Wednesday, August 23, 2017

बैलोबा

बैल

तुम्हाला कधीतरी किंवा तुम्ही कोणालातरी कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी नक्की झापले असणार - "काय लेका नुसता बैला सारखा काम करतोस, जरा डोक वापरायला शिक."

म्हणजे बैल डोक वापरत नाही पण भरपूर काम करतो किंवा डोक नाही म्हणून आम्हाला बैल म्हणत असावेत. आमची नावही अशीच ... कोणी ढवळ्या तर कोणी पवळ्या वगैरे. तुमच्यातही जर एखादा कोणी ढ किंवा मठ्ठ असेल तर त्याला गमतीने का होईना आमच्या नावाने म्हणजे ढवळ्या, पवळ्या अशी हाक मारता ना तुम्ही ?

पण माझा सांगायचा मुद्दा आज वेगळाच आहे. नुकताच तुम्ही आमचा वाढदिवस म्हणजे तुमच्या लेखी बैलपोळा साजरा केलात. बर वाटते हो एक दिवस काम न करता निवांत ! शिवाय त्या दिवशी कोडकौतुक होत ते वेगळच.

तुमच्यात नाही का बच्चे कंपनीचा वाढदिवस असला कि केक कापण असते, नविन कपडे, गोडधोड जेवण, बागेत फिरायला नाहीतर एखादा सिनेमा, संध्याकाळी घरी मित्रांबरोबर धमाल नंतर देवासमोर बसून औक्षण. हल्ली हे औक्षण वगैरे शहरातून क्वचितच दिसत म्हणा.

असो ... आमची पण शिंगे त्यादिवशी मस्तपैकी रंगवतात, रंगीबिरंगी कपड्यांची अंगावर झूल ! मालक फार हौशी असेल तर अगदी अंगावर रांगोळी काढली जाते. नेहमीच जेवण तर असतच, जोडीला पुरणपोळीही मिळते बर का ! मग वाजंत्री, ताशा बडवत  गावातून मिरवणूक. मस्त वाटत, मज्जा येते. तिन्ही सांज झाली कि मग थोड उदास वाटायला लागते, दुसरे दिवशीची सकाळ दिसू लागते. परत मानेवर रोजच्यासारख जू ठेवून काम करायच, राबायच.

पण हे वाटणेही क्षणिकच बर का ! काम तर  करायचच असत, अगदी भरपूर ! खर सांगायच तर हे अस एक दिवसासाठी सजून बसून रहायच, बसून आयत खायच म्हणजे कसतरी वाटते हो ! म्हणूनच या निमित्ताने आज मन मोकळ करतांना एक विनंती कराविशी वाटते आहे.

तुमच्याकडे बच्चे कंपनीच्या वाढदिवसाला तुम्ही विचारता कि नाही त्यांना कि "काय आणू तुला वाढदिवसासाठी ?" तस जर मला विचारले ना तर मी मात्र एक मनातली सुप्त इच्छा सांगणार आहे.

तुम्हा मंडळींना व्यायाम म्हणून रोज तासभर चालायच म्हटले तरी कंटाळा असतो. आणि समजा अचानक सांगितले कि उद्या मॅरेथाॅनमधे तुम्हाला धावायचे आहे. धावाल का ? नुसत्या कल्पनेने काटा येतो ना अंगावर.

जरा गाड्याला जुंपण्यापूर्वी एकदा आमच्या डोळ्यात बघा, कशाला कोर्टाच्या आदेशाची वाट बघायची ?  जेव्हा गाड्याला जुंपून शर्यतीत धावायला लावता, कल्पना करा  काय वाट लागत असेल तेव्हा आमची ? एकिकडे पोळ्याला लाड करायचे आणि दुसरीकडे ही क्रुरता ! थांबवता आल तर बघा, एक विनंती समजा. तशी बाकी आमची काहीच इच्छा नाही.

कोणत्याही शर्यतीत कधीही न धावलेला पण ज्यांचे आयुष्य हीच एक शर्यत आहे अशा तमाम बैलोबांच्या वतीने .....

बिंदुमाधव भुरे

Saturday, August 19, 2017

सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची नवी गोष्ट

सोन्याचे अंडे देण्याऱ्या कोंबडीची नवी गोष्ट  

रोज एक सोन्याच अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे. सगळी सोन्याची अंडी एकदम मिळावी म्हणून एक दिवस मालक कोंबडीच्या पोटावरुन सुरी फिरवतो. कोंबडी मरते आणि एकदम खूप सोन्याची अंडी मिळणे सोडा, रोज एक मिळणारे अंडे मिळणे बंद होते.  

पण ही गोष्टी आता जुनी झाली. आता या नव्या गोष्टीतला मालक रोज कोंबड्यांच्या खुराड्यात यायचा, कोंबड्यांना खाऊ घालायचा. जातांना अंडी गोळा करुन निघून जायचा. ही अंडी विकून चार पैसे मिळवायचे असा गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा हा जीवनक्रम सुरु होता. एकंदरित कुटूंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालु होता. कुक्कुटपालनाच्या या व्यवसायाचा पसारा खूप मोठा होता. भांडवल म्हणून अनेक नातेवाइक, मित्रमंडळींनी त्याच्या व्यवसायात पैसा गुंतविला होता कारण या गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळत होता.  

वर्षांमागून वर्षे सरली, महागाइ वाढू लागली तसे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अपुरे पडू लागले. तज्ञांचा सल्ला घेतला - व्यवसाय वाढवणे, खर्च कमी करणे यासारखे पुस्तकी सल्ले मिळाले ! पण यासारख्या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत होता. खर्चात किती आणि कुठे कपात करायची ? किमान खर्च तर टाळू शकत नाही. मित्र, नातेवाईक यांना त्यांच्या गुंतवलेल्या पैशावर व्याज तर द्यायलाच पाहिजे. व्यवसायवाढीलाही तीव्र स्पर्धेमुळे मर्यादा होत्या.  

मग आमच्या मालकाने नामी शक्कल लढविली.   खर्चात कपात करायची म्हणून त्याने कोंबड्याच्या खाद्यात भेसळ करायला सुरुवात केली. १०% भेसळ केल्यानंतर असे लक्षात आले कि रोज मिळणाऱ्या अंड्यांच्या संख्येत फरक पडत नाही आहे. पण खाद्यावरील खर्चात झालेल्या कपातीमुळे उत्पन्नात मात्र वाढ होते आहे. यशाचा मार्ग सापडल्यामुळे मालक आनंदात होता.

पण काही ब्रँडेड व खाजगी व्यावसायिक यांच्यामुळे आता स्पर्धा दिवसेंदिवस जीवघेणी होऊ लागली होती. जो सशक्त,ताकदवान तोच या खेळात टिकणार बाकीच्यांनी गाशा गुंडाळायचा किंवा वेगळा व्यवसाय निवडायचा. आमच्या मालकानी व्यवसायात टिकून रहायचा दृढ़संकल्प केला होता, नव्हे करावाच लागला होता, नाहीतर असंख्य नातेवाइक मित्रमंडळींचे ठेव म्हणून स्वीकारलेले पैसे परत द्यावे लागले असते.  

खाद्यातील भेसळीचे प्रमाण वाढले कि उत्पन्न वाढते हे सूत्र डोक्यात बसले होते. स्पर्धेत टिकूनही रहायचे आणि नफाही कमवायचा त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्यान्नातली भेसळ आता प्रमाणाबाहेर वाढली होती. नित्य नियमाने अंडी गोळा करतांना मालकाला आजकाल रोज एखादी कोंबडी मेलेली आढळून येऊ लागली होती. त्याच कारण कळत होते पण व्यवसाय आता अशा टोकाला येऊन पोहोचला होता कि प्राप्त परिस्थितीत सुधारणा करणे अवघड होऊन बसले होते.   

आर्थिक स्थिती चांगली असतांना नित्य नियमाने बाजूला काढून ठेवलेली पुंजी संपत आली होती, उधारीवर विक्री केलेल्यांकडून वसूली होत नव्हती, काहींनी तर दिवाळे काढल्यात जमा होते त्यामुळे ती उधारी बुडल्यात जमा होती. बुडित देणेकऱ्यांची संख्या वाढू लागल्याने धंदा करायचा कसा हा प्रश्न सतावत होताच शिवाय मित्र आणि नातेवाईकांनी गुंतवलेल्या भांडवलावर नियमित परतावा देण्याच दडपण होते ते वेगळच !  

मला आठवले १९७० च्या दशकातले बँकिंग. ठेवी असो वा कर्ज, व्याजदर ठरलेले असायचे. वर्षातून एखादा "बचत पंधरवडा" किंवा "डिपाॅझिट मोबिलायझेशन विक" साजरा करायचा. बँकेकडे चालून येणारी कर्ज प्रकरणे विचारात घ्यायची, कर्जावर दर तीन महिन्यांनी व्याजआकारणी करायची. वार्षिक हिशोब जुळणी झाली कि विषय संपला. सगळ्याच बँका नफ्यात असायच्या. रोजच्या रोज अंडी विकून कुटूंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालकासारखे त्या काळात बँकाचे बरे चालले होते.  

१९९१ नंतर हळूहळू स्पर्धा वाढू लागली,स्पर्धेचे नविन नियम आले. कागदोपत्री नफा आता चालणार नव्हता. कर्जदाराचा हप्ता, व्याज याची परतफेड थकली तर तेवढ्या रकमेची तरतूद करण्याच्या नियमामुळे नफ्याचे प्रमाण घटू लागले. कर्जबुडवेगिरीचे वाढते प्रकार, वाढती कोर्ट प्रकरणे व निकालांना लागणारा विलंब यामुळे बँकिंग यंत्रणेवर नफा कमाविण्यासाठी ताण वाढू लागला होता.   

लेजर फोलियो चार्जेस, चेक रिटर्न चार्जेस,इन्स्पेक्षन चार्जेस, रिव्ह्यू चार्जेस, हँडलिंग चार्जेस यासारख्या मार्गे मग उत्पन्न वाढवायचा प्रयत्न सुरु झाला. हे अतिरिक्त उत्पन्न म्हणजे एक प्रकारे कोंबड्यांच्या खाद्यान्नात भेसळ करुन नफा कमावण्यासारखे होते. त्याने सुरुवातिला १०% भेसळ करुन उत्पन्न वाढविले तर बँकांनी विविध प्रकारचे चार्जेसची आकारणीला सुरुवात करून ! कोंबड्या बिचाऱ्या चूपचाप अन्याय सहन करायच्या तद्वत् ग्राहकही ! भेसळ प्रमाणाबाहेर गेली तसे कोंबड्या मान टाकू लागल्या तर इकडे ग्राहक पासबुकात दिसणाऱ्या चार्जेसमुळे हवालदिल होऊन खाती बंद करु लागले.  

नफा कमवायचा तर कर्जाला मागणी वाढली पाहिजे म्हणून मग व्याजदरात कपात करण्यावाचून पर्याय नव्हता. पण थकित, बुडित कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्पन्न, नफा कमी होत होता. परिणामी, खर्चात कपात करायची म्हणून ठेवींचे व्याजदरात कपात होऊ लागली. एकिकडे भरमसाठ चार्जेस तर दुसऱ्या बाजूला व्याजाच्या मिळकतीत घट अशा कात्रीत सापडलेला बिचारा ग्राहक विचार करु लागला कि हे सगळे भोग कर्जबुडवेगिरी करणाऱ्या काही मंडळींमुळे नशीबी आले. त्यांची अवस्था त्या कोंबड्यांसारखीच - खाद्यान्नातली भेसळ निमुटपणे सहन करायची पण अंडी मात्र तेवढीच द्यायची.  

काय होणार याचा शेवट ? लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत मालकाला हाव सुटल्यामुळे तो कोंबडी कापतो. पण या नव्या गोष्टीत आज काही उधारी बुडविणाऱ्या मंडळींमुळे खाद्यान्नातली अतिभेसळ, (म्हणजेच एका अर्थाने घटते व्याजदर व अव्वाच्या सव्वा चार्जेस तसेच) बुडित येणी यामुळे संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय, त्याचे मालक, ठेवीदार, मित्रमंडळी व असंख्य कोंबड्या हे सगळे काही कायमचा इतिहास बनून रहाणार अशी भीती निर्माण झाली आहे. कोंबड्यांच्या या नविन गोष्टीसारखी बँकिंगला लागलेली ही एनपीएची कीड, व्हायरस वेळीच आटोक्यात आला नाही तर ? काही बँकांचे एनपीए हे धोकादायक पातळीच्या पुढे कधीच गेले आहेत.   

या बँकांनी "हे राम" म्हणायच्या आधी कठोर पाऊल उचलले गेले पाहिजे. अर्थात कोंबड्यांच्या जर्जर झालेल्या २-४ खुराड्यांना एकत्र करुन हा व्यवसाय वाचविणे ही वरवरची मलमपट्टी ठरेल. तद्वत् बँकांचे मर्जिंग म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. स्टेट बँक व सहयोगी बँकांच्या विलीनिकरणातून बँक तर मोठी झाली पण निर्माण झालेले प्रश्न त्याहीपेक्षा जास्त मोठे आहेत. एनपीएची वसूलीसाठी कायद्यात बदल व जाणीवपूर्वक कर्जबुडव्यांना कडक शासन ही काळाची गरज आहे, बँकांच्या मर्जिंगने काय साधणार ? नव्या कथेतून शासनाला बोध व्हावा ही माफक अपेक्षा !  

बिंदुमाधव भुरे, पुणे.  

Shared with https://goo.gl/9IgP7

Wednesday, August 2, 2017

एक्स फॅक्टर

शाळेत असतांना गणिताच्या तासाला काळ, काम वेगाचे गणित आठवतय ? एका तोटीने पाण्याचा हौद भरायला अमूक वेळ लागतो तर चार तोटींनी किती वेळ लागेल ? किंवा ताशी अमूक किमी वेगाने अ ही आगगाडी जाते आहे व ब ही ताशी अमूक किमी वेगाने. तर किती वेळात अ आगगाडी ब ला मागे टाकेल ? जर विरुद्ध दिशेने याच गाड्या धावत असतील तर .... वगैरे वगैरे.

अशा गणितांची उत्तरे काढायची एक खास पद्धत गुरुजींनी तेव्हा शिकवली होती. किती वेळ लागेल असा गणितात प्रश्न विचारला असल्यामुळे उत्तर काढतांना "क्ष" वेळ लागेल असे गृहीत धरायचे आणि गणित सोडवून "क्ष" ची किंमत शोधून  काढायची. प्रश्न कोणताही असला तरी गृहीतक "क्ष" धरुन पुढे जायचे.

काळ, काम, वेग या प्रकारात इतक्या विविध प्रकारची गणिते विचार करायला लावणारी असली तरी त्याचे उत्तर शोधण्यासाठी गृहीतक धरुन पुढे मार्ग दाखविणारा हा "क्ष" तेव्हा खुप गंमतीशीर वाटायचा.  गणितांची उत्तरे जसजशी बरोबर यायची तसतसा आनंद व्हायचा व कितीही अवघड गणित आल तरी हा "क्ष" बरोबर उत्तरापर्यंत घेऊन जाईल असा आत्मविश्वास मनोमन जागृत व्हायचा.

पण तेच एखाद्या गणिताने त्रास दिला, उत्तर चुकीचे आले कि वाटायच काय उपयोग आहे "क्ष" धरुन ? कशाला असतात असली गणिते ? याचा पुढच्या आयुष्यात काय उपयोग असणार आहे का ?  आज अनेक वर्षानी विचार करताना अस वाटून गेल कि माणसाच जगणे म्हणजे पण एक गणितच आहे नाही का ? दैनंदिन जीवनात, रोजच्या व्यवहारात येणाऱ्या समस्या, अडचणी यातून मार्ग काढतांना कितीतरी प्रश्न मनात येतात आणि यावर उत्तर शोधतांना आपण कळत नकळत हा "क्ष" गृहित धरत असतो.

आता समीरचच एक काल्पनिक उदाहरण पहा ना. हा एक मध्यमवर्गीय. वडिलांना श्वासाचा त्रास होऊ लागला, छातीत दुखू लागले तस त्याने बाबांना जवळच्या हाॅस्पिटलमधे डाॅक्टरांच्या सल्ल्याने अॅडमिट केले. बायपास करावी लागणार व ४-५ लाखाच्या आसपास खर्च येणार होता. त्याची तयारी होती पण बाबांनी त्याला समजावून सांगितले. ते म्हणाले " हे बघ समीर, माझे वय आज ७२ आहे अजून किती आयुष्य आहे माहिती नाही. आपण अस गृहीत धरु कि आॅपरेशन करायच असा निर्णय आपण घेतला. आता ते यशस्वी होईल का ? आॅपरेशन दरम्यान आणखी काही काॅम्प्लिकेशन्स निर्माण झाली तर ? खर्च वाढला तर पैसा कसा उभा करणार ? आणि इतके सगळे करुन आयुष्य असे किती वाढणार ? या सगळ्याचा विचार करता हे आॅपरेशन करु नये अस माझे मत आहे."

आॅपरेशन करावे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधतांना कोणती तरी एक शक्यता गृहीत धरली व त्या अनुषंगाने विचार करुन समीरचे वडिल एका निर्णयाप्रत आले. म्हणजे एका अर्थाने समस्येच उत्तर त्यांनी "क्ष" ही शक्यता गृहीत धरुन मिळवले.

नविन वास्तू, वाहन खरेदी करतांना, मुलांच्या उच्च शिक्षणाचेवेळी किंवा लग्नसमारंभाचे बजेट बनवितांना अगदी दुकानात साडी खरेदीच्या करतांना .... जेव्हा जेव्हा समोरील उपलब्ध पर्यायातून एकाची निवड करायची असते तेव्हा तेव्हा आपण "एलिमिनेशन थियरी" चा उपयोग करत कळत नकळत मनातल्या मनात कोणतातरी एक पर्याय म्हणजेच हा "क्ष" गृहीत धरुन निर्णय घेत असतो व हे गणित सोडवत असतो. रुग्णाच्या तपासणीतही काढला जाणारा "एक्सरे" रोगाचे निदान नक्की करण्यात उपयुक्त ठरत असतो.

शाळेत जेव्हा गणित चुकायच तेव्हा वाटायच काय उपयोग आहे "क्ष" धरुन ? या असल्यास गणितांचा पुढच्या आयुष्यात काही उपयोग आहे का ? पण आज अनुभवाने कळालय कि प्रत्येकाच्या आयुष्यात हा "क्ष" खूपच महत्वाचा आहे, आयुष्यातली गुंतागुंतीची गणिते सोडविणारा मार्गदर्शकच जणू.

तुमच्या आयुष्यात पण नक्की आले असतील असे  "एक्स फॅक्टर" चे अनेक प्रसंग ! आठवून पहा एखादा !

बिंदुमाधव भुरे, पुणे ©