Thursday, November 22, 2018

डॉ घाणेकर - एक चित्रपट

डॉ घाणेकर - एक चित्रपट

सोशल मिडिया व वाहिन्यांवर झालेल्या प्रोमोज् व प्रमोशन्समुळे डॉ काशिनाथ घाणेकर कधी प्रदर्शित होतोय व कधी पहातोय असे झाले होते. एखाद्या चित्रपटाविषयी गेल्या आठवड्यापर्यंत "काहीही माहिती नसणे" आणि आज "कधी पहातोय असे होणे" ही किमया आहे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाची व आधुनिक प्रचार-प्रसार माध्यमांची. हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवतोय, कदाचित आणखी एखाद दोन आठवडे चित्रपटगृहात टिकून राहिल.

ज्या कालखंडातला हा चित्रपट आहे त्या काळात एखादा चित्रपट तिकिटबारीवर किती चालणार किंवा रौप्यमहोत्सव करणार का हे एक दोन आठवड्यानंतर कळायचे. महिनाभरानंतर निवांतपणे जाणाऱ्या मंडळींची संख्या त्याकाळी मोठी असायची. आज मल्टीप्लेक्समुळे शोज् ची संख्या वाढली आहे, परिणामी २-३ आठवड्यात चित्रपटगृहावरील पोस्टर्स बदलेली दिसतात. अर्थात, चित्रपटांची वाढलेली संख्या, मल्टिप्लेक्समुळे वाढलेली शोज् ची संख्या, हाताळल्या जाणाऱ्या विषयात असणारे वैविध्य या घटकांचाही तो एक स्वाभाविक परिणाम म्हणता येईल.

चित्रपट स्रुष्टीतील अनेक कलाकार त्याच्या विक्षिप्तपणा, मूडी स्वभाव, सेटवरील भांडणे, ऊशीरा येणे, व्यसनाधीनता या सारख्या कारणांमुळे कायमच चर्चेत रहातात. जुन्या काळातील राजकुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना ही वानगीदाखल काही नावे. अलिकडे संजयदत्त हा आधी त्याच्या व्यसनाधिनतेमुळे व नंतर अतिरेक्यांशी असलेल्या संबंधातून झालेल्या शिक्षेमुळे चर्चेत राहिला. यामुळे सर्वसामान्यांसाठी असे सेलिब्रेटीज व त्यांचे व्यक्तिगत आयुष्य हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू यातील संभाजीला डॉ घाणेकरांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले होते.  अर्थात यात लेखकाचाही वाटा तेवढाच मोठा आहे हे नाकारता येणार नाही. अश्रूंची झाली फुले (याची लोकप्रियता बघून हिंदीत आसू बन गए फूल आला) व गारंबीचा बापू या आणखी काही लोकप्रिय ठरलेल्या कलाकृती ! मूलतः डॉ घाणेकर हे रंगमंच कलाकार व त्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा चित्रपट क्षेत्राला मोह झाला असे म्हणता येइल. परंतु त्यांच्या चित्रपटांनी इतिहास रचला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पाठलाग, मधूचंद्र, देवमाणूस व हा खेळ सावल्यांचा या त्यातल्या त्यात गाजलेल्या कलाकृती ! पण खरी लोकप्रियता त्यांना रंगमंचाने दिली.

डॉ घाणेकर हे त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाले ते त्यांच्या बंडखोर व्यक्तिमत्वामुळे व हा बंडखोरपणा त्यांनी साकारलेल्या संभाजीत पुरेपुर उतरला होता. किंबहूना संभाजीच्या व्यक्तीरेखेमुळे हा बंडखोरपणा त्यांच्या स्वभावात आला असेही धाडस करुन म्हणता येईल. संगीत नाटकांची चलती अन् कृष्णधवल चित्रपटांच्या साचेबद्धतेमुळे एकसूरी झालेल्या प्रेक्षकांना डॉ घाणेकरांनी ज्याची नेमकी व्याख्या करता येणार नाही असा हवा हवा असणारा बदल, पर्याय म्हणून दिला. आणि प्रेक्षकांनाही ते भावले, त्यांच्या व्यक्तिरेखां म्हणूनच डोक्यावर घेतल्या गेल्या.

पण असे असले तरी डॉ घाणेकर यांच्या जीवनावर चित्रपट निघावा इतके ते महान होते का ? हा प्रश्न चित्रपट पाहून झाल्यावर मनात येतोच. जुन्या पिढीने डॉ घाणेकरांना पाहिले आहे. समकालीन रमेशदेव, राजा गोसावी यासारख्या कलावंतांनाही पाहिले आहे. त्यामुळे या मंडळींनी उत्सुकतेने हा चित्रपट पहाणे स्वाभाविक होते. नव्या पिढीला सुबोध भावेने भुरळ घातली आहे कारण अर्थातच झीमराठी, बालगंधर्व, नटसम्राट वगैरे. त्यामुळे नेटवर डॉ घाणेकरांची माहिती घेऊन चित्रपट पहाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

या दोन्ही किंबहुना ज्या ज्या मंडळींनी हा चित्रपट पाहिला त्या त्या मंडळींच्या तोंडी होता तो सुबोध भावे व त्याच्या अभिनय. चित्रपटातील अन्य कलावंतांविषयी फारसा उल्लेख ऐकिवात आला नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट आहे ती व्यक्ती म्हणजे डॉ काशिनाथ घाणेकर हे नाव चित्रपट पाहून झाल्यानंतर प्रेक्षकांच्या फारसे चर्चेत नसणे हे चित्रपटाचे यश म्हणायचे कि अपयश ? आज दुसऱ्या आठवड्यात या अप्रतिम चित्रपटाचे कौतुक करत बाहेर पडलो तेव्हा हाही प्रश्न मनात आला.

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment