Tuesday, April 20, 2021

विरहातील आर्तता

विरहातील आर्तता 

अथांग नभात विखुरुन पडलेल्या तारकांचा लख्ख प्रकाश आता मंदावू लागला आहे. अशा किती रात्री उलटून गेल्या असतील बर ? अगदी रात्रीचा अंतिम प्रहर सरेपर्यंत मी कायम तुझी चातकासारखी वाट बघितली ! माझ्या उदास ... उद्विग्न मनाची अवस्था तुझ्या लक्षात ग कशी येत नाही ? किती वाट पहायची तुझी ? 

तू नसल्यामुळे हे मन खुप उदास आहे, दुःखी आहे. मला कायमचे विरहात लोटणार असशील ..... तर ... तर तसं सांग ! अगदी जड अंतःकरणाने मी सांगतो कि .... आता माझी त्यालाही तयारी आहे पण ... पण तस सांगण्यासाठी का होईना ... एकदा तरी येऊन जा. 

तुझ्यासाठी माझ्या हृदयात असणारी अपार प्रीती, प्रेमभाव .... हे सार काही आठव ना एकदा ! माझ्या हृदयात सदैव तूच असतेस आणि या ओठांवर तुझ्या प्रीतीचे गीत ! पण तुझ्या अभावी त्या गीतांना सूर नाही हे तुला कस बर समजत नाही. ते सूर बनण्यासाठी का होईना ... निदान एकदा तरी येशील का ? 

तुझ्या सहवासातील त्या धुंद क्षणांना आठवून मी कसेबसे दिवस कंठतो आहे. आपल्या त्या अमिट मिलनाच्या आठवणींचा तो मंद प्रकाश .... त्यात मी कायमच हरपून जात असतो ... त्या मंद प्रकाशाचा तो झरोका अगदी निष्ठूरपणे विजवून टाकणार असशील तरी माझी हरकत नाही पण ..... पण त्यासाठी तरी येशील ना ? 

या जीवनात मला जे जे काही हव होते ते सार काही नशिबाने मला मिळालय‌. पण अद्यापही काही अपूऱ्या क्षणांची पूर्तता होण्याची आस हे वेड मन बाळगून आहे. ते अपूरे क्षण बनून तू येशील ना ? 

मला माहिती आहे कि तू पण माझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतेस कारण तू कधी ते प्रकट केल नाहीस पण तूला ते कधी लपवताही आल नाही ग ! आयुष्यात एकदा .... फक्त एकदा तरी तो प्रेमभाव मोकळेपणाने प्रकट करण्यासाठी येशील का ? मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंतपर्यंत वाट बघत राहीन ! 

आयुष्याचा अखेरचा श्वास ...केव्हा व कधी घेतला जाईल ? काही सांगता येत नाही. पण एका क्षणासाठी का होईना, माझ्या आयुष्यात तू पुनः येणार असशील तर त्या अंतिम श्वासालाही मी थोपवेन, त्या मृत्यूलाही मी थांबण्यासाठी आर्जवे करेन आणि त्या एका अखेरच्या श्वासात माझ्या अपूऱ्या इच्छांची, अतृप्त भेटीची पूर्तता करेन. 

तू माझ्यापासून दूर निघून गेलीस.... का गेलीस ? या विरहाचे कारण मी कोणाला सांगू ? कस सांगू ? हा विरह आता मला सहन होत नाही. मी अनंतापर्यंत तुझी वाट पहात राहीन ! तू अगदी अनपेक्षितपणे, अगदी न सांगता आलीस तरी चालेल पण मग मात्र परत जाऊ नकोस.... कधीच परत जाऊ नकोस. 

                  @@##@@##@@

प्रियतमा, सखी, प्रेमिका हिच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या जीवाची घालमेल, आर्तता, उदासीनता, उद्विग्नता व्यक्त करणारी अनेक काव्ये, रचना साहित्यात आहेत. क्षणिक विरहाच्या आड असलेली सुखाची किनार कधी मृगजळासारखी तर कधी सावली सारखी भासमान असते. कधीतरी स्वप्नवत अशा मिलनाच्या आसेची तृप्ती प्रत्यक्षात येईल हा भाव प्रियकराच्या भावनातून प्रकट होत असतो. मात्र प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या या कोमल विरही मनावर कशी बरे फुंकर मारावी ? त्याची कशी बरे समजूत काढावी.  

मराठी आणि उर्दू या दोन भाषात असलेल्या दोन अजरामर अशा काव्यरचना ... अगदी समांतर जाणाऱ्या ...... ! त्यातील साम्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न ! एक कडवे मराठीचे तर एक उर्दू काव्याचे .... असा क्रमाने स्वच्छंद अनुवाद, भावार्थ वर लिहिला आहे. पण दोनही काव्यरचनां मधील आशय भिन्न असूनही या भावार्थामधे एक कंटीन्यूटी भासते. एकात आशेचा किरण आहे, प्रियतमेबद्दल मनाला असणाऱ्या प्रेमभावात लपलेला एक आदर आहे, एक लाडिक तक्रार आहे. तर दुसऱ्या रचनेत मिलनाच्या क्षणांच्या अपेक्षा धूसर होत चालल्याचा उदास भाव, उद्विग्नता डोकावते आहे. 

एक सुधीर मोघेंची रचना ... गायक बाबूजी (पं. भीमसेन यांनी पण अप्रतिम गायिले आहे) ... काव्य आहे 
"सखी मंद झाल्या तारका .. आता तरी येशील का ?"
तर दूसरी रचना शायर अहमद फराज़ यांची ...
"रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ" 
दोन्ही रचनांमधील भावनांची मांडणी गायकांनी अशा उत्कटतेने केली आहे कि दोन्ही रचना थेट हृदयाला भिडतात. गाण्यातला भाव बाबूजी तसेच मेहंदी हसन या महान गायकांनी नेमका प्रकट केल्यामुळे ही गाणी अजरामर झाली आहेत. 

या रचना खाली उद्धृत केल्या आहेत. प्रत्येक रचनेतील एक कडवे व नंतर वरील मुक्तछंदी भावार्थ असे वाचल्यास या रचनांचा आनंद घेता येईल. 

मराठी गीत - गीतकार सुधीर मोघे

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?

हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?

उर्दू गझल - रचनाकार - अहमद फराज

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही..

© बिंदुमाधव भुरे, पुणे. 


No comments:

Post a Comment