Wednesday, February 13, 2019

मी म्हणतो तेच खर

क्रिकेटचा सामना सुरु असतो. एलबीडब्ल्यू चे अपिल मान्य करत पंच फलंदाजाला बाद देतात. फलंदाज नाबाद असल्याचा दावा करतो व पंचाशी हुज्जत घालू लागतो. पंचांनी दिलेले स्पष्टीकरण फलंदाजाला अमान्य असल्यामुळे तिसऱ्या पंचाला विचारणा केली जाते. तिसरा पंचही रिप्ले बघून फलंदाज बाद असल्याचा निर्णय  योग्य असल्याचा निर्णय देतात.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू मधल्या यष्टीवर सरळ रेषेत होता. फलंदाज बँकफूटवर होता. चेंडूला उंची नव्हती व चेंडूचा बँटला स्पर्षही झालेला दिसत नव्हता. चेंडू पायावर आदळला असल्यामुळे एलबीडब्ल्यूचा निर्णयावर संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मैदानावर व दूरचित्रवाणी संचावर सामना पहाणाऱ्या कोट्यावधी लोकांनाही हा निर्णय १००% बरोबर वाटत होता.

फलंदाजाने मग आरोप करण्यास प्रारंभ केला. तिसऱ्या पंचाने रिप्ले पाहून निर्णय दिला असला तरी ज्या कँमेऱ्याने हे चित्रित केल आहे ते कँमेरे सदोष होते, मी चेंडू बँटनेच अडवला होता, मी सरळ रेषेत उभा होतो पण मागच्या यष्टी चुकीच्या लावल्या होत्या, सदोष कँमेऱ्यामुळे चेंडू कमरेपर्यंत उसळलेला दिसून आला नाही, पंच पक्षपातीपणा मुद्दामहून करत आहेत वगैरे वगैरे.

पंच, तिसरा पंच, रिप्ले किंवा डीआरएस हे सगळे खोटे आहेत मी म्हणतो तेच बरोबर आहे असा फलंदाजाचा दावा जनतेने हास्यास्पद ठरवला होता. शालेय क्रिकेट, युनिवर्सिटी, जिल्हा, राज्य पातळीवर इतकेच नव्हे तर रणजी, इराणी, दुलिप करंडक यापैकी कोणत्याच स्तरावर न खेळता पिढीजात पुण्याईवर थेट राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूकडून वेगळी काय अपेक्षा असणार ?

सुप्रीम कोर्ट, लोकसभेतील स्पष्टीकरण, कँगचा अहवाल या सगळ्यांनी राफेलवर निर्णय देऊनही ते मान्य न करणाऱ्या राहूल गांधींशी या खेळाडुशी तुलना झाल्यास तो योगायोग समजावा.

©बिंदूमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment