Friday, August 10, 2018

अंधेरा छटेगा ... !

समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूमधे अस्ताला जाणाऱ्या सुर्याकडे पहात तो उभा होता. सुर्य मावळतीचा, पण तरी मन मोहून टाकणारा ! त्या तांबूस प्रकाशाच्या छटात सुर्याचे ते रुप विलोभनीय दिसत होत. काही क्षणांनी तो दिसेनासा होणार म्हणून मनातून थोडा खिन्न होता, उदास होता तो. पण ही हुरहुर, खिन्नता काही क्षणांची हे ही तो जाणून होता.

२०१९ ची आता चाहूल लागायला सुरुवात झाली होती, सरकारच्या कारकीर्दीची संध्याकाळ ! आत्तापर्यंतच्या वाटचालीवर तो समाधानी होता. अगदी काही महिन्यांचा अवकाश ... मनात तीच हुरहुर, खिन्नता, उदासी ! पण त्या सुर्यास्ताप्रमाणेच "हे वाटणेही" काही क्षणांचेच ! त्याने मनाला समजावले.

द्वेष, असूया व मत्सरापोटी असत्यालाच सत्य सिद्ध करण्याचे प्रयत्न कधीच सुरु झाले होते. त्यासाठी दशदिशांना साद घातली जात होती.... या साऱ्या दिशांनी आपले स्थान सोडून एकाच दिशेने वाटचाल करावी असा प्रयत्न सुरु होता. मी का यायच ? माझ्याच मागे सगळ्यांनी का यायच ? यावर वाद-प्रतिवादाची ठिणगी केव्हा पडेल सांगता येण अवघड होत कारण सध्या तरी चहुबाजूंनी अपप्रचाराची राळ उठविण्यात सगळेजण दंग होते.

मावळतीच्या सुर्यावरुन त्याने क्षणभर नजर हटवली. आजूबाजूच्या वाळूत उमटलेली, गिचमिडलेली, एकमेकांना तुडवलेली असंख्य पावले त्यानी पाहिली. चहुकडे उमटलेल्या त्या असंख्य पावलांचा राडा पाहून त्याने मनोमन स्मित हास्य केल. येणाऱ्या काही महिन्यात असाच आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडेल, एकमेकांवर चिखलफेक होईल व ही राडेबाजी वाढतच जाईल.

लाटा समुद्रावर तरंगत येत होत्या. काही दूरवर विरायच्या तर काही अगदी त्याच्या पुढ्यात यायच्या आधीच ! पण या लाटांकडे पहात असतांना अचानक एक लाट त्याच्या पायापर्यंत आली व सुखावून गेली. विचारांना उसंत न देता पुढची लाट जोरदार आली अन पायाखालून खुप आतपर्यंत आली. ती लाट परतल्यानंतर त्याचे लक्ष सभोवतालच्या वाळूकडे गेल. तो पावलांचा राडा, गिचमिड त्या लाटेनी एका क्षणात हटवली होती अन् त्या वाळूला एकसारख्या समान स्तरावर आणल होत.

पुनः तो झंजावात सुरु होईल, विलक्षण देशप्रेमाच्या ध्येयाने झपाटलेल्या त्या ओघवत्या वाणीच्या लाटेने अपप्रचाराची सगळी गिचमिड, दलदल नष्ट होईल. सुर्य आता मावळला होता, अंधारत चाललेल्या नभाकडे पहातांना त्याला अटलजींच्या ओळी स्मरल्या ... "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल ..... "

अन् त्याच्या मनाची हुरहुर, खिन्नता क्षणात नष्ट झाली. सभोवताली पसरलेल्या अथांग एकसंध वाळूवर त्याची नजर पुनः एकदा गेली. त्याला आता २०१९ ची काळजी नव्हती. काही क्षणांचा अवकाश ... तोच सुर्य त्याच तेजाने पुनः तळपणार होता !

बिंदुमाधव भुरे, पुणे.