Wednesday, April 21, 2021

श्रीराम नामाची श्रेष्ठता !

श्रीराम नामाची श्रेष्ठता

।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 

श्रीराम नामाचा महिमा अपार आहे. हिंदू धर्मामधे चार वेद आधारभूत मानले गेले आहेत. या चारही वेदांचे सार महाभारतात आले आहे अशी मान्यता आहे.  म्हणूनच महाभारताला पंचमवेद असे मानले गेले आहे. भगवद्गीता ही श्रीकृष्णमुखातून उद्धृत झाली आणि भीष्माचार्य जाणत होते कि श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्रीविष्णूंचा अवतार आहे ! इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या भीष्माचार्यांनी शरपंजरी असतांनाच त्या अखेरच्या क्षणांमध्ये श्रीविष्णू सहस्त्रनामाचा जप सुरु केला होता असे म्हणतात. 

श्री रामरक्षा स्तोत्र म्हणताना त्यातील अंतिम श्लोक आहे 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे 
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने 

श्रीरामाचे एक नाम घेतल्यामुळे  सहस्त्रनाम जपण्याइतके पुण्य पदरी पडते. अर्थात, विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत भाषेत आहे. तेव्हा प्रत्येकालाच त्याचा जप करणे शक्य होईल असे नाही. मात्र या श्रीरामनामाच्या जपाने विष्णू सहस्त्रनामाचे फल प्राप्त होते, महापातकांचाही नाश होतो. 

एकैकं अक्षरम् पुसां महापातक नाशनम् 
असा उल्लेख श्री रामरक्षा स्तोत्रामधे आला आहे. 

श्रीरामाचे नाम म्हणजे "ॐकाराचा अनुकल्प"अशी उपमा पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली आहे. काही गोष्टी ग्रहण करतांना त्यांची दाहकता सौम्य करण्याची आवश्यकता असते. तद्वत, ॐकाराचे सौम्य, साधे, सोपे व सरलरुप म्हणजे श्रीरामाचे नाम ! "बहु साजिरे स्वल्प सोपे फुकाचे"असे श्रीराम नामाचे वैशिष्ट्य श्री समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केले आहे. त्यामुळे श्रीराम नामाचा जप करताना उच्चारण चुकले किंवा नियम, आसन, ध्यान वगैरेंचे पालन न झाले तरी त्याची काळजी नको. जसे जमिनीत बीज पेरतांना ते उलटे आहे कि सुलटे आहे हे तपासून बघण्याची आवश्यकता नसते, त्याची फलप्राप्ती होणे हे निश्चित असते तसेच श्रीराम नामजपाचे आहे.        

स्वामीजी म्हणतात कि श्रीराम नामात "अग्निबीजाचा र, सूर्यबीजाचा अ आणि चंद्रबीजाचा म" यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा जप हा सर्व पापांचे क्षालन करुन शीतलता प्रदान करतो. श्रीराम म्हणजे साक्षात सगूण साकार ! पण मग निर्गुण निराकार ?? .. तर यातही राम आहे आणि त्यालाच आपण आत्माराम म्हणतो. हे एक आत्मतत्त्व आहे म्हणजे स्वतःला विसरुन आत्मारामाशी एकरुप होणे. बाह्य समृद्धी व आतील आत्मशांती हे दोन्ही या नामजपाने साधले जाते. 

"देहली दीपन्याय" म्हणजे घरात असणारा एकमेव दिवा जर दोन खोल्यांच्या मधे ठेवला तर दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश मिळतो‌. तद्वत जिव्हा .. जी मध्यभागी असते, त्यावर सतत श्रीरामाचे नाम असेल तर त्यामुळे आतील शांती व बाह्य समृद्धी दोन्ही प्राप्त होईल. 

श्रीराम नामाची महती सांगणारी पुराणात एक कथा आहे. श्री रामरक्षा स्तोत्रामधे सुरवातीला श्लोक आहे. 

चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् 

देव, दानव आणि मानव या तिघांनाही हे शतकोटी श्लोक हवे होते. पण त्याचे निष्पक्षपणे वाटप कोण करणार ? म्हणून हे तिघेही जण भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांनी प्रत्येकी ३३ कोटी असे वाटप केले. पण शेवटी १ कोटी उरले. मग त्याचे वाटप प्रत्येकी ३३ लाख असे केले. शेवटी १ लाख उरले. त्यांचे वाटप मग प्रत्येकी ३३ हजार असे झाले. पण शेवटी १ हजार उरले. मग भोलेनाथांनी त्याचे  नंतर प्रत्येकी ३३३ असे वाटप केल्यावर एक श्लोक उरला. आता यांचे वाटप कसे करावे ? अनुष्टूप छंदातील श्लोक असल्यामुळे यात ३२ अक्षरे होती. भोलेनाथांनी यांचे प्रत्येकी १० असे वाटप केले. शेवटी उरलेले दोन अक्षरे भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतले. ती दोनअक्षरे म्हणजे "राम" ! 

साक्षात भोलेनाथांना ज्या रामनामाचा मोह झाला ते रामनाम सदैव ओठांवर असावे. 

जानकी जीवन स्मरण जय जय राम ! 

(संदर्भ आधार : पू. स्वामी गोविंद गिरी यांची प्रवचने)

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे 
श्रीराम नवमी, २१ एप्रिल २०२१

23 comments:

  1. फारच ओघवतं व सुंदर लिखाण....

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  2. फारच. सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  3. सुरेख खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  4. क्या बात है.. खूप सोप्या आणि ओघवत्या शैलीत गहन अर्थ समजावून सांगितला 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  5. पूज्यनीय स्वामी गोविंदगिरी यांच्या प्रवचनातील संदर्भ घेऊन त्यातील फार सुंदर विचार संकलन केले आहे.त्यामुळे श्रीरामाची महती एका ठिकाणी संक्षिप्तपणे फार यथार्थपणे मांडली आहे.अतिशय सुंदर !

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  6. उत्कृष्ठ लेख --- साध्या आणि समर्पक शब्दात श्रीराम या आपल्या दैवताचे वर्णन आणि माहात्म्य कथित केलं आहे मनःपूर्वक धन्यवाद 

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  7. फारच सुंदर लेख

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद ! प्रतिक्रिया देणाऱ्याचे नाव कळू शकले नाही. कृपया कळवावे.

      Delete
  8. नेहमीप्रमाणे ओघवत्या व सुंदर भाषेत माहितीपूर्ण विवेचन.
    असेच लेखन चालू ठेवा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद ! प्रतिक्रिया देणाऱ्याचे नाव कळू शकले नाही. कृपया कळवावे.

      Delete
  9. खूप छान लेख... सुरेख विवेचन... असेच आणखी काही श्लोकांचे विवेचन अपेक्षित.
    शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद ! प्रतिक्रिया देणाऱ्याचे नाव कळू शकले नाही. कृपया कळवावे.

      Delete
  10. फारच सुरेख विवेचन.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete
  11. प्रदीप पोतनीस

    ReplyDelete
  12. फारच छान. जय श्रीराम.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद ! प्रतिक्रिया देणाऱ्याचे नाव कळू शकले नाही. कृपया कळवावे.

      Delete