Sunday, April 7, 2019

राजकारणातील त्रिशूल

राजकारणातील त्रिशूल

१९७८ साली प्रदर्शित झालेला त्रिशूल चित्रपट आठवतोय ? संजीवकुमार व अमिताभ बच्चन यांच्यात  असणाऱ्या कलह, वैर यावर आधारित हा सूडपट होता. शशीकपूर, हेमामालिनी, राखी, सचिन, पूनम धिल्लॉ यासारखी पात्रे या कथानकात जात येत असतात. पण खरा चित्रपट संजीवकुमार व अमिताभ यांच्याभोवती जास्त फिरत रहातो कारण या चित्रपटातले हे नायकच  एकमेकांचे खलनायक असतात.

परंतू फारसा लक्षात न रहाणारा आतल्या गाठीचा असा खरा खलनायकही यात आहे आणि हे पात्र रंगवलय प्रेम चोप्राने ! संजीवकुमार व प्रेम चोप्रा यांच्यात व्यावसायिक भांडण आहे व एकमेकांवर कुरघोडी करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. अमिताभ बच्चन कडूनही त्याने मार खाल्लेला आहे. त्यामुळे प्रेम चोप्राला या दोघांशीही काही घेणदेण नाही. तो या दोघांच्या भांडणात पिचला गेलेला असल्यामुळे सर्वस्व गमावून बसलेला आहे. संधी मिळेल तेव्हा दोघांचाही वचपा काढण्याची सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नाही.

संजीवकुमार व अमिताभ बच्चन यांचे वैर शेवटच्या टप्प्यात येते तेव्हा अनैतिकता हाच पाया असणारा, अस्तित्व धोक्यात आलेला, अहंकार दुखावलेला संजीवकुमार नैतिकता हेच कवच, हीच शक्ती असणाऱ्या अमिताभला संपविण्यासाठी प्रेम चोप्राकडे  याचना करतो. अनैतिकता हा व्यवसायाचा, वागणूकीचा पाया असल्यामुळे संजीवकुमारचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. पण गमावण्यासारखे काहीच नाही मिळालेच तर नैतिकता असणाऱ्या अमिताभ बच्चनला हरविण्याचे मानसिक समाधान ! या भावनेतून या वादात उडी घेतल्यामुळे प्रेम चोप्रावर काय प्रसंग ओढवला ? 

आज ४१ वर्षानंतर राजकीय पटलावर याला सार्धम्य असणाऱ्या घटना घडत असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण सध्याच्या कथानकात मोदी शहा (उद्धव) जोडगोळी हे एक पात्र, तर गांधी पवार हे दूसरे ! सर्वस्व गमावलेले व या दोघांशीही वैर असणारे तिसरे पात्र आज पहिल्या पात्राचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी यात उतरलय. यात त्याला स्वतःला काय मिळणार ठाऊक नाही पण झालाच तर दुसऱ्या पात्राचा फायदा होणार ! अर्थात आता हे तिसरे पात्र कोण ? हे सांगायची गरज नाही मात्र त्याचे भवितव्य काय ? याचे उत्तर येणारा काळच देइल.

© बिंदुमाधव भुरे, पुणे.
bnbhure@rediffmail.com

No comments:

Post a Comment