Thursday, November 22, 2018

डॉ घाणेकर - एक चित्रपट

डॉ घाणेकर - एक चित्रपट

सोशल मिडिया व वाहिन्यांवर झालेल्या प्रोमोज् व प्रमोशन्समुळे डॉ काशिनाथ घाणेकर कधी प्रदर्शित होतोय व कधी पहातोय असे झाले होते. एखाद्या चित्रपटाविषयी गेल्या आठवड्यापर्यंत "काहीही माहिती नसणे" आणि आज "कधी पहातोय असे होणे" ही किमया आहे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाची व आधुनिक प्रचार-प्रसार माध्यमांची. हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवतोय, कदाचित आणखी एखाद दोन आठवडे चित्रपटगृहात टिकून राहिल.

ज्या कालखंडातला हा चित्रपट आहे त्या काळात एखादा चित्रपट तिकिटबारीवर किती चालणार किंवा रौप्यमहोत्सव करणार का हे एक दोन आठवड्यानंतर कळायचे. महिनाभरानंतर निवांतपणे जाणाऱ्या मंडळींची संख्या त्याकाळी मोठी असायची. आज मल्टीप्लेक्समुळे शोज् ची संख्या वाढली आहे, परिणामी २-३ आठवड्यात चित्रपटगृहावरील पोस्टर्स बदलेली दिसतात. अर्थात, चित्रपटांची वाढलेली संख्या, मल्टिप्लेक्समुळे वाढलेली शोज् ची संख्या, हाताळल्या जाणाऱ्या विषयात असणारे वैविध्य या घटकांचाही तो एक स्वाभाविक परिणाम म्हणता येईल.

चित्रपट स्रुष्टीतील अनेक कलाकार त्याच्या विक्षिप्तपणा, मूडी स्वभाव, सेटवरील भांडणे, ऊशीरा येणे, व्यसनाधीनता या सारख्या कारणांमुळे कायमच चर्चेत रहातात. जुन्या काळातील राजकुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना ही वानगीदाखल काही नावे. अलिकडे संजयदत्त हा आधी त्याच्या व्यसनाधिनतेमुळे व नंतर अतिरेक्यांशी असलेल्या संबंधातून झालेल्या शिक्षेमुळे चर्चेत राहिला. यामुळे सर्वसामान्यांसाठी असे सेलिब्रेटीज व त्यांचे व्यक्तिगत आयुष्य हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू यातील संभाजीला डॉ घाणेकरांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले होते.  अर्थात यात लेखकाचाही वाटा तेवढाच मोठा आहे हे नाकारता येणार नाही. अश्रूंची झाली फुले (याची लोकप्रियता बघून हिंदीत आसू बन गए फूल आला) व गारंबीचा बापू या आणखी काही लोकप्रिय ठरलेल्या कलाकृती ! मूलतः डॉ घाणेकर हे रंगमंच कलाकार व त्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा चित्रपट क्षेत्राला मोह झाला असे म्हणता येइल. परंतु त्यांच्या चित्रपटांनी इतिहास रचला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पाठलाग, मधूचंद्र, देवमाणूस व हा खेळ सावल्यांचा या त्यातल्या त्यात गाजलेल्या कलाकृती ! पण खरी लोकप्रियता त्यांना रंगमंचाने दिली.

डॉ घाणेकर हे त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाले ते त्यांच्या बंडखोर व्यक्तिमत्वामुळे व हा बंडखोरपणा त्यांनी साकारलेल्या संभाजीत पुरेपुर उतरला होता. किंबहूना संभाजीच्या व्यक्तीरेखेमुळे हा बंडखोरपणा त्यांच्या स्वभावात आला असेही धाडस करुन म्हणता येईल. संगीत नाटकांची चलती अन् कृष्णधवल चित्रपटांच्या साचेबद्धतेमुळे एकसूरी झालेल्या प्रेक्षकांना डॉ घाणेकरांनी ज्याची नेमकी व्याख्या करता येणार नाही असा हवा हवा असणारा बदल, पर्याय म्हणून दिला. आणि प्रेक्षकांनाही ते भावले, त्यांच्या व्यक्तिरेखां म्हणूनच डोक्यावर घेतल्या गेल्या.

पण असे असले तरी डॉ घाणेकर यांच्या जीवनावर चित्रपट निघावा इतके ते महान होते का ? हा प्रश्न चित्रपट पाहून झाल्यावर मनात येतोच. जुन्या पिढीने डॉ घाणेकरांना पाहिले आहे. समकालीन रमेशदेव, राजा गोसावी यासारख्या कलावंतांनाही पाहिले आहे. त्यामुळे या मंडळींनी उत्सुकतेने हा चित्रपट पहाणे स्वाभाविक होते. नव्या पिढीला सुबोध भावेने भुरळ घातली आहे कारण अर्थातच झीमराठी, बालगंधर्व, नटसम्राट वगैरे. त्यामुळे नेटवर डॉ घाणेकरांची माहिती घेऊन चित्रपट पहाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

या दोन्ही किंबहुना ज्या ज्या मंडळींनी हा चित्रपट पाहिला त्या त्या मंडळींच्या तोंडी होता तो सुबोध भावे व त्याच्या अभिनय. चित्रपटातील अन्य कलावंतांविषयी फारसा उल्लेख ऐकिवात आला नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट आहे ती व्यक्ती म्हणजे डॉ काशिनाथ घाणेकर हे नाव चित्रपट पाहून झाल्यानंतर प्रेक्षकांच्या फारसे चर्चेत नसणे हे चित्रपटाचे यश म्हणायचे कि अपयश ? आज दुसऱ्या आठवड्यात या अप्रतिम चित्रपटाचे कौतुक करत बाहेर पडलो तेव्हा हाही प्रश्न मनात आला.

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, November 16, 2018

नाळ

काल "नाळ" चित्रपट पाहिला तोही प्रिमियर शो सिटी प्राईड कोथरुडला. सुरवातीच्याच टायटल्समधे झी स्टुडिओजचे म्हणून "परिणीता भुरे" नाव झळकलेल पाहिल.  असो...

सैराट ह्या निखळ व्यावसायिक चित्रपटानंतर "नागराज मंजुळे" या नावाने प्रादेशिक सीमा धुडकावून लावल्या. दुनियादारीने मराठी चित्रपट व्यवसाय हा कोटींमधे होऊ शकतो व तेही दोन अंकी कोटीतला आकडा ! तर सैराटने हा आकडा तीन अंकीही होऊ शकतो हे स्वप्न वास्तवात आणून दाखवले होते.

सैराटनंतर येणाऱ्या "नाळ"च्या प्रोमोजने या चित्रपटाची ऊत्सुकता चाळवतांना यावर वैदर्भीय भाषेची गोड झाक असल्याची चुणूक दिसून आली होती. आज चित्रपट पाहून झाल्यावर प्रकर्षीने जाणवले कि प्रोमोजमधे दिसणारा बालकलाकार हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू असून त्याच्या अभिनयाने चित्रपट वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. बालकलाकार आजवर अनेक पाहिले पण अभिनयाची इतकी जाण असणारा, बोलके डोळे व विलक्षण बोलका चेहरा असलेला हा पहिलाच बालकलाकार आहे. अर्थात, त्याच्याकडून इतके सुंदर काम करवून घेण्याचे श्रेय दिग्दर्शक व नागराज मंजुळे दोघांनाही द्यावे लागेल.

कँमेरा चालवणारा जर दिग्दर्शक असेल तर चित्रपटाची प्रत्येक फ्रेम किती ऊत्कृष्ट दिसते हे चित्रपट बघतांना पदोपदी जाणवते. अनेकदा कँमेरा लावलेल्या फक्त अँगल्समधून दिग्दर्शक बरेच काही सांगून जातो हे अनेक फ्रेम्समधे अनुभवायला मिळाल.

देविकाने आईची माया, व तिची होणारी जीवाची घालमेल हे सगळे संयमित अभिनयाने लाघवी केलय तर दीप्तीची निशब्द आई आपल्या डोळ्याने व चेहऱ्यावरील भावाने खूप बोलकी केली आहे. शेवटच्या प्रसंगांमधे तर तिची कावरीबावरी नजर, तिने भावनांवर ठेवलेला संयम तर या लहानग्याला एकदा तरी तिच्याशी नजरानजर व्हावी म्हणून त्याचेआसूसलेले डोळे व तसे चेहेऱ्यावरील भाव ... हे सारे प्रेक्षकांना गलबलून टाकणारे आहे. आणि इथे फिरणारा कँमेरा लाजबाब !

संपूर्ण चित्रपटात कँलिडोस्कोप हे खेळण, व्यालेल्या म्हशीचे रेडकू व म्हैस यासारख्यांचा प्रतिक म्हणून केलेला सूचक वापर वाखाणण्यासारखा आहे. दिग्दर्शकाचे कौशल्य व हुशारी यातून लक्षात येते. परंतू, ग्रामीण भागातील प्रेक्षकांना हे बारकावे व त्यांनी साधलेला परिणाम कितपत लक्षात येईल याबद्दल शंका आहे.

म्हणूनच  ग्रामीण बाज किंवा पार्श्वभूमि असलेला व करमणूकीऐवजी कलात्मक अंगाचे वळण घेणारा हा चित्रपट शहरातील प्रेक्षकांना अधिक भावेल असे वाटते. चित्रपट निःसंशय अप्रतिम सुंदर झालाय व "अवश्य पाहिलाच पाहिजे" कँटेगरीत मोडणारा आहे. अगदी नागराजच्या शब्दात सांगायचे तर "लय भारी झालाय".

आज प्रिमियर शोचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आसनमार्गाकडे जाणाऱ्या उतरत्या पायऱ्यांवर माझ्या खुर्चीलगत शेजारी झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी बसले होते तर त्यांचे शेजारी नागराज मंजुळे, त्यांच्यापुढे देविका वगैरे !

आपल्या चित्रपटांनी कितीही उत्तुंग यश मिळवले, प्रसिद्धी मिळवली तरी या चित्रपटाच्या कलाकारांनी प्रसंगी (जागेअभावी) पायरीवर बसून चित्रपट पाहतांना आपली नाळ प्रेक्षकांशीच जोडलेली आहे हे दाखवून दिले. चित्रपट पाहून आल्या आल्या सुचल व लक्षात आल ते लिहिलय. फर्स्ट इंम्प्रेशन कि काय ते ! नंतर लिहायला बसल तर आठवत नाही न !

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, November 9, 2018

आठवणीतला भाऊबीजेचा दिवस !

आठवणीतला भाऊबीजेचा दिवस !

लक्ष्मीपूजन व पाडवा.. बँकेला सुट्ट्या दोनच दिवस, भाऊबीजेला सहसा सुट्टी नसायची. पाडवा भाऊबीज एकाच दिवशी अशी अपवादात्मक स्थिती आल्यास भाऊबीजेला सुट्टी मिळायची. बँकेत आता स्थानिक मंडळी कमी अन् बाहेरगावची, परराज्यातील मंडळींची संख्या जास्त यामुळे सणवाराला रजा मागणाऱ्यांची संख्या मोठी असायची. रजा मिळालेला स्वतःला भाग्यवान समजत असे. आम्ही स्थानिक मंडळी अशा प्रसंगी रजा घेणे टाळत असू, किंबहूना एखाद्याला रजा मिळावी म्हणून प्रसंगी मँनेजरकडे त्याची रदबदली करत असू. कामाचा खूप ताण आला तर आम्ही आहोत, काळजी करु नका असे आश्वस्त केले कि अशा मंडळींची रजा मंजूर व्हायची. बोनस मिळत असे त्या काळात होणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यामुळे आम्हाला मिळायचा.

अशीच एक दिवाळी आठवते. तेव्हा रास्ता पेठ ब्रँचला होतो. रजेवर खुपजण होते. या शाखेच टेलर काऊंटर संभाळणे हे मोठच दिव्य होत. कँश डिपॉझिट मशिन्स तेव्हा आलेली नव्हती. त्यामुळे सकाळी काऊंटर सुरु होण्याआधीच १०-१५ मिनिटे कस्टमर्सची रांग लागलेली असायची. पाच तास काऊंटर सुरु असे त्यात ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक म्हणजे प्रत्यक्ष काम २७० मिनिटे चालायच. या वेळात अक्षरशः कधी कधी ३०० व्हाउचर्स व्हायची. २२५ वगैरे म्हणजे आज "स्लँक होता" असे म्हटले जायचे. पण माझ्या कामाची पद्धत व शिस्त अशी होती कि ३.३० ला काऊंटर बंद झाले कि साधारण पुढच्या २० मिनिटात किवा फार फार तर ४ वाजेपर्यंत कँश टँली होत असे, अगदी दिवाळीच्या दिवसातला हेवी रश असला तरी !

कालच भाऊबीज झाली आणि पुनः एकदा २०११ सालचा तो भाऊबीजेचा दिवस माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला! गर्दी नेहमीप्रमाणे तुफान ! परराज्यात पैसे पाठवणाऱ्यांची जेवढी गर्दी तेवढीच पैसे काढणाऱ्यांचीही. पैसे काढणाऱ्या एकाने स्लिप सरकवली. रक्कम होती ₹२५,०००/- रांगेत किमान १५-२० जण कायम असायचे. यांत्रिक पद्धतीने हाताची बोट कॉम्पुटर की बोर्डवरुन मराभर फिरत होती. स्लिप घेतांना चेहेरा पाहिलेला असायचा त्यामुळे सही चेक केली कि F10 करुन transaction नंबर टाकायचा. नोटा हातांनी एकदा मोजायच्या मग मशिनमधे टाकून confirm करायच्या. काऊंटरवरच्या छोट्या display वर आकडा यायचा तो कस्टमर पहात असे. तरी पैसे देतांना "मोजून घ्या" अस मी म्हणायचो... म्हणायचो कसल ? तेही यांत्रिक पद्धतीने तोंडातून निघत असे. दिवाळी असल्यामुळे "हँपी दिवाली" किंवा "शुभ दीपावली" अशा शुभेच्छांची सस्मित देवाण घेवाण व्हायची !

नंतर पुढचा कस्टमर आला, तीच रक्कम होती ₹२५,०००/- त्याच प्रकारे व्यवहार पूर्ण झाला. नंतर पुढे लागोपाठ दोघांनी ₹२५,०००/- काढले. त्यापुढचा मात्र पैसै भरणारा होता पण रक्कम तीच. त्यामुळे हा आकडा डोक्यात बसला अन् त्यानेच पुढे गडबड उडवून दिली. कारण त्यानंतरच्या व्यक्तीची स्लिप होती ₹२०,०००/- ची, मी कम्प्युटरवर नोंदही त्याच रकमेची केली पण पैसे देतांना मात्र दिले ₹२५,०००/-. काऊंटर बंद झाले, ३.५० झाले तरी कँश टँली नव्हती ₹५,०००/- कमी लागत होते. मी परत एकदा आकडेमोड, नाणेवारी तपासली व व्हाउचर्स तपासू लागलो. बरोबर दहाव्या मिनिटाला ही स्लिप हाती लागली. एन्ट्री बरोबर ₹.२०,०००/-ची केली होती मात्र पैसे देतांना ₹२५,०००/- दिल्याचे स्लिपमागे नोटांचा लिहिलेला तपशील दर्शवत होता.

कम्प्युटरवर खाते नंबर टाकला व फोन नंबर, पत्ता, नाव कागदावर लिहून घेतल. फोन लावला .. नंबर अस्तित्वात नाही आवाज कानाने ऐकला. जो पत्ता होता त्यावर जायच ठरवल. जाऊन येइपर्यंत त्याच्या अकाऊंट ओपनिंग फॉर्म रोहिदासला काढून ठेवायला सांगितला. दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो तर तिथे एका कंपनीचे ऑफिस होते. मासिक हप्त्यावर ग्रुहोपयोगी वस्तू विकणाऱ्या कंपनीचे ते कार्यालय ! चौकशी करता कळले कि किरण शिलवंत हा त्यांच्या स्कीमचा सदस्य होता. अशा स्कीममधे सामील होणाऱ्या प्रत्येकाला बँक खाते काढणे सक्तीचे होते. त्यामुळे स्कीमच्या काळात अशी तीनशेहून अधिक खाती रास्ता पेठ शाखेत उघडण्यात आली होती व या सगळ्यांना ओळख म्हणून या कंपनीनेच सह्या दिल्या होत्या. माझा प्रॉब्लेम ऐकल्यावर त्या बिचाऱ्यांनी जुने रेकॉर्ड शोधून त्यांच्याकडे असलेला त्याचा घरचा पत्ता मला दिला. एक टप्पा यशस्वी पार पाडून मी ब्रँचमधे परतलो.

दिलेल्या पत्त्यावर जण्यासाठी माझ्यासोबत रोहिदास, तानाजी हे दोघे शिपाईबंधू तयार झाले. अकाऊंट ओपनिंग फॉर्म असलेला जाडजूड बाईंडर सोबत होताच. पर्वतीच्या जवळ इंदिरा जनता वसाहत बोर्डजवळ स्कूटर लावल्या. एका किराणा दुकानाबाहेर रेशनिंग धान्याचा बोर्ड दिसला. विचार केला कि इथे नक्की पत्ता कळू शकेल. चौकशी केली, अंदाज बरोबर ठरला होता. झोपडीसारखी वाटणारी दाटीवाटीने वसलेली पक्की घरे दुतर्फा होती. एका वेळी एक किवा दोन जणच जा ये करु शकतील इतका चिंचोळा रस्ता मधे होता. इतक्या लहान जागेतही प्रत्येकाच्या दारासमोर काढलेली रांगोळी त्या गरीब वस्तीचा दिवाळी आनंद व्यक्त करत होती.

काही दारात बसलेली तर काही दारात उभी असलेली मंडळी आमच्याकडे प्रश्नार्थक, संशयित नजरेने बघत होती. सोबत असणाऱ्या शिपाई बंधूंचा पांढरा ड्रेस व माझा साहेबी वाटणारा ड्रेस यामुळे आम्ही कार्पोरेशनची नोटिस बजावणारे किंवा एनपीए रिकव्हरीला आलेले वाटत होतो. त्यांच्या रोखलेल्या, भेदक भासणाऱ्या नजरांची मला थोडी भिती वाटत होती. तो कस्टमर भेटेल का ? पैसे परत मिळतील का ? या प्रश्नांची जागा काही क्षण या अनामिक भितीने घेतली होती. एखाद्या झोपडपट्टीत अवैध उद्योगधंदे चालविणाऱ्या डॉनला झडपण्यासाठी येणाऱ्या पोलिसांवर अचानक चहुकडून हल्ला होणारा चित्रपटातील सीन विनाकारण, अवेळी माझ्या डोक्यात आला आणि क्षणभर जीवाचा थरकाप उडाला. अनाहूतपणे मी चहुकडे नजर फिरवली. सगळ काही निवांत पाहून मनातल्या मनात मी हुःश केल.

तेवढ्यात तानाजी म्हणाला "साहेब, हेच घर आहे" त्याचा आवाज ऐकून मिणमिणता दिवा असलेल्या त्या अंधाऱ्या खोलीतून एक वयस्कर  ग्रुहस्थ बाहेर आला. ठेवणीतला पायजमा शर्ट असा वेश ... बहुदा दिवाळी म्हणून अंगावर आला असावा. चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह अन् भिती स्पष्ट दिसत होती. मी हात जोडून "नमस्कार दादा ! मी बँक ऑफ बरोडा, रास्ता पेठ शाखेचा कँशियर. माझ नाव ....... "  माझी ओळख करुन देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसे त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर भितीच्या जागी मंदसे स्मित उमटल पण प्रश्नचिन्ह तसच होत.

"किरण शिलवंत इथेच रहातात ना ?" माझा प्रश्न ! "व्हय, माझच पोरग हाय त्यो, पर आता कामावर गेलाय. काय काम व्हत ?" समोरुन कबूली अन् प्रतिप्रश्न ! मग मी शांतपणे समजावून सांगितल .. "दादा, आज ते बँकेत पैसे काढायला आले होते. दिवाळीमुळे खुप गर्दी होती. लागोपाठ एकाच रकमेची ₹२५,०००/- ची पेमेंट झाली. किरणच पेमेंट ₹२०,०००/- च होत पण माझ्याकडून चूक झाली, मी त्यालाही ₹२५,०००/- दिले. आता मला बँकेत कँश जुळवायची आहे. ₹५,०००/- कमी लागतयत. आमच्याकडे किरणचा जो नंबर आहे तो बंद आहे. त्यामुळे आम्ही पत्ता शोधत इथे आलो." माझ बोलण ऐकून आतून एक वयस्कर बाई बाहेर आल्या. "अहो साहेब, आत तरी या. तुमच पैस कुटबी नाय जानार. नका काळजी करु." बहुदा किरणची आई असावी. आम्ही घरात पाऊल टाकले तस .. बहुदा किरणची पत्नी असावी .. तिने एक लोखंडी घडीची खुर्चीपुढे सरकवून बसण्याची विनंती केली.

वडिल म्हणाले "साहेब, बसा मी फोन लावतो किरणला." एका फोन कॉलचा त्यांना भुर्दंड कशाला या विचाराने मी माझा फोन पुढे करत म्हटले, "दादा, याच्यावरुन लावा फोन !" त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करत व फोन लावला. "हँलो, किरण आरsss हे बँकेच साहेब घरी आल्यात बग, बोल हिकड" असे म्हणत त्यांनी माझ्याकडे फोन दिला. मी फोनवरुन बोलतांना आधी माझा परिचय दिला व मग बँकेतला घटनाक्रम सांगत विचारले कि किती पैसे काढले ?" किरण म्हणाला ₹२०,०००/- मग पुढचा प्रश्न .. कोणत्या नोटांमधे पेमेंट घेतल ? तो म्हणाला पाचशेच्या ! मी विचारल किती नोटा होत्या ? किरण म्हणाला "साहेब, मोजल्या नाहीत. अजून तसेच आहेत खिशात. तुम्ही दिले कि आम्ही डायरेक्ट खिशात टाकतो, कधीच मोजत नाही. तुमच्यावर भरवसा आहे." मी त्याच्या बोलण्याने थोडा सुखावलो आणि त्याला म्हटले कि मोजा आता, मी फोन होल्ड करतो ..." साधारण एक मिनिटानंतर पलिकडून उत्तर "साहेब, पन्नास नोटा आहेत, ₹५,०००/- जास्त आहेत." माझा जीव भांड्यात पडला. मग पैसे कुठे व कसे द्यायचे याचा निर्णय झाला अन् फोन बंद करुन मी परत दिला.

एव्हाना घरच्या मंडळींनाही सगळ्या प्रकाराचा अंदाज आला होता. म्हातारी म्हणाली "साहेब, मी बोलली नवती तुमाला कि पैस कुटबी न्हाय जानार म्हनून" मी किरणच्या प्रामाणिकपणाच कौतुक केल व त्याच श्रैय त्याच्या आई वडिलांना, त्यांच्या शिकवणूकीला दिले. "साहेब फराळ करा दिवाळीचा, तोपर्यंत चहा टाकते." किरणच्या बायकोची विनंती नाकारण्याच खर तर काहीच कारण नव्हत पण घड्याळात एव्हाना सहा वाजले होते. ब्रँचला जाऊन कँश आटपायची, मग घरी जाऊन भाऊबीजेसाठी बहिणीकडे जायच होत. त्यामुळे फराळ, चहापाणी यात वेळ घालवण शक्य नव्हत. म्हणून मी तिला म्हणालो "राहू द्या ताई आता. आम्हाला खूप ऊशीर झालाय. काम आटोपून मग बहिणीकडे जायचय, आज भाऊबीज आहे न !"

"आत्ताही तुम्ही बहिणीच्याच घरात आहात कि दादा" त्या आवाजात क्रुत्रिमता नव्हती, प्रेमाच आर्जव होत. ते एक वाक्य या मंडळींच्या मनाची श्रीमंती दाखवून गेल. या श्रीमंतीने त्या घरात पावलोपावली दिसणाऱ्या गरीबीच्या ठळक खुणा मला दिसेनाश्या झाल्या. घर, गाडी, दागदागिने यासारख्या वस्तू हा एखाद्याची श्रीमंती मोजण्याचा मापदंड असतो या माझ्या समजूतीला आज छेद गेला होता. हातावर चिमूटभर साखर ठेवण्याची माझी विनंती तिने स्वीकारली. "परत या एकदा चहाला" अशा तिच्या प्रेमळ आग्रहाला "हो नक्की येईन" अस आश्वासन दिल आणि साखर तोंडात टाकून आम्ही बाहेर पडलो. अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या सुदामाला श्रीक्रुष्णाच्या श्रीमंतीचा मोह कधीच पडला नाही. त्याच्यातल्या प्रामाणिकतेने न मागताही त्याला सारे काही मिळाल होत. तशी किरणच्या कुटूंबियावर त्या मुरलीधराची क्रुपा व्हावी अस मला क्षणभर वाटून गेल.

पुनः कधीतरी त्या घरात फराळाला जाईन अस मनाशी ठरवल होत, तस त्यांना आश्वासनही दिल होत पण नाही जमल अजून !

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

Monday, November 5, 2018

भावना आणि कर्तव्य !

भावना आणि कर्तव्य !

जवळ जवळ १८ तासांचा प्रवास संपवून अविनाश मुंबईत विमानतळावर उतरणार होता. लँडिंगची अनाउन्समेंट झाली तसा तो अधिरतेने खिडकीबाहेर पाहू लागला. धावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र ढगांच्या आड खाली दिसणारी रांगोळीच्या ठिबक्यांसारखी छोटी छोटी घरे व हिरवी गार शेते मागे पडत होती तसा ठिबक्यांच्या दाटीत हिरवा गालिचा लुप्त होत चालला होता. ठिबके मोठे होत होते, बहुमजली ईमारती दिसू लागल्या होत्या. विमानाच्या पायऱ्या उतरुन मायभुमीवर त्याने पाऊल ठेवल तस एक क्षणभर जागेवर उभे रहात त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. "अपने मिट्टीकी खुशबू" कशाला म्हणतात ते आज तो अनुभवत होता. आजूबाजूचे व मागून येणारे प्रवासी बघत होते पण त्याला परवा नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरील मंद स्मित खूप काही सांगून जात होत.

 

कधी एकदा घरी पोहोचतो असे त्याला झाले होते. बेल्टवरून आलेले लगेज त्याने उचलले आणि विमानतळाबाहेर आला. बुक केलेली कँब समोर आली तसे त्याने घाईने सामान डिकीत टाकले. आताआणखी तीन तासांनी घरी असेन या विचाराने तो सुखावला होता. या दोन वर्षांच्या काळात त्याचा आई वडिलांशी नियमित संपर्क होता. पण गेल्या दोन महिन्यात आईशी मात्र त्याच बोलण झाल नव्हत त्यामुळेच कधी एकदा घरी पोहोचतो अस त्याला झाल होत.

 

एका महत्वाच्या प्रोजेक्टवर कंपनीने त्याला दोन वर्षांपूर्वी युएसला पाठवले होते. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास कंपनीला मोठी व्यावसायिक झेप घेण शक्य होणार होत आणि देशासाठीही ती अभिमानाची बाब ठरणार होती. त्यामुळे कोणाला पाठवायचे हा प्रश्न पुढे आला तेव्हा बोर्ड मिटिंगमधे अविनाशचेच नाव एकमुखाने पुढे आले होते. अविनाशनेही कंपनीचा विश्वास सार्थ ठरवला होता. तो भारतात पोहोचण्या आधीच अनेक नव्या ऑफर्सचे इमेल कंपनीला येणे सुरु झाल होत.

 

अविनाश लहानपणापासून हुषार होताच पण विशेष म्हणजे मोठे झाल्यावर काय व्हायच, काय करायच हे त्याने नववीत असतांनाच ठरवले होते. स्मार्ट फोनच्या आहारी गेलेल्या समवयस्क मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही त्याचा आदर्श ठेवावा, इतरांना सांगावा इतका तो परफेक्ट होता. सचिनच्या बँटमधून निघणारा स्ट्रेट ड्राइव्हचा नेत्रदीपक फटका जसा कॉपी बुक स्टाईल असतो, अमीरखान जसा मि. परफेक्शनिस्ट असतो तसच अविनाशच त्याच्या करियरबाबदच्या विचारांच होत. म्हणूनच संगणक तज्ञ अविनाश आज एका आघाडीच्या कंपनीत उच्च पदावर होता. 

 

युएसमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी त्याला गलेलठ्ठ पगार देतांना कायमचे नागरिकत्व मिळवून देण्याची तयारी दर्शवली होती. पण आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग या देशाच्या प्रगतीसाठीच करायचा हा त्याचा तात्विक, वैचारिक चौकटीतला द्रुढनिश्चय होता. आई वडिलांच्या उतारवयात जेव्हा त्यांना आधारासाठी आपली खरी गरज असते तेव्हा करियरचा मुखवटा पुढे करुन आपला स्वार्थ, प्रगती साधण्यासाठी त्यांना कधीही सोडून जायच नाही हा त्याचा असाच आणखी एक तात्विक ठाम निर्णय ! त्याच्या आई वडिलांना त्याच्या अशा विचारांचा, अशा निर्णयांचा अभिमान वाटत असला तरी "प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तेव्हा  आमची काळजी न करता तू नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस" असे त्याला वेळोवेळी त्यांनी स्पष्ट केले होते. 

 

सलग तीन दिवस मिटींग वर मिटींग सुरु होत्या. युएस प्रोजेक्टची जबाबदारी अविनाशवर येणार हे पहिल्या दिवशीच जवळजवळ नक्की झाल होत. प्रोजेक्टचे डिटेल्स निश्चित करण्यासाठी अविनाशने मिटींग तीन दिवस लांबवली असे वरकरणी दिसत असले तर या तीन दिवसात अविनाश आई वडिलांना एकटे सोडून जाण्यासाठीची स्वतःच्या मनाची तयारी करत होता. आज निर्णयावर कंपनीने शिक्कामोर्तब केल होत. पासपोर्ट, व्हिसा व अन्य तयारीसाठी १५ दिवसांचा अवधी होता. घरी गेल्यावर जेवतांना आजच आई वडिलांच्या कानावर घालायला हव. आपल्या मनाला निर्णय घेतांना तीन दिवस किती त्रास झाला हे लक्षात घेता आई वडिलांना आज सांगितल म्हणजे १५ दिवसांनंतर निरोप देतांना त्यांच्या मनाची तयारी झालेली असेल. या विचारांनी त्याला क्षणभर गलबलून आले. 

 

जेवणाच्या टेबलवर तिघेही बसले होते. काय हव नको पाहून आई नंतर बसली. अविनाशचे जेवतांना आज असलेल अबोलपण लक्षात येण्यासारखे होते त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे पहात होते तर कशी व कुठून सुरवात करायची या विचारात अविनाश घास तोंडात टाकत होता. "आज ऑफिसमधे फार काम होत का रे ? थकलेला दिसतोस खूप आज !" बाबांनी शांततेचा भंग करुन कोंडी दूर केली. "गेल्या दोन दिवसांपासून बघते आहे मी. एक आठ दिवस रजा घेऊन विश्रांती घे जरा म्हणजे बर वाटेल" आईच्या ममतेने बाबांच्या बोलण्याची री पुढे ओढली. “आई, थोडी खिचडी वाढ अजून” अविनाश आपल्याच विचारात होता. गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या तब्येतीची कुरबुर सुरु होती. अविनाश म्हणालाही होता कि “एकदा डॉक्टरांना दाखव, काही टेस्ट करायच्या असतील तर करून घे."  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टेस्ट झाल्या, रिपोर्ट आले होते. आज अविनाशच्या कानावर सगळ काही घालायचं हे दोघांनीही ठरविले होते. पण अविनाशच्या या स्थितीत एका नवीन चिंतेची भर जेवतांना टाकायचे धाडस दोघांनाही झाले नाही.

 

जेवणे आटोपून तिघेही हॉल मध्ये बसले असता अविनाश मनाचा निर्धार करून बोलता झाला. “बाबा, कंपनीचा एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे व तो मीच हँडल करावा असा कंपनीचा निर्णय झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्याच मिटींग्ज सुरु होत्या. मी हा प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी घ्यावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण मनातून मलाही हे पूर्णपणे माहित होते कि माझ्याशिवाय हे दुसरे कोणी हँडल करू शकणार नाही.” इतक बोलून होताच अविनाशला निम्म मानसिक दडपण कमी झाल्यासारखे वाटून गेले. “अरे, मग चांगले आहे कि ! नवीन जबाबदाऱ्या, नवीन आव्हाने यांना सामोरे जायला तर तुला आवडतेच ना ? तुझ्या हुशारीचा ज्ञानाचा कंपनीला व देशाला उपयोग होतो आहे ही तर अभिमानाची गोष्ट आहे.” बाबा लहानपणी एखादी गोष्ट समजावून सांगतांना पाठीवरून मायेने हात फिरवायचे तसा आभास अविनाशला खूप वर्षांनी पुन: आज झाला.

संभाषण सुरु होते आणि आई मूक श्रोता होती. “बाबा, तुम्ही म्हणता आहात ते अगदी बरोबर आहे, मला पटतेही आहे. पण, यासाठी मला यूएसला जावे लागणार आहे व तेही तब्बल दोन वर्षांकरिता !” या वाक्यानिशी आईचा चेहरा एकदम उतरला, डोळे पाणावले व ती एक टक अविनाशकडे पाहू लागली. “कालावधी वाढूही शकतो आणि तुम्हाला इतक्या मोठ्या कालावधीसाठी एकटे सोडून जाण्याचे धाडस अजून होत नाहीये माझ !” अविनाशचा आवाजतला कातर स्वर दोघांनाही जाणवला.

 

“कधी निघायचं आहे ?” आईने धीर एकवटून प्रश्न केला. “साधारण १५ दिवस ते तीन आठवडे आहेत अजून !” या अविनाशच्या उत्तरावर आई म्हणाली “काय काय तयारी करायची आहे सांग. मला जमेल तसे रोज थोडे थोडे करत जाईन. हल्ली मला खूप थकवा येतो रे ! ती असली असती तर मला काही बघायला लागले नसते आणि दुसरे लग्न कर म्हणणे आम्ही कधीच थांबवलंय.” नकळत आईच्या मनातली वेदना आज खूप दिवसांनी पुन: एकदा बाहेर पडली होती. जेमतेम दोन वर्षांचा लग्नाचा सहवास. काही चूक नसतांना एका ट्रकने अवनीला उडविले होते. तिच्या अपघाती मृत्यूचे दु:ख अविनाश विसरू शकत नव्हता. अवनीच्या दोन वर्षांच्या सहवासातील सुखद आठवणी त्याला पुसायच्या नव्हत्या. आपल्या विचारांवर व निर्णयांवर ठाम रहाण्याचा अविनाशचा स्वभाव आई वडिलांना माहित होता त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी दुसऱ्या लग्नाचे टूमणे लावणे बंद केले होते.

 

निघण्याची तयारी सुरु होती. अविनाशने एक लँपटॉप आणला होता. त्याचा स्काईप कँमेरा वापरून एकमेकांशी कसे बोलायचे ते या १५ दिवसात दोघांनाही त्याने शिकवून ठेवले. युएसला गेल्यानंतर दर शुक्रवारी व सोमवारी एकमेकांशी बोलायचे असे त्यांनी एकमताने ठरवून टाकले होते. जाण्याचा दिवस उजाडला. अविनाशने दोघांनाही नमस्कार केला. आईने हातावर दही ठेवले व खालच्या आवाजात म्हणाली, “विमानतळावर येऊन काय करायच ? नाहीतरी आतपर्यंत येऊ देत नाहीत ! त्यापेक्षा इथेच तोंडभरून पाहू दे.” अविनाशने डाव्या हातानी आईला जवळ घेतले व म्हणाला “अग, असे काय करतेस, स्काईपवरुन आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत आपण. फक्त तुझा मायेचा स्पर्श व तुझ्या हातचे जेवण मिस करणार बघ मी दोन वर्ष ! पण आल्यावर त्याची भरपाई करणार आहे बर का मी पुरेपूर !” चेहऱ्यावर उसने हास्य आणत अविनाश गाडीत बसला व गाडी दिसेनाशी होईपर्यंत आई बाबा हात हलवून निरोप देत होते.

 

कँब पुण्याकडे भरधाव वेगाने निघाली असतांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या कंपनीच्या निर्णयापासून ते घर सोडेपर्यंतच्या सगळ्या आठवणी अविनाशच्या बंद डोळ्यासमोर क्रमाक्रमाने येत होत्या. यूएसला गेल्यानंतर पहिला एक महिना स्काईपवर गप्पा मारतांना अडचणी आल्या पण नंतर मात्र आई बाबांना सराव झाल्याचे त्याने अनुभवले होते. मात्र गेल्या दीड महिन्यात स्काईपवर केवळ दोनच वेळा बोलणे झाले व तेही फक्त बाबा बोलले होते. एकदा आई दवाखान्यात गेली आहे म्हणाले तर दुसऱ्या वेळी म्हणाली कि ती झोपली आहे व हे बोलता बोलता काहीतरी बिघाड होऊन स्काईप बंद पडला होता. बहुतेक स्काईपला किंवा कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला असावा या समजुतीने अविनाशने थोडे दुर्लक्ष केले.  आणि दुसरे म्हणजे प्रोजेक्ट ठरल्यावेळेपेक्षा १५ दिवस आधेच पूर्ण होत होता. त्यामुळे आता प्रत्यक्षच भेटूनच सरप्राईज देऊ असा त्याने विचार केला.

 

साहेब, मॉलला थांबायच का ?” कँब ड्रायव्हरने विचारले तशी अविनाशची तंद्री भंग पावली. “नको अरे, डायरेक्ट जाऊ आपण. पण तुला चहाची तल्लफ असेल तर थांबूया रे बाबा. माझ्यासाठी तुझी तल्लफ नको मारूस !” अविनाश म्हणाला तसे ड्रायव्हर नुसताच हसला. कँब घराच्या दारासमोर उभी होती. अविनाशने सामान घेतले व दारावरची बेल दोनवेळा दाबली. मी जेव्हा जेव्हा बाहेरून येईन तेव्हा अशी दोन वेळा बेल वाजवत जाईन असे अविनाशने सांगितलेले होते. गेल्या दोन वर्षात मात्र आई बाबांची अशी डबल बेल ऐकायची सवय मोडली असणार आणि ही बेल ऐकून त्यांना मी आल्याचा भास होईल, दार उघडून मला प्रत्यक्ष बघतील तेव्हा .... “ नुसत्या कल्पनेने अविनाशच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले.

 

बाबांनी दार उघडले आणि त्याला पाहताच “अविनाश” असे म्हणून त्याला मिठीच मारली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत अविनाशने त्यांना नमस्कार केला. बँगा घेऊन तो आत आला तसा त्याने टेबलवर आईचा हार घातलेला फोटो पहिला आणि त्याच्या हातातून बँगा खाली गळून पडल्या. त्याने रडवेल्या आवाजात विचारले “बाबा, हे काय ? कधी झाल ?” “तीन आठवडे झाले अवि. जाईपर्यंत तुझी सारखी आठवण काढत होती. मी म्हटले तिला कि स्काईपवरून आपण बोलू त्याच्याशी, सगळे काही सांगू त्याला. पण नको म्हणायची ! त्याला कळले तर सगळे सोडून येईल तो. इतकी मोठी जबाबदारी आणि काम संपत आले असतांना कशाला थोडक्यासाठी त्याला डिस्टर्ब करताय. तिच्या या हट्टाला न जुमानता मी त्या दिवशी स्काईपवर तुला सगळे काही सांगणार होतो पण तिने काहीतरी बटणे दाबून स्काईप बंद करून टाकला व मला शपथ घातली. तेव्हापासून तो लँपटॉप बंद करुन ठेवलाय.”

बाबा सगळ काही सांगत होते अन अविनाश स्तब्ध होऊन ऐकत होता. “अविनाश, अरे ज्या दिवशी तु यूएसला जाण्याचा निर्णय आम्हाला सांगितलास ना त्याच दिवशी तिचे रिपोर्ट्स आले होते. जेवतांना तुला कसे सांगायचे याचा विचार करत आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. तूच आम्हाला खूप टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत असल्यामुळे तिने ठरविले कि तुला दोन तीन दिवसानंतर सांगू. पण तुझे युएस चे जाणे तू सांगितल्यानंतर दुसरे दिवशी तिने मला बजावले कि माझ्या या आजाराविषयी अविनाशला एक अक्षरही कळता कामा नये. आपण त्याला अनेकदा सांगितले आहे ना कि प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तर आमची काळजी न करता नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस म्हणून ! मग आता त्याच्या पायात खोडा नाही घालायचा आपण ! त्याला जाऊ दे, भरारी घेऊ दे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचा निश्चय पक्का होता. तुझीच आई ती, प्रत्यक निर्णयावर ठाम राहणारी.”

 

कंपनीचे नाव व देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज ऑफिसमध्ये अविनाशचा विशेष सत्कार होत होता. सत्कारानंतर बोलतांना अविनाशने या यशाचे सारे श्रेय आईला बहाल केले. तिच्या आजाराबद्दल कळले असते तर कदाचित हा प्रोजेक्ट अर्धवट सोडून मी परतलो असतो, कदाचित करार मोडल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक दंड बसला असता, देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही तिची शिकवण ! कदाचित् माझ्याकडून या शिकवणीला तडा गेला असता म्हणून तिने मला काहीच कळू दिले नाही पण ती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत ही शिकवण जगली. अविनाश बोलत होता, कंपनीचा सगळा स्टाफ भावूक होऊन हे सगळे ऐकत होता. पहिल्या रांगेत बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान, आनंद याचे संमिश्र भाव होते अन डोळ्यात अश्रू !

 

 © बिंदुमाधव भुरे, पुणे