Thursday, March 21, 2019

बच्चनराज

*बच्चनराज*

जंजीर, दीवार, डॉन, शोले मधला बच्चन आम्हाला आवडला होता. अन्याय करणाऱ्या, शोषण करणाऱ्या सामाजिक व्यवस्थेविषयी संताप व्यक्त करणारे अँग्रेशन आम्हाला भावल होत. प्रेक्षक ते कुठेतरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी कनेक्ट करायचे. त्याच्या खर्जातल्या आवाजातल्या डायलॉग डिलिवरीवर आम्ही जाम फिदा होतो. त्याच्या आवाजात असणाऱ्या जबरदस्त कॉन्फिडन्समुळे मरगळलेल्या मनाला एक वेगळाच हुरुप मिळायचा आणि बस्स आता सार काही ठीक होणार अस वाटून मन आश्वस्त व्हायच. चुपके चुपकेतली हलकी फुलकी कॉमेडी जितकी आवडली तितकाच नमकहलाल मधला आपल्या दद्दूवर प्रेम करणारा, धन्याचे प्राण वाचविणारा इमानदार सेवक व त्याच्याआड दडलेला नकलाकारही !

पण नंतर एक काळ असा अवतरला कि बच्चन पहावेना. *आपण काहीही केल तरी लोकांना ते आवडेल असा फाजील आत्मविश्वास* त्याच्या चित्रपटातील वावरण्यातून जाणवत होता. खर सांगतो वेगळ्या धाटणीत उभा केलेला विजय दिनानाथ चौहान तेव्हा मनापासून नव्हता आवडला. अन् देशप्रेमी, महान, अजूबा वगैरे पाहिल्यावर ठरवल कि बास आता आणखी बच्चनची फालतुगिरी पहाणे नाही. *आपणच सेट केलेला बेंचमार्क पाळला नाही* तर पब्लिकच्या टाळ्या, शिट्ट्या राहिल्या दूर आख्खी इंडस्ट्री तुमच नाण आता वाजत नाही समजून तुम्हाला पर्याय शोधू लागते. एक कलाकार म्हणून त्याच्या कुवतीबाबद, क्षमतेबाबद कोणालाच शंका नव्हती पण *चूकतय म्हटल्यावर मायबाप प्रेक्षकांनी पाठ फिरवली.*

परवा टीव्हीवर मनसेचे सर्वेसर्वा राजसाहेबांच लाइव्ह भाषण ऐकतांना माझ्या मनात उगाचच बच्चन डोकावत होता. आपले पिक्चर्स चालत नाहीत म्हणून गोंधळून जाऊन नसत्या दिग्दर्शकाच्या नादी लागत हातात पडलेल दर्जाहीन स्क्रिप्टवर बच्चन बरळला तर कस वाटेल तस काहीस भाषण ऐकतांना भासत होत. *अभ्यास करुन विषय मांडणी करणारा, आपल्या भुमिकेशी ठाम रहाणारा मनस्वी नेता* म्हणून प्रथमदर्शनी मनात ठसलेल्या प्रतिमेला तडे पडण्यास पूर्वीच सुरुवात झाली होती. माणूस एक एक पायरी चढतांना प्रत्येक पायरीगणिक एक उंची गाठत असतो तेव्हा लोकांच्या अपेक्षाही उंचावत असतात. मात्र वर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येत कि या पायऱ्या घसरगुंडीच्या होत्या. आता त्यावर बसायच कि नाही हे ठरविण्याचा विवेक हरवून कस चालेल ?

चित्रपट असो कि राजकारण .. *जनतेचा कौल लक्षात घेऊन वेळीच आपली दिशा कोणती असावी हे ठरवावे लागत* अन्यथा घसरगुंडी अटळ असते! त्यानुसार घेतलेल्या माघारीचा निर्णय हापण एक प्रकारचा विजय आहे हे ठसवण्याचे कौशल्य एका ठाकरेंनी चतुराईने साधल. मात्र त्याचवेळी दुसऱ्या ठाकरेंनी घेतलेल्या विचित्र भुमिकेतून निर्माण झालेला विरोधाभास हा स्वतःच्या प्रतिमेला जात असलेले तडे आता सांधण्यापलिकडे गेल्याच द्योतक होता कारण मोदी शहा विरोधात केलेल्या आवाहनाला उपस्थितांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात नेहमीचा जोश उत्स्फुर्तपणाचा अभाव स्पष्ट दिसत होता. *आपण जे काही करतोय ते आपल्या चाहत्यांना आवडत नाही हे बच्चनने ओळखले आणि आपल्या भुमिकेत बदल केला. त्यामुळे बदलेला बच्चन आम्हाला आजही तितकाच आवडतो.*

©बिंदूमाधव भुरे, पुणे.

2 comments: