Wednesday, August 23, 2017

बैलोबा

बैल

तुम्हाला कधीतरी किंवा तुम्ही कोणालातरी कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी नक्की झापले असणार - "काय लेका नुसता बैला सारखा काम करतोस, जरा डोक वापरायला शिक."

म्हणजे बैल डोक वापरत नाही पण भरपूर काम करतो किंवा डोक नाही म्हणून आम्हाला बैल म्हणत असावेत. आमची नावही अशीच ... कोणी ढवळ्या तर कोणी पवळ्या वगैरे. तुमच्यातही जर एखादा कोणी ढ किंवा मठ्ठ असेल तर त्याला गमतीने का होईना आमच्या नावाने म्हणजे ढवळ्या, पवळ्या अशी हाक मारता ना तुम्ही ?

पण माझा सांगायचा मुद्दा आज वेगळाच आहे. नुकताच तुम्ही आमचा वाढदिवस म्हणजे तुमच्या लेखी बैलपोळा साजरा केलात. बर वाटते हो एक दिवस काम न करता निवांत ! शिवाय त्या दिवशी कोडकौतुक होत ते वेगळच.

तुमच्यात नाही का बच्चे कंपनीचा वाढदिवस असला कि केक कापण असते, नविन कपडे, गोडधोड जेवण, बागेत फिरायला नाहीतर एखादा सिनेमा, संध्याकाळी घरी मित्रांबरोबर धमाल नंतर देवासमोर बसून औक्षण. हल्ली हे औक्षण वगैरे शहरातून क्वचितच दिसत म्हणा.

असो ... आमची पण शिंगे त्यादिवशी मस्तपैकी रंगवतात, रंगीबिरंगी कपड्यांची अंगावर झूल ! मालक फार हौशी असेल तर अगदी अंगावर रांगोळी काढली जाते. नेहमीच जेवण तर असतच, जोडीला पुरणपोळीही मिळते बर का ! मग वाजंत्री, ताशा बडवत  गावातून मिरवणूक. मस्त वाटत, मज्जा येते. तिन्ही सांज झाली कि मग थोड उदास वाटायला लागते, दुसरे दिवशीची सकाळ दिसू लागते. परत मानेवर रोजच्यासारख जू ठेवून काम करायच, राबायच.

पण हे वाटणेही क्षणिकच बर का ! काम तर  करायचच असत, अगदी भरपूर ! खर सांगायच तर हे अस एक दिवसासाठी सजून बसून रहायच, बसून आयत खायच म्हणजे कसतरी वाटते हो ! म्हणूनच या निमित्ताने आज मन मोकळ करतांना एक विनंती कराविशी वाटते आहे.

तुमच्याकडे बच्चे कंपनीच्या वाढदिवसाला तुम्ही विचारता कि नाही त्यांना कि "काय आणू तुला वाढदिवसासाठी ?" तस जर मला विचारले ना तर मी मात्र एक मनातली सुप्त इच्छा सांगणार आहे.

तुम्हा मंडळींना व्यायाम म्हणून रोज तासभर चालायच म्हटले तरी कंटाळा असतो. आणि समजा अचानक सांगितले कि उद्या मॅरेथाॅनमधे तुम्हाला धावायचे आहे. धावाल का ? नुसत्या कल्पनेने काटा येतो ना अंगावर.

जरा गाड्याला जुंपण्यापूर्वी एकदा आमच्या डोळ्यात बघा, कशाला कोर्टाच्या आदेशाची वाट बघायची ?  जेव्हा गाड्याला जुंपून शर्यतीत धावायला लावता, कल्पना करा  काय वाट लागत असेल तेव्हा आमची ? एकिकडे पोळ्याला लाड करायचे आणि दुसरीकडे ही क्रुरता ! थांबवता आल तर बघा, एक विनंती समजा. तशी बाकी आमची काहीच इच्छा नाही.

कोणत्याही शर्यतीत कधीही न धावलेला पण ज्यांचे आयुष्य हीच एक शर्यत आहे अशा तमाम बैलोबांच्या वतीने .....

बिंदुमाधव भुरे

No comments:

Post a Comment