Sunday, March 31, 2019

विलिनतेतून एकात्मकता

*विलिनतेतून एकात्मकता*

आप आपले संसार थाटलेल्या मुलांच आपल एक विश्व तयार झाल. या भावविश्वात ती रमली. लहानपणी रोज होणाऱ्या गप्पा, खेळणे, भांडणे, रुसवे फुगवे या कालांतराने आठवणी बनून गेल्या. कधी काळी एकमेकांच्या बऱ्या वाईट प्रसंगात, सुख दुःखात सहभागी होणारे, एखाद्याच्या पायात काटा टोचला तर इतरांच्या डोळ्यात पाणी दाटणारे आज अस काही कळाल कि त्यांचा आपसात चौकशीचा फोन होतो. *नात्यातला ओलावा आपुलकी प्रेम प्रसंगानुरुप प्रकट होते.* माध्यम असत कधी प्रत्यक्ष भेट, कधी फोन तर कधी व्हॉटस् अप ! *प्रसंग काय यावर आणि आपल्याला सोइच काय यावर सार काही ठरत असत.*

थोरल्याकडे असलेल्या थोरलेपणामुळे आणि सगळ्यांना समजून व सामावून घेण्याच्या स्वभावामुळे सणासुदीला त्याच्याकडे एकत्र येण ठरलेल ! प्रसंगी एखादा मुक्कामही होतो. तेव्हा मात्र सहवास घडतो आणि गप्पांमधून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि मग आपआपल्या सवयीत बदल झाल्याच जाणवत. *विचार करण्याची पद्धत अन् त्याला अनुकूल वागण्यातून येणाऱ्या प्रतिक्रीया यामधे आलेले वेगळेपण सुखद स्वीकारार्ह असत तर कधी ते खटकणार, न पटणार असत.*

आज मात्र बदललेल्या परिस्थितीत *दोन्ही धाकली पाती  आपल घर सोडतायत. आपल सर्वस्व घेऊन थोरल्याकडे कायमच येतायत. यामुळे घराच्या चौकटीला आणखी मजबूती येणार आहे.* या एका छताखाली एखादी रात्र काढणे वेगळ आणि कायमस्वरुपी रहायला येण वेगळ. आपल वेगळेपण त्यागण्यासाठी मनाची तयारी झाली असली तरी धाकल्यांना आता त्यांची मानसिकता बदलावी लागेल. *या घरातील रीती व पद्धतीनुसार आपल्या जुन्या सवयीत परिवर्तन घडवून आणावे लागेल तर थोरल्याला हे परिवर्तन सुखद होण्यासाठी कधी तडजोडीची तर कधी कठोर भुमिका स्वीकारावी लागेल* आणि आपसी नात्यातली ही नव्याने घातली जात असलेली वीण भक्कम राहील हे पहावे लागेल. *एकत्र येतांना विलिनीकरणाच एक सूत्र नकळत तयार होत असत.* यातून निर्माण होत असलेल्या नात्यात *समरसता आली कि प्रत्येकाचे असलेले वेगळेपण गळून पडत* अन् एकच ओळख ठळकपणे सगळ्यांपुढे येते.

जसे *बीज तेच असल तरी त्या बहरलेल्या आम्रवृक्षाच्या फळांच्या चवीत विविधता असते.* एखाद गोड, एखाद कमी गोड किंवा जरा आंबट ! अर्थात या प्रत्येक चवीचे आपल आगळ एक वैशिष्ट्य आहेच. पण सगळ्यांचा रस एकत्रित केल्यानंतर त्याची गोडी वेगळीच असते. कमी गोडीच्या आणि जरा आंबट असलेल्या फळालाही गोड फळाचा *सहवास लाभला कि बदल घडून येतो* आणि त्या रसाच्या गोडीत हे घटक विलीन होतात.

*आज विजया आणि देना यांचा विलय होतोय. एका उज्ज्वल भवितव्यासाठी आपले वेगळेपण ते बँक ऑफ बरोडात विलीन करतायत. त्या समरसण्यातून एक आगळी-वेगळी ही गोडी निर्माण होईल व ती सगळ्यांना भावेल अशी अपेक्षा बाळगत त्यांनी यशाची नवनविन शिखरे सर करावीत यासाठी शुभेच्छा देऊया !*

© बिंदुमाधव भुरे, पुणे.
९४२३००७७६१ (what's app)
८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

No comments:

Post a Comment