लवासातील गेट टूगेदर
गुगलवर लवासा अस टाईप केल्यावर याला आता "घोस्ट सिटी" म्हणतात हे नव्याने कळाल असल तरी गेल्या आठवड्यात प्रत्यक्षात लवासात फिरलो त्यावेळी तेथील अर्धवट, अपूर्ण घरांचे सांगाडे, त्या घरांवर साचलेले शेवाळ्याचे थर, लोखंडी कंपाऊंड किंवा पिलर्स मधून बाहेर डोकावण्याऱ्या स्टीलवर चढलेला गंज तर काही ठिकाणी जमिनीत खचलेला बांधकाम सांगाडा अगर कललेल आख्खच्या आख्ख घर ... आमची वाहने खडबडीत रस्त्यावरून पुढे जशी जात होती तसे हे दृष्य डोळ्यापुढे सरकताना मनात एक प्रश्न डोकावून गेला कि या ओसाड गावावर "कोणत्या भुताने" आपली जादू चालवली ?
वाटेत काही घरे बांधून पूर्ण झालेली दिसत होती अन् तिथे रहाणारी माणसे पाहून मनात डोकावणाऱ्या या प्रश्नाच्या भितीची सावली छेदली जात होती. पण अशी घरे कमीच होती. बऱ्याचश्या बांधून पूर्ण झालेल्या घरांवरील कुलूपे मालकांच्या प्रतिक्षेत असावीत... कदाचित शनिवार रविवार मंडळी येत असतीलही. आमचा प्रवास सोमवारी सुरु असल्यामुळे आम्हाला कुलूपबंद घरांचे दर्शन होत होते.
पुण्यातून ८ सप्टेंबरला दुपारी माॅडर्न हायस्कूल १९७३ बॅचचे आम्ही बारा तरणेबांड म्हातारे लवासाच्या दिशेने निघालो होतो. निमित्त ??? छे !!! शाळेच्या मित्रांना एकत्र येण्यासाठी निमित्त कशाला लागतय ???
"वय काहीही असो.. तुम्ही मनाने चिरतरुण आणि सदैव प्रफुल्लित असायला हवे.."
वाचायला सोपे वाटतय ना ? जगातील समस्त सिनियर सिटीझन्स जमातीला सतावणाऱ्या या प्रश्नाला आम्ही माॅडर्नवाले मात्र निवांतपणे सामोरे जात असतो.. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मोहिंदर अमरनाथ जितक्या सहजतेने फास्ट बाॅलिंगला सामोरे जायचा ना तसेच काहीसे..
आयुष्यात सुख दुःख दोन्ही आहेच आणि अस असल तरी "जिंदगी कैसी है पहेली" हा प्रश्न सतावत असतोच ना ? पण याला "कभी ये हसाए कभी ये रुलाए" अशी मनाची समजूत घालत जीवन आनंदाने जगतांना "जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही" हे तत्वज्ञान आपल्या पिढीला माहिती आहे. मात्र रोजच्या धकाधकीत त्याचा विसर पडल्यासारखं झाल कि मग त्याला असा रिफ्रेशिंग डोस द्यायचा.. पुढचे काही महिने मस्त जातात..
लवासात आमचा चड्डी मित्र गौतम पाषाणकरच्या घरी आम्ही त्यासाठीच चाललो होतो. पाऊस थांबला होता पण पावसाळी दिवस आहेत याची जाणीव करुन देणार मस्त वातावरण ! टेमघर धरणाच्या पायथ्याशी समर्थचा गरमागरम वडापाव आणि चहा याने मस्त मूड बनला होता.. धरण काठोकाठ भरलेले.. कोणीतरी गच्च भरलेल्या भांड्याला धक्का लावल्यावर पाणी सांडावे तसे धरणाच्या सांडव्यावरुन वहाणारे पाणी पहाताना धरणाच्या भिंतीला उंदीरांनी पोखरल्याच्या गंमतीशीर बातमीची आठवण मनात उगाचच ताजी झाली.
गौतमने केलेले स्वागत आणि केलेली सोय म्हणजे त्याला "beyond star" असेच म्हणावे लागेल. या वन स्टार ते सेवन स्टार मिरवणाऱ्यांच्या सोयी या गौतमच्या अरेंजमेंटपुढे फिक्या पडाव्यात अशाच होत्या. स्वागतपर चहापान झाले आणि रस्त्यावरील खडी डोकावणाऱ्या टोकदार रस्त्यावरुन आमचा फेरफटका झाला. पुन्हा एकदा भग्न अवस्थेतील घरांचे दर्शन ... पण आता नजर सरावली होती.. कदाचित सभोवतालच्या अदृश्य भुतांनी आम्हाला प्रेमाने स्वीकारले असावे..
"सेवन कोर्स" डिनरच्या मेनूचा स्वाद घेता घेता गप्पांचा फड रंगत चालला होता. आमच्यासाठी "समयका ये पल थमसा गया है" अशी स्थिती होती.. सकाळीही ब्रेकफास्टला पोहे, डोसा, उत्तप्पा याच्या बरोबरीने फळे.. गौतमच्या अरेंजमेंटपुढे अक्षरशः नतमस्तक !!
आजच्या काळातही कृष्ण सुदामा मैत्रीच्या गोष्टींचे दाखले दिले जातात. काळ लोटला आहे, आज सुदामा सुस्थितीत आहे पण मैत्र भावना मात्र तीच आणि तशीच आहे.. अशा विलक्षण मैत्र भावनेचा अनुभव गौतमने दिला होता. "आऊटसोर्सिंग" च्या जमान्यात सगळ्या व्यवस्था स्वतः लक्ष घालून अन् मन लावून त्याने केल्या आहेत याचे खूप अप्रूप वाटले.
निरोपसमयी मैत्रीचा सुगंध सतत दरवळत रहावा म्हणून दिलेली भेटवस्तू यालाही "कौटुंबिक टच" होता.. या घोस्टसिटीत कधीही न विसरणारा प्रेमाचा अविस्मरणीय असा स्नेहानुभव दिल्याबद्दल गौतम... तुला या तुझ्या चड्डी मित्रांकडून मनःपूर्वक धन्यवाद !! या रिफ्रेशिंग डोसचा इफेक्ट दीर्घ काळ टिकेल यात शंका नाही.. अन्यथा असेच केव्हातरी पुन्हा भेटू..
बिंदुमाधव भुरे..
मैत्रीची ताकद खूप छानपणे वर्णन केली आहे! एकंदरीत सर्व वृत्तांत अप्रतिम लिहिला आहे!
ReplyDeleteहीच खरी लहानपणीची घट्ट मैत्री लेख एकदम मस्त
ReplyDeleteखूपच छान लेख लिहिला आहे
ReplyDeleteशब्द मनातले मनातच राहिले
ReplyDeleteमॉडर्न चे विद्यार्थी काय करतील त्याचा नेम नाही !!😄😂
ReplyDelete