Friday, November 9, 2018

आठवणीतला भाऊबीजेचा दिवस !

आठवणीतला भाऊबीजेचा दिवस !

लक्ष्मीपूजन व पाडवा.. बँकेला सुट्ट्या दोनच दिवस, भाऊबीजेला सहसा सुट्टी नसायची. पाडवा भाऊबीज एकाच दिवशी अशी अपवादात्मक स्थिती आल्यास भाऊबीजेला सुट्टी मिळायची. बँकेत आता स्थानिक मंडळी कमी अन् बाहेरगावची, परराज्यातील मंडळींची संख्या जास्त यामुळे सणवाराला रजा मागणाऱ्यांची संख्या मोठी असायची. रजा मिळालेला स्वतःला भाग्यवान समजत असे. आम्ही स्थानिक मंडळी अशा प्रसंगी रजा घेणे टाळत असू, किंबहूना एखाद्याला रजा मिळावी म्हणून प्रसंगी मँनेजरकडे त्याची रदबदली करत असू. कामाचा खूप ताण आला तर आम्ही आहोत, काळजी करु नका असे आश्वस्त केले कि अशा मंडळींची रजा मंजूर व्हायची. बोनस मिळत असे त्या काळात होणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यामुळे आम्हाला मिळायचा.

अशीच एक दिवाळी आठवते. तेव्हा रास्ता पेठ ब्रँचला होतो. रजेवर खुपजण होते. या शाखेच टेलर काऊंटर संभाळणे हे मोठच दिव्य होत. कँश डिपॉझिट मशिन्स तेव्हा आलेली नव्हती. त्यामुळे सकाळी काऊंटर सुरु होण्याआधीच १०-१५ मिनिटे कस्टमर्सची रांग लागलेली असायची. पाच तास काऊंटर सुरु असे त्यात ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक म्हणजे प्रत्यक्ष काम २७० मिनिटे चालायच. या वेळात अक्षरशः कधी कधी ३०० व्हाउचर्स व्हायची. २२५ वगैरे म्हणजे आज "स्लँक होता" असे म्हटले जायचे. पण माझ्या कामाची पद्धत व शिस्त अशी होती कि ३.३० ला काऊंटर बंद झाले कि साधारण पुढच्या २० मिनिटात किवा फार फार तर ४ वाजेपर्यंत कँश टँली होत असे, अगदी दिवाळीच्या दिवसातला हेवी रश असला तरी !

कालच भाऊबीज झाली आणि पुनः एकदा २०११ सालचा तो भाऊबीजेचा दिवस माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला! गर्दी नेहमीप्रमाणे तुफान ! परराज्यात पैसे पाठवणाऱ्यांची जेवढी गर्दी तेवढीच पैसे काढणाऱ्यांचीही. पैसे काढणाऱ्या एकाने स्लिप सरकवली. रक्कम होती ₹२५,०००/- रांगेत किमान १५-२० जण कायम असायचे. यांत्रिक पद्धतीने हाताची बोट कॉम्पुटर की बोर्डवरुन मराभर फिरत होती. स्लिप घेतांना चेहेरा पाहिलेला असायचा त्यामुळे सही चेक केली कि F10 करुन transaction नंबर टाकायचा. नोटा हातांनी एकदा मोजायच्या मग मशिनमधे टाकून confirm करायच्या. काऊंटरवरच्या छोट्या display वर आकडा यायचा तो कस्टमर पहात असे. तरी पैसे देतांना "मोजून घ्या" अस मी म्हणायचो... म्हणायचो कसल ? तेही यांत्रिक पद्धतीने तोंडातून निघत असे. दिवाळी असल्यामुळे "हँपी दिवाली" किंवा "शुभ दीपावली" अशा शुभेच्छांची सस्मित देवाण घेवाण व्हायची !

नंतर पुढचा कस्टमर आला, तीच रक्कम होती ₹२५,०००/- त्याच प्रकारे व्यवहार पूर्ण झाला. नंतर पुढे लागोपाठ दोघांनी ₹२५,०००/- काढले. त्यापुढचा मात्र पैसै भरणारा होता पण रक्कम तीच. त्यामुळे हा आकडा डोक्यात बसला अन् त्यानेच पुढे गडबड उडवून दिली. कारण त्यानंतरच्या व्यक्तीची स्लिप होती ₹२०,०००/- ची, मी कम्प्युटरवर नोंदही त्याच रकमेची केली पण पैसे देतांना मात्र दिले ₹२५,०००/-. काऊंटर बंद झाले, ३.५० झाले तरी कँश टँली नव्हती ₹५,०००/- कमी लागत होते. मी परत एकदा आकडेमोड, नाणेवारी तपासली व व्हाउचर्स तपासू लागलो. बरोबर दहाव्या मिनिटाला ही स्लिप हाती लागली. एन्ट्री बरोबर ₹.२०,०००/-ची केली होती मात्र पैसे देतांना ₹२५,०००/- दिल्याचे स्लिपमागे नोटांचा लिहिलेला तपशील दर्शवत होता.

कम्प्युटरवर खाते नंबर टाकला व फोन नंबर, पत्ता, नाव कागदावर लिहून घेतल. फोन लावला .. नंबर अस्तित्वात नाही आवाज कानाने ऐकला. जो पत्ता होता त्यावर जायच ठरवल. जाऊन येइपर्यंत त्याच्या अकाऊंट ओपनिंग फॉर्म रोहिदासला काढून ठेवायला सांगितला. दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो तर तिथे एका कंपनीचे ऑफिस होते. मासिक हप्त्यावर ग्रुहोपयोगी वस्तू विकणाऱ्या कंपनीचे ते कार्यालय ! चौकशी करता कळले कि किरण शिलवंत हा त्यांच्या स्कीमचा सदस्य होता. अशा स्कीममधे सामील होणाऱ्या प्रत्येकाला बँक खाते काढणे सक्तीचे होते. त्यामुळे स्कीमच्या काळात अशी तीनशेहून अधिक खाती रास्ता पेठ शाखेत उघडण्यात आली होती व या सगळ्यांना ओळख म्हणून या कंपनीनेच सह्या दिल्या होत्या. माझा प्रॉब्लेम ऐकल्यावर त्या बिचाऱ्यांनी जुने रेकॉर्ड शोधून त्यांच्याकडे असलेला त्याचा घरचा पत्ता मला दिला. एक टप्पा यशस्वी पार पाडून मी ब्रँचमधे परतलो.

दिलेल्या पत्त्यावर जण्यासाठी माझ्यासोबत रोहिदास, तानाजी हे दोघे शिपाईबंधू तयार झाले. अकाऊंट ओपनिंग फॉर्म असलेला जाडजूड बाईंडर सोबत होताच. पर्वतीच्या जवळ इंदिरा जनता वसाहत बोर्डजवळ स्कूटर लावल्या. एका किराणा दुकानाबाहेर रेशनिंग धान्याचा बोर्ड दिसला. विचार केला कि इथे नक्की पत्ता कळू शकेल. चौकशी केली, अंदाज बरोबर ठरला होता. झोपडीसारखी वाटणारी दाटीवाटीने वसलेली पक्की घरे दुतर्फा होती. एका वेळी एक किवा दोन जणच जा ये करु शकतील इतका चिंचोळा रस्ता मधे होता. इतक्या लहान जागेतही प्रत्येकाच्या दारासमोर काढलेली रांगोळी त्या गरीब वस्तीचा दिवाळी आनंद व्यक्त करत होती.

काही दारात बसलेली तर काही दारात उभी असलेली मंडळी आमच्याकडे प्रश्नार्थक, संशयित नजरेने बघत होती. सोबत असणाऱ्या शिपाई बंधूंचा पांढरा ड्रेस व माझा साहेबी वाटणारा ड्रेस यामुळे आम्ही कार्पोरेशनची नोटिस बजावणारे किंवा एनपीए रिकव्हरीला आलेले वाटत होतो. त्यांच्या रोखलेल्या, भेदक भासणाऱ्या नजरांची मला थोडी भिती वाटत होती. तो कस्टमर भेटेल का ? पैसे परत मिळतील का ? या प्रश्नांची जागा काही क्षण या अनामिक भितीने घेतली होती. एखाद्या झोपडपट्टीत अवैध उद्योगधंदे चालविणाऱ्या डॉनला झडपण्यासाठी येणाऱ्या पोलिसांवर अचानक चहुकडून हल्ला होणारा चित्रपटातील सीन विनाकारण, अवेळी माझ्या डोक्यात आला आणि क्षणभर जीवाचा थरकाप उडाला. अनाहूतपणे मी चहुकडे नजर फिरवली. सगळ काही निवांत पाहून मनातल्या मनात मी हुःश केल.

तेवढ्यात तानाजी म्हणाला "साहेब, हेच घर आहे" त्याचा आवाज ऐकून मिणमिणता दिवा असलेल्या त्या अंधाऱ्या खोलीतून एक वयस्कर  ग्रुहस्थ बाहेर आला. ठेवणीतला पायजमा शर्ट असा वेश ... बहुदा दिवाळी म्हणून अंगावर आला असावा. चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह अन् भिती स्पष्ट दिसत होती. मी हात जोडून "नमस्कार दादा ! मी बँक ऑफ बरोडा, रास्ता पेठ शाखेचा कँशियर. माझ नाव ....... "  माझी ओळख करुन देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसे त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर भितीच्या जागी मंदसे स्मित उमटल पण प्रश्नचिन्ह तसच होत.

"किरण शिलवंत इथेच रहातात ना ?" माझा प्रश्न ! "व्हय, माझच पोरग हाय त्यो, पर आता कामावर गेलाय. काय काम व्हत ?" समोरुन कबूली अन् प्रतिप्रश्न ! मग मी शांतपणे समजावून सांगितल .. "दादा, आज ते बँकेत पैसे काढायला आले होते. दिवाळीमुळे खुप गर्दी होती. लागोपाठ एकाच रकमेची ₹२५,०००/- ची पेमेंट झाली. किरणच पेमेंट ₹२०,०००/- च होत पण माझ्याकडून चूक झाली, मी त्यालाही ₹२५,०००/- दिले. आता मला बँकेत कँश जुळवायची आहे. ₹५,०००/- कमी लागतयत. आमच्याकडे किरणचा जो नंबर आहे तो बंद आहे. त्यामुळे आम्ही पत्ता शोधत इथे आलो." माझ बोलण ऐकून आतून एक वयस्कर बाई बाहेर आल्या. "अहो साहेब, आत तरी या. तुमच पैस कुटबी नाय जानार. नका काळजी करु." बहुदा किरणची आई असावी. आम्ही घरात पाऊल टाकले तस .. बहुदा किरणची पत्नी असावी .. तिने एक लोखंडी घडीची खुर्चीपुढे सरकवून बसण्याची विनंती केली.

वडिल म्हणाले "साहेब, बसा मी फोन लावतो किरणला." एका फोन कॉलचा त्यांना भुर्दंड कशाला या विचाराने मी माझा फोन पुढे करत म्हटले, "दादा, याच्यावरुन लावा फोन !" त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करत व फोन लावला. "हँलो, किरण आरsss हे बँकेच साहेब घरी आल्यात बग, बोल हिकड" असे म्हणत त्यांनी माझ्याकडे फोन दिला. मी फोनवरुन बोलतांना आधी माझा परिचय दिला व मग बँकेतला घटनाक्रम सांगत विचारले कि किती पैसे काढले ?" किरण म्हणाला ₹२०,०००/- मग पुढचा प्रश्न .. कोणत्या नोटांमधे पेमेंट घेतल ? तो म्हणाला पाचशेच्या ! मी विचारल किती नोटा होत्या ? किरण म्हणाला "साहेब, मोजल्या नाहीत. अजून तसेच आहेत खिशात. तुम्ही दिले कि आम्ही डायरेक्ट खिशात टाकतो, कधीच मोजत नाही. तुमच्यावर भरवसा आहे." मी त्याच्या बोलण्याने थोडा सुखावलो आणि त्याला म्हटले कि मोजा आता, मी फोन होल्ड करतो ..." साधारण एक मिनिटानंतर पलिकडून उत्तर "साहेब, पन्नास नोटा आहेत, ₹५,०००/- जास्त आहेत." माझा जीव भांड्यात पडला. मग पैसे कुठे व कसे द्यायचे याचा निर्णय झाला अन् फोन बंद करुन मी परत दिला.

एव्हाना घरच्या मंडळींनाही सगळ्या प्रकाराचा अंदाज आला होता. म्हातारी म्हणाली "साहेब, मी बोलली नवती तुमाला कि पैस कुटबी न्हाय जानार म्हनून" मी किरणच्या प्रामाणिकपणाच कौतुक केल व त्याच श्रैय त्याच्या आई वडिलांना, त्यांच्या शिकवणूकीला दिले. "साहेब फराळ करा दिवाळीचा, तोपर्यंत चहा टाकते." किरणच्या बायकोची विनंती नाकारण्याच खर तर काहीच कारण नव्हत पण घड्याळात एव्हाना सहा वाजले होते. ब्रँचला जाऊन कँश आटपायची, मग घरी जाऊन भाऊबीजेसाठी बहिणीकडे जायच होत. त्यामुळे फराळ, चहापाणी यात वेळ घालवण शक्य नव्हत. म्हणून मी तिला म्हणालो "राहू द्या ताई आता. आम्हाला खूप ऊशीर झालाय. काम आटोपून मग बहिणीकडे जायचय, आज भाऊबीज आहे न !"

"आत्ताही तुम्ही बहिणीच्याच घरात आहात कि दादा" त्या आवाजात क्रुत्रिमता नव्हती, प्रेमाच आर्जव होत. ते एक वाक्य या मंडळींच्या मनाची श्रीमंती दाखवून गेल. या श्रीमंतीने त्या घरात पावलोपावली दिसणाऱ्या गरीबीच्या ठळक खुणा मला दिसेनाश्या झाल्या. घर, गाडी, दागदागिने यासारख्या वस्तू हा एखाद्याची श्रीमंती मोजण्याचा मापदंड असतो या माझ्या समजूतीला आज छेद गेला होता. हातावर चिमूटभर साखर ठेवण्याची माझी विनंती तिने स्वीकारली. "परत या एकदा चहाला" अशा तिच्या प्रेमळ आग्रहाला "हो नक्की येईन" अस आश्वासन दिल आणि साखर तोंडात टाकून आम्ही बाहेर पडलो. अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या सुदामाला श्रीक्रुष्णाच्या श्रीमंतीचा मोह कधीच पडला नाही. त्याच्यातल्या प्रामाणिकतेने न मागताही त्याला सारे काही मिळाल होत. तशी किरणच्या कुटूंबियावर त्या मुरलीधराची क्रुपा व्हावी अस मला क्षणभर वाटून गेल.

पुनः कधीतरी त्या घरात फराळाला जाईन अस मनाशी ठरवल होत, तस त्यांना आश्वासनही दिल होत पण नाही जमल अजून !

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment