Wednesday, December 6, 2017

हिरा आणि गारगोटी

हिरा आणि गारगोटी

गेल्या काही दिवसात गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध चॅनल्सवर अनेक नेते, पक्षप्रवक्ते वेगवेगळ्या चर्चासत्रात, मुलाखतीत व वादविवादात दिसून आले. अगदी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहापण मुलाखतीत दिसले. लोकसभेत भाषण करतांना चुकीची माफी मागणारे, चुकीचे ट्विट केल्याबद्दल माफी मागणारे, गुजरात  निवडणुक प्रचारात बेरोजगारांची प्रत्येक सभेत वेगळी आकडेवारी देणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी अशा मुलाखतीत, चर्चासत्रात कधी कधी दिसतायत त्याची मी वाट पहातोय.

कारण थेट वादविवादात, लाइव्ह मुलाखतीतच कळून येइल कि त्यांच्या चुकांचे प्रमाण कमी झालय कि काॅपी करतांना त्यांच्या अजूनही चुका होतायत ते. परदेशात विद्यार्थी वर्गासमोर त्यांनी दिलेली मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे, ती बघावी. त्यात दिलेली उत्तरे पहाता नीट तयारी व्हावी म्हणून प्रश्नांची यादी आधीच त्यांना दिली असावी असे वाटते कारण जे विद्यार्थी थेट प्रश्न विचारु इच्छित होते त्यांना मनाई केली गेली. (कारण अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आला तर बिंग फुटण्याची भिती)

जर अशा लाइव्ह वादविवादात, मुलाखतीत ते सामील झाले तर सपोर्ट सिस्टमशिवाय त्यांच्या किती चुका होतात हे कळेल अन्यथा चुकीबद्दल त्यांनी मागितलेली माफी ही ट्विटर हॅन्डलर किंवा त्यांच्या सल्लागारांच्या चुकांची आहे हे सिद्ध होईल ! काँग्रेसजनांनी त्यांना कितीवेळा संभाळून घ्यायचे व त्यांच्या प्रगल्भतेला, बुद्धिमत्तेला किती काळ झाकून ठेवायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी जनता हे सगळ अवलोकन करुन आपले मत बनवत असते, मुल्यांकन करत असते हे विसरता कामा नये.

गुजरातमधे हार्दिक, अल्पेश व जिग्नेश यांना स्वबळावर आंदोलनाद्वारे काही करण्यावर स्वाभाविक मर्यादा असल्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार घेतला (दुसरा पर्यायही नव्हताच) तर राहूल यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसलाही अशा रेडिमेड आंदोलनकारी प्लॅटफॉर्मची गरज होती. या एकत्रिकरणामुळे भाजपा राजवटीविरोधात (तसेच अॅन्टी एन्कंबन्सी या घटकामुळे) आव्हान निर्माण झाल्याचा आभास होतोय व परिणामतः काँग्रेसचा परफाॅरमन्स किंचित सुधारला असे वाटेलही पण यातून गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?

या प्रश्नाचे उत्तर सुजाण जनता पुनः भाजपाला कौल देऊन देतील असे वाटते कारण या एकत्रिकरणाचा पाया विकास नसून भाजपविरोध हा आहे आणि प्रत्येक घटकाच्या भाजपविरोधाचे कारण वेगळ असून त्यात परस्परविरोधही आहे. विकास ही निरंतर सुरुच रहाणारी प्रक्रिया असून या एकत्रिकरणात या विकासप्रक्रियेच्या प्रतिबिंबाचा तसेच तरुणाईच्या असंतोषावरील उपाययोजनांचा अभाव दिसतो आहे.

म्हणूनच काँग्रेस आज तरी गुजरात निवडणुकीकडे राहूल गांधीना नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी निकराचा प्रयत्न करण्याची प्रयोगशाळा म्हणून पहात आहे असे वाटते. या प्रयोगशाळेत हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांनी तापविलेल्या वातावरणाची तयार पार्श्वभूमि आहे व म्हणून यशाचा अंधूकसा कवडसा दिसतो आहे. अर्थात, या प्रयोगात खरा कस पक्षाचा लागणार आहे कारण त्यांना त्यांच्या नेत्याला सिद्ध करायच आहे. 

हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गुजरात राज्याच्या निवडणुक-मंथनात ज्याला पैलू पाडायचा काँग्रेसजन व पक्ष कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत तो "अनमोल हिरा" म्हणून उदयास येईल कि "गारगोटीच" राहील हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात, अपयश आल्यास काँग्रेसजनांनी सवयीच्या अनुभवातून राहुलची कवचकुंडले म्हणून सोइस्करपणे त्याचा ठपका अल्पेश, जिग्नेश व हार्दिक यांच्यावर टाकण्याचा पर्याय खुला ठेवलेला असेल व यश आल्यास राज्याभिषेक ठरलेला आहेच !

बिंदुमाधव भुरे.

No comments:

Post a Comment