Friday, February 15, 2019

आनंदी गोपाळ - एक कलाकृती

*आनंदी गोपाळ – एक कलाकृती*

 
एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते हे वाक्य कधी आणि कोणत्या प्रसंगामुळे जन्माला आले याची कल्पना नाही. पण भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान *“आनंदी गोपाळ जोशी”* यांना मिळाला. स्त्री शिक्षण म्हणजे स्वैराचार अशी समाजमानासाची धारणा असणाऱ्या काळात तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणारे तिचे पती गोपाळराव यांची भूमिका यात तितकीच महत्वाची होती. आनंदीने शिकले पाहिजे या गोपाळरावांच्या टोकाच्या हट्टाचे रुपांतर एका ध्येयात होते व नंतर तिने डॉक्टर बनावे या ध्यासाने त्यांना झपाटून टाकले जाते. त्यांच्या या हट्टाने, ध्यासाने आनंदीत जिद्द निर्माण होते व तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते. *टोकाचा अट्टाहास ते स्वप्नपूर्ती हा निग्रही खडतर प्रवास म्हणजे “आनंदी गोपाळ”!*

त्या काळातील प्रचलित प्रथेनुसार बालपणीच झालेल्या विवाहानंतर विक्षिप्तपणा हा स्वभावधर्म असणाऱ्या गोपाळरावांनी आनंदीने अभ्यास करावा, शिकावे म्हणून केलेला त्रागा, संताप अभिनेता ललित प्रभाकरने उत्तम प्रकारे प्रकट केला आहे. तिला अभ्यासावरून रागावतांना त्याने सदैव लावलेला टिपेचा सूर व त्यामुळे दबावाखाली, दडपणाखाली असलेली “आनंदी” अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने अतिशय समर्थपणे साकारली आहे. कर्मठ, सनातनी व रूढी परंपरांना कवटाळून बसलेल्या समाजातील ठेकेदारांच्या विरोधामुळे उद्विग्न होऊन धर्मांतराचा निर्णय घेणारे गोपाळराव व त्यांना संयमित पण ठाम विरोध करणारी आनंदी या प्रसंगातून *शिक्षणामुळे स्त्रीमध्ये आलेली वैचारिक प्रगल्भता दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सूचकपणे मांडली आहे.*  

 
आनंदी विदेश प्रवासाला अखेर एकटीच निघते त्यावेळी तिला निरोप देण्यासाठी चित्रित केलेल्या प्रसंगात गोपाळरावांचा नेहमीचा संतापी अन टिपेचा स्वर कातर होतो. त्यांच्या व्याकूळ स्वरातील भावुकता व हळवेपणा तसेच त्या प्रसंगी हृदयात होणारी कालवाकालव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येते. डोळ्यात जमा झालेले पण बाहेर न पडणारे अश्रू त्यांच्या स्वभावातील ममतेची, हळूवारपणाची ओळख करून देतात तेव्हा नकळत आपल्याही पापण्या ओलावतात. शेवटच्या प्रसंगात आनंदीला डॉक्टर पदवी प्रदान होतांनाही गोपाळरावांना झालेला आनंद, आपली पत्नी आपल्यापेक्षाही जास्त शिक्षित झाल्याचा वाटणारा अभिमान, तिने घेतलेल्या परिश्रमाला मनापसून केलेले वंदन हे सारे काही त्यांच्या डोळ्यात जमा झालेले आनंदाश्रू व चेहेर्यावरील भाव व्यक्त करून जातात. हा प्रसंग पाहतांना भावूक होत पुन: एकदा आपली बोटे डोळ्यांच्या ओला कडा नकळत पुसत असतात. *चित्रपटातील हे दोन्ही प्रसंग लाजबाब व त्यासाठी दिग्दर्शकासह संपूर्ण टीमची कौतुक करावे तेव्हढे थोडेच !* यानिमित्ताने संवादलेखनासाठी लेखिका इरावती कर्णिक यांचे विशेष अभिनंदन कारण १९व्या शतकातील काळ दाखविण्याचे दडपण जाणवू न देता या संवादात आशयसंपन्नता व सहजसुलभता आहे.

 

चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आनंदी हीच आहे. भेदरलेली, दडपणाखाली असलेली अबोल आनंदी, मिशनरी स्कूलमध्ये अन्यायाविरोधात भांडणारी आनंदी, धर्मांतराच्या निर्णयाला ठाम विरोध करणारी आनंदी, अशा विविध छटा भाग्यश्री मिलिंदने अप्रतिमपणे साकारल्या आहेत. पण जास्त लक्षात राहते ते ललित प्रभाकर याने साकारलेले गोपाळराव हे पात्र. सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील या व्यक्तिरेखांचे आपसातील पत्रव्यवहार याव्यतिरिक्त फारसे साहित्य उपलब्ध नसतांना त्या व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने, समर्थपणे, प्रभावीपणे उभ्या करणे हे मोठे आव्हान होते. पण ते या दोन प्रमुख कलाकारांनी यशस्वीपणे पेलले आहे कारण या भूमिका साकारण्यासाठी त्यांनी या व्यक्तिरेखांचा केलेला अभ्यास ! *अशा व्यक्तिरेखांमध्ये सर्वस्व विसरून आकंठ बुडाल्याशिवाय त्याचे वास्तववादी प्रकटीकरण होऊच शकत नाही.* पं भीमसेनजींच्या स्वरात इंद्रायणी काठी हा अभंग ऐकणारा, पहाणारा काही क्षण स्वतःला विसरुन माऊलीच्या भक्तीत नकळत एकरुप होतो कारण इतकी स्वरार्तता त्या आवाजात आहे. तद्वत चित्रपट पाहतांना पडद्यावर आपण ललित प्रभाकर किंवा भाग्यश्री मिलिंद या कलाकारांना पहात आहोत याचा काही वेळाने विसर पडतो व आपण आनंदी व गोपाळ या व्यक्तिरेखांमध्ये हरवून जातो कारण ती उत्कटता त्यांच्या अभिनयात पुरेपूर उतरली आहे. अर्थात त्यासाठी अनुकूल वातावरण नेटकेपणे उभे करतांना निवडलेली लोकेशन्स, केलेली प्रकाश व्यवस्था व हे सगळे अप्रतिमपणे टिपणारा कँमेरा यांचे योगदान तेवढेच मोलाचे आहे. भारतीय इतिहासात विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या महिलांची घेतलेली सन्मानपूर्वक चित्ररुप नोंद व त्याच्या कोलाजमधून साकारलेल्या आनंदीचे मूळ चित्र पडद्यावर शेवटी दिसते.

 
*हा करमणुकीसाठी असणारा चित्रपट नाही किवा प्रायोगीक अंगाने जाणारा चित्रपटही नाही तर ही एक रेखीव कलाकृती आहे कारण यामागे असंख्य मंडळींची दोन अडीच वर्षांपासूनची तपश्चर्या आहे आणि म्हणूनच “आनंदी गोपाळ” पाहणे हा एक समृद्ध व सुखद अनुभव आहे.*  

 ©बिंदुमाधव भुरे, पुणे.   

No comments:

Post a Comment