Saturday, July 10, 2021

आमची ९ जुलैची वारी

आळंदी ते पंढरपूर मार्ग हा वारीचा मार्ग ! दरवर्षी लाखो वारकरी तहानभूक, देहभान विसरून या मार्गावर विठू माउलीचे नाम घेत, टाळ चिपळ्या मृदंग यांच्या तालावर विठू माऊलींच्या भेटीच्या ओढीने तल्लीन होऊन भजन गात वाटचाल करत असतात. माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मार्गाला आपला पदस्पर्श झाला, त्या वाटेवर आपण चार पावले मार्गस्थ झालो तर निदान मोहरी एवढे पुण्य आपल्या पदरी पडेल या भाबड्या आशेने दरवर्षी आम्ही लुटूपुटूचे वारकरी बनून एक दिवस पायी वारी करायचा प्रयत्न करत असतो. 

गेल्या वर्षी व याही वर्षी कोरोना संकटामुळे व निर्बंधांमुळे दिवे घाट माथ्यावर असलेल्या भव्य विठ्ठलमूर्तीचे दर्शन घ्यायचे व परत यायचे असा उपक्रम आम्हाला करावा लागला. लहान मुल भातुकली खेळतात तशी आमची वारी होते होती. पण त्यातही आनंद आहे तो वारीच्या मार्गावर चार पावले चालण्याचा नेमात खंड न पडल्याचा ! 

जुलै सुरुवात होऊनही उन्हाचा चटका जाणवत होता पण काल माऊलीची कृपा झाली. वातावरण ढगाळ होत. वातावरणातील उष्मा गायब झाला होता. घाटात चालत असतांनाच बघता बघता वर्षासरींनी रेनकोट अंगावर चढवण्याचा इशारा दिला. घाटातून सर्वत्र दिसणारी हिरवळ नेत्रसुखद होती. घाट केव्हा संपला कळालेच नाही. माऊलींचे दर्शन झाले आणि वर्षासरींनी विलंबित मधून द्रूत मधे प्रवेश केला. 

वाफाळलेला चहा घेत सभोवताली नजर टाकता काही क‌ष्णमेघांनी विसाव्यासाठी डोंगरांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आपण नाही का विसाव्यासाठी म्हणुन एखाद्या  हिल स्टेशनला गर्दी करतो तसंच काहीसं वाटून गेलं.  पावसाचा जोर वाढतच होता. या पावसात घाट पायी उतरुन जायचं कि पावसाचा जोर ओसरण्याची वाट पहायची या प्रश्नाने फार त्रास नाही दिला.
एका मिसळ टपरीवर गरम कांदा भजी, बटाटेवडा व मिसळीची सोय झाली. पट्टीच्या गायकाला तबला, तंबोरा आणि हार्मोनियम या त्रिकूटाची संगत आली कि गाण रंगात येत. तसं या पावसाळी वातावरणात वडा, भजी आणि मिसळ या त्रिकुटाने आमची पंगत झकास जमली. मात्र घरुन आणलेला डबा संपविताना प्रत्येकाला दोन घास अंमळ जास्तच झाल्याच लक्षात आल तसा आम्हा वारकरी मंडळींनी "पुढच्या वेळेपासून घरुन डबा आणायचा नाही" असा ठराव एकमुखाने पारित केला. 

परत निघताना माउलींना मनोमन नमस्कार करत विनवले कि पुढच्या वर्षी मात्र वारीपूर्वीच सार वातावरण कोरोनामुक्त होऊ दे. वारीमार्गावर काही क्षण पायी चालल्याचे समाधान मनी बाळगले आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत परतीचा प्रवासाला लागलो. एव्हाना पाऊसही थांबला होता. 

बिंदुमाधव भुरे, पुणे.