशोरकुमारच गाणे “ये दिल, ना होता बेचारा“ ! थिएटरमधे नुसत्या शिट्ट्यांचा आवाज ! 

 
“मासा गळाला लागला“  अशी आपल्याकडे म्हण आहे. इथे नेमक कोण कोणाच्या गळाला लागल ? तनुजा देवआनंदच्या कि देवआनंद शेठ विशंभरदासच्या कि ज्वेल थीफ पोलिसांच्या ? "काठीला लावलेला मासा" दाखवून ही सुचक कल्पकता फक्त विजयआनंद करू जाणे. गाणे संपता संपता तनुजाच्या कानातील हिऱ्याच्या इयरिंग्ज वरून देवआनंदचे या चित्रपटातील “हिरे-तज्ञ” म्हणून कॅरॅक्टर एस्टाब्लीश होते.

 
सप्रूच्या म्हणजे शेठ विशंभरदासच्या घरी पार्टीमध्ये त्याचा जुना मित्र अशोककुमार व वैजयन्तीमाला यांची एन्ट्री, त्यांनी विनयला अमर म्हणून संबोधणे, वैजयंतीमाला म्हणजे शालूची अमर बरोबर एंगेजमेंट झाल्यानंतर तो गायब झालेला असल्यामुळे शालूने "ओह अमर, अमर" असे म्हणत विनयला बिलगणे व विनयने तिला झिडकारणे यातून होणाऱ्या शाब्दिक चकमकीमुळे पार्टीत वातावरण गरम होते. अमरच्या एका पायाला सहा बोटे आहेत असे सांगून अशोककुमार विनयला अमर म्हणून सिद्ध करण्यासाठी भर पार्टीत सर्वांसमक्ष बूट काढायला लावतो. 

 
या प्रसंगातून अमर नावाच एक पात्र म्हणजे दुसरा देवआनंद आहे असा दृढ विश्वास प्रेक्षकाच्या मनात निर्माण होऊ लागतो. अर्थात तो अमर नाही हे सिद्ध होते व मग अशोककुमार माफीही मागतो. पण याप्रसंगानंतर विनयच्या मनात शालूबद्दल नकळत सहानुभूति निर्माण होते. या संपूर्ण सीनमधे वैजयंतीमालाचा अभिनय लाजबाब ! (चित्रपटाच्या पहिल्याच सीनमधे तिला नृत्याबरोबरच अभिनयाचही पहिले बक्षिस मिळालेल असते)

 
अमरकडून फसवणूक झालेली शालू दुःखी आहे. "रुलाके गया सपना" या लता मंगेशकरच्या अप्रतिम गाण्यातून तिने दुःखाला वाट मोकळी दिली आहे.  हे दुख: हलके व्हायला एक मित्राची गरज आहे असे म्हणत विनय शालूजवळ मैत्रीचा हात पुढे करतो. विनय कळत नकळत शालूकडे ओढला जातो. एक दिवस शालू त्याला एक बाॅक्स गिफ्ट देते. त्यात अमरचा कोट व खास कॅप असते. होय तीच ती ज्वेल थीफच्या पोस्टरवर देवआनंदने घातलेली ती कॅप ! अनिच्छेनेका होईना शालूला बरे वाटावे म्हणून विनय अमरच्या वेषात ती कॅप घालून तिच्यासमोर अचानक येतो. शालू क्षणभर त्याला अमर म्हणून बिलगते, पण .... 

 
नंतर मग "आसमाके नीचे" हे किशोर लताचे एक अफलातून द्वंदगीत कथानक पुढे घेऊन जाते. गाण्यात देवआनंदच्या खास लकबी, नखरे पहायला मिळतात हे काय सांगायला पाहिजे का ? 

 
दुकानात जायला निघालेल्या विनयला इकडे अवखळ तनुजा लाडिकपणे गुंतवून ठेवते व दरम्यान  “रात अकेली है“ हे आशा भोसलेने गायलेले भन्नाट गाणे होऊन जाते. अर्थात, गाण्याच चित्रिकरण, लाईट इफेक्ट्स लाजबाब.  या दरम्यान विशंभरदासाचे संपूर्ण दुकान "ज्वेल थीफ“ अमर साफ करतो. शेठ विशंभरदास शोरुममधून घरी परत येतात आणि विनयला स्वतःच्या घरात बघून हादरतात. विनय सांगतो कि “मी गेले दोन तास तुमच्याच घरात आहे “ व तनुजा त्याला दुजोरा देते तेव्हा शेठ विशंभरदास म्हणतात कि “हे कस शक्य आहे ? गेले दोन तास तू माझ्याबरोबर दुकानाच्या तळघरात होतास“ ! याचा अर्थ ही चोरी अमरने केली व अमर हाच “ज्वेल थीफ" आहे याची एव्हाना आता प्रेक्षकानाही खात्री पटलेली आहे.

 
डोक्याला हात लावून बसलेला शेठ विशंभरदास, विनय व अशोककुमार यांच्याबरोबर पोलिसांचे सुरु असणारे संभाषण चोरून ऐकणाऱ्या एका भुरट्या चोरास विनय पकडतो व त्याच्याकडून अमर हा हॉटेल रोमन नाईट क्लब येथे असल्याचे कळते. नाईट क्लब मध्ये हेलनच एक फर्मास कॅबेरा नृत्य ! 

 
गाण संपल्यानंतर मीच अमर आहे असे भासवत विनय हेलनसोबत काहीकाळ अमरचा छडा लावायचा या हेतूने घालवतो. आणि मग अमरचा पाठलाग करण्याच्या धावपळीत ट्रेनचा प्रवास करत पुणे व तेथून थेट सिक्कीमला पोहोचतो. या दरम्यान अमर हा "प्रिन्स अमर" आहे व त्याची गँग बरीच मोठी असल्याचे विनयला कळून येते.

 
एव्हाना चित्रपट साधारण दोन तासांचा संपलेला असतो आणि प्रेक्षकांना जबरदस्त धक्का देतांना "प्रिन्स अमर" म्हणजे दुसरा देवआनंद  वगैरे नसून गेले दोन तास आपण एक सभ्य मनुष्य आहोत असे दाखवणारा हा अशोककुमार असल्याचा गौप्यस्फोट होतो. प्रेक्षकांची मती गुंग ! मुळात अशोककुमारची प्रतिमा ही अतिशय सोज्वळ व सालस अशीच आहे. याच प्रतिमेमुळे हा माणूस असले खलनायकी उद्योग करणारा असेल असे गौप्यस्फोट होऊनही आपले मन स्वीकारायला तयार होत नाही. आत्तापर्यंत पडद्यावर आलेल्या कथानक मनात आठवून दुसऱ्या देवआनंदच कोड उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न एकीकडे सुरु असतांना कथानक खास फिल्मी स्टाईलने पुढे सरकु लागते.

 
विनयला अमर बनवायचे म्हणजे त्याला विनयचे आयुष्य विसरायला लावायचे. त्यासाठी डॉक्टरांना कामाला लावले असते. एकीकडे विनयच्या आठवणी पुसल्या जाव्यात यासाठी शॉक द्यायचे व बाकीच्या गँग मेम्बर्सनी त्याच्यापुढे सतत अमरच्या वेगवेगळ्या चोऱ्यांबद्दल बोलत राहायचे. चित्रपटाच्या सुरवातीला वैजयन्तिमालाला नृत्याबद्दल मिळालेले बक्षीस व कार्यक्रमासाठी राजवाड्यात यायचे निमंत्रण आता उपयोगी पडते.

एक नृत्य पथक घेऊन वैजयंतीमाला राजदरबारात नृत्यासाठी येते व इथे एका नायाब हिऱ्याची चोरी करण्यासाठी अमर बनविलेला विनय तिचा साथीदार बनून येतो. ठेका धरायला लावणारे खूप मोठा मुझिक पीसने सुरुवात होणारे व खास टिपिकल  सिक्कीमच्या लोकसंगीतावर आधारीत “होटोपे ऐसी बात मै दबाती चली आयी” हे अफलातून नृत्यगीत होते.

चोरीचा प्लान फसतो व खरा “प्रिन्स अमर” म्हणजे अशोककुमार पकडला जातो. चित्रपटाच्या सुरुवातीला ज्या लहान मुलाचे अपहरण झालेले असते तो वैजयंतीमालाचा भाऊ असतो व त्याला ओलीस ठेऊन “प्रिन्स अमर” शालू झालेल्या वैजयन्तिमालासह अन्य साथीदारांच्या मदतीने हा प्लान प्रत्यक्षात आणत असतो. वगैरे..... अर्थात शेवट गोड होतो.

आपण मिसळ पाव हा बेत अनेकदा आखला असेल. मिसळ मधले सगळे घटक हे परफेक्ट जमून येणे व त्यावर तर्री टाकल्यावर जेव्हा पहिला घास जिभेवर पडतो तेव्हा कोणी कितीही तज्ञ असू दे, मिसळ नेमकी कशामुळे फर्मास बनली हे तो सांगू शकत नाही. एक नक्की कि त्यातला एक जरी घटक पदार्थ कमी पडला तरी भट्टी बिघडली च समजा. “ज्वेल थीफ”चे तसेच आहे. देव आनंद, वैजयंतीमाला, अशोककुमार, तनुजा, हेलन वगैरे कलाकारांची निवड, विजयआनंदचे दिग्दर्शन, कथा, पटकथा व संकलन यावर कळस चढवायचे काम एस डी बर्मन यांच्या संगीताने केले आहे. यातला एकजरी घटक कमी पडला असता तर ?

आज ५० वर्ष पूर्ण होत असतांना “ज्वेल थीफ” ने त्या स्मृती पुन: जाग्या केल्या. आज नव्या व प्रगत तंत्रज्ञानाने तयार होणाऱ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीतही जर मल्टिप्लेक्समध्ये “ज्वेल थीफ” पुनः रिलीज झाला तर बॉक्स ऑफिसवर रेकार्डब्रेक  गल्ला जमवेल यात काही शंका नाही.

 

बिंदुमाधव भुरे.

Wednesday, October 25, 2017

खा राजू शेट्टी भाजप विरोधात प्रचार !

खा राजू शेट्टी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार ही बातमी माध्यमांसाठी ठळक बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज बनली. खर तर आंदोलन करणे तुलनेन सोप असते कारण लोकक्षोभाला वाट करुन देणारा व आंदोलनकर्त्यांना प्रसिद्धि मिळवून देणारा तो एक सर्वमान्य मार्ग आहे. अर्थात, या मार्गाने आलेली सत्ता किंवा पद किती काळ टिकते याचा इतिहास तपासून पहावा लागेल.

शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे हे सगळ्यांनाच मान्य आहे. हा विषय शरद जोशींनी प्रथम प्रकाशझोतात आणला. आताची मंडळी हा विषय घेऊन शरद जोशींचाच आंदोलनाचा मार्ग चोखाळतात कारण हा मार्ग शेतमालाला भाव मिळवून देण्याची शक्यता असणारा असला तरी उपद्रवमूल्य मात्र नक्कीच मिळवून देतो.

अर्धा किंवा एक एकर शेती असणारा अल्पभूधारक व शेकडो एकर जमीन बाळगणारा संपन्न शेतकरी या दोघांच्याही शेती उत्पादन किंमतीत फरक असणार. मग हमीभाव निश्चित करतांना कोणाची किंमत आधारभूत मानायची ? हा कळीचा प्रश्न  सोडवावा लागणार आहे व त्याच्या उत्तरातून नविन प्रश्न निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण उत्पादन खर्च जास्त असणारी रक्कम पायाभूत मानून जर हमीभाव नक्की केला तर ग्राहकांचे कंबरडे मोडणार व उत्पादन खर्च कमी धरुन किंमत निश्चित केल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांची घुसमट होणार !

त्यामुळे या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तोडगा शोधण्याचे काम राज्यकर्त्यांना करावे लागणार आहे. आंदोलन कर्त्यांच्या मागण्यात या प्रश्नावर त्यांच्या लेखी असलेल्या तोडग्याचा उल्लेख त्यांनी स्पष्ट शब्दात करायला हवा किंबहुना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी "हा तोडगा" अशी एक स्पष्ट मागणी म्हणुन मांडावा व त्यासाठी आंदोलन करावे.

खा राजू शेट्टींनी गुजरातमधे जाऊन भाजपविरोधी प्रचार करेन ही केलेली दर्पोक्ती म्हणजे ज्या आंदोलनातून आपण पुढे आलो आहोत त्या आंदोलनाची व शेतकऱ्यांची फसवणूक नाही का ?

बिंदुमाधव भुरे, पुणे

Friday, October 20, 2017

एसटीची दूरावस्था

*"प्रवासी वाहतूक क्षेत्रातील खाजगी कंपन्यांची मनमानी व एसटीची दूरावस्था"*

"खाजगी स्पर्धकांना प्रवेश दिल्यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण होईल व अंततः ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल" खाजगीकरणाची जोरदार वकिली करतांना २०-२५ वर्षांपूर्वी ही वाक्य कानांवर सातत्याने पडायची. सरकारी सेवा संस्थाच्या सेवेचा दर्जा सुधारण्याच्या नावाखाली (किंबहुना त्या सुधारण्यात व्यवस्थापनाला आलेले अपयश झाकण्यासाठी) खाजगी सेवांचे स्वागत करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात, १९९१ साली जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्याचा तो एक स्वाभाविक परिणाम होता असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये.

खाजगी सेवा देणारे येथे पैसा कमवायला आलेले असतात त्यांना चॅरिटी करण्यात स्वारस्य नसते. आज एसटी संपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणून या क्षेत्राशी निगडित प्रवासी वाहतूक क्षेत्रातील खाजगी वाहतूक कंपन्याचा विचार करु. या कंपन्या त्यांच्या चालकांना व वाहकांना किती पगार व कोणत्या सुविधा, सवलती देतात ? त्यांना कोठे आहे आस्थापना खर्च ? बसडेपो साठी, बसच्या देखभालीसाठी कायमस्वरुपी ना यंत्रणा ना त्यासाठीचा कायमस्वरुपी खर्च ! केवळ नफा हे एकमेव ध्येय असल्यामुळे  मनात येईल तेव्हा मनमानी भाडेवाढ सुरुच असते. ही वाढ केवळ सणासुदीलाच नव्हे तर शनिवार रविवार व जोडून सुट्ट्या आल्यावरही अनुभवास येते.

खाजगीकरणाचे भूत मानगुटीवर बसलेल असल्यामुळे या खाजगी व्यावसायिकांना परवाना देतांना सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकुश न ठेवता त्यांना खुली सूट दिली. आज त्याने भस्मासुराचे रुप घेतलय कारण या व्यावसायिकांमुळे सरकारी बस सेवा, एसटी धोक्यात आली आहे. आम्ही ग्राहक पण किती कोरडी सहानुभूति दाखवितो ! एसटीच्या कर्मचारी वर्गाला अपूरा पगार म्हणून हळहळ व्यक्त करतो पण जरा भाडेवाढ केली कि सरकारला शिव्यांची लाखोली वहातो आणि दुसरीकडे खाजगी बसची मनमानी भाडेवाढ नाक मुरडत स्वीकारतो. अर्थात, एसटी तोट्यात असण्याची अन्य कारणे दुर्लक्षून चालणार नाहीत व भाडेवाढ केल्यामुळे तोटा संपेल किवा हवी तशी पगारवाढ देता येईल असेही नाही.

या खाजगी वाहतूक व्यावसायिकांना परवाना देतांना त्यांच्या परवाना फीमधे वेळोवेळी भरपूर वाढ केली असती व / किंवा त्यांच्या प्रवासी तिकिटविक्रीवर दरडोई काही रक्कम आकारुन त्याचा विनियोग एसटीच्या भल्यासाठी केला असता तर एसटीची आर्थिक अवस्था आज आहे इतकी दयनीय झाली नसती.

आज ८००० कोटीची उलाढाल असलेल्या एसटीचा वेतनावरील खर्च हा सुमारे ३५% आहे व एसटीचा संचित तोटा हा ३००० कोटीच्या जवळपास आहे. या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीत एसटीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणे शक्य नाही हे स्पष्ट दिसतय. राज्य सरकारने भार उचलावा असा युक्तिवाद केला जाईल पण मुळात राज्य सरकारचा श्वास हा ४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली कोंडला गेला आहे.

खाजगी वाहतूकीवर करआकारणी करुन, त्यांच्या वार्षिक परवाना फीमधे वाढ करुन ही रक्कम एसटीच्या महसूलात जमा करणे, तसेच राज्य सरकारने एसटीवर लादलेल्या भरमसाठ प्रवासीकरात कपात करणे व त्याबरोबरीने एसटी तोटा सहन करुन खेडोपाडी पुरवत असलेल्या सेवेसाठी त्यांना त्या तोट्याच्या बदल्यात सरकारी अनुदान देणे ! काही अनावश्यक खर्च कमी करुन भ्रष्टाचाराला पायबंद घालतांनाच उत्पन्नांचे नवे मार्ग शोधून महसूल वाढविण्याचा प्रयत्न करणे इ. सारख्या उपाययोजनांचा अवलंब एसटी महामंडळाला करावा लागेल.

या उपाययोजनांबरोबरच भाडेवाढीचा कटू पण आवश्यक निर्णय घेऊन वेतनवाढीवर सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न व्हावा असे वाटते. काही प्रमाणात अंतरिम वाढ जाहीर करुन एक प्रकारची सकारात्मकता एसटी महामंडळाने (सरकारच्या पाठिंब्याआधारे) दाखविल्यास कर्मचारी संघटनांनीही लवचिकता दाखवून वाटाघाटीसाठी पुढे यावे व सन्माननीय तडजोड स्वीकारण्यास राजी व्हावे. अर्थात, भाजप सेना यांच्या राजकीय वादामधे आपण भरडले जाणार नाही व आपला वापर होणार नाही याची खबरदारी संघटनांनी घेतली पाहिजे.

पुणे मनपाच्या पीएमटीला जसे एक तुकाराम मुंढे दिलेत तसे कोणीतरी एसटीला लाभल्यास चित्र वेगळे दिसू शकते. आणि शेवटी खाजगीकरणाला किती मुक्त कुरण चरु द्यायचे याचाही एकदा पुनर्विचार करावा लागेल.

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, October 13, 2017

१४ आॅक्टोबर, श्रद्धेय ठेंगडीजींचा स्मृतिदिन

१४ आक्टोबर, स्व. दत्तोपंत ठेंगडीजींचा स्मृतिदिन

 

२३ जुलै १९५५ रोजी एका पत्रकार परिषदेत स्व. दत्तोपंत ठेंगडीजींनी भारतीय मजदूर संघाची स्थापना झाल्याची घोषणा केली आणि कामगार क्षेत्रात आणखी एका राष्ट्रीय संघटनेचा उदय इतकीच दखल त्याकाळी माध्यमांनी घेतली तर लाल झेंडा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या या क्षेत्रात संघवाल्यांचे काय काम ? अशा शब्दात प्रस्थापित अन्य साम्यवादी मातब्बर संघटनांनी हेटाळणी केली. परंतु या कुचेष्टेकडे दुर्लक्ष करत भारतीय मजदूर संघाने आपले कार्य सुरूच ठेवले व बघता बघता ही संघटना या देशातील क्रमांक एकची संघटना बनली. अर्थात प्रथम क्रमांक मिळवणे हे ध्येय नव्हते तर राष्ट्र पुनर्निर्माणाचे कार्य म्हणून एक वेगळा विचार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावा याहेतूने सुरु केलेल्या कार्याच्या वाटचालीतील तो एक सहजसाध्य टप्पा होता. देशहितांतर्गत उद्योगहित व उद्योगहितांतर्गत कामगारहित असा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा एक वेगळा विचार स्व. दत्तोपंत ठेंगडीजींनी तेव्हा मांडला. १ मे या जागतिक कामगार दिनाऐवजी या विश्वाचा आद्य कामगार “विश्वकर्मा” याच्या जयंतीचा दिवस म्हणजे १७ सप्टेंबर, हा कामगारदिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह त्यानी धरला. लाल झेंड्याऐवजी भगवा झेंड्याचा अंगीकार करणाऱ्या भारतीय मजदूर संघाचा गेली अनेक वर्षे कामगार क्षेत्रातील हा प्रथम क्रमांक कायम आहे. आज ५००० हून अधिक संघटना व एक कोटीहून अधिक सदस्यसंख्या असा हा विस्तार असून हजारो पूर्ण वेळ व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या अथक त्याग व परिश्रमामुळे कार्यविस्ताराची ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे.

 

स्व. दत्तोपंत ठेंगडीजी हे एक द्रष्टा कामगार नेता होते. वर्धा जिल्ह्यातील आर्वी नामक एका लहानशा गावात १० नोवेंबर १९२० रोजी त्यांचा जन्म झाला. बालवयापासूनच संघाशी संबंध आल्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९४१ साली त्यांनी प्रचारक म्हणून कार्यास सुरुवात केली. भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेपूर्वी कामगार क्षेत्राचा अनुभव यावा म्हणून त्यांनी आयटक व इंटक या संघटनांमध्ये कार्य केले.  कामगार संघटन म्हणजे कामगारांच्या मागण्यांसाठी मालकाशी संघर्ष करणारे एक हत्यार असे स्वरूप त्या काळात कामगारांच्या मनात ठळकपणे ठसविण्यात आले होते. परंतु, अशा संघर्षामुळे ज्या समाजाला त्रास होतो त्याच समाजाचा आपणही एक घटक आहोत ही जाणीव त्यांनी कामगारांना करून दिली. राष्ट्र पुनर्निर्माणाचे कार्य हे समाजाच्या विविध घटकांना एकत्र घेऊन करावे लागणार होते व कामगार हा त्या समाजाचा एक घटक असल्यामुळे त्याचे हित हे समाजाच्या हिताच्या, देशाच्या हिताच्या आड येणार असेल तर ते काही काळ बाजूला ठेवावे लागेल हा धाडसी विचार त्या काळात मांडणे व रुजाविणेचे अवघड कार्य स्व. दत्तोपतांनी मोठ्या कुशलतेने केले. अन्य कामगार संघटनाचा दृष्टीकोण याला ते “ब्रेड बटर ट्रेड युनियन” म्हणत व त्यापासून वेगळा दृष्टीकोण मांडतांना कोणत्याही राजकीय पक्षाची बटिक न बनता आपले संघटन हे एक “जेन्युइन ट्रेड युनियन” म्हणून कामगार क्षेत्रात ओळखले जाईल अशी कार्यरचना, रिती-नीती त्यानी संघटनेत रुजवली.

 

काळाच्या पुढे पाहू शकणारा या व्हिजनरी व दृष्ट्या नेत्यांने कामगार क्षेत्रात डाव्या चळवळीचा, साम्यवादी विचारांचा प्रभाव असतांना १९८१ मध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले कि डाव्या विचारांच्या संघटना व साम्यवाद यांच्या विरोधात काम करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका कारण कम्युनिज्म संपणार आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असलेला हा नेता उर्दुचाही जाणकार होता. आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना एखादा मुद्दा प्रभावीपणे पटवून देताना ते देश विदेशातील घटनाचे ऐतिहासिक दाखले अगदी सहजपणे देत असत इत त्यांचा अभ्यास होता. गेट करार, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटना यांच्या आडून होणार्या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या धूर्त आक्रमणाच्याविरोधात कामगारांबरोबरच शेतकरी, विद्यार्थी व ग्राहक यांची अभेद्य एकजूट उभे करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. देशाला आर्थिक पारतंत्र्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढावीच लागेल हा आग्रह धरतांना त्यासाठी स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून व्यापक चळवळ त्यांनी यशस्वीपणे उभी केली.

स्व. . दत्तोपतांविषयी लिहू तेव्हडे थोडेच आहे. आज म्हणजे १४ आक्टोबर, त्यांना आपल्यातून जाऊन १३ वर्षे पूर्ण झाली परतु, विपुल साहित्य, ग्रंथसंपदा, भाषणे या माध्यमातून व्यक्त केलेल्या विचारातून ते आमच्यात सदैव आहेत व पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देत राहतील असा दृढ विश्वास आम्हा लाखो कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

 

 

 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

स न २, हिस्सा न १क+२ब/१, ओमकार कोलोनी,

विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस, वैविध्य नगरीजवळ,

कर्वेनगर, पुणे ४११०५२

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com