Tuesday, September 5, 2017

डोंगर पोखरुन उंदीर निघाला.

"डोंगर पोखरुन उंदीर सापडला" 
नोटबंदीनंतर रिजर्व बँकेने १०००/५०० च्या नोटांबाबद नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे ही म्हण घरोघरी पोहोचली आणि मोदी टीकाकारांना एकाएकी स्फुरण चढले.

एकदा उंदीर घरात शिरला कि किती धुडगूस घालतो व किती चांगल्या गोष्टींची माती करतो ... वर्तमानपत्रांची रद्दी, महत्वाची कागदपत्रे, अभ्यासाची पुस्तके वह्या, जुने न वापरता येण्याजोगे कपडे, ठेवणीतले महागडे कपडे, रोजच्या वापरातले कपडे, वर्षभराचा साठा म्हणून ठेवलेल धान्य किंवा रोजच्या वापरासाठी आणलेल मोजक धान्य .... ! उंदराला थोडीच यात फरक करणार आहे ?  कुरतडणे हा त्याचा स्थायीभाव, तो ते करतच  रहाणार.

पिटुकला पण चपळ असा हा प्राणी त्याचा शोध घ्यायला गेल तर तो असा पटकन् कधीच सापडत नाही पण कुरतडलेल्या कचऱ्याच्या पाऊलखुणांवरुन त्याचे अस्तित्व जाणवत आणि ते दखल घ्यायला भागही पाडते. त्याचा बंदोबस्त करण्यास जितका उशीर करु तितके आपले नुकसान जास्त ! मग कुठे पिंजरा लाव, कुठे औषधि गोळ्या टाक असले उपाय आपण करत असतो.

शेवटचा उपाय म्हणून मग संपूर्ण घर शोधण्याची मोहीम सुरु करावीच लागते. दैनंदिन कामे बाजूला ठेवून सगळे घरदार त्याला घेरण्यासाठी सज्ज होते. सगळी कपाटे, प्रत्येक रुमचे पोटमाळे, फर्निचर, सगळे किचन वगैरे वगैरे आपण आख्खे घर अक्षरशः रिकाम करतो.

यानिमित्ताने आपले घर आवरले जाते. अनेक न लागणाऱ्या वस्तू अडगळीतून बाहेर काढल्या जातात, बऱ्याचशा सापडत नसलेल्या गोष्टी सापडतात. एकंदरीत काय तर घर पुनः एकदा नव्याने नीट लावले जाते.

तर अशा या उंदीरमामाचा बंदोबस्त केला नाही तर झालेल्या नुकसानाची मोजदाद करुन आपले किती नुकसान झाल हे सांगता येत. पण त्याला वेळीच पकडून ठिकाणी लावण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यामुळे माझा किती अन् कसा फायदा झाला हे मा़त्र सांगता येत नाही. भ्रष्टाचार, काळा व बेहिशोबी पैसा यांनी कुरतडलेली पोखरलेली अर्थव्यवस्था लक्षात घेतली तर मला वाटत नोटबंदीबाबद असेच काहीसे म्हणावे लागेल.

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment